‘अभ्यासू’ क्लायंट

गेली तीन वर्षे मी एक भाषांतरकार म्हणून काम करत आहे. या कामानिमित्त बर्‍याच एजन्सीज, स्वतंत्र क्लायंट्स यांच्याशी संबंध आला. काहींशी बर्‍यापैकी तारा जुळल्या, काहींशी भाषांतर या विषयावर दीर्घ चर्चा झाल्या व पुढे मैत्रीही झाली, काहींशी चांगले व्यावसायिक संबंध जुळले तर बर्‍याच जणांशी वाद झाले. काल म्हणजे १५ सप्टेंबरला ज्या क्लायंटने फोन केला, तिची मात्र गोष्टच न्यारी होती. तिच्याशी बोलून झाल्यावर मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. तिच्याशी झालेलं संभाषण खाली दिलं आहे ते वाचा आणि हसावं की रडावं ते आपलं आपण ठरवा.

क्लायंटः नमस्कार, मला तुमचं नाव अमुक तमुक यांनी सुचवलं. मला थोडं भाषांतर करून हवं आहे. २८ सप्टेंबरला देऊ शकाल का?
मी: ते सांगण्यासाठी थोडे तपशील लागतील. आधी सांगा विषय काय आहे?
क्लायंटः एस.वाय.बी.ए.च्या मानसशास्त्राच्या नोट्स.
मी: साधारण शब्दसंख्या सांगता येईल का?
क्लायंटः ते नाही मी मोजलं, पण पानं साधारण २००-२५० असतील.
मी: (तोंडाचं भोकाचं थालीपीठ) आज तारीख १५, तुम्हाला भाषांतर करून हवं आहे २८ ला. १३-१४ दिवसांत २००-२५० पाने कशी होतील?
क्लायंटः अगदीच नाही होणार का? १ ऑक्टोबरपासून माझी परीक्षा आहे हो. मला गेल्या वर्षी के.टी. बसली आहे या विषयात. या वर्षी काहीही करून पास व्हायला हवं. टी.वाय्.चं वर्ष आहे.
मी: अहो पण १३ दिवसात इतकी पानं कशी होतील? शिवाय परीक्षेची तारीख खूप आधी ठरते ना. तुम्ही आधीच का नाही चौकशी केलीत?
क्लायंटः (काहीतरी फुटकळ सबब)
मी: हे बघा, मला वाटत नाही, तुम्हाला कोणीही इतकी पाने इतक्या कमी वेळात भाषांतरित करून देऊ शकेल. फार फार तर १५-२० लोकांना एकाच वेळी थोडी थोडी पाने देऊन काम दिले तर एखाद वेळेस होईल. पण अशा वेळी दर्जा खूपच खालावतो. शिवाय, त्यासाठी तुम्हाला एखाद्या एजन्सीकडे जावे लागेल. पण त्यापूर्वी तुम्हाला एवढ्या पानांचं भाषांतर करून घेणं खरंच परवडणार आहे का?
क्लायंट: (गप्प)
मी: नाही म्हणजे तुम्ही विद्यार्थिनी आहात आणि भाषांतर करून घेण्याचा तुमचा हा पहिलाच अनुभव आहे म्हणून विचारते आहे. माझा स्वतःचाच दर १ रु. प्रति शब्द आहे. काही एजन्सीज प्रति पान दर लावतात. त्यांचा माझ्याहून कमी असेल. पण तोही २०० रु. प्रति पान हून कमी असणार नाही. म्हणजे २००-२५० पानांचे ४०-५० हजार रु. होतील.
क्लायंटः पण आता काय करणार ना?
मी: मराठीत मानसशास्त्राची पुस्तके/मार्गदर्शके काहीच नाही?
क्लायंटः आहे, पण त्यात काही मुद्दे गाळलेले आहेत.
मी: मग तेवढेच मुद्दे नाही तुम्हाला स्वतःहून लिहून काढता येणार?
क्लायंटः आता तेच करावं लागणार; पण मला अगदी अचूक उत्तरे हवी होती.
मी: तुम्हाला अगदीच असं नाही म्हणताना जीवावर येतंय म्हणून एका एजन्सीचा नंबर देते, तो घ्या.

मी त्या मुलीची अगदीच शाळा घेतली हे मान्य आहे, पण मला अजिबात रहावलं नाही. हे म्हणजे “कैच्या कै” होतं. स्वतः वर्षभर अभ्यास करायचा नाही. इतकंच काय, पुस्तकं पण नीट शोधायची नाहीत. आयत्या नोट्समध्ये स्वत:चे दोन रु. घालण्याचे श्रम घ्यायचीही इच्छा नाही. ४०-५० हजार (किंवा त्याहून जास्तच) रुपये फेकून तयार नोट्स मिळवण्याची तयारी. वर त्या नोट्सही १३ दिवसांत हव्या. एकूणात काय “पैसा फेको तमाशा देखो” असंच वाटत असतं बर्‍याच जणांना!