मी रचलेल्या काही संस्कृत समस्यापूर्ति

तमाक्रान्ता यदा दिशः विद्युद्दीपाः प्रकाशन्ते।
  दृश्यते तच्चित्रं यथा ताराङ्गणं धराऽरूढम्॥
अर्थ- दिशांतून जेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा (घरोघरी )  विजेचे दिवे पेटतात व आसमंत उजळून टाकतात. हे दृश्य वरून पाहिले तर धरेवर तारांगण अवतरल्याचाच भास होतो

मालाकाराः इवारामे
भवन्ति सश्रमाः सर्वे।
वृक्षः यदा धनं धत्ते,
पृथ्वी च हरितायते॥

अर्थ-  झाडाला जर पैसे लागले, तर जो तो कामधंदे सोडून माळ्याप्रमाणे आपापल्या बागेत घाम गाळू लागेल व पृथ्वी पुन्हा एकदा हिरवीगार होईल.
        बागांची किड्यांपासून निगा राखण्यासाठी रसायनशास्त्राचा भाव चढेल. ५०० आणि १००० रु. च्या नोटांच्या बॉन्सायना विशेष मागणी राहील. घराबाहेर अंगण असेल तर १००, ५० च्या नोटांचे डेरेदार वृक्ष मूळ धरतील. त्यावर १० रु. च्या वेली सोडल्या जातील. घरातले कुणी परदेशी जाणार असेल तर त्या देशीच्या चलनाची रोपे मुद्दाम आयात करून हरितगृह बांधून लाडाकोडात वाढवली जातील. सत्यनारायणाची वगैरे पूजा करायची असेल तर एक महिना आधीपासूनच १ व २ रु. ची इवलीशी रोपे मागवली जातील…
क्षीणायां चंद्रकांत्यां गतश्चन्द्रिलश्चन्द्रहन्तम्।
भयात्मुक्ता: चन्द्रहर्त्रा शतचन्द्रं नभस्तलम्॥

अर्थ- चंद्रग्रहण म्हणजे राहूचं चंद्राला गिळणं. अशाच एका चंद्रग्रहण समयी चंद्राचं तेज फिकं पडू लागताच भगवान शंकरांना राहूचं हे कट कारस्थान समजतं व ते जाब विचारायला त्याला गाठतात. कोपीष्ट शंकराला समोर पाहून राहू भीतीने गर्भगळित होतो. व घाबरून आताच्या चंद्रग्रहणात गिळलेलाच नव्हे तर आधी गिळलेले सर्व चंद्र एकाच वेळी मुक्त करतो. मग काय, आकाशभर चंद्रच चंद्र पसरलेले दिसू लागतात.

यदा प्रज्वलितो अग्नि: शमनसमर्थं वारि।
शाम्यते कोऽत्र तु यदा सलिलादग्निरुत्थित:॥

‘चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए,
 सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाए?’  या गाण्याचा संस्कृतात अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. नंतर कुणीतरी लक्षात आणून दिल्याप्रमाणे या स.पू. चा एक वेगळाही अर्थ लागतो. हे सर्व वर्णन समुद्राच्या पोटातल्या वडवानलालाही लागू होते.

कटपयादि सूत्रे

दैनंदिन व्यवहारांमध्ये आपल्याला बर्‍याचदा काही अनेक आकडी संख्या लक्षात ठेवायला लागतात. उदा.- दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, वाढदिवसाच्या तारखा किंवा असे बरेच काही.

या संख्या लक्षात राहण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कटपयादि सूत्रे. कटपयादि सूत्र म्हणजे एखादा अंक एखाद्या अक्षराने दाखवणे. उदा.- कुणाचा दूरध्वनी क्रमांक १४६२१८१ असा असेल तर कटपयादि सूत्रांनुसार तो “कवतरपहट” या अक्षरांनी दाखवता येईल. ( कसे ते आपण नंतर सारणीत पाहूच) आणि हा क्रमांक लक्षात ठेवायला ह्या अक्षरांचा मिळून एक अर्थपूर्ण शब्दबंध बनवायचा उदा.- ‘केव्हा तरी पहाटे’ या सूत्रात व्यंजनांना महत्व असल्याने असे शब्द बनवता येतात. म्हणजे आता मजा बघा, अमुक एका व्यक्तिचा दूरध्वनी क्रमांक ‘केव्हा तरी पहाटे’ असा लक्षात ठेवला की कधीही विसरणे शक्य नाही, आणि त्यावरून लगेच ‘१४६२१८१ ‘ असा ‘संख्याबोध’ देखिल होतो ,आहे की नाही गंमत!

जिथे जिथे अनेक आकडी संख्या व त्या लक्षात ठेवणे गरजेचे असेल , तेथे तेथे कटपयादि सूत्रे आहेतच आपल्या दिमतीला ! हीच संकल्पना संगणकाच्या प्रणालीतही वापरता येऊ शकते याला hashing असे म्हणतात. ही प्रणाली किती प्रमाणावर वापरली जाते ते संगणकतज्ञच सांगू शकतील.

कटपयादि सूत्रे कोणती आहेत हे आपण पुढल्या भागात पाहुया पण त्याआधी पाहुया त्यांचा इतिहास-

कटपयादि सुत्रांचा उगम कुठला म्हणजे कोणत्या ग्रंथातला ह्याबाबतील मतभेद आहेत. आणि गोंधळात गोंधळ म्हणूनच की काय ह्या सूत्रांचे अनेक वेगवेगळे प्रकार प्रचलित आहेत. माझ्या आतापर्यंत वाचनात आलेली क… सूत्रे म्हणजे एक आर्यभट्टाचे, एक पिंगलाचार्यांचे आणि एक (कुणाचे ते माहित नाही) कर्नाटक संगीतात रागांची नावे ठरवण्यासाठी आधारभूत मानले गेलेले. परंतु आजच्या काळात पुन्हा ही सूत्रे वापरात आणण्याचे ठरवल्यास कोणतेही एक सूत्र सोयीनुसार निवडता येऊ शकते.

कर्नाटक संगीत , संख्या व कटपयादि सूत्रे हे त्रिकूट ऐकायला कसे वाटते? पण या ३ गोष्टी एकत्र आल्याने वेगवेगळे राग व त्यांच्या स्वरमालिका अचूकपणे लक्षात ठेवणे सोपे जाते. (माझा कर्नाटक संगीताचा अभ्यास नाही , त्यामुळे माहितीजालावरील संकेतस्थळांवर एक भाबडी श्रद्धा ठेवून ही माहिती येथे देत आहे. तात्पर्य- चू.भू. द्या. घ्या)

कर्नाटक संगीतात दोन प्रकारचे राग असतात – जनक राग व जन्य राग. या रागांना Melakarta (मेलाकार्ता असे असावेसे वाटते) राग असे म्हणतात. हे एकूण ७२ राग आहेत व अशा रितीने मांडले आहेत, की त्यांच्या स्वरमालिका एका विशिष्ट क्रमाने बदलत जातात. या क्रमातदेखिल कोणती तरी गणिती श्रेणी असावी असे मला वाटते.

अधिक माहितीसाठी http://www.geocities.com/promiserani2/melas.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. येथे सर्व राग क्रमाने दिले आहेत. केवळ नाव पाहूनच त्याच्या स्वरमालिकेचा क्रम लक्षात यावा यासाठी एक सोय म्हणून रागाचे नाव कटपयादि सूत्रात गुंफले होते.
या मांडणीसाठी वापरली गेलेली कटपयादि सूत्रे –

क ट प य – १ च त ष -६
ख ठ फ र – २ छ थ स -७
ग ड ब ल – ३ ज द ह -८
घ ढ भ व – ४ झ ध -९
ङ ण म श -५ ञ न -०

आता कसे ते आपण खालील उदाहरणांवरून पाहूया. या रागांपैकी पहिलाच राग -कनकांगी

पहिले अक्षर ‘क’. सारणीत पाहून आपल्याला समजते की ‘क’ हे अक्षर ‘१’ हा अंक दर्शवते. आणि दूसरे अक्षर ‘न’ व ते दर्शवते ‘०’. आता दोन्ही अंक उलट्या क्रमाने वाचायचे- म्हणजे १ ० न वाचता ०१ असे वाचायचे. म्हणजेच हा राग प्रथम क्रमांकाचा!

आपण वर दिलेल्या संकेतस्थळातील रागांची नावे पाहिलीत तर आपल्या लक्षात येईलच की प्रत्येक रागाचे नाव या प्रकारानेच ठरवले आहे. पहिले ३६ राग शुद्ध मध्यमेचे आहेत व पुढील ३६ हे प्रति मध्यमेचे आहेत. शिवाय या रागांचे पुन्हा ६-६ रागांत क्रमवार विभाजन केले आहे. व अशा प्रत्येक गटाला वेगळे नाव दिले आहे. त्या त्या गटाच्या नावावरून ऋषभ ,गंधार, धैवत व निषाद या चार स्वरांची कोणत्याप्रकारे मांडणी केली असेल, याचा अंदाज बांधता येतो. कर्नाटक संगीततज्ञाला हे जास्त चांगल्या रितीने समजेल. (व समजावताही येईल)

कटपयादि सूत्रांचा असा एक वेगळाच उपयोग अत्यंत खूबीने केला गेला आहे.

पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे कटपयादि सूत्रांचे २-३ प्रकार आहेत. त्यांपैकी पहिला प्रकार आपण दुसऱ्या भागात पाहिला, आता दुसरा प्रकार पाहूया. या प्रकाराचा जनक आहे आर्यभट्ट (पहिला).
वर्गाक्षराणि वर्गेऽवर्गेऽवर्गाक्षराणि कात् ङ्मौ यः।
खद्विनवके स्वरा नव वर्गेऽवर्गे नवान्त्यवर्गे वा॥
(‘वर्ग’ चा अनुप्रास लक्षात आला असेलच)
या श्लोकात त्याने मांडल्याप्रमाणे त्याची सूत्रे –
क-१ ख-२ ग-३ घ-४ ङ्-५
च-६ छ-७ ज-८ झ-९ ञ-१०
ट-११ ठ-१२ ड-१३ ढ-१४ ण-१५
त-१६ थ-१७ द-१८ ध-१९ न-२०
प-२१ फ-२२ ब-२३ भ-२४ म-२५
य-३० र-४० ल-५० व-६०
श- ७० ष-८० स-९० ह-१००

या सूत्रांचा उपयोग खगोलशास्त्रविषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला गेला. अशा ग्रंथांत बरीच आकडेमोड असते. परंतू मजकूर तर मुख्यत्वे पद्यात असतो. मग या संख्या पद्यात बसवायच्या कशा, तर त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होतं, त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणंही सोपं जात असे. त्यामुळे ही सूत्रे अत्यंत उपयोगी ठरली व पुढे बऱ्याच खगोलशास्त्रज्ञांनी आपापल्या ग्रंथांत त्यांचा वापर केला.
उदा.- ‘दीननम्रानुशास्यो’नं दिनराशिं कलेर्गतम्।
‘शिवदूता’ऽहतं हत्वा ‘पर्याप्तहृदये’न यत्॥
या श्लोकात कटपयादि सूत्रांचा पहिला प्रकार वापरलेला दिसून येतो. अवतरणचिह्नात लिहिलेले शब्द अनुक्रमे १५०२००८, ६८४५, १६८६११ ह्या संख्या दर्शवतात.

या सूत्रांचा आणखीही एक प्रकार आहे, जो पिंगलाचार्यांनी त्यांच्या छंदशास्त्र या ग्रंथात मांडला आहे. आपल्याला माहीत आहेच, की वृत्तांत लघु-गुरु पद्धत वापरली जाते. यातील लघु १ या आकड्याने तर गुरु ० या आकड्याने पूर्वी दर्शवला जात असे, श्री. सुभाष काक या अभ्यासकाचे म्हणणे आहे. त्यामुळे पिंगलाचार्यांची कटपयादि सूत्रे पुढीलप्रमाणे-
म- ००० य-१००
र-०१० स-११०
त-००१ ज-१०१
भ-०११ न-१११

या तिन्ही प्रकारापैकी पहिल्या प्रकाराचा शोध कधी लावला गेला हे आपल्याला माहीत नाही. दुसरा प्रकार निर्माण करणारा आर्यभट्ट इ. स.५व्या/६व्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. तर तिसरा प्रकार निर्माण करणारे पिंगलाचार्य (अष्टाध्यायीरचयिता पाणिनी यांचे बंधुराज) इ. स.पूर्व ५व्या शतकात होऊन गेले असावेत असे मानले जाते. म्हणजे ही कटपयादित सूत्रे किती प्राचीन आहेत, ते पाहा.

खरंच, लेखनाच्या वगैरे फारशा सुविधा नसतानाही, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयींवर मात करण्यासाठी विविध मार्ग अवलंबत सतत प्रगती करण्यासाठी झटणाऱ्या आपल्या पूर्वजांबद्दल मला अत्यंत आदर वाटतो.

नांदी

गेल्या वर्षी आम्ही फर्ग्युसनमहाविद्यालयात सादर केलेली एकांकिका- ‘अक्ष एव जयते’. ही एकांकिका जुगारावर आधारित असल्याने या अक्षक्रीडेचे आद्यदैवत शंकर पार्वती हे नटी सूत्रधार नसतील तरच नवल. तर अशा या एकांकिकेची नांदी आज देते आहे. पार्श्वभूमी समजावून सांगायला हवी, म्हणजे नांदीची मजा येइल. तर हे आमचे शंकर साहेब एकदा अक्षक्रीडेवर फिदा हो उन तिचे गुणगान गाऊ लागतात. मागे पार्वती उभी आहे हे महाशयांना माहितच नाही. तिथे पार्वती आपलीच स्तुती चाललीये हे ऐकून खूश होते, आणि शेवटी अक्षक्रीडेचे नाव ऐकले की तिच्या अंगाचा तीळपापड सुरू होतो, आणि रंगमंचावर वेगळेच नाट्य सुरू होते.
प्रिये मनोवनोदिनि, सकलसुखप्रदायिनी,
त्वमेव हि मम स्वामिनी, त्वमेव हृदयमोहिनी,
प्रतिद्वन्द्विहारिणि, जितविभवनाशिनी,
प्रिये, …….. अक्षक्रीडे, पाहि मां विलासिनि, त्राहि मां सुहासिनी।
प्रिये मनोवनोदिनि, सकलसुखप्रदायिनी ॥

कठीण शब्दांचे अर्थ- प्रतिद्वन्द्विहारिणि- प्रत्येक डावात हरवणारी, जितविभवनाशिनि- जिंकलेले धन पुन्हा लावून हरवायला लावणारी
पाहि मां/ त्राहि मां- माझे रक्षण कर.
कशी वाटली नांदी.
नांदी रचली आहे- प्रा. डॊ. मंजुषा गोखले यांनी.

भर्तृहरीचा एक श्लोक

आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात्।
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम्॥

दिवसभरात सूर्यामुळे पडणारी सावली सतत आपला आकार बदलत असते. सकाळी सूर्य उगवतो तेव्हा लांबच लांब सावली पडते. पण सूर्य जसजसा आकाशात वर वर चढू लागतो, तसतसा तिचा आकार कमीकमी होत जातो. व शेवटी सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा तर ही सावली गायबच होते. तशीच दुष्ट माणसांची मैत्री! सुरवातीला अगदी गळ्यात गळे घालतील, स्तुती करतील. पण एकदा का त्यांचा मतलब साध्य झाला, की त्यांचे उतू जाणारे प्रेम अचानक थंडावते. व कमी होत होत शेवटी ओळख दाखवण्याचीही मारामार होते. असे हे खल, चञ्चल वृत्तीचे.
त्याऊलट सज्जनांची मैत्री मात्र दिवसाच्या उत्तरार्धातल्या सावलीसारखी, सुरवातीला लहान व मग बाळसे धरणारी, दाट होत जाणारी, ती थेट जीवनाच्या काळरात्रीपर्यंत सोबत करणारी!
आपले जीवन मात्र या एका अख्ख्या दिवसासारखं असतं. कधी दुर्जनांची संगत भोगावी लागते, तर कधी सज्जनांच्या सोबतीत रमता येतं.

वधूपरीक्षा

कार्येषु मन्त्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रम्भा।
धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा॥

– एखाद्या उपवधू मुलाने ‘पर उसमे वो बात नही यार…!” असं म्हणत बऱ्याच जणींना नकार देऊन मग हे सुभाषित रचले असावे, असे का कोण जाणे पण मला नेहमी वाटते. या महाशयांची ‘वधू कशी पाहिजे’ ही यादी अंमळ लांबलेलीच दिसते.
कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या इष्ट- अनिष्ट परिणामांचा परामर्श घेऊन काय करावे व कसे करावे यासंदर्भात सल्लामसलत करता येण्याइतकी वधू हुशार असावी. तेच कार्य पूर्ण करण्याची वेळ आली, की पगारी नोकराप्रमाणे (पगार न घेताच) मान मोडून काम करण्याइतकी कार्यक्षम असावी. आईच्या मायेने (व आईच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीने…) जेवण बनवणारी व ते खाऊ घालणारी अशी ‘सुगरण’ असावी. शयनकक्षात नवऱ्याला रिझवण्यासाठी तिने साक्षात रंभा व्हावं. धार्मिक कार्यांत ‘मम’ म्हणायला सतत तयार असावं. व नवऱ्याच्या सर्व चूका पोटात घालायला, पृथ्वीइतकं क्षमाशील असावं. ( म्हणजे पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणून पृथ्वीला पाय लावायला आपण मोकळे!)
ही यादी जर उद्या या सुभाषितकाराने माहितीजालावरील वधूवरसूचक मंडळांत घातली, तरी त्याला मुलींच्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच दूर्लभ असतील, यात वाद नाही.

महाकवी कालिदासानेही अभिज्ञानशाकुंतलात याच अर्थाचा एक श्लोक लिहिला आहे. कण्व महर्षि शकुंतलेची सासरी पाठवणी करताना, सासरी कसे रहावे, यावर उपदेश करत आहेत.-
‘शूश्रूशस्व गुरून्, कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने,
भर्तुर्विप्रकृताऽपि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने, भाम्येश्वनुत्सेकिनी,
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो; वामाः कुलस्याधयः॥’
– “पोरी, सासरी वडिलधाऱ्यांची सेवा कर. सवतींशी मैत्री ठेव व सद्भावनेने वाग (!) नवऱ्याकडून काही अपराध घडला, तरी त्याला सांभाळून घे, सेवकांशी सौजन्याने वाग, हस्तिनापूराची राणी झालीस तरी गर्व बाळगू नकोस, असं वागलीस तर ‘गृहस्वामिनी’ असा तुझा गौरव होईल. आणि विपरित वागलीस, तर कुळाला बट्टा लावशील.”

सरस्वतीचा खजिना

अपूर्वः कोऽपि कोषोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्॥
प्रत्येक देवतेची काही ना काही खासियत असते. कोणा इंद्राकडे संहारक अस्त्र असतं, कोणा कृष्णाकडे जगन्मोहिनी बासरी असते, कोणा लक्ष्मीकडे दामाजीपंत असतात, तशी ही आपणा सर्वांना वंदनीय अशी वाग्देवता, हिच्याकडे एक जादूचा खजिना आहे. या खजिन्यातलं द्रव्य इतरांमध्ये वाटलं, की कमी न होता उलट वाढतं. आणि कुणालाही न देता जर तसंच साठवून ठेवलं, तर आपलं आपण कमी होतं. असं एक अजब द्रव्य या खजिन्यात भरलेलं आहे, आणि ते म्हणजे ज्ञान!

श्रीगणेशा

||श्री||

आजपासून वासरीलेखनाचा श्रीगणेशा करते आहे. यात साधारणपणे मला आवडलेली संस्कृत सुभाषिते असतील व त्याखाली मी त्यांचा माझ्या अल्पमतीप्रमाणे लावलेला अर्थ. (त्यामुळे शुद्धलेखानात किंवा अर्थ लावण्यात काही चुका झाल्या तर चु.भु.दे. घे.) कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात मंगलाचरणाने करायची असते तर मी या वासरीची सुरुवात करते महाकवी कालिदासाच्या लेखणीतून उतरलेल्या रघुवंश या महाकाव्याच्या नांदीने!

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगतः पितरौ वंदे पार्वतिपरमेश्वरौ॥
प्रत्येक महाकाव्य/नाटक/ग्रंथ मंगलाचरणाने सुरू करावा असा संस्कृत साहित्यात संकेत आहे. त्याला अनुसरून कालिदासाने ‘रघुवंश’ या महाकाव्याचा श्रीगणेशा या श्लोकाने केला. १९ सर्गांच्या या महाकाव्याला सुरुवात करताना कोणतेही विघ्न उद्भवू नये, म्हणून त्याने पार्वती व शंकराची आळवणी या श्लोकातून केली आहे. कालिदास म्हणतो, “शब्दाशिवाय अर्थ नाही आणि अर्थाशिवाय शब्द नाही. हे शब्द आणि अर्थ जसे एकमेकांशी तादात्म्य पावलेले आहेत, तसेच भगवान शंकर व देवी पार्वती, तुम्ही दोघेही एकमेकांशी तद्रुप झाला आहात. तेव्हा शब्द आणि अर्थ यांना जाणून घ्यायची इच्छा करणाऱ्या मला तुमचा आशीर्वाद लाभो.”
अर्थाला वगळा गतप्रभ झणी होतील शब्दांगणे,
शब्दांना वगळा विकेल कवडीमोलापरि हे जिणे!
अत्यंत सुंदर श्लोक आहे, जितके त्यात खोलात जाऊ तितके नवनवीन अर्थ समोर येतील. त्यावर बोलण्यासाठी ‘क्व मे अल्पविषया मति?’