काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.
हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.
सर्वसाधारणपणे, आपल्या डोक्यात अशी संकल्पना असते, की ‘अनेकवचन’ म्हणजे एकाहून अधिक संख्येच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे वचन. परंतु, नीट विचार केला, तर ‘अनेक’ या शब्दाचा अर्थ ‘जे एक नाही ते’ असा होतो. त्यामुळे, त्यात ‘एकहून अधिक’ आणि ‘एकहून कमी’ हे दोन्ही भाग आले.
आता ‘अनेकवचन’ या पारिभाषिक शब्दाची व्याप्ती खरेच इतकी आहे का, ते पहायला हवे. यासाठी आपण शून्य ते एक यांच्यामधल्या संख्यावाचक विशेषणांचा विचार करू.
उदा.
आम्ही सर्वांनी मिळून पाव केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून पाऊण केक संपवला.
याचा अर्थ असा, की शून्य आणि एक यांच्यामधले संख्यावाचक विशेषण असल्यास ते एकवचनी मानले जाते. पण ‘अर्धा’ ची गोष्टच वेगळी आहे.
आम्ही सर्वांनी मिळून अर्धा केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून अर्धे केक संपवले.
आता इथे एक वेगळीच मजा समोर येते आहे. अर्धा या संख्यावाचक विशेषणाची विशेष्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हींत वापरता येत आहेत. परंतु, तसे करताना अर्थात फरक पडत आहे. या विशेषणाचे विशेष्य एकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘एका वस्तूचा काही भाग’ असा होतो; तर तेच विशेष्य अनेकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘अनेक नगांपैकी काही नग’ असा होतो. त्याचप्रमाणे, विशेष्याच्या वचनाबरोबर या विशेषणाचे वचनही बदलते, म्हणजेच ‘अर्धे’ चे ‘अर्धी’ होते. म्हणजे, अर्धे हे विशेषण एकाच वेळी ‘एक’ आणि ‘अनेक’ या दोन्हींत मोडते. परंतु तरीही इथे एक नियमितता आहे. ती अशी, की विशेष्याने बोधित होणारी वस्तू जर संख्येने एक (किंवा एका नगाचा काही भाग) असेल, तर ते विशेष्य एकवचनी असेल आणि जर त्याच वस्तुची संख्या एकाहून अधिक असेल, तर ते विशेष्य अनेकवचनी असेल. याचाच अर्थ असा, की ‘अर्धे’ हे विशेषण ‘एकवचनी’ आणि ‘अनेकवचनी’ असे दोन्ही असले, तरी त्याचे वचन हे ‘एक’ आणि ‘जे एक नाही ते’ या व्याख्यांनुसारच ठरते.
आता आपण ‘एक’ आणि ‘दोन’ यांच्यामधील संख्यावाचक विशेषणे घेऊया.
उदा.
दीड वाजला.
* दीड वाजले.
दीड पोळी खाल्ली.
* दीड पोळ्या खाल्ल्या.
* पावणेदोन वाजला.
पावणेदोन वाजले.
* पावणेदोन पोळी खाल्ली.
पावणेदोन पोळ्या खाल्ल्या.
म्हणजेच, दीड’ या विशेषणाचे विशेष्य केवळ एकवचनीच असू शकते; तर ‘पावणेदोन’ या विशेषणाचे विशेष्य मात्र केवळ अनेकवचनीच असते.
याचा अर्थ असा, की एकवचनाची व्याप्ती केवळ ‘एक’ पुरती मर्यादित नसून, ‘पाव’ ते ‘दीड’ इतकी आहे.
ह्म्म्म्म्म, इंटरेस्टिंग!
यातून निर्माण होणारे प्रश्नः
१- ०.००१ यांसारख्या संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
२- ऋण संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
३- आपण ‘दीड’ ला एकाहून अधिक का मानत नाही?
ता. क. हा विषय खरे म्हणजे बराच अभ्यासपूर्वक हाताळण्याचा विषय आहे. शिवाय, विविध लोकांचे ‘वचना’चे प्रयोग वेगवेगळेही असू शकतात. परंतु सध्या या लेखाकडे केवळ लाऊड थिंकिंग स्वरुपाचे लेखन म्हणून पहावे.
ऑक्टोबर 18, 2011 @ 09:26:18
interesting observation…!
ऑक्टोबर 19, 2011 @ 02:28:18
मस्तच आहे हे निरीक्षण.. कधी लक्षातच आलं नव्हतं.. सहीच !
ऑक्टोबर 19, 2011 @ 08:39:13
सुदीप आणि हेरंब, प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
ऑक्टोबर 19, 2011 @ 11:18:13
Very Intelligent!
ऑक्टोबर 19, 2011 @ 18:02:50
Expressions like ‘there is zero evidence’ (purava shuny), ‘naasti’ (zero asti) also exist.
ऑक्टोबर 21, 2011 @ 03:08:10
Thanks for your comments, Arun and Anon.
‘naasti’ is a slightly different issue. It is related to negation and not zero. ‘evidence zero’ on the other hand, is a very interesting point. It tells us that attributive ‘shunya’ and predicative ‘shunya’ have different grammatical behavior. I also think that ‘puraave shunya’ is an equally valid construction. Thanks a lot for raising this point
ऑक्टोबर 21, 2011 @ 08:36:51
Hi Archana,
Very interesting post. Looks like 1 has much more to it than meets the eye!
I just hopped to your blog and realized that I had been here before and had enjoyed your writing. I am blogrolling you so that I can reach your blog more frequently 🙂
ऑक्टोबर 24, 2011 @ 07:00:40
Thanks, Nivedita. 🙂