आज कालिदास दिन! गेली अनेक वर्षे या मुहूर्तावर ‘ऋतुसंहारा’वरचे एक पोस्ट टाकायचे मनात आहे. पण त्यासाठी वेळ मिळत नाहीये. तेव्हा तोवर ही एक जुनी कविता वाचा.
मेघदूतातील यक्षपत्नीचे मनोगत
अवचित एका सायंकाळी
नभ मेघांनी भरून येई
थेंबांची मग लकेर उठता
घन चिंतेचे विरून जाती
मेघांची दुंदुभी ऐकुनी
धावत येती सखी-साजणी
प्रियतम त्यांचे येतील परतून
आनंदे नाचती अंगणी
मोद परि मज होईल कोठून
प्राणसख्याची नसता चाहूल,
नयनी माझ्या पाहून वर्षा
घनधाराही थिजून जातील
केस मोकळे कपाळ कोरे
हात रिकामे वसन फाटके
शुद्धच नाही शृंगाराची
दिन विरहाचे मोजीत बसते
दु:खपर्व हे असे चालता
देई साथ एकलीच वीणा
थेंब स्वरांचे धावत येती
भिजवुनी जाती शुष्क मनाला
आज परंतु काय जाहले
वीणेचे का ओठही मिटले
छेडून तारा अनंतवेळा
सूर तरीही का न उमटले?
सोडून मग मी नाद तयाचा
आळविते त्या सुरेल ताना
नाव प्रियाचे ज्यात गुंफले
हाय विसरले परि त्या गाना
हताश मग मी होऊन बसता
शब्द घनाचा कानी आला
म्हणे, ‘हा घे तुझ्याचसाठी
तव नाथाचा निरोप आणला…
-“जतन करून तू ठेव स्वतःला
देहभार मी जसा वाहतो
सरता वर्षा सूर्यासह मी
बघ तू कैसा झणी परततो!”‘
ऐकून हे मी आनंदाने
धावत सुटले अंगणात अन्
जलधारांचा स्पर्श लाभता
झरे मुखातून विस्मृत गान
जुलै 01, 2011 @ 08:49:15
Apratim!
जानेवारी 22, 2012 @ 10:28:17
धन्यवाद, नंदन! 🙂