नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही!

वर्ग चालू असेल आणि बाईंना कळू न देता आपल्या शेजारच्या मैत्रिणीशी बोलायचं असेल, तर आपण काय करतो? आपण बाईंची नजर चुकवून हळूच तिच्या कानात पुटपुटतो. नाहीतर, आपल्या वहीवर लिहून तिला ’वाच’ असं खुणेनं सांगतो. तीच गोष्ट चार बाकं पलिकडे बसलेल्या मित्राला सांगायची असेल तर आपण काय करतो? बाईंची पाठ वळली, की हातवारे करून नाहीतर डोळ्यांनी खाणाखुणा करून त्याला सांगतो. पण सगळ्याच गोष्टी काही खाणाखुणांनी सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ, ’मला भूक लागली’ हे खूण करून सांगता येईल. पण ‘काल बाबांनी रविवारच्या आयपीएल मॅचची तिकिटं आणली’ हे खूण करून कसं सांगणार? मग चिठ्ठीवर लिहून ती पास करण्याला पर्याय उरत नाही. पण इथे एक प्रॉब्लेम असतो. ती चिठ्ठी बाईंच्या हातात सापडली, तर त्या ती वाचणार आणि आपण काय लिहिलंय ते त्यांना कळणार आणि आपल्याला ओरडा मिळणार. यावर एक-दोन उपाय आहेत, पण ते उपाय मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही कुणाला सांगणार नसाल तरच मी सांगेन. बघा हं! नंतर तुमच्या बाईंनी मला पत्रातून ओरडा दिला, तर मी पुन्हा असे उपाय सांगणार नाही!

काय करायचं, की एकतर ’च’च्या भाषेसारखी इतरांना कळणार नाही आणि फक्त आपल्या मित्रमैत्रिणींना कळेल अशी एक सिक्रेट भाषा बनवायची. आणि त्या भाषेत चिठ्ठी लिहायची. म्हणजे काय होईल, की बाईंच्या हातात चिठ्ठी पडली, तर त्यांना काय लिहिलंय ते वाचता आलं तरी त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. पण अशी भाषा बनवण्याचं काम वाटतं तितकं सोपं नाही, बरं का! पण थांबा, आपल्याकडे दुसरा उपाय आहे. शब्द तेच ठेवायचे, पण लिहिताना ते आपल्या सिक्रेट अक्षरांत लिहायचे. ती अक्षरं ’क’, ’ख’, ‘a’, ‘b’ पेक्षा वेगळी, तुम्ही स्वत: बनवलेली असायला हवीत. म्हणजे काय होईल, की बाईंना त्या शब्दांचा अर्थ कळणं तर सोडाच, पण ते शब्द वाचताही येणार नाहीत. आहे की नाही छान उपाय!

पण हा उपाय काही माझ्या सुपीक डोक्यातून उगवलेला नाही. आधी बऱ्याच गुप्तहेरांनी आणि इतरही अनेकांनी हा उपाय वापरलेला आहे. पण आज मी गोष्ट सांगणार आहे, ती चीनमधल्या एका छोट्याशा भागात बनवलेल्या सिक्रेट अक्षरांची. कोणे एके काळी चीनमधल्या हुनान प्रांतातल्या एका छोट्याशा भागात एक लिपी (म्हणजे एखादी भाषा लिहून काढण्यासाठीची अक्षरं. उदाहरणार्थ, आपली वर्णमाला किंवा इंग्रजीमधली ’alphabet’) जन्माला आली. काय झालं, त्या काळात तिथे बायकांना बऱ्याच गोष्टी करायला मनाई होती. पण त्याच गोष्टी करायचं स्वातंत्र्य पुरुषांना मात्र होतं. आपल्याकडे कसं, आपले दादालोक रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर घराबाहेर भंकस करू शकतात आणि आपल्या तायांना मात्र संध्याकाळी सातच्या आत घरात यावंच लागतं. तसेच आणि त्याहून कडक नियम होते तेव्हा चीनमध्ये.

त्या काळात चीनमधल्या पुरुषांना लिहाय-वाचायला शिकण्याचं स्वातंत्र्य होतं, आणि बायकांवर मात्र ते शिकायची बंदी होती. पण तिथल्या बायकांना तर लिहाय-वाचायचं होतं. त्यांना मुळात एकत्र जमून गाणी गायला खूप आवडायचं. त्यामुळे त्या सतत नवनवीन गाणी रचायच्या. पण त्यांना लिहिता येत नसल्याने ती गाणी जपून ठेवता यायची नाहीत. किंवा दुसऱ्या एखाद्या गावातल्या आपल्या मैत्रिणीला पाठवताही यायची नाहीत. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सरळ आपली एक सिक्रेट लिपीच तयार केली. तिचं नाव ’नु शु’. ’नु शु’ याचा त्यांच्या भाषेतला अर्थ म्हणजे ’बायकांचं लिखाण’. नु शुमधली अक्षरं बनवली ती पुरुष जी अक्षरं वापरायचे त्यांच्यात थोडे-फार फेरफार करून, जेणेकरून पुरुषांना नु शु वाचता येणार नाही. दोन्हींतला एक महत्त्वाचा फरक म्हणजे, पुरुषांची अक्षरं थोडी रुंद असायची आणि नु शुमधली अक्षरं मात्र उभट, चिंचोळी आणि तिरकी असायची. पण दिसायची मात्र फारच सुरेख!

लहान मुलींना नु शु शिकवायच्या त्या त्यांच्या आया किंवा गावातल्या इतर मोठ्या बायका. ती शिकवायची त्यांची तऱ्हाही वेगळीच होती. त्या अक्षराभोवती गुंफलेलं एक गाणं त्या गायच्या. गाताना त्या लहान मुलीचा हात हातात घेऊन तिच्या तळहातावर आपल्या बोटाने ते अक्षर रेखाटायच्या. मग ती छोटुकली ते अक्षर कागदावर लिहायचा सराव करायची आणि अशा पद्धतीने नु शु शिकायची.

नु शुमध्ये लिहिलेली गाणी ही कधी कागदावर लिहिलेली असत तर कधी कापडावर भरतकाम करून काढलेली असत. त्यामुळे त्यांचं हे लिखाण कागदाच्या पंख्यांवर आणि भरतकाम केलेल्या रुमालांवर सहज लपवता येत असे. भरतकाम करून अक्षरं काढणे हा प्रकार बहुधा फक्त याच लिपीत केला गेला आहे. तुम्हाला तर माहीत आहेच, की आपण कशाने लिहितो यानुसार आपल्या अक्षरांच्या आकारात बारीक बारीक फरक पडतात. बॉलपेनने काढलेलं अक्षर आणि शाईपेनाने काढलेलं अक्षर यांत रेषांच्या जाडीत थोडा फरक असतो. त्यातही, वेगवेगळ्या निबांची शाईपेनं वापरली तर आपल्याला एकाच अक्षराचे वेगवेगळे आकार मिळू शकतात. त्याचप्रमाणे, भरतकामाच्या या पद्धतीची छाप नु शुमधील अक्षरांवरही पडली होती. यातल्या बऱ्याचशा अक्षरांचा आकार हा भरतकामाच्या टाक्यांवर आधारित आहे.

हा एवढा खटाटोप कशासाठी, तर दोन कारणांसाठी. एक म्हणजे बायकांना लिहाय-वाचायला येतं हे पुरुषांना कळू द्यायचं नव्हतं. कारण तसं झालं असतं तर बायकांना त्याची शिक्षा भोगायला लागली असती आणि लिहिण्या-वाचण्याचा हा मार्ग त्यांना बंदही झाला असता. आणि दुसरी, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायकांच्या या लिखाणात बऱ्याचदा त्या पुरुषांबद्दल केलेल्या तक्रारी असायच्या. त्या तक्रारी पुरुषांनी वाचल्या असत्या तर…?

अशाप्रकारे, चीनमधल्या बायकांनी आपली स्वत:ची खास लिपी तयार केली. त्यातून लिहिण्यासाठी भरतकामासारख्या पद्धतींचा अभिनव वापर केला. एवढंच नव्हे, तर ही लिपी त्यांनी शतकानुतकं पुरुषांपासून लपवूनही ठेवली. आहे की नाही भारी!

हे एवढं सगळं सांगितलं पण चिनी पुरुष वापरायचे ती लिपी आणि नु शु यांच्यातला एक महत्त्वाचा फरक मी सांगितलेलाच नाही. पुरुष वापरायचे ती चित्रलिपी. म्हणजे एखादा शब्द लिहिण्यासाठी ते त्या शब्दातली अक्षरं एकापुढे एक मांडून त्यांची मालगाडी बनवत नसत, तर अख्ख्या शब्दासाठी मिळून एकच चिह्न वापरत असत. नु शुमध्ये काही शब्द एका चिन्ह्नाने लिहिले जात, तर काही शब्द अक्षरांची मालगाडी बनवून लिहीत. अख्ख्या शब्दासाठी एक चिह्न वापरणं आणि अक्षरांची मालगाडी करणं यांत काय फरक आहे, ते आपण पुढील लेखात पाहू.

———————————–

कलावृत्त या वृत्तपत्रात पूर्वप्रकाशित

भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा

नमस्कार मंडळी,

गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .

त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४
स्थळः भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, कालिना

अधिक माहितीसाठी कृपया या संस्थळाला भेट द्या- https://sites.google.com/site/paninilinguisticsolympiad/

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे आई-वडिल, शिक्षक, भाषा या विषयात रुची असणारे सर्वच भाग घेऊ शकतात.

ब्लॉगवाचक या माहितीचा उपयोग करून घेतील अशी आशा आहे.

अनुवादत्रयी-१

एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करण्यासाठी नेमकं काय काय लागतं असा विचार केला तेव्हा नजरेसमोर या तीन गोष्टी आल्या-
१. माहिती (सांस्कृतिक संदर्भ इ.)
२. साधने (कोश इ.)
३. कौशल्ये (अनावश्यक अर्थ अनुवादात आणणे कसे टाळायचे इ.)
या मालिकेच्या तीन भागांत वरील तीन गोष्टींची चर्चा मी करेन. या तीन भागांतून अनुवादप्रक्रियेच्या विविध शक्यता धुंडाळण्याचा प्रयत्न करायचा आहे; त्यांद्वारे कोणतीही नियमात्मक (प्रिस्क्रिप्टिव्ह) मांडणी करायचा उद्देश नाही.
——————————————————————

माहिती

अनुवाद करण्यासाठी लागणारी किमान माहिती/ज्ञान-
१. स्रोतभाषेच्या (ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा) केवळ आकलनापुरते ज्ञान: म्हणजेच, इंग्रजीतील एखाद्या कथेचा अनुवाद करायचा असेल, तर इंग्रजीतील शब्द, त्यांचे अर्थ, ते शब्द एखाद्या प्रकारे मांडल्यावर कोणता अर्थ समोर येतो इ. इ. गोष्टींचे ज्ञान
२. लक्ष्यभाषेत (ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा) निर्मिती करण्यासाठी आवश्यक ज्ञान: म्हणजेच, जर मराठी भाषेत अनुवाद करायचा असेल, तर विशिष्ट अर्थ दर्शवणारे मराठीतले शब्द, आपल्याला हवा तो अर्थ अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांची कशी मांडणी करावी लागेल इ. इ. गोष्टीचे ज्ञान.

थोडक्यात काय, तर स्रोतभाषा समजणे महत्त्वाचे, वापरता येणे नव्हे. याउलट, लक्ष्यभाषा वापरता येणे मात्र फारच महत्त्वाचे. एवढे आले, म्हणजे अनुवाद करता येतो. हे एवढेच अनुवादकाचे ‘क्वालिफिकेशन’ आहे असा अनेक अनुवादकांचा आणि इतर जनतेचाही समज असतो. पण फक्त एवढ्याच ज्ञानाच्या बळावर स्रोतलेखनातले घेण्याजोगे सर्व काही घेऊन त्यापैकी लक्ष्यलेखनात (अनुवादात) देण्याजोगे सर्व काही देता येईल का? याचे उत्तर ‘नाही’ हे निश्चित.

एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करताना वर दिलेल्या दोन गोष्टींखेरीज आणखीही गोष्टींची माहिती लागते-
३. स्रोतसाहित्यकृतीच्या लेखकाची लेखनशैली आणि त्यातून समोर येणारी त्याची विचारपद्धती. उदा. लेखनाला विशिष्ट लय आणण्यासाठी काही लेखक शब्दांची पुनरावृत्ती करतात.
४. स्रोतसाहित्यकृती जेव्हा लिहिली गेली त्या काळाचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इ. इ. संदर्भ. उदा. सध्याच्या वृत्तपत्रीय लेखनातील ‘आदर्श’ या विशेषणाचे दोन वेगवेगळे अर्थ होतात, व त्यातील एक अर्थ हा काही विशिष्ट घडामोडींमुळे त्या विशेषणाला नव्याने प्राप्त झालेला आहे.
५. स्रोतसाहित्यकृतीच्या विषयवस्तुची माहिती. उदा. एखाद्या पुस्तकात मासेमारीच्या प्रक्रियेचे उल्लेख येत असतील, तर त्या मजकुराचा अनुवाद करताना ती प्रक्रिया व तिची लेखनात वापरलेली परिभाषा समजून घेणे.

थोडक्यात काय, तर स्रोतसाहित्यकृतीच्या विषयामुळे त्या साहित्यकृतीत नेहमीपेक्षा वेगळे असे जे जे शब्द वापरले जातात, त्याचप्रमाणे नेहमीच्या शब्दांत आणि त्यांच्या नेहमीच्या मांडणीत कालसापेक्ष आणि लेखकसापेक्ष असे जे जे बदल घडतात ते ते सर्व या माहितीमुळे कळून येतात आणि स्रोतसाहित्यकृतीतून काय काय घेण्याजोगे आहे, याच्या आकलनाची बाजू भक्कम होते.

मूळ लेखकाला त्याच्या साहित्यकृतीतून काय मांडायचे आहे ते नीट समजून घेऊन त्याचा अनुवाद करावा असे मानणारा ‘मूळलेखकनिष्ठ’ गट या शेवटच्या तीन मुद्द्यांवर विशेष भर देताना दिसतो.

ही साहित्यकृतीसापेक्षतेची चौकट काढून टाकून इंग्रजी-मराठी यासारख्या कोणत्याही एका भाषाजोडीत कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद करताना काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते पाहू.

६. स्रोत- आणि लक्ष्यभाषा यांची वैशिष्ट्ये, त्यांची बलस्थाने आणि मर्यादा, तसेच त्यांतील परस्परसंबंध. उदा. मराठीत कर्तरी प्रयोग केल्यास क्रियापदाला लागणार्‍या प्रत्ययाद्वारे कर्त्याचे लिंग सांगावे लागते. इंग्रजीत मात्र तसे नाही. यामुळे इंग्रजीतून मराठीत अनुवाद करताना वाक्यातील कर्त्याचे लिंग पुरेसे स्पष्ट नसल्यास अडचण येऊ शकते. परंतु, मराठीच्या वैशिष्ट्यांचा नीट विचार केलेला
असल्यास कर्तरीखेरीज इतर वाक्यरचना वापरून ही समस्या सोडवणेही शक्य होऊ शकते.
७. स्रोत- आणि लक्ष्यसंस्कृती यांचे स्वरूप व वैशिष्ट्ये. उदा. इंग्रजी भाषिकांत दगडाला खंबीरतेचे प्रतीक मानले जाते, तर मराठी भाषिकांत त्याच दगडाला मूर्खपणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे
अशा रूपकांचा अनुवाद करताना दोन्ही संस्कृतींचे नीट भान असणे आवश्यक असते. याखेरीज दोन्ही संस्कृतींतील सण, चालीरीती इ. इ. गोष्टी माहीत असणे आवश्यक असतेच.
८. स्रोत- आणि लक्ष्यभाषा यांतील वाङ्मयीन परंपरेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. उदा. एखादी विशिष्ट भावना अभिव्यक्त करण्यासाठी एखाद्या भाषेत कविता हा वाङ्मयीन प्रकार वापरला जात असेल,
तर तीच भावना अभिव्यक्त करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या भाषेत गद्य हा वाङ्मयीन प्रकार वापरला जात असेल.
९. स्रोत- आणि लक्ष्यभाषा या ज्या समाजांत बोलल्या जातात, त्या समाजांचा सामाजिक, भौगोलिक, पर्यावरणीय इ. इ. इतिहास. याचे कारण असे, की या गोष्टींचा भाषेवर सतत परिणाम होत असतो.

या शेवटच्या चार गोष्टींमुळे आपला अनुवाद अधिकाधिक परिणामकारक कसा करावा, देण्याजोगे जे जे आहे, त्यातले किती देता येईल आणि जे देता येईल ते कसे द्यावे हे समजते.

आता ही भाषाजोडीसापेक्षतेचीही चौकट काढून टाकून आपल्या कक्षा आणखी विस्तारूया.
१०. भाषेचे स्वरूप- मानवी भाषा म्हणजे नेमके काय, तिच्याद्वारे संवाद कसा साधला जातो इ. गोष्टी. उदा. शब्द, प्रत्यय असा तुलनेने कमी संख्येचा कच्चा माल घेऊन मानवी भाषा तुलनेने खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप विविधता असलेले अर्थ अभिव्यक्त करू शकते. तसेच, प्रत्येक अर्थ मांडण्याचे सामर्थ्य प्रत्येक भाषेत असते. त्यासाठी ती भाषा कशी वाकवायची एवढे मात्र आपल्याला बघावे लागते. हे लक्षात घेतले की अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.
११. संस्कृतीचे स्वरूप- संस्कृती म्हणजे नेमके काय, तिचा आपल्या दैनंदिन जीवनावर किती आणि कसा प्रभाव पडतो, सर्व संस्कृतींमधील जागतिक घटक आणि त्यांचे संस्कृतीसापेक्ष आविष्कार इ. इ.
१२. वाङ्मयाचे स्वरूप- वाङ्मय म्हणजे नेमके काय, त्याचा समाजावर नेमका कसकसा प्रभाव पडतो, वाङ्मयाचा अर्थ लावण्याचा हक्क कोणाचा- मूळ लेखकाचा की वाचकाचा इ. इ.
१३. भाषा, संस्कृती आणि वाङ्मय यांच्यातील परस्परसंबंध- संस्कृती भाषेत कशी प्रतिबिंबित होते, भाषा वाङ्मय कसे घडवते आणि भाषा व वाङ्मय यांद्वारे संस्कृती कशी आकाराला येत जाते इ. इ.
१४. अनुवादाचे स्वरूप- अनुवाद म्हणजे नेमके काय, अनुवादप्रक्रियेत काय काय शक्यता असतात इ. इ. उदा. स्रोतसाहित्यकृतीच्या लेखकाने जे म्हटले आहे, तेच आणि तसेच अनुवादात तंतोतंत मांडणे अनिवार्य आहे का की अनुवादात स्रोतसाहित्यकृतीतले काय अनुवादायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार अनुवादकालाही आहे, तसे अनुवादकानेच ठरवल्यास अनुवाद चांगला की वाईट हे कसे ठरवायचे इ. इ.

या शेवटच्या पाच गोष्टींचा विचार केल्यास अनुवादासाठी पूर्वी बंद असलेले बरेचसे दरवाजे सताड उघडतात आणि अनुवादाच्या आणखी शक्यता निर्माण होतात.

अनुवादाबद्दल सिद्धांत मांडणार्‍या व्यक्ती या पाच गोष्टींचा विशेषत्वाने विचार करतात.

आता ही भाषामाध्यमसापेक्षतेचीही चौकट काढून टाकून माध्यमांतरापर्यंत (एखाद्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपट, एखाद्या सुरावटीवर आधारित एखादे नृत्य) आपले क्षितिज विस्तारता येईल. तसे केल्यास भाषा आणि तिच्यासारखी इतर माध्यमे कोणती, त्यांचे स्वरूप काय, कोणत्या माध्यमातून अर्थनिष्पत्ती कशी होते, विविध माध्यमांची बलस्थाने आणि मर्यादा काय इ. इ. गोष्टी बघाव्या लागतील.

सारांश: ‘संवाद’ हा घटक तोच राहतो, परंतु त्याच्या प्रकटीकरणासाठी वापरलेली भाषादि माध्यमे, अनेक भाषांतली एखादी विशिष्ट भाषा, प्रकटीकरण करणारा एखादा विशिष्ट भाषिक (म्हणजेच स्रोतसाहित्यकृतीचा लेखक) या घटकांमुळे अर्थ शोधायच्या जागा बदलतात. त्यानुसार ते अर्थ स्रोतसाहित्यकृतीत कोठे शोधावयाचे, त्यातले कोणते अर्थ अनुवादावेत अशी आपली इच्छा आहे, आपल्याला अनुवादायची इच्छा असलेल्या अर्थांपैकी कोणते अर्थ लक्ष्यभाषेत अनुवादणे शक्य आहे आणि ते अनुवादण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येतील हे ठरवण्यासाठी वरील १४ गोष्टींची माहिती/ज्ञान साह्यकारी ठरते.

एक बडबडगीत- ‘कडू कडू कारले’

मी कधी बडबडगीत लिहीन असं मला मुळीच वाटत नव्हतं. पण एका मित्राला चिडवायला म्हणून दोन-चार ओळी लिहिल्या आणि मग त्याने मागे लागून माझ्याकडून हे बडबडगीत पूर्ण करून घेतलं. ते इथे देते आहे.

कडू कडू कारले

एक होता _ _ _, गाव त्याचे पार्ले
आवडायचे त्याला, कडू कडू कारले

एकदा त्याने खाल्ले, गोड गोड कारले
आणि त्याचे डोके, फिर फिर फिरले

“आवडे मला कडू, आणि हे काय चारले”
असे म्हटले जिभेने, नि मानगूट त्याचे धरले

कॉफीचे पाकीट त्याने, आणले भलेथोरले
बाटलीभर कॉफी प्यायला, तरी नाही पुरले

कडूशार कोयनेल, होते घरी उरले
बादलीभर प्यायले, तरी नाही पुरले

अंगणात होते पाच, कडुनिंब पेरले
एक अख्खे झाड खाल्ले, तरी नाही पुरले

शेवटी त्याच्या डोक्यात, खरे काय ते शिरले
आणून कडू साखर, तिचे बकाणे भरले

पळून गेले जिभेवरचे, गोड उरले-सुरले
’हुश्श’ म्हणून त्याने, खाल्ले कडू कडू कारले

बडबडगीत पूर्ण करताना फार मजा आली. त्याबद्दल त्या मित्राचे आभार. 🙂

आणखी काही छायाचित्रे

सध्या मी माझ्या डिजिकॅमचा मॅक्रो मोड वापरून प्रयोग करून पाहते आहे. अशाच प्रयोगांत काढलेली काही छायाचित्रे.

 

 

पुस्तकातील खूण कराया दिले एकदा पीस सावळे*

*मूळ कवितेत ‘पांढरे’ हा शब्द आहे 🙂

 

—————————————————————————————–

 

 

लालचुटूक, काळाभोर, निळाशार, हिरवाकंच असे शब्द वापरायला मला फार आवडतं. तसाच हा पिवळाधम्मक झेंडू.

 

—————————————————————————————

 

कसा बरोब्बर “V” आकार आलाय या फुलांचा!

——————————————————————————-

ही फुले कोणती बरे?

—————————————————————————————-

चिनी गुलाब

———————————————————————

 

आधीच तो चिनी गुलाब एवढासा, त्यात त्याच्या आत आणखी चांदणीसारखी बारीक बारीक फुलं!

—————————————————————————

 

दिमाखदार!

——————————————————————

 

निळाई.

—————————————————————————

 

माझी लाडकी घाणेरी.

 

 

होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स

लोकहो, खरे म्हणजे मला तुम्हाला घाबरवायचे नाही. पण वेळच तशी आली आहे. आपल्या पृथ्वीवर एक मोठी उलथापालथ झालेली आहे. मला त्या उलथापालथीचे नेमके स्वरुप लक्षात आलेले नाही हे खरे, पण I have got a shrewd idea and my shrewd ideas normally turn out to be accurate! मला असा संशय आहे, की पुढील दोनपैकी एक गोष्ट घडलेली आहे- एकतर या पृथ्वीतलावर एक सिल्व्हरटंग जन्माला आला आहे (सिल्व्हरटंग म्हणजे एखादी कथा मोठ्याने वाचून त्यातील एखादे पात्र पुस्तकातून बाहेर काढून वास्तव जगात आणू शकणारी व्यक्ती- संदर्भ: इंकवर्ल्ड ट्रिलजी) किंवा कोणीतरी बुकजंपिंगची कला अवगत केलेली आहे (बुकजंपिंग म्हणजे वास्तव जगातून एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या पुस्तकातून दुसर्‍या पुस्तकात उड्या मारणे व त्यातील पात्रांची इतरत्र ने-आण करणे- संदर्भ: थर्सडे नेक्स्ट कादंबर्‍या), कारण बीबीसीच्या नव्या ‘शेरलॉक’ या मालिकेतला ‘शेरलॉक होम्स’ हे पात्र साकारणारा आणि इतर वेळी ‘बेनेडिक्ट कंबरबाच’ या नावाने वावरणारा इसम हा तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानव नसून डॉयलच्या कथांतला शेरलॉक होम्सच आहे अशी माझी पक्की खात्री झाली आहे.

का ते सांगण्यासाठी या शेरलॉकचे वेगळे वर्णन करण्याची गरजच नाही (आता इथून पुढे कथेतील शेरलॉक होम्स या पात्राचा उल्लेख ‘होम्स’ असा केला जाईल आणि या टीव्हीमालिकेतील शेरलॉक होम्सचा उल्लेख ‘शेरलॉक’ असा केला जाईल. हेच तत्त्व जॉन वॉटसन या पात्रालाही लागू. याचे कारण पुढे कळेलच). वॉटसनने केलेले होम्सचे सगळे वर्णन आठवा आणि वेगवेगळ्या कथांतून आपल्याला दिसलेले त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आठवा, ते सगळे या शेरलॉकशी तंतोतंत जुळतात.

पण होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत एक मोठा फरक आहे. होम्स आणि वॉटसन आहेत व्हिक्टोरियन काळातील लंडनमध्ये राहणारे, तर शेरलॉक आणि जॉन आहेत आजच्या, २१व्या शतकातल्या लंडनमध्ये राहणारे. या फरकामुळे अर्थातच होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत वरवरचे असे बरेच आनुषंगिक फरक निर्माण झाले आहेत.  होम्स घोडागाड्यांतून फिरायचा, तर शेरलॉक कॅबा उडवतोय. वॉटसन त्याच्या कथा मासिकात पाठवायचा, तर जॉन त्या कथा त्याच्या ब्लॉगवर पोस्ट करतोय. होम्स लोकांची माहिती जमवून स्वतःचे कोश बनवायचा, तर शेरलॉक मोबाईल आणि लॅपटॉपवरून इंटरनेट वापरून आपला रिसर्च करतोय. होम्स छोट्या-मोठ्या चौकश्यांसाठी तार करायचा, तर शेरलॉक टेक्स्टिंग करतोय. होम्स-वॉटसन एकमेकांना आडनावाने हाक मारायचे, तर शेरलॉक-जॉन फर्स्ट नेम बेसिसवर आहेत.

परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे, हे सगळे फरक केवळ वरवरचे. दोघांचा ‘आत्मा’ मात्र एकच. होम्स आणि शेरलॉक दोघांसाठीही गुन्ह्यांचा छडा लावणे हे प्राणवायूसारखे आहे. सोडवायला केस नसताना दोघेही कंटाळून व्यसनांना कवटाळतात. दोघांचाही सायन्स ऑफ डिडक्शनवर विश्वास आहे. दोघांपैकी कुणालाही सूर्यमालेबद्दल काही माहिती नाही आणि दोघांपैकी कोणालाही भावना कळत नाहीत.

या शेवटच्या दोन परिच्छेदांतली एक गंमत लक्षात आली का तुमच्या? या आधीच्या परिच्छेदात होम्स आणि शेरलॉक या दोघांबद्दल बोलताना मी साधा वर्तमानकाळ वापरला आहे, जणू काही त्या विधानांतून मला
त्यांचे कालातीत होम्सत्व दाखवायचे आहे. याऊलट त्याआधीच्या परिच्छेदात मात्र त्या दोघांच्या या कालातीत होम्सत्वाची कालिक प्रकटने दर्शवण्यासाठी  मी होम्स-वॉटसनबद्दल बोलताना रीती भूतकाळ वापरलाय आणि शेरलॉक-जॉनबद्दल बोलताना चालू वर्तमानकाळ वापरलाय. मी नकळतपणे केलेल्या या वाक्यरचनेतूनच मालिकेचे मुख्य उद्दिष्ट सफल झालेले दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर शेरलॉकच्या पात्राद्वारे  होम्सची व्यक्तिरेखा तिच्या गाभ्याला जराही धक्का न लागता, जशीच्या तशी आजच्या काळात आलेली आहे.

या मालिकेत केवळ पात्रेच नव्हे, तर अख्ख्या कथावस्तुचाही असा ’कालानुवाद’ केलेला आहे. पहिल्या सिझनचा पहिला भाग हा ’स्टडी इन स्कार्लेट’ वर बेतलेला होता. शेवटच्या दोन भागांत मात्र एकच अशी कथा घेतली नव्हती. याऊलट सध्या चालू असलेल्या सीझनमध्ये मात्र तिन्ही भाग एकेका कथेवर आधारलेले आहेत. पहिला भाग ’अ स्कॅंडल इन बोहेमिया’ वर आधारलेला होता, दुसरा भाग ’द हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स’ वर बेतलेला होता तर तिसरा भाग हा ’फायनल प्रॉब्लेम’चे रुपांतरण असणार आहे. एकेका कथेवर आधारित असलेल्या भागांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी त्या त्या कथेतील महत्त्वाच्या घटना, त्यांची वैशिष्ट्ये या गोष्टींना फारसा धक्का लावलेला नाही. ’द हाऊंड्स इन बॅस्करव्हिल’मध्ये एक भयानक कुत्रा हे सूत्र समान आहे. परंतू, येथे बॅस्करव्हिल हॉलच्या जागी बॅस्करव्हिल रिसर्च सेंटर आले आहे. त्या भयानक कुत्र्याच्या मागे बॅस्करव्हिल कुटुंबावरील शाप नसून जेनेटिक एक्स्पेरिमेंटेशन आहे. एकुणात काय, तर कथेचे मुख्य घटक तेच ठेवले आहेत, पण त्यांची पार्श्वभूमी कालानुरूप बदलली आहे आणि त्यामुळे त्या कथाही अधिक विश्वसनीय झाल्या आहेत. मार्क गॅटिस या मालिकालेखकाने या भागाचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेबद्दल एका मुलाखतीत दिलेली माहिती वाचनीय आहे.

या मालिकेतला हा कालानुवाद एकुणातच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. हा कालानुवाद वेगवेगळ्या स्तरांवर झालेला आहे. सगळयात पहिला आणि लगेच डोळ्यात भरणारा स्तर म्हणजे शेरलॉक आणि वॉटसन यांची वेशभूषा (डिअरस्टॉकर आणि पाईप यांचं गायब होणं), त्यांचे घर, त्यांच्या आसपासच्या वस्तू (लॅपटॉप इ.)- थोडक्यात काय, तर नेपथ्य.

पुढचा स्तर आहे, एका शॉटमध्ये एस्टॅब्लिश न करता येणाऱ्या गोष्टींचा- पात्रांचे वागणे (टेक्स्टिंग), पात्रांच्या सवयी (निकोटिन पॅचेस), त्यांचा पूर्वेतिहास (वॉटसन आणि जॉन दोघेही अफगाणिस्तानात लढले आहेत असे दाखवले आहे, परंतू दोन्ही युद्धे वेगवेगळी). या स्तरावरील कालानुवादात दोन भाग आहेत- एक एक सवय घेऊन तिचा दुसऱ्या काळातला इक्विव्हॅलंट शोधणे हा एक भाग आणि त्या इक्विव्हॅलंटवर आजच्या काळातील सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय इ. इ. परिस्थितीचा कसा परिणाम होईल याचा विचार करणे हा दुसरा भाग. म्हणजे, होम्सच्या व्हिक्टोरियन काळातील पाईपसाठी सिगारेटी हा चांगला पर्याय होता, परंतु “It’s impossible to sustain a smoking habit in London these days” असे म्हणत शेरलॉक निकोटिन पॅचेसचा आश्रय घेताना दाखवला आहे.

याच्या पुढील स्तर आहे तो संवादांच्या कालानुवादाचा. या मालिकेत बरेचसे संवाद नव्याने लिहिले आहेत. नवीन संवादांबरोबरच होम्सच्या काही लोकप्रिय संवादांचाही समावेश आहे. जसे, ‘द गेम इज अफूट’. या कारणास्तव, संवादलेखनाचेही दोन भाग बनतात- नवे संवाद अशा प्रकारे लिहिणे, की जेणेकरून त्याची भाषा व सांस्कृतिक संदर्भ आजचे असतील, तरी त्यांतून केलेली विधाने व केलेली शब्दरचना व वाक्यरचना ही त्या त्या पात्राच्या स्वभावाशी सुसंगत असेल व त्याचबरोबर ते संवाद आपल्याला मांडावयाच्या कथेला पोषक असतील. जुन्या संवादांचा कालानुवाद करताना त्यांत जे वाक्यविशेष व रुपके वापरलेली असतात, त्यांचे त्या संवादातले स्थान, कार्य, प्रभाव, काव्यात्मकता, त्यामागचा त्या पात्राचा विचार इ. गोष्टी पाहून तशा प्रकारचे नव्या भाषेतले वाक्यविशेष व नव्या संस्कृतीतली रुपके वापरायची असतात. उदा. वर उल्लेखलेला संवाद या मालिकेत ‘द गेम इज ऑन’ हे रुप घेऊन आला आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, आपल्याला सूर्यमालिकेबद्दल काहीच माहिती का नाही हे वॉटसनला सांगत असताना होम्स आपल्या स्मरणशक्तीला अ‍ॅटिकची, म्हणजे घरातल्या माळ्याची उपमा देतो. शेरलॉक मात्र अशाच प्रकारच्या संवादात स्मरणशक्तीला कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हची उपमा देतो.

पुढील स्तर आहे तो मूळ कथेतल्या मुख्य घटकांसाठी एक्विव्हॅलंट्स शोधण्याचा (मूळ कथेतील नटी आयरीन ऍडलर ही मालिकेत डॉमिनेट्रिक्स बनली आहे, तर तिच्याकडे राजघराण्यातल्या ज्या व्यक्तीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे आहेत, ती  व्यक्ती एक स्त्री आहे). येथे त्या एलिमेंट्सचे कथेतले स्थान, त्याचा कथानकावर पडणारा प्रभाव आणि त्यांचे कार्य या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार इक्विव्हॅलंट्स शोधावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणाबाबत बोलायचे झाल्यास, मूळ कथेतील छायाचित्रांचे महत्त्व हे त्यांच्यामुळे विवाहपूर्व प्रेमप्रकरणाचे बिंग फुटण्याची शक्यता असल्याने वाढले होते. आताच्या काळात विवाहपूर्व प्रेमप्रकरणे असणे वावगे नाही. त्यामुळे या छायाचित्रांची स्फोटकता राखण्यासाठी आयरीनला डॉमिनेट्रिक्स बनवलं आहे आणि राजघराण्यातली ती व्यक्ती स्त्री आहे असं दाखवलं आहे.

याच्या पुढचा स्तर आहे, तो कालानुरुप बदललेली पात्रे, बदललेली परिस्थिती, कथेतले बदललेले घटक यांमुळे कथानकाच्या बदलत जाणारय़ा ओघावर नियंत्रण आणून ते पात्रांच्या स्वभावाशी, वागण्याशी सुसंगत करणे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर या मालिकेतील मॉली या नवीन पात्राचे द्यावे लागेल. व्हिक्टोरियन काळात एखादी मुलगी होम्सवर भाळून सतत त्याच्या मागेपुढे करणे कितपत कालसुसंगत होते ते माहीत नाही, परंतु आताच्या काळात शेरलॉकच्या दिशेने कोणत्याही मुलीने पाऊल न टाकणे निव्वळ अशक्य. या कारणास्तव कदाचित मॉलीची व्यक्तिरेखा कथानकात घालण्यात आली आहे. असे असूनही शेरलॉकचे मॉलीशी होणारे बोलणे, वर्तन हे खास शेरलॉकी शैलीतले आहे. त्यामुळे मॉलीच्या व्यक्तिरेखेचा प्रवास कुठेही खटकत नाही.

या सर्व स्तरांवरच्या या यशस्वी कालानुवादामुळे ‘शेरलॉक होम्स’ ही व्यक्तिरेखा आता संकल्पनेच्या पातळीवर गेली आहे आणि डॉयलचा होम्स व गॅटिस-मोफॅटचा शेरलॉक हे त्या सांकल्पनिक ‘शेरलॉक होम्स’चे दोन वेगवेगळे कालानुवाद झाले आहेत असे वाटते. होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स यांच्यात स्रोत पात्र-लक्ष्य पात्र असे नाते आहे, असा विचार केल्यास कदाचित या कालानुवादाकडे अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येईल.

या कालानुवादानंतर मोठे आव्हान उभे राहते, ते पुस्तक ते छोटा पडदा या माध्यमांतराचे. आणि या विशिष्ट मालिकेबाबत बोलायचे झाले, तर यात कथा ज्या क्रमाने घेतल्या आहेत, तो क्रम डॉयलच्या मूळ कथाक्रमापासून भिन्न आहे. त्यामुळे मालिकेच्या पटकथालेखकांना संपूर्ण मालिकेतून जी कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यादृष्टीने कथानकात बरेच बदल केले गेले आहेत (उदा. आयरीन ऍडलर आणि मॉरियार्टीचे संगनमत).

इतक्या लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि १२० वर्षे सतत लोकांच्या वाचनात राहिलेल्या व त्यामुळे वाचकांना तोंडपाठ झालेल्या कथा मालिकाबद्ध करताना मूळ कथांना व्यापून राहिलेली एक भावना- उत्कंठा टिकवून धरण्याचे शिवधनुष्यही पटकथालेखकांना पेलायचे होते. तेही त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे, मूळ कथेतला खलनायक- जॅक स्टेपलटन हा ’द हाऊंड्स ऑफ बॅस्करव्हिल’ या भागात नाहीच आहे. त्यामुळे हे सगळे कोण घडवून आणते आहे ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते.

प्रेक्षकांना या मालिकेत खास रस वाटण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला मालिकेत दिलेले दृश्य स्वरुप. शेरलॉक जेव्हा घटनास्थळावरची एक एक वस्तू पाहतो, तेव्हा ती पाहून त्याने काढलेले एकेक निष्कर्ष आपल्याला पडद्यावर लिखित स्वरुपात दिसतात. शेरलॉक जेव्हा लंडनच्या रस्त्यांचा नकाशा आठवायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आपल्यालाही दिसू लागतो. त्यामुळे शेरलॉकच्या मनात काय चालले आहे ते आपल्याला दिसत राहते आणि हेच इतरांना कळत नाही आहे हे पाहून शेरलॉकप्रमाणेच आपल्यालाही मजा वाटते. आजवर पडद्यावर अनेक शेरलॉक होम्स पाहिले असले, तरी मनाला सर्वाधिक भुरळ पाडणारी त्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मेंदूत फिरणारी चक्रे- ती या मालिकेत दिसतात, त्यामुळे हा शेरलॉक अधिक जवळचा वाटतो. खरे म्हणजे, शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला दृश्य स्वरुप देणे हे गेल्या दोन वर्षांत आलेल्या होम्स रूपांतरणांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रॉबर्ट डाऊनी ज्युनियर अभिनीत आणि गाय रिची दिग्दर्शित ’शेरलॉक होम्स’ या चित्रपटातही ’स्लो मोशन’च्या सहाय्याने होम्सची विचारप्रक्रिया दाखवली आहे. याच चित्रपटात होम्सचे वेषांतर ज्या पद्धतीने दाखवले आहे, तेही उल्लेखनीय.

’शेरलॉक’ मालिकेच्या या भागांचे कथालेखनाच्या दृष्टीने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व भागांत डॉयलच्या ६० होम्सकथांचे विखुरलेले संदर्भ आणि त्यांची विनोदपूर्ण हाताळणी. जॉनने आपल्या ब्लॉगवर लिहिताना कथांना ’द गीक इंटरप्रीटर’, ’द स्पेकल्ड ब्लॉंड’ अशी नावे दिली आहेत. एका भागात जॉनने लपवून ठेवलेल्या सिगारेटी धुंडाळताना शेरलॉक चपला उलट्यापालट्या करून बघतो. ’अ स्टडी इन पिंक’ मध्येही एका घरात एक प्रेत सापडते, इथेही RACHE ही अक्षरे लिहिलेली सापडतात. लगेच पोलिसांचा फॉरेन्सिक एक्स्पर्ट जर्मन भाषेतल्या ’राखं’ या शब्दाबद्दल बोलू लागतो, तर होम्स त्या खोलीचे दार त्याच्या तोंडावर आपटतो, व तो शब्द ’राखं’ नसून ’रेचल’ आहे असे सांगतो आणि आपली हसून हसून पुरेवाट होते.

आता इतके चर्‍हाट लावून झाल्यावर थोडक्या शब्दांत या मालिकेचे परीक्षण द्यायचे म्हटले तर मी असे म्हणेन- बेनेडिक्ट कंबरबाचचं होम्ससदृश रुपडं, त्याने विलक्षण समज आणि संयम दाखवून केलेला अभिनय, पटकथालेखकद्वयीने केलेला उत्तम कालानुवाद हा या मालिकेचा मुख्य ऐवज, त्यावर शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला  दृश्यस्वरुप देऊन, प्रेक्षकांची उत्कंठा कायम राखण्यासाठी मूळ कथेत बदल करून आणि मूळ होम्सकथांतील विविध संदर्भाची मधूनच पेरणी करून पटकथालेखकांनी ‘प्रतिमेहूनही वास्तव उत्कट’ असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. बाकी कोणाचे असो वा नसो, माझे मन मात्र या मालिकेने नक्कीच जिंकले आहे. यासाठी सिल्वरटंग मार्क गॅटिसला आणि बुकजंपर स्टिव्हन मोफॅटला माझे मनापासून धन्यवाद.

मराठीतील कोशवाङ्मयाची यादी

मराठीत समृद्ध कोशवाङ्मय आहे, असे एक विधान नेहमी केले जाते. या विषयावर बर्‍यापैकी लेखनही केले गेले आहे. असे असूनही, या सर्व कोशवाङ्ममयाची एकत्रित यादी मिळवताना मात्र नाकी नऊ येतात. बर्‍याचदा भाषाभ्यासक, मराठीतून लेखन करणारे लेखक, भाषांतरकार, अनुवादक यांना या कोशांची गरज भासते, परंतु माहितीच्या अभावी ते या कोशांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या लेखात या कोशांची एक यादी करण्याचा प्रयत्न करते आहे. जेणेकरून इतरांना मराठीच्या शब्दकोशांचा शोध घेणे सोपे जाईल. आपल्याला जर या यादीतील कोशांव्यतिरिक्त कोणते मराठी शब्दकोश माहीत असतील, तर कृपया आपल्या प्रतिसादांत त्याचे नाव, प्रकाशकाचे नाव इ. माहिती द्या. म्हणजे एकाच ठिकाणी एक चांगली यादी तयार होईल.

जेव्हा आपण ’कोशवाङ्मय’ हा शब्द वापतो, तेव्हा त्यात दोन प्रकारचे कोश अंतर्भूत होतात.

१- आपल्या परिसरातील वस्तू, प्राणी, व्यक्ती, सांस्कृतिक संकल्पना इ. गोष्टींची माहिती देणारे कोश. उदा. संस्कृतीकोश, विश्वकोश इ.
२- भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ यांची माहिती देणारे कोश. उदा. ऑक्सफर्डचा इंग्रजी-मराठी शब्दकोश.

येथे जी यादी केली जाणार आहे, त्यात दुसऱ्या प्रकारचे शब्दकोश असतील.
————————————————————————-

मराठी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- अभिनव मराठी-मराठी शब्दकोश (५ खंड) – द. ह. अग्निहोत्री – व्हीनस प्रकाशन
२- महाराष्ट्र शब्दकोश (८ खंड)- दाते, कर्वे- वरदा प्रकाशन
३- मराठी शब्दकोश- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (या शब्दकोशाचे २ खंड येथे उपलब्ध आहेत-http://mahasahityasanskriti.maharashtra.gov.in/shoabdakosh.htm)
४- मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी- शुभदा-सारस्वत प्रकाशन
५- मराठी लाक्षणिक शब्दकोश- र. ल. उपासनी- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
६- पर्याय शब्दकोश- वि. शं. ठकार- नितीन प्रकाशन
७- विस्तारित शब्दरत्नाकर- वा. गो. आपटे, ह. अ. भावे- वरदा प्रकाशन
८- समानार्थी, विरुद्धार्थी शब्दकोश- य. ना. वालावलकर- वरदा प्रकाशन
९- मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश- भा. म. गोरे- वरदा बुक्स
१०- ग्रामीण बोलीचा शब्दकोश- द. ता. भोसले- मेहता पब्लिशिंग हाऊस
११- गावगाड्याचा शब्दकोश (संपादक, प्रकाशक यांची माहिती उपलब्ध नाही)
१२- मराठी अंत्याक्षरी शब्दकोश- हरिश्चंद्र बोरकर- अनुबंध प्रकाशन
१३- संख्या संकेत कोश- श्री. शा. हणमंते- प्रसाद प्रकाशन
१४- संकल्पनाकोश (आतापर्यंत १ खंड प्रकशित झाला आहे)- सुरेश पांडुरंग वाघे- ग्रंथाली
१५- व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश- मो. वि. भाटवडेकर- राजहंस प्रकाशन
१६- मराठी लेखन-कोश- अरुण फडके- अंकुर प्रकाशन

मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- मराठी-इंग्रजी शब्दकोश- मोल्सवर्थ
२- सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश- कृ. भा. वीरकर- अनमोल प्रकाशन
३- मराठी- इंग्रजी शब्दकोश- ह. अ. भावे- वरदा बुक्स
४- वाक्यकोश (३ खंड)- वामन केशव लेले- राजहंस प्रकाशन
५- मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे- वरदा प्रकाशन
६- मराठी-इंग्रजी शब्दकोश- एम. के. देशपांडे- परचुरे प्रकाशन

इंग्रजी भाषेतील शब्दांचे मराठीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश-
१- इंग्रजी-मराठी शब्दकोश- र. वा. धोंगडे- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
२- नवनीत ऍडव्हान्स्ड डिक्शनरी- सुधाकर प्रभुदेसाई- नवनीत प्रकाशन
३- ए कॉम्प्रिहेन्सिव्ह डिक्शनरी, इंग्लिश ऍंड मराठी- बाबा पद्मनजी- एज्युकेशन सोसायटी प्रेस

इंग्रजी-मराठी पारिभाषिक शब्दकोश-
अ- भाषा संचलनालयाचे परिभाषा कोश-
१- साहित्य समीक्षा परिभाषा कोश
२- वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश
३- शारीर परिभाषा कोश
४- कृषिशास्त्र परिभाषा कोश
५- वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश
६- मानसशास्त्र परिभाषा कोश
७- औषधशास्त्र परिभाषा कोश
८- प्रशासन वाक्प्रयोग
९- न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश
१०- धातुशास्त्र परिभाषा कोश
११- विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश
१२- संख्याशास्त्र परिभाषा कोश
१३- भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश
१४- भौतिकशास्त्र परिभाषा कोश
१५- व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
१६- यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश
१७- पदनाम कोश
१८- रसायनशास्त्र परिभाषा कोश
१९- ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश
२०- शिक्षणशास्त्र परिभाषा कोश
२१- गणितशास्त्र परिभाषा कोश
२२- विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली
२३- भूगोलशास्त्र परिभाषा कोश
२४- न्याय व्यवहार कोश
२५- वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (गणितशास्त्र, वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र)
२६- वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (वनस्पतिशास्त्र)
(यातले बरेचसे पारिभाषा कोश येथे उपलब्ध आहेत-http://www.marathibhasha.com/index.html).

ब. डायमंड पब्लिकेशन्सचे परिभाषा कोश
१- अर्थशास्त्र शब्दकोश- वि. ज. गोडबोले
२- मानसशास्त्र शब्दकोश- मुकुंद इनामदार
३- शिक्षणशास्त्र शब्दकोश- बेनझीर तांबोळी
४- ग्रंथालयशास्त्र शब्दकोश- सुजाता कोण्णूर

क. प्रगती बुक्सचे परिभाषा कोश
१- कॉमर्स डिक्शनरी- जोशी, परदेशी
२- सायन्स डिक्शनरी- विकास जोशी
३- इकॉनॉमिक्स डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
४- लॉ डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
५- मेडिकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
६- टेक्निकल डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)
७- कम्प्युटर डिक्शनरी (संपादकाचे नाव उपलब्ध नाही)

ड- इतर परिभाषा कोश
१- भौगोलिक शब्दकोश- र. भा. नाईक- वरदा बुक्स

मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दकोश-
१- भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली- भाषा संचलनालय

तुमच्या मदतीने ही यादी पुढे वाढत जाईल अशी आशा करते.

मी काढलेली काही छायाचित्रे

काही दिवसांपूर्वी एकाच प्रकारच्या फुलांची काही छायचित्रे काढली होती. ती फुले, छायाचित्रात मधेच उमटणार्‍या कुंड्यांच्या गोल कडा, सोनेरी प्रकाश या सगळ्या गोष्टींमुळे मला स्वत:ला ही छायाचित्रे मनापासून आवडली. तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे.

 

 

—————————————————————————————————————————————————

 

 

—————————————————————————————————————————————————

 

—————————————————————————————————————————————————-

 

 

—————————————————————————————————————————————————-

 

 

—————————————————————————————————————————————————

 

————————————————————————————————————————————————

‘बिफोर सनराईज’ आणि ‘बिफोर सनसेट’

 

 

‘बिफोर सनराईज’ आणि ‘बिफोर सनसेट’ हे दोन्ही चित्रपट मला अनेक कारणांसाठी आवडतात. मुळात, दोनच पात्र असणं आणि चित्रपटभर त्यांनी फक्त गप्पा मारणं, त्या गप्पांत म्हटलं तर काहीच समान नसणं आणि म्हटलं तर त्या गप्पा आणि त्यांमधलं मौन यातनं दोघांनी एकमेकांना “तू मला आवडतोस/तेस” ही एकच एक गोष्ट सांगत राहणं या गोष्टी फार आवडल्या मला. त्यातल्या छोट्या छोट्या कल्पनाही मोह पाडणार्‍या आहेत- (भाबड्या फिल्मीपणाचा आरोप होण्याची पूर्ण जाणीव असूनही येथे यादी देते आहे) ‘सनराईज’मधले ते रेस्तराँमध्ये झालेले खोट्या फोनवरचे खोटे संभाषण, ‘सनराईज’ मधलाच ‘तुमच्या आयुष्यात माझ्या कवितेने काही चांगल्या क्षणांची भर घातली, तरच पैसे द्या’ म्हणणारा भिकारी, ‘सनसेट’मधली ब्रिजवरची बाग आणि बरेच काही.

या सर्वांहून जास्त आवडली ती दिग्दर्शकाने दोन्ही चित्रपटांत वापरलेली एक क्लृप्ती. ‘सनराईज’ मध्ये सूर्योदयापूर्वी ते दोघे ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणांचे सूर्योदयानंतरचे शॉट्स चित्रपटाच्या शेवटी एकामागोमाग एक दाखवले आहेत. ‘सनसेट’ मध्ये हाच प्रकार उलट्या क्रमाने केला आहे. म्हणजे ते दोघे दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणांचे सकाळच्या कोवळ्या उन्हातले शॉट्स चित्रपट सुरू होण्यापूर्वीच क्रमाने दाखवले आहेत.

‘सनराईज’ मधले हे शॉट्स पाहताना मनात वेगवेगळे विचार उमटतात. एकतर रात्रीच्या अर्धवट अंधारातले आणि अर्धवट प्रकाशातले ते जादुई वातावरण स़काळच्या उन्हात कुठेतरी हरवून गेलेले असते. त्यात ते दोघे जिथे बसले/उभे राहिले होते, त्या जागा रिकाम्या दिसतात, त्या दोघांशिवाय वेगळ्याच, अनोळखी आणि निरर्थक वाटतात. एखाद्या ठिकाणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतच्या काही खास आठवणी असतील, तर कालांतराने त्याच ठिकाणी त्या व्यक्तीशिवाय गेल्यावर ‘इथे आपण हे बोललो, इथे आपण हे केलं’ अशा आठवणी मनात गर्दी करतात आणि थोड्या वेळाने रितेपणाची भावना मनात येते. अगदी असंच काहीसं हे शॉट्स पाहतानाही होतं

‘सनसेट’ पहिल्यांदा बघताना वेगळीच मजा झाली. त्या सर्व जागांचे शॉट्स सुरुवातीलाच पाहिलेले होते व ते पाहताना मन तितकेसे सावधही नव्हते. त्यामुळे ते दोघे त्या त्या ठिकाणी गेल्यावर सतत ‘देजा वू’चा फील येत राहिला. ‘सनसेट’ दुसर्‍यांदा बघायला घेतला तेव्हा ते शॉट्स बघून दिग्दर्शकाने काय केले आहे ते लगेच ध्यानात आले व त्या शॉट्सची एक वेगळीच रंगत आली. त्या ठिकाणांना त्या दोघांच्या त्या गप्पांचा, त्या हसण्याचा स्पर्श अजून व्हायचा आहे हे लक्षात आलं आणि जणू काही ती ठिकाणे काहीतरी वेगळे घडण्याच्या प्रतीक्षेत आपापल्या जागी उभी आहेत असं काहीसं वाटलं. शिवाय त्याच्या जोडीला ‘नाऊ वी आर टुगेदर, सिटिंग आउटसाईड इन द सनशाईन…. सून वी विल बी अपार्ट अँड सून इट विल बी नाईट’ हे पुन्हा ‘तेव्हा आणि आता’ मधला फरक अधो

रेखित करणारं गाणं.

ही प्रेक्षकांच्या स्मृती आणि भावना मॅनिप्युलेट करण्याची एक क्लृप्ती इतर दिग्दर्शकांनीही वापरली असेल. मी मात्र ती प्रथम पाहिली ती या चित्रपटद्वयींत आणि ती मला फार म्हणजे फार आवडली. असे आणखी काही चित्रपट माहीत असल्यास त्यांची नावे जरूर सुचवा.

एक तितली अनेक तितलियाँ

काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.

हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.

सर्वसाधारणपणे, आपल्या डोक्यात अशी संकल्पना असते, की ‘अनेकवचन’ म्हणजे एकाहून अधिक संख्येच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे वचन. परंतु, नीट विचार केला, तर ‘अनेक’ या शब्दाचा अर्थ ‘जे एक नाही ते’ असा होतो. त्यामुळे, त्यात ‘एकहून अधिक’ आणि ‘एकहून कमी’ हे दोन्ही भाग आले.

आता ‘अनेकवचन’ या पारिभाषिक शब्दाची व्याप्ती खरेच इतकी आहे का, ते पहायला हवे. यासाठी आपण शून्य ते एक यांच्यामधल्या संख्यावाचक विशेषणांचा विचार करू.
उदा.
आम्ही सर्वांनी मिळून पाव केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून पाऊण केक संपवला.

याचा अर्थ असा, की शून्य आणि एक यांच्यामधले संख्यावाचक विशेषण असल्यास ते एकवचनी मानले जाते. पण ‘अर्धा’ ची गोष्टच वेगळी आहे.

आम्ही सर्वांनी मिळून अर्धा केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून अर्धे केक संपवले.

आता इथे एक वेगळीच मजा समोर येते आहे. अर्धा या संख्यावाचक विशेषणाची विशेष्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हींत वापरता येत आहेत. परंतु, तसे करताना अर्थात फरक पडत आहे. या विशेषणाचे विशेष्य एकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘एका वस्तूचा काही भाग’ असा होतो; तर तेच विशेष्य अनेकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘अनेक नगांपैकी काही नग’ असा होतो. त्याचप्रमाणे, विशेष्याच्या वचनाबरोबर या विशेषणाचे वचनही बदलते, म्हणजेच ‘अर्धे’ चे ‘अर्धी’ होते. म्हणजे, अर्धे हे विशेषण एकाच वेळी ‘एक’ आणि ‘अनेक’ या दोन्हींत मोडते. परंतु तरीही इथे एक नियमितता आहे. ती अशी, की विशेष्याने बोधित होणारी वस्तू जर संख्येने एक (किंवा एका नगाचा काही भाग) असेल, तर ते विशेष्य एकवचनी असेल आणि जर त्याच वस्तुची संख्या एकाहून अधिक असेल, तर ते विशेष्य अनेकवचनी असेल. याचाच अर्थ असा, की ‘अर्धे’ हे विशेषण ‘एकवचनी’ आणि ‘अनेकवचनी’ असे दोन्ही असले, तरी त्याचे वचन हे ‘एक’ आणि ‘जे एक नाही ते’ या व्याख्यांनुसारच ठरते.

आता आपण ‘एक’ आणि ‘दोन’ यांच्यामधील संख्यावाचक विशेषणे घेऊया.
उदा.
दीड वाजला.
* दीड वाजले.
दीड पोळी खाल्ली.
* दीड पोळ्या खाल्ल्या.
* पावणेदोन वाजला.
पावणेदोन वाजले.
* पावणेदोन पोळी खाल्ली.
पावणेदोन पोळ्या खाल्ल्या.

म्हणजेच, दीड’ या विशेषणाचे विशेष्य केवळ एकवचनीच असू शकते; तर ‘पावणेदोन’ या विशेषणाचे विशेष्य मात्र केवळ अनेकवचनीच असते.

याचा अर्थ असा, की एकवचनाची व्याप्ती केवळ ‘एक’ पुरती मर्यादित नसून, ‘पाव’ ते ‘दीड’ इतकी आहे.

ह्म्म्म्म्म, इंटरेस्टिंग!

यातून निर्माण होणारे प्रश्नः
१- ०.००१ यांसारख्या संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
२- ऋण संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
३- आपण ‘दीड’ ला एकाहून अधिक का मानत नाही?

ता. क. हा विषय खरे म्हणजे बराच अभ्यासपूर्वक हाताळण्याचा विषय आहे. शिवाय, विविध लोकांचे ‘वचना’चे प्रयोग वेगवेगळेही असू शकतात. परंतु सध्या या लेखाकडे केवळ लाऊड थिंकिंग स्वरुपाचे लेखन म्हणून पहावे.

Previous Older Entries