बृहत्संहिता

आताच्या काळात जशी व्यावहारिक बाबींची माहिती देणारी पुस्तके लिहिली जातात तसाच ५व्या/६व्या शतकात वराहमिहिराने बृहत्संहिता नामक ग्रंथ लिहिला. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने व बारकाईने लिहिलेल्या या ग्रंथाला आजच्या पुस्तकांच्या रांगेत बसवणे तसे चूकच! या ग्रंथाच्या १०७ अध्यायांच्या यादीवर एकवार नुसती नजर जरी टाकली तरी त्यातील विषयवैविद्ध्याने थक्क व्हायला होते. आकाशातले चमत्कार, अंतरीक्षातल्या घडामोडी, त्यांचे त्याकाळच्या उपलब्ध साधनांच्या साह्याने केलेले विश्लेषण , अंदाज (काही फसलेले, काही बरोबर) इथपासून ते शकुनापशकुन , भूकंपशास्त्र, राजा-सेनापती-राजकुमार इ. च्या मुकुट , छत्रचामराच्या प्रमाणांविषयीचे नियम, वृक्षायुर्वेद, वास्तुशास्त्र , दकार्गल (जमिनीखालील पाण्याचे साठे शोधण्याचे शास्त्र), गंधशास्त्र अशी ही वाचताना दम लावणारी यादी.
          वराहमिहिराची अफाट निरीक्षणक्षमता, कुतूहल, पूर्वसुरींच्या ग्रंथसंपदेचा परिपूर्ण अभ्यास, स्वतःची काही ठाम मते व ती मुद्देसुदपणे मांडण्याची हातोटी हे सर्व पाहून मनोमन त्याला दंडवत घातला जातो.
      राहूचाराध्यायात त्याने चंद्रग्रहणामागची राहूची शक्यता मुद्देसुदपणे फेटाळून देत आपला वेगळा सिद्धांत मांडला आहे, चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पृथ्वीची छाया पडल्याने तो दिसेनासा होतो. तर सूर्यग्रहणाच्या वेळी तो सूर्य व पृथ्वीच्या मधे येतो हे त्याने तर्काच्या आधारे अचूक सांगितले. आता या २१व्या शतकात बसून वाचायला ‘त्यात काय मोठंसं’ असं आपल्याला वाटेल, परंतु त्याच्या गर्गादि पूर्वसुरींची चंद्रग्रहणाबद्दलची मते अगदीच हास्यास्पद होती. त्यामानाने वराहमिहिराचा हा सिद्धांत क्रांतिकारकच म्हटला पाहिजे. (पुस्तकातील माहितीच्या आधारे मी हे विधान करण्याचे धाडस करते आहे. चू.भू.द्या.घ्या. यानंतर मलाच कधी हे विधान चूकीचे असल्याचे आढळल्यास मी तसे येथे नमूद करेन)
         सद्योवर्षण नामक अध्यायात त्याने पाऊस पडण्याची लक्षणे कशी ओळखावीत ते सुचवले आहे. मुंग्या जेव्हा उगाचच आपली अंडी एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करतात तेव्ह लवकरच पाऊस पडेल असे ओळखावे. अत्यंत व्यावहारिक व समजायला सोपं असं लक्षण. ( माझ्या माहितीप्रमाणे नाशिक येथील एक गृहस्थ ‘पर्जन्यशास्त्रा’वर संशोधन करत आहेत, त्यात हा अध्याय अंतर्भूत होत असावा.)
          ‘भूकंपलक्षणाध्याय’ हा तर मला सर्वांत आश्चर्यकारक वाटणारा अध्याय आहे. या शास्त्रातील तज्ञानी २००१ साली झालेलेआ भुजचा भूकंप हा या अध्यायात वर्णिलेल्या लक्षणांप्रमाणे ‘इंद्रमंडल’ भूकंप या प्रकारात मोडतो असे सांगितले आहे. याहून महत्वाचे म्हणजे इंद्रमंडलभूकंपप्रवण क्षेत्राच्या यादीत सुराष्ट्र (सौराष्ट्र ??) हे नाव आहे. ( या शास्त्रावरही सध्या संशोधन चालू आहे)
          ग्रहगोचराध्याय वाचताना तर वराहमिहिराकडे ज्ञानाबरोबरच उत्तम प्रतिभाही होती हे कळून आपण त्याच्यापुढे नतमस्तक होतो. या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे या अध्यायाचा विषय एकूण ६३ श्लोकांतून मांडला आहे व प्रत्येक श्लोकात वेगळा छंद वापरला आहे. अगदी शार्दूलविक्रीडितापासून ते स्वागतापर्यंत!
           एकूणच त्या काळी हा ग्रंथ पॉकेटपोथी म्हणून लोकप्रिय व्हायला हरकत नसावी. (तेव्हा आताचं पुस्तकांचं आकर्षक स्वरूप , कागदाचं वैपुल्य, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज नव्हत्या एवढाच काय तो अडसर. हा हा हलकेच घ्यावे)
            एकदा तरी प्रत्येकाने चाळावाच असा हा ग्रंथ आहे. आपापल्या व्यवसायाच्या व एखाद्या विषयातील विशेषज्ञानाच्या दृष्टीने या ग्रंथातील एक एक अध्याय वाचला तर याहून बऱ्याच नवनवीन गोष्टी , खुब्या कळतील, प्रकाशात येतील. या ग्रंथाचा भर फलज्योतिषावर आहे हे मान्य! परंतु शकुनापशकुनाचा  भाग वगळून आपण या ग्रंथाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो. शेवटी शुभ व अशुभ यांचा अर्थ ‘हितकारक’ व ‘अहितकारक’ एवढाच घ्यायचा की तो विस्तारित करायचा हे ठरवणं तर आपल्याच हातात आहे ना!

6 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. संगीता
    सप्टेंबर 24, 2006 @ 15:53:29

    अर्चना,

    तुमचा ब्लॉग खुप आशयगर्भ आहे. विविध भाषांतरे फ़ारच वाचनिय आहेत.
    वराहमिहिर आणि त्याच्या साहित्याबद्द्ल आता माझी उत्सुकता चाळवली आहे.
    बृहत्संहिताचा अनुवाद उपलब्ध आहे का? नसल्यास तुम्ही स्वत:च अनुवाद करायला सुरुवात करा….

    संगीता
    http://kasakaay.blogspot.com/

    उत्तर

  2. संगीता
    सप्टेंबर 24, 2006 @ 15:53:46

    अर्चना,

    तुमचा ब्लॉग खुप आशयगर्भ आहे. विविध भाषांतरे फ़ारच वाचनिय आहेत.
    वराहमिहिर आणि त्याच्या साहित्याबद्द्ल आता माझी उत्सुकता चाळवली आहे.
    बृहत्संहितेचा अनुवाद उपलब्ध आहे का? नसल्यास तुम्ही स्वत:च अनुवाद करायला सुरुवात करा….

    संगीता
    http://kasakaay.blogspot.com/

    उत्तर

  3. Abhijit
    सप्टेंबर 24, 2006 @ 16:02:05

    Ultimate!
    Keep writing – I would love to read more of your stuff.

    उत्तर

  4. Shailesh S. Khandekar
    सप्टेंबर 25, 2006 @ 04:55:38

    बृहत्संहितेवरील लेख मनापासून आवडला. भारताच्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक उन्नतीचे तो एक परिमाण आहे. “जुने ते सर्वच सोने” विरूद्ध “गतकाळाची होळी झाली” या टोकाच्या भूमिका घेण्याऐवजी जुन्या ग्रंथातून आजच्या संदर्भात काही उपयुक्त ज्ञान वापरता येईल का हा विचार आपण मांडता आहात ही कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या या विचाराशी सहमत आहे.

    उत्तर

  5. Trackback: DesiPundit » Archives » बृहत्संहिता
  6. Prakash Ghatpande
    ऑक्टोबर 15, 2006 @ 14:48:19

    भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ले.शं.बा.दिक्षीत हे १८९२ चे पुस्तक वरदा बूक्सने पुन्हा प्रकाशित केले आहे.अत्यंत अभ्यासपूर्ण असे पुस्तक आहे. त्यात वराहमिहीर बाबत माहीती उपलब्ध आहे

    उत्तर

यावर आपले मत नोंदवा