एका मुखपृष्ठाचे रसग्रहण

मला ‘अनुवाद’ ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा ‘कथांतर’ नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक! अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.

मुखपृष्ठcoverpage

हे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्‍या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर ‘रशियन कथांचा भावानुवाद’ हे उपशीर्षक, त्याखाली ‘कथांतर’ हे शीर्षक, सर्वांत खाली ‘भावानुवाद’ असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.

सर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. ‘कथांतर’ हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही ‘भाषांतर’ हा शब्द येत नाही, त्याजागी ‘भाव-अनुवाद’ हा शब्द वापरलेला आहे. ‘भावानुवाद’ या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.

भाषांतर या शब्दाचा विग्रह ‘दुसरी भाषा’ आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्‍या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्‍या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे! यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.

पण प्रत्यक्षात तसे होत नाही!

कथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत ‘दिवसाचा मध्य’ या अर्थाने वापरल्या जाणार्‍या ‘मध्याह्न’ या शब्दासाठी कुरुक भाषेत ‘जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा’ अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ ‘दुपारी १२ वाजताची वेळ’ असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी ‘आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी ‘जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा ‘उन्हे डोक्यावर येणे’ हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी ‘जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन’ असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक ‘मराठी’ वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.

म्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा ‘ती’च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.

अशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय?

वरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.

इथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना ‘भाषांतर’ न म्हणता ‘भाव-अनुवाद’ असे म्हणते.

मूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.

पण ही कथा आता ‘ती’च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे ‘कथांतर’ झाले आहे!

असे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची ‘सावली’ आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.

इतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्‍या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.