मी कधी बडबडगीत लिहीन असं मला मुळीच वाटत नव्हतं. पण एका मित्राला चिडवायला म्हणून दोन-चार ओळी लिहिल्या आणि मग त्याने मागे लागून माझ्याकडून हे बडबडगीत पूर्ण करून घेतलं. ते इथे देते आहे.
कडू कडू कारले
एक होता _ _ _, गाव त्याचे पार्ले
आवडायचे त्याला, कडू कडू कारले
एकदा त्याने खाल्ले, गोड गोड कारले
आणि त्याचे डोके, फिर फिर फिरले
“आवडे मला कडू, आणि हे काय चारले”
असे म्हटले जिभेने, नि मानगूट त्याचे धरले
कॉफीचे पाकीट त्याने, आणले भलेथोरले
बाटलीभर कॉफी प्यायला, तरी नाही पुरले
कडूशार कोयनेल, होते घरी उरले
बादलीभर प्यायले, तरी नाही पुरले
अंगणात होते पाच, कडुनिंब पेरले
एक अख्खे झाड खाल्ले, तरी नाही पुरले
शेवटी त्याच्या डोक्यात, खरे काय ते शिरले
आणून कडू साखर, तिचे बकाणे भरले
पळून गेले जिभेवरचे, गोड उरले-सुरले
’हुश्श’ म्हणून त्याने, खाल्ले कडू कडू कारले
बडबडगीत पूर्ण करताना फार मजा आली. त्याबद्दल त्या मित्राचे आभार. 🙂
ताज्या प्रतिक्रिया