चंद्रकोर-२

त्या पुस्तकातल्या माझ्या सर्वांत आवडत्या लेखाचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न-

 

फुलांची शाळा

 

ए आई, तुला माहित आहे का, ते काळेकुट्ट ढगोबा जेह्वा आकाशात गडगडू लागतात आणि मग पहिला पाऊस खाली येतो ना, तेव्हा वेडं वारं वेळूच्या बेटात शिरतं आणि बांबूच्या आडून शीळ घालू लागतं.

 

आणि मग अचानक, कुठून कुणास ठाऊक, पण भरपूर फुलं बाहेर येतात आणि गवतावर मजेत नाचू लागतात, दंगामस्ती करू लागतात.

 

आई, मी सांगतो तुला, ही फुलं किनई जमिनीखालच्या शाळेत जातात. दरवाजे गच्च बंद करून घेऊन ती फुलं तिथे अभ्यास करतात. आणि जर सुट्टी होण्यापूर्वीच त्यांनी बाहेर यायची धडपड केली, तर त्यांचे मास्तर त्यांना कोपऱ्यात उभं करतात.

 

पाऊस पडल्यावर मात्र त्यांना सुट्टी मिळते. सू सू पळणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटतात आणि पानं सळसळू लागतात, मग ढगोबा आपल्या भल्यामोठ्ठ्या हातांनी टाळ्या वाजवतात आणि तेव्हाच ती चिंटीपिंटी फुलं आपले गुलाबी, पिवळे, पांढरे कपडे घालून बाहेर धावतात.

तुला माहित आहे का गं आई, त्या फुलांचं घर किनई ते तारे जिथे राहतात ना, त्या आकाशात आहे. तू पाहिलं नाहीस का, ती फुलं तिथं पोचायला किती अधीर असतात ते? तुला माहित नाही का, ती इतकी घाईत का असतात?

अर्थात, मला माहित आहे, ते कुणाकडे पाहून आपले हात उंचावतात ते. मला वाटतं, त्यांची एक आई असावी, अगदी माझ्या आईसारखी!

चंद्रकोर

कालच चर्चगेटची बुक स्ट्रीट फिरता फिरता रविंद्रनाथ टागोर यांचं ‘The Crescent Moon’ हे पुस्तक अवघ्या १० रु. ना मिळालं. टागोरांचं पुस्तक म्हणून मी मोठ्या कुतुहलाने विकत घेतलं आणि आज सकाळी वाचायला म्हणून ते जे हातात घेतलं, ते पूर्ण वाचूनच खाली ठेवलं.

तळहाताएवढ्या या इवल्याशा पुस्तकात टागोरांच्या ४१ बंगाली कवितांच्या त्यांनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादांचा संग्रह आहे. अर्धं पान ते ३ पानं अशा लांबीच्या या एवढ्याएवढ्याशा लघुलेखांतून आई आणि तिचं बाळ यांचं जे रम्य विश्व टागोरांनी उभं केलं आहे, ते वाचून आपणही परत त्याच विश्वात जावं असं वाटू लागतं. चंद्रकोरीप्रमाणे मोठी होत जाणारी मुलं आणि त्यामुळे आईशी असलेल्या त्यांच्या नात्यात पडत जाणारा बदल हेही टागोरांनी खूप चांगल्या रीतीने टिपले आहे.

हे पुस्तक वाचत असतानाच त्याचा अनुवाद करावा असं वाटू लागलं, म्हणून हा प्रयत्न करते आहे. चुकलं माकलं तर माफ करा.

 

घर

 

शेतातल्या वाटेवरून मी एकटाच चाललो होतो, तेव्हा एखाद्या कवडीचुंबकाप्रमाणे सूर्यास्त आपली शेवटची सोनकिरणं चोरून घेत होता. प्रकाश कमी कमी होत अखेर अंधारात विलीन झाला आणि पिकं कापून काढल्यामुळे बोडकी झालेली जमीन ओठ मिटून गप्प बसली.

इतक्यात अचानक एका मुलाच्या खड्या सूरांनी आकाश व्यापलं. तो मुलगा अंधार कापत पलिकडे निघूनही गेला, मला न दिसताच! पण संध्याकाळच्या शांततेवर आपल्या गाण्याचा माग सोडून गेला.

माळाच्या टोकाशी असलेल्या गावात त्याचं घर होतं, ऊसमळ्याच्या पल्याड; केळीच्या, फणसाच्या नि ताडामाडाच्या सावलीत लपलेलं.

चांदण्याने आच्छादलेल्या माझ्या एकाकी वाटेवर मी क्षणभर थबकलो आणि समोरच्या अंधारलेल्या धरतीकडे पाहू लागलो. तिच्या कुशीत वसली होती असंख्य घरे; त्यात होते पाळणे, पलंग, आईचं काळीज, लामणदिवे आणि आपल्याच आनंदात रममाण झालेले अनेक कोवळे जीव, ज्यांना माहितही नाही की त्यांचा हा आनंद जगासाठी किती मोलाचा आहे!

अनुवाद

अश्कोंमें जो पाया है, वो गीतोंमें दिया है
इसपर भी सुना है के जमाने को गिला है

गीतांस तव मिळाले, हे दान आसवांचे,
दुनियेस हाय परि या, ना भान आसवांचे,
तव नाव जन विसरले, तरी मागतेस दाद?
स्वीकार तू नव्याने, हे गान आसवांचे!

कही दूर जब दिन ढल जाये …

नभी दूर दिन मावळू लागे

सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे

मम मनाच्या गाभार्‍यात

कोण गे उजळे हे स्वप्नदिवे , हे स्वप्नदिवे …

क्षणी एका अवचित श्वास जडावे

पळी त्याच नयनांत जलद दाटले

येइ जवळ कोणी प्रेमभराने

स्पर्श करी पण नजर ही चुकवे , नजरही चुकवे …

कधी गीत मीलनाचे राही अधुरे

तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे

अडके गुंती , वैरी मन माझे,

मज छळी साहुनी ते दु:खही परके , दु:खही परके …

अंतरास ठावे मम गुपित गहिरे,

कैसा स्वर्णस्पर्श स्वप्ना या लाभे,

हे मम स्वप्न , तेचि आप्त माझे,

सावली यांची मम कधी न अंतरे, कधी न अंतरे …

“The Leaves & the Wind”

‘पिकल्या पानाचे’च रूपक वापरून जॉर्ज कूपर याने “The Leaves & the Wind” नावाची एक सकारात्मक कविता लिहीली आहे. तिचा अनुवाद मी इथे लिहीते आहे-

     अवखळ वारा आज पानांना हाकारी
 “चला मजसवे, मारु आकाशी भरारी
दूर तिथे गगनी हवा थंड बोचरी
ऊबदार पांघरा ती वसने सोनेरी”

ऐकताच हाक वाऱ्यावर आरुढली
पर्णलाट एक आसमंती लहरली
गात मोदभरे ओळखीच्या स्वरावली
आठवांच्या राज्यातून पाने भटकली

“मित्रांनो स्वीकारा अखेरचा दंडवत
नाही ‘अंत’ ही तर ‘आदि’ची सुरुवात
ऐकव ना रे झऱ्या एक निरोपाचे गीत
मैत्र अनेक दिवसांचे ठेव स्मरणात

लेकरांनो परता घरट्यात तुमच्या
पंखाखाली सुरक्षित अपुल्या आईच्या
पाहिल्या आनंदे कैक भराऱ्या तुमच्या
आठवाल का कधी या सावल्या मायेच्या?”

वाऱ्यावर झाली शेवटची भिरभिर
समाधान वसे मनी नाही हूरहूर
भूमीच्या कुशीत होई श्वासांची अखेर
हिम घाली पांघरूण त्यांच्या डोईवर.

                  जॉर्ज कूपर

मौत तू एक कविता है ।

मूळ कविता:-

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको.

डूबती नब्जोंमे में जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लिये चांद उफ़क तक पहुंचे
दिन अभी पानीमें हो रात किनारेके करीब
न अंधेरा न उजाला हो न अभी रात न दिन
जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आये

मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको!

अनुवाद :-

मृत्यु तू एक कविता आहेस
वचन मला या कवितेचे की , गवसेल मला…

मंदावणार्‍या स्पंदनांत विसावताना वेदना,
क्षितीजावर रेंगाळेल फिकटलेला चंद्रमा.
अर्पूनी दिवसाचे अर्घ्य रात्र लागता काठाला,
तिमीर अन तेजातली पुसटेल सीमारेषा.
मालवल्यावर देह जेव्हा हुंकारेल आत्मा,
जागूनी वचनास ती कविता, गवसेल मला…

कोणे एके नाताळी

 

कोणे एके नाताळी

नाताळची पूर्वसंध्या! भिंतीवर पायमोजे टांगून, दारं-खिडक्या फुलांच्या माळांनी सजवून, ‘खिसमस ट्री’ खाली भेटवस्तूंचा छोटासा ढीग रचून घर शांतपणे नाताळाच्या स्वागतासाठी सज्ज! हे प्रतीक्षेचे क्षण मी मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवते- दरवर्षी , न चुकता. माझं घर जणु त्या क्षणी भूतकाळाच्या आठवणींतून जिवंत होतं, गतकाळाबद्दल कृतार्थ होतं आणि वर्तमानाचा विचार करत भविष्याची वाट पाहत राहतं. या अशा ऊबदार क्षणांनीच कित्येक विलक्षण व आश्चर्यकारक घटनांना जन्म दिलाय; आणि आता तर मलाही सवय लागलीय, कोणत्यातरी अकल्पित घटनेची कल्पना करण्याची, अलौकिक आनंदाला सामोरं जायला तयार राहण्याची. ह्यावर्षी असा कोणता आनंदाचा ठेवा हा नाताळ माझ्या पदरात टाकणार आहे बरं?

आणि असा विचार करता करता, कशी कुणास ठाऊक, अशाच एका नाताळाने मला दिलेली एक दुर्लभ भेट आठवली. गोष्ट फार वर्षांपूर्वीची, इथून दूर…… खूप दूर घडलेली. मी त्यावेळी नुकतंच लग्न झालेली एक नवतरुणी होते. लग्न होऊन काही दिवस उलटूनही माझ्या नवर्‍याची मला पुरती ओळख पटली नव्हती. पटणार तरी कशी, त्या परंपरावादी चिनी समाजामध्ये एखाद्या तरूणीने एखाद्या तरुणाला लग्नापूर्वी एकांतात भेटणं फारसं शिष्टसंमत नव्हतं, त्यामुळे फारशा भेटी आमच्या नशिबात नव्हत्या. हा, पत्रांची देवाणघेवाण मात्र झाली. त्या छोट्याशा परंपरावादी चिनी शहरात एकमेकांना अनोळखी असलेले आम्ही दोघे अमेरिकन आता एकटेच राहू लागलो. आणि तरीही एकाकीपणाचा हा वेढा फोडण्यासाठी मी धडपडत होते. त्यातल्या त्यात समधानाची बाब अशी की, नाताळ एकत्र साजरा करायला माझे लाडके आईबाबा आमच्याकडे येणार होते. किती उत्सुकतेने वाट पाहत होते मी त्या दिवसाची! उत्साहाच्या भरात रात्रंदिवस खपून मी जंगी तयारी केली. त्या भागात टर्की मिळणं निव्वळ अशक्य. म्हणुन मी टर्कीऐवजी रानबदक शिजवलं- आयुष्यात पहिल्यांदा! तेही कुणाच्याही मदतीशिवाय! प्लम पुडिंग ऐवजी सुका मेवा आणि तांदूळ वापरून चिनी पद्धतीची आठ चविष्ट पुडिंग्ज तयार केली. सोबतीला हिरव्यागार पानांआड लपलेला अमृततुल्य बांबू आणि हॉलीऐवजी दुसरी तांबडी फळे ठेवून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न केला.

पण नाताळच्या आदल्याच दिवशी सकाळी एक तार आली- आईच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ती येऊ शकणार नाही व बाबांनाही तिच्या सोबत रहायला हवं आसल्यामुळे त्यांनाही येता येणार नाही, अशी बातमी घेऊन! झालं, माझा नूरच पालटला. एकाएकी माझ्या उत्साहाला ओहोटी लागली. माझी ही घोर निराशा लपवण्याच्या आटोकाट प्रयत्नातच दिवस मावळला. दिवेलागणीची वेळ झाल्यावर जरा बरं वाटलं. वीज नावाचा प्रकार आमच्या गावात अस्तित्वात नव्हताच, केरोसीनचे दिवे पेटवूनच नाताळचं स्वागत करावं लागलं. मी कॅरल्स म्हटली. आणि मग आम्ही दोघंच लहानपणी साजर्‍या केलेल्या नाताळबद्दल गप्पा मारू लागलो, झोप येईपर्यंत.

मला अजूनही आठवतंय, बिछान्यावर पडल्यावरही मला झोप लागत नव्हती. अखेर तासाभराने उठून मी बाहेरच्या खोलीच्या खिडकीत जाऊन उभी राहिले. मध्यरात्रीचा सुमार, येशूजन्माची वेळ. येशूच्या आगमनाची बातमी देणारा तो तारा चमकत असलेला मला दिसला. वेशीला लागूनच आहे असे भासवणारा पण प्रत्यक्षात खूप खूप दूर असलेला- आणि बरोब्बर त्याच क्षणी मी दरवाजावर थाप पडलेली ऐकली, द्विधा मनस्थितीत कुणीतरी हळुवारपणे (हलकेच ?)मारलेली थाप. इतक्या रात्री कोण आलं असेल? आमच्या भागात दरोडेखोरांचा सुळसुळाट झाला होता, त्यामुळे दार उघडणं खरं तर योग्य नव्हतं. पण तरीही मी दार उघडलंच. आणि पाहते तर काय, दारात एक ५ ते ६ वर्षांचा लहानसा चिनी मुलगा उभा. (त्याचं वय त्यावेळी १० वर्षं होतं हे नंतर त्यानेच मला सांगितलं.) त्याची शरीरयष्टी खूप कृश होती, अंगावरचे कपडे फाटले होते. पण याक्षणी प्रकर्षाने आठवणारी गोष्ट म्हणजे, त्याचे डोळे! एखाद्या बालदूतासारख्या मुखावर उठून दिसणारे ते टपोरे काळेभोर डोळे! सुंदर शांत चेहर्‍याला आकार देणारं विशाल कपाळ आणि निमुळती हनुवटी . त्याच्या फिकटलेल्या थकलेल्या चेहर्‍यावर शांत, धीरगंभीर पण आत्मविश्वासपूर्ण असे विलक्षण भाव होते. तो काहीच बोलला नाही, माझ्याकडे एकटक बघत तसाच उभा राहिला.

मी चिनी भाषेत त्याला विचारलं, ‘कोण रे तू?’
‘कुणीच नाही.’ शुद्ध पेकिंग लहेजात त्याने उत्तर दिलं.
‘पण तुझं नाव काय?’ मी पुन्हा प्रश्न केला.
‘मला नाव नाही.’
‘तुझे आईबाबा कुठे आहेत?’
‘मला आईबाबा नाहीत.’
हा आकाशातून टपकला की काय, अशा नवलाने मी त्याच्याकडे पाहत राहिले, कदाचित असेलही.
‘तू आलास तरी कुठून?’ माझा पुढचा सवाल.
‘मी कुठूनही आलेलो नाही.’
‘आणि कुठे जाणारही नसशील, नाही का?’
‘कुठेही नाही.’
‘मग माझ्याकडे का आलास?’
कदाचित त्यालाही ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसावं, त्याने नुसतीच मान हलवली. आणि परत त्याच्या तेजस्वी डोळ्यांनी माझ्याकडे एकटक बघत राहिला. मला तर जणु त्याच्या डोळ्यांची मोहिनीच पडली होती. हे सुंदर एकाकी मूल कोण असेल बरं? भिकारी? पण मग माझ्याच घरी का आलाय तो? तेही आजच रात्री? मध्यरात्री?
‘ये आत, तुला खूप भूक लागली असेल ना?’, मी म्हटलं.तो शांतपणे आत आला, तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं, तो किती थकला होता ते. थंडीमुळे काकडणारं शरीर तो बळंच काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तो शेगटीजवळ (शेगडीजवळ ?)आला. आग तर विझली होती. पण काही निखार्‍यांत अजूनही थोडी धुगधुगी होती. त्यांची ऊब मिळवण्यासाठी त्याने हात शेगटीवर (शेगडीवर ?) धरले, छोटेसे नाजूक हात. खराब झालेले त्याचे ते हात, धूळीने भरल्यामुळे तपकिरी झालेले त्याचे ते केस, अशा त्याच्या एकंदरीत अवतारावरून तो बरंच अंतर पायी चालत आला असावा असा अंदाज मी बांधला. कदाचित त्याला कोणत्यातरी घटनेचा जबर मानसिक धक्का बसला असावा, कारण त्याची स्मृती नष्ट झाली होती.
मुक्यानेच मी त्याला मोरीत (स्नानगृहात ?)नेलं, त्याला स्वच्छ आंघोळ घातली. एका पायजम्याचे हातपाय त्याच्या मापाप्रमाणे कापून ते त्याला घातले. आणि त्याच्या कमरेभोवती छोटासा पट्टा बांधला. मग मी त्याला शिजवलेली अंडी, पाव व डबाबंद दूध दिलं. त्याला दूध हा प्रकारच माहीत नसावा, त्याने ते हुंगून बाजूला ठेवून दिलं.

‘तू चहा घेशील का?’ मी विचारलं.
‘तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नका.’ तो उत्तरला. पण मी चहा बनवल्यावर मात्र घटाघटा प्यायला. मग मी बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर त्याच्यासाठी बिछाना घातला. आणि तो झोपी जाईपर्यंत त्याच्या उशाशी बसून राहिले. मग मीही माझ्या बिछान्याकडे वळले. आश्चर्य म्हणजे आता मात्र मलाही झोप लागली.
सकाळी उठून मी बाहेरच्या खोलीत जाऊन बघते, तर हा पठ्ठ्या आधीच उठला होता. जमिनीवर मांडी घालून बसला होता, खिसमस ट्री मजेने न्याहाळत.
‘काही आठवतं का तू कोण आहेस ते?’ मी विचारलं. त्याच्या चेहर्‍यावर एक लाघवी स्मित उमटलं. मान नकारार्थी हलवून तो म्हणाला, ‘मी तुमच्यासोबत रहायला आलो आहे.’ असं घडलं सारं!
तो नाताळ आम्ही त्याच्यासोबत साजरा केला. एकाकीपणाची ती जीवघेणी पोकळी त्याने जणु आपल्या अस्तित्वाने भरून काढली होती. मी त्याला बाजारात घेऊन गेले आणि त्याच्यासाठी कपडे विकत घेतले. तोही वर्षानुवर्ष आमच्याचबरोबर राहत असल्यासारखा वागत होता. आम्ही त्याला ‘नोएल’ असं नाव दिल. नोएल म्हणजे नाताळ, नोएल म्हणजे नाविन्य, नोएल म्हणजे अंधारावर मात करणारा प्रकाशाचा किरण.आमच्या चिनी मित्रमंडळींकडे, शेजार्‍यापाजार्‍यांकडे त्याच्याबद्दल चौकशी केली. पण कुणीच त्याला कधीही पाहिलं नव्हतं. जर ते त्याला ओळखत असले तरी त्यांनी तसं दाखवलं मात्र नाही. त्यालाही त्या संध्याकाळपूर्वीचं काहीही आठवत नव्हतं. तो खूप भुकेला होता आणि अशात त्याला कुणीतरी आमच्या घराचं दार ठोठावायला सांगितलं, एवढंच तो सांगू शकला. अर्थातच, तो बालयेशू असावा अशी माझी काही भाबडी समजूत नव्हती. पण त्याला पाहून नेहमीच बालयेशूची आठवण व्हायची, अगदी तो मरेपर्यंत. त्यालाही ऐन तारुण्यातच मृत्यूने कवटाळलं.आणि तेही अशा परिस्थितीत, की त्याचा मृत्यु म्हणजे समाजोन्नतीसाठी केलेलं बलिदान ठरावं!
पण हे फार वर्षांनी घडलं. त्याआधीचा मोठा काळ त्याने आमच्यासोबत घालवला. शाळेत जाऊ लागला, मोठा होऊ लागला. त्याने कधीही कुणालाही त्रास दिल्याचं मला आठवत नाही. अभ्यास त्याच्या खास आवडीचा! लोक त्याच्याकडे आकर्षित होत. पण त्याला जवळचा मित्र असा कुणी नव्हताच! लोकांच्या घोळक्यात राहूनही तो काहीसा अलिप्त, सगळ्यांचा आवडता, सगळ्यांना मदत करणारा, पण अलिप्त!
वर्षं सरली तसं त्या लाघवी निरागस मुलाचं रुपांतर एका उंच, शिडशिडीत, बुद्धिमान तरुणात झालं. डॉक्टर बनण्याची त्याची इच्छा होती. ती त्याने पूर्णही केली. तो एक आदर्श डॉक्टर बनला. धनवानांप्रमाणेच निर्धनांची, दुर्बलांचीही काळजी घेणार्‍या, प्रेमाने सेवाशुश्रुषा करणार्‍या फार थोड्या डॉक्टरांपैकी एक! तो कधीच कुणाला उमजला नाही; मला वाटतं, मलाही नाही. तो पूर्णपणे निस्वार्थी होता, पीडितांच्या सेवाकार्यात त्याने स्वत:ला झोकून दिलं होतं. अजूनही तो पूर्वीसारखाच होता, मितभाषी, स्वत:शीच चिंतन-मनन करणारा, त्याचे डोळेही तसेच, विशाल आणि शांत! त्याच्या नाजूक हातांनी शल्यचिकित्सकाचं कौशल्य व सफाईदारपणा आत्मसात केला. त्याच्या आयुष्याचा मार्ग ठरला होता, आणि त्याच्या उदात्त अंत:करणावर विसंबून, आम्ही तो स्वीकारलाही होता.
आणि मग ते युद्ध पेटलं. चिनी समाजात दुफळी माजली. जिथे तिथे साम्यवाद्यांनी राष्ट्रवाद्यांविरुद्ध रान उठवलं. आमच्या शहरात तर हे दोन्ही गट नोएलवर चिडले होते, कारण तो त्याच्याकडे येणार्‍या प्रत्येक माणसाची सारख्याच सेवाभावाने काळजी घेत होता. रुग्ण कोणत्या पक्षाचा आहे याची त्याने कधी साधी विचारपूस देखिल केली नाही. अखेर साम्यवादी जिंकले आणि आम्हाला इतर अमेरिकनांप्रमाणे चीन सोडावं लागलं. त्याने आमच्याबरोबर यावं अशी माझी फार इच्छा होती. मी त्याची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला, त्याला अमेरिकेतल्या वैद्यकशास्त्राच्या उच्चशिक्षणाचं आमिष दाखवलं. पण तो बधला नाही. नम्रपणे हसत हसत त्याने नकार दिला.
‘मी माझ्या माणसांबरोबरच राहिलं पाहिजे, आतातर त्यांना माझी जास्तच गरज आहे.’
मी विरोधाचा प्रयत्न केला, ‘पण हे साम्यवादी तुला तुझ्या तत्त्वांप्रमाणे जगू देतील असं वाटतं तुला?’
पण व्यर्थ…तो म्हणाला,’कितीही झालं तरी मी एक डॉक्टर आहे. त्यांना माझी गरज आहे. तेव्हा ते मला त्रास देऊ शकत नाहीत.’

आणि अशाप्रकारे आमची ताटातूट झाली. माझ्या धाकट्या भावालाच मागे टाकून मी चाललेय अशी भावना माझ्या मनात दाटून आली. सुरुवातीला आमच्यात पत्रव्यवहार चालू होता, पण नंतर तो थांबवण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला. कारण अमेरिकेहून पत्र आलेलं पाहून साम्यावाद्यांनी त्याच्यावर संशय घेतला असता आणि चीनहून पत्र आलेलं पाहून मी संशयित ठरले असते .
त्यानंतर काही वर्षांनी मला त्याच्या मृत्युचा वृत्तांत कळला. आमचा एक मित्र चीनहून पळून आला आणि मला भेटल्यावर त्याने मला सांगितलं. नोएल एकटा राहत असे. स्वत:ला कामात गाडून घेऊन तो स्वत:चेच हाल करून घेत होता. आजुबाजुच्या
शेकडो मैलांच्या परिसरात तो एकमेव डॉक्टर होता. लांबलांबून त्याच्याकडे लोक येत, त्यात राष्ट्रवादी व साम्यवादी दोन्ही गटांच्या सैनिकांचा भरणा अधिक होता. साम्यवाद्यांनी जिंकल्याच्या गुर्मीत त्याला धमकावलंही होतं- त्याने फक्त त्यांच्याच सैनिकांवर उपचार करावेत म्हणून. त्यावर तो हसला होता व काहीच न बोलता पुन्हा जो येईल त्याच्या शुश्रुषा करण्यात गढून गेला.

एका रात्री तो झोपलेला असताना, त्याला बोलवायला तीन माणसं आली. ती माणसं साधीशीच दिसत होती. जवळच राहणार्‍या एका आजारी माणसाला तपासण्यासाठी त्याला न्यायला आली होती. त्याने तत्परतेने आपला कोट अंगावर चढवला आणि त्यांच्याबरोबर घराबाहेर पडला. पुढच्या वळणावर वळल्यावर त्या तिघांनी घात केला , त्याला गोळी घातली. त्याचा जागीच अंत झाला.

मला कळलं ते एवढंच. पण आज, या क्षणाला मला तीव्रतेने आठवतो आहे, तो त्याचा मृत्यु नव्हे, माझ्या नजरेसमोर येतोय तो, एक लहानगा, खूप खूप वर्षांपूर्वी एका नाताळच्या आदल्या रात्री माझ्या दारावर थडकलेला, नाव-गाव-पूर्वेतिहास सगळ्याला पारखा!

देहदंड

खरं म्हणजे ह्या कथेला अनुवाद / स्वैरअनुवाद/ रुपांतरण/ स्वतंत्र कथा किंवा चक्क चोरी यापैकी काय म्हणावे ते मला कळत नाहीये. इथे मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. ही कथा आधारलेली आहे मार्क ट्वेनलिखित The Death Disk ह्या सत्यकथेवर! ही घटना घडली कॉमनवेल्थच्या काळातील हुकूमशहा ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या कारकिर्दीत. त्याला मराठीत आणताना महाराज अशी बिननावाची एक काल्पनिक व्यक्ती मी योजली आहे. —————————————–

देहदंड

आभाळ झाकोळून आलं होतं. ढगांनाच पावसाचा भार सहन होत नव्हता. पण तरी त्यांनी पावसाच्या रेट्याला कसाबसा बांध घातला होता. कारण पावसाची निराधार वेलींना झोडपण्याची, निष्पाप फुलांना चुरगाळण्याची, सगळं सगळं वाहून नेण्याची खुमखुमी त्यांना चांगलीच ठाऊक होती. या प्रयत्नांत होणारा ढगांचा गडगडाट , विजांचा लखलखाट सारी सृष्टी श्वास रोखून निस्तब्धपणे पाहत होती. रुक्मिणी खिडकीत उभी राहून मूकपणे हे सगळं बघत होती. बाहेरचं आभाळ तरी अजून शाबूत होतं, घरातलं मात्र उसवलं होतं. ठिगळं लावणार तरी किती अन् कुठे? आतापर्यंत दाबून ठेवलेला उमाळा एकदम वर आला. आणि ती खिडकीच्या गजांवर डोके टेकवून रडू लागली. तिचा भावनावेग ओसरेपर्यंत तिचा नवरा कृष्णाजी तिला थोपटत राहिला मग म्हणाला,

“अगं वेडे, काय मनाला लावून घेतेस एवढं? तुझा हा मर्द मराठा नवरा रणांगणावरच शहीद झाला असं समज. हे बघ, तू एका मावळ्याची शूर बायको आहेस. धिराने घेतलं पाहिजे तुला हे सगळं.”

हे वाक्य ऐकता क्षणीच रुक्मिणीने डोकं वर उचललं आणि डोळे पुसून ती पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली.

“हे बघ दादाला पत्र टाकलं आहे. माझ्यानंतर तुम्हा दोघींची सारी व्यवस्था तो बघेल. आणि महाराजही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत.”

“नाव काढू नका त्या महाराजांचं.” रुक्मिणी एकाएकी उसळली. “तुम्ही इतकी वर्षं त्यांची, या मुलुखाची सेवा केलीत. हातातल्या बळाच्या जोरावर जुमलेदाराचे सरनौबत झालात. आणि आता….. आता एका एवढ्याश्या चुकीने तुम्ही त्यांना नकोसे झालात? तेही इतके की त्यांनी तुम्हाला तोफेच्या तोंडी द्यायचं फर्मान काढावं?”

“रुक्मिणी…….एक शब्द बोलू नकोस महाराजांविरुद्ध. जन्मभर त्यांचीच चाकरी केली आहे मी. माझी आताची चूक ही चूक नव्हती तर अक्षम्य गुन्हा होता आणि म्हणूनच………”

पण त्याचं बोलणं अपूरंच राहिलं कारण “अय्या, बाबा तुम्ही आलात?” असं म्हणत ७ वर्षांच्या एका चिमुरडीने धावत येऊन त्याच्या पायांना विळखा घातला होता. तिला पाहून कृष्णाजीला एकदम वात्सल्याचं भरतं आलं. त्याने तिला एकदा डोळे भरून पाहून घेतलं. ८ महिन्यांपूर्वी तो मोहिमेला निघाला होता, त्याहून आता ती थोडी वेगळी दिसत होती. उंची वाढली होती. तिला कुरवाळत त्याने तिचे पटापट मुके घेतले. ती बिचारी तर एकदम भांबावूनच गेली.

“हे हो काय बाबा? माझे केस विस्कटतील ना!”

“अचं का? बरं बरं चिमणाबाई, नाही हो आम्ही तुमचे मुके घेणार.” असं म्हणून त्याने तिला कडेवरून उतरवलं व रुसल्याचं नाटक करत भिंतीला टेकून बसला.

“असं काय हो बाबा, चुकून बोलले. नाही बोलणार पुन्हा असं”

कृष्णाजीने तोंड दुसरीकडे फिरवलं. आता मात्र त्या छोट्याश्या ‘सखुला’ अगदी रडू रडू झालं आपल्यामुळे बाबा रुसले असं वाटून तिने भीत भीत आईकडे पाहिलं तर आईही रडत होती. आता तर तिला अगदी कसंसंच होऊ लागलं. तिने आपली रडवेली नजर पुन्हा बाबांकडे वळवली तर ते आपले गालातल्या गालात हसत तिच्याकडेच पाहत होते. आता त्यांचा कावा तिच्या लक्षात आला आणि ती गाल फुगवत म्हणाली,”आम्ही नाही जा, तुम्ही नेहमी आम्हाला चिडवता.”

तिच्या गोबऱ्या गालांचा गालगुच्चा घेत कृष्णाजीने तिला पुन्हा जवळ ओढलं व म्हणाला ,”बरं बाईसाहेब, नाही हं चिडवणार आम्ही तुम्हाला.”

“खोटं, तुम्ही खोटारडेच आहात. नेहमी असं म्हणता आणि परत परत मला चिडवता.”

त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत सखु म्हणाली. तर त्याने तिल पुन्हा पोटाशी धरलं आणि स्वतःचे कान पकडून विचारलं”चुक झाली बाईसाहेब, सांगा काय शिक्षा आहे आम्हाला? कान पकडून उठाबशा काढू?” या विचारासरशी ती खुदकन हसली व त्याच्या गळ्यात पडत म्हणाली,

” नको. मी सांगू काय करायचं…… अं……. तुम्ही किनई मला एक गोष्ट सांगा.”

“गोष्ट?” असं तो विचारणार इतक्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. आत वळलेली रुक्मिणी पुन्हा एकदा खिडकीशी धावली. भेदरलेल्या डोळ्यांनी पुन्हा रस्त्याकडे पाहू लागली. २-३ पाईक समोरून चालले होते. पण त्यांच्या घराकडे न वळता तसेच सरळ चालत गेले. रुक्मिणीने एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. कृष्णाजी काय ते समजला. त्याच्याकडे वेळ फार कमी होता. त्याने विचारलं,” गोष्ट? कोणती गोष्ट? आटपाट नगराची की भुताची की दूसरी एखादी?”

थोडा विचार करून सखु म्हणाली, “नको ,बाबा तुम्ही तुमच्या मोहिमेची गोष्ट सांगा ना.”

ते ऐकून कृष्णाजी कडवटपणे हसला पण लगेच ‘सांगतो’ असंही म्हणाला.सखुने आईला खाली बसायला सांगितलं आणि तिच्या मांडीत सावरू न बसत म्हणाली ,”हं करा सुरु.”

त्या परिस्थितीतही कृष्णाजीला हसू फुटलं. एवढी चुरू चुरू बोलणारी आपली ही लेक, आपल्यानंतर हिचं कसं होईल? पैशाची तर ददात पडणार नाही, पण बापाच्या प्रेमाचं काय? या विचारासरशी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. सखुच्या ”सांगा ना हो बाबा” या आर्जवाने तो भानावर आला. डोळ्यात भरून आलेलं पाणी मागे रेटत मग तोही गोष्ट सांगायला सरसावून बसला. “आताच काही दिवसांपूर्वीची गोष्ट! आम्ही गेलो होतो वाईला- मोहिमेवर. आणि तिथे आमचा गनिमांशी सामना झाला.”

“गनिम म्हणजे काय हो बाबा?”

“गनिम म्हणजे शत्रू बेटा. मग त्यांच्याशी लढाई सुरू झाली. आपले मावळे संख्येने खूप कमी होते. लढाई जिंकणं पुढच्या दृष्टीने चांगलं नव्हतं. पण त्या मावळ्यांना तर वाचवायचं होतं. म्हणून मग तीन सरनौबतांना आपापल्या तुकड्या घेऊन गनिमांवर मागून हल्ला करण्याची सेनापतीने आज्ञा दिली. जेणकरून त्यांना कोंडीत पकडता येईल.”

सखुला काही कळलंसं वाटत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिह्न उभं राहिलं होतं. आईला काही कळलं का ते बघायला तिने मान वर केली तर ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडत होती. सखु आईचे गाल कुरवाळत म्हणाली, “आई, अशी कशी गं तू भित्री भागुबाई? बाबा एवढे जाऊन लढाई करतात आणि तू लढाईचं नाव ऐकूनच रडतेस?”

सखुच्या निरागस डोळ्यांतून तिची नाराजी स्पष्ट दिसत होती. आतापर्यंत रुक्मिणीच्या मनात घोळणारे आत्महत्येचे विचार सखुच्या या प्रश्नाने जणू हवेतच विरून गेले नाही ,या लेकरासाठी जगायला हवं मला. “नाही रडणार गं पोरी.”

असं म्हणून ती आणखी जोरजोरात हुंदके देऊन रडू लागली. कृष्णाजी तिला हलकेच थोपटू लागला. मानेवरची टांगती तलवार दोघांनाही स्पष्ट दिसत होती. पण तरीही उसनं बळ आणून कृष्णाजी म्हणाला, “मग काय झालं माहितीये का गं सखु? त्या तीन सरनौबतांनी गनिमांवर मागून हल्ला चढवला. अपेक्षेप्रमाणे गनिम गोंधळला व पुढच्या मावळ्यांवरची त्याची पकड ढिली झाली. ते मावळे मग सुखरूप छावणीत परतले. पण या तिघा सरनौबतांनी मात्र उत्साहाच्या भरात करू नये ते केलं. गनिमांना केवळ घाबरवण्याचं काम त्यांना दिलं होतं, पण त्यांनी तर गनिमांना हरवून टाकलं.”

सखुने आनंदाने टाळ्या पिटल्या, “गनिम हरले, गनिम हरले”

कृष्णाजीचा चेहरा मात्र दुःखाने काळवंडून गेला. “नाही बाळ, ही आनंदाची गोष्ट नव्हे. गनिमाला इतक्यात हरवून सतर्क करणं परवडणारं नव्हतं, म्हणून मग महाराज त्या तीन सरनौबतांवर रागावले.”

सखुला अजूनही काही उमजत नव्हतं. गनिम हरले पण ते हरायला नको होते एवढंच तिला कळलं ” मग काय झालं बाबा?”तिनं विचारलं.

“महाराज त्यांच्यावर खूप चिडले.”

“महाराज…..” सखुला काहीतरी आठवत होतं, “महाराज म्हणजे, गडावर राहणारे ते ना उंचसे? तुम्ही सगळे मोहिमेवर गेलात तेव्हा किनई ते या रस्त्यावरून गेले होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं. सगळे त्यांना खूप खूप घाबरतात पण मी नाही घाबरले. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा. मी त्यांच्याकडे पाहून हसले तर ते पण हसले. बाबा ते किनई फार फार छान आहेत, त्यांचा राग लगेच जाईल.”

सखुच्या आईने एक जोरदार हुंदका दिला. सखु उठून तिचे डोळे पुसत म्हणाली,” आई नको गं रडूस. मी सांगते ना तुला, महाराजांचा राग अस्सा पळून जाईल बघ!”

“महाराजांनी त्यांना तोफेच्या तोंडी द्यायचं फर्मान काढलं आहे.”

सखुला अर्थातच या शिक्षेतलं गांभीर्य कळलं नाही. “त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची खूप मनधरणी केली,की हे बरोबर नाही. इतर सैन्याला धडा शिकवायचाच असेल, तर कुणा एकालाच मृत्युदंड व्हायला हवा. तिघांना का? होना करत शेवटी महाराजांनी हे म्हणणं मानलं.” कृष्णाजी स्वतःशीच बोलत होता.

“मृत्युदंड म्हणजे काय हो बाबा?”

“त्या माणसाला शिक्षा म्हणून देवाघरी पाठवणार राजा. त्या तिघांपैकी कुणाला पाठवायचं ते आज ठरवणार.”

” कसं हो बाबा? ‘अटकमटक चवळीचटक’ करून?” तिच्या त्या निरागस प्रश्नाने त्याचं काळीज पुन्हा हेलावलं. पण त्याच्यावर उत्तर देण्याची वेळ कधी आलीच नाही. दरवाज्यावर जोरजोरात टकटक होत होती.

“दार उघडा”

रुक्मिणीने सखुला उराशी गच्च कवटाळलं आणि भयचकित नजरेने दरवाज्याकडे पाहू लागली. उठण्यापूर्वी कृष्णाजीने काही क्षण डोळे मिटले. मन काबूत आणलं आणि मगच पाईकांना सामोरा गेला. पाईकांनी त्याला महाराजांचं फर्मान ऐकवून दाखवलं. ते ऐकून घेताना त्याच्या चेहऱ्यावरची एकही रेषा हलली नव्हती. जाताना त्याने एकवार मागे वळून पाहिलं. डोळ्यांनीच रुक्मिणीचा निरोप घेतला. सखुच्या कपाळावर ओठ टेकले व एक शब्दही न बोलता पाईकांच्या बरोबर चालू लागला. रुक्मिणी मागोमाग उंबरठ्यापर्यंत धावली. कृष्णाजी नजरेआड व्हायला आणि आभाळ फाटायला एकच गाठ पडली. पाऊस आडवा तिडवा कोसळू लागला. इकडे रुक्मिणी चक्कर येऊन उंबरठ्यातच कोसळली होती.

आता बाहेर लख्खं उन्ह पडलं होतं. जागोजागी पाण्याची छोटीछोटी तळी साचली होती. अश्याच एका तळ्यात सखु कागदाच्या होड्या करून सोडत होती. पण ते लवकरच कंटाळली. कारण आईला बरं वाटत नव्हतं. तिची काळजी घ्यायला शेजारीपाजारी जमले होते त्यात हिची लुडबुड नको म्हणून हिला बाहेर घालवण्यात आलं होतं.

खरं म्हणजे ह्याचा सखुला राग आला होता. बाबा आले कामाहून की त्यांच्याकडे या सगळ्यांची तक्रार करायची, असं तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं. पण बाबा येणार तरी कधी? काल रात्रीपासून गेलेत ते अजून आलेले नाहीत. आईला बरं नाही असं सांगितलं तर ते पटकन परत येतील, या सगळ्यांना घालवून टाकतील मग आईसुद्धा बरी होईल. मग आम्ही तिघं मजा करू. आपल्याच अश्या विचारांवर सखु जाम खूष झाली. बाबांपर्यंत ही बातमी आपणच पोचवली पाहिजे असं ठरवून ती उठली.बाबा गडावर गेलेत, हे तिला माहित होतं. घरात कुणालाही न सांगता गुपचूप ती सटकली आणि गडाच्या दिशेने चालू लागली.

महाराज आपल्या दालनात येरझाऱ्या घालत होते. त्या तिघा सरनौबतांपैकी कुणाला देहदंड ठोठावायचा हा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. त्या तिघांनी मात्र या निर्णयाला विरोध केला होता. “मरू तर तिघे एकत्रच, कारण चढाईचा निर्णय तिघांचा होता.”

असं बाणेदार उत्तर त्या तिघांनी पाठवलं होतं.महाराजांना त्यांचा फार अभिमान वाटत होता. असे निधड्या छातीचे लोक आपण बाळगले म्हणून हे राज्य उभं राहिलं , हे त्यांना जाणवत होतं.पण पुन्हा कुणी अशी चुक करू नये म्हणून त्यांना धडा शिकवणंही गरजेचं होतं. शेवटी काही वेळाने काहीतरी ठरवून ते बाहेर आले. त्या तिघांना बाजूच्या दालनात एका रांगेत पाठमोरं उभं करण्याची आज्ञा त्यांनी पाईकांना दिली. आणि दुसऱ्या एका पाईकाला खाली गावात उतरून पहिलं दिसेल ते लहान मूल वर आणायला सांगितलं. आणि महाराज पुन्हा येरझाऱ्या घालू लागले. आपण करतोय ते बरोबर आहे ना, ही चिंता त्यांचं काळीज पोखरत होती.

मूल शोधायला गेलेल्या पाईकाला गडाच्या पायथ्याशीच एक चिमुरडी दिसली. परकराचा काचा मारून गडाचे अवघड चढायची तिची मोठी शिकस्त चालली होती. तो लगबगीने तिच्याकडे गेला. तिला तशीच कडेवर घेतली आणि पळाला गडाकडे.

“महाराज” असं म्हणून त्याने महाराजांचं लक्ष वेधून घेतलं. त्या मुलीला त्यांच्या पुढ्यात उभं करून तीन वेळा लवून कुर्निसात केला आणि मागच्या मागे बाहेर पडला. त्या मुलीला महाराज क्षणभर न्याहाळतच राहिले. परकराचा काचा मारलेला, केस अस्ताव्यस्त विस्कटलेले, मातीचे हात गालाला लागून गाल खराब झालेले. एवढ्या मोठ्या दालनात येऊन तीही बिचकली होती. महाराजांना ही लहानगी मुलगी खूपच आवडली. त्यांनी तिला कडेवर उचललं आणि तिचं नाव विचारलं.

“सखु”

“बरं सखुबाई, तुम्हाला एक गंमत सांगू? तुम्ही फार फार गोड दिसता.”

“खरं?”

आपली स्तुती तीही खुद्द महाराजांकडून ऐकून तिची कळी खुलली आणि टकळी सुरू झाली.

“महाराज, तुम्हाला माहितीये? मी शूरपण आहे. त्यादिवशी तुम्ही आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जात होतात ना, तेव्हा किनई मी खिडकीत उभी होते. तुम्हाला सगळे घाबरले पण मी नाही घाबरले.”

“शाब्बास!”

“आणि……..आणि मी तुमच्याकडे पाहून हसलेदेखिल. मग तुम्हीही माझ्याकडे बघून हसलात, आठवतं तुम्हाला?”

महाराजांनी आठवण्याचं नाटक केलं.

“अहो, त्यादिवशी मी ते नाही का, नारळी रंगाचं परकरपोलकं घातलं होतं.”

तरी आपले महाराज गप्पच!

“जरीकाठाचं……?”

तिचा हिरमुसलेला चेहरा महाराजांना पाहवला नाही.

“माफी असावी , सखुबाई. पण यापुढे आम्ही तुम्हाला अजिबात विसरणार नाही. तुम्ही तर थेट आमच्या रेणुकेसारख्या दिसता…….” असं म्हणताना क्षणभर त्यांना गहिवरून आलं. त्यांची मुलगी रेणुका ५-६ वर्षांची असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली होती.

“शप्पथ?”

सखुच्या प्रश्नाने महाराज भूतकाळातून वर्तमानात आले. चिमटीत आपला गळा पकडून ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होती. हसत हसत त्यांनी देखिल आपल्या गळ्याचे कातडी चिमटीत ओढली आणि “शप्पथ” असं म्हणाले. तसं करताना त्यांच्या बोटातली राजमुद्रेची अंगठी विलक्षण चमकली.

“अय्या, हे काय आहे?” सखु राजमुद्रा पहिल्यांदाच पाहत होती.

“ही………. ही आमची अंगठी आहे.”

“किती सुंदर आहे!”

“आवडली?”

“खूप”

“बरं, मग माझं एक काम कराल का?”

“सांगा ना !”

महाराजांचं काम आपण करणार या विचाराने तिला एकदम स्वतःचा अभिमान वाटू लागला. महाराजांनी तिला कडेवरून खाली उतरवलं. तिचा पेहराव ठीकठाक केला. आणि ती अंगठी काढून तिच्या हातात दिली.

“बाजूला तो पडदा आहे ना, त्याच्यामागचं दार उघडून आत जा. तिथे तिघेजण पाठमोरे उभे असतील आणि त्यांनी आपले हात पाठीमागे ओंजळीसारखे पसरलेले असतील. त्यापैकी कुणाही एकाच्या हातात ही अंगठी ठेवाल?”

सखुने मान हलवली.तिची नजर त्या अंगठीवरून हटतच नव्हती. ती त्या दालनात गेली आणि एक बोट गालावर ठेवून तिने त्या तिघांकडे एकवार पाहिलं.

“अरे हे तर बाबा” तिने मनात म्हटलं.

कृष्णाजीची पाठमोरी आकृती तिने बरोबर ओळखली. ही छानदार अंगठी आपण त्यांनाच द्यायची. आनंदाने ती जाऊन कृष्णाजीला बिलगली; “बाबा, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय!” असं म्हणत तिने ती अंगठी त्याच्या ओंजळीत टाकली.

दारातून आत येणारे महाराज थबकले. दालनातल्या सगळ्यांच्या नजरा कृष्णाजीवरून महाराजांवर आळीपाळीने फिरू लागल्या. कृष्णाजी आपल्या मुलीला भेटायला वळला तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. थरथरत्या हातांनी त्याने तिला पंखाखाली घेतलं……… शेवटचं! महाराज जागच्या जागीच थिजले होते.

“चला बाबा, मी तुम्हाला न्यायला आलेय. तुम्ही गेल्यापासून आई खूप आजारी पडलीये. तुम्ही चला ना, मग ती ठीक होईल.”

“हे…. हे तुमचे बाबा आहेत?” महाराज कसेबसे पुटपुटले.

“हो”

इतक्यात दोन पाईक पुढे झाले व कृष्णाजीला घेऊन जाऊ लागले.

“कुठे घेऊन चाललात त्यांना?”

पाईकांना काय उत्तर द्यावं, काहीच उमजेना. असहायपणे ते तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागले. ते काही बोलत नाहीसं पाहून मग तिने आपला मोर्चा महाराजांकडे वळवला. “बघा ना महाराज, ते लोक त्यांना घेऊन चाललेत. त्यांना सांगा ना माझ्या बाबांना सोडायला. मी त्यांना न्यायला आलेय.”

महाराजांची मुद्रा झाकोळली. “ते शक्य नाही.”

“शक्य नाही? असं कसं? तुम्ही महाराज आहात. तुम्ही सांगितलं तर तुमची आज्ञा त्यांना ऐकावीच लागेल.”

“अरे देवा! हे काय करून बसलो मी?” महाराजांना काहीच सुचेना. सखु मात्र एव्हाना रडकुंडीला आली होती. अखेरचा उपाय म्हणून तिने आपलं अश्रूंचं शस्त्र उपसलं. रडत रडत म्हणाली, “पण तुम्ही म्हणालात मी रेणुकेसारखी दिसते……. माझं ऐकायलाच हवं तुम्हाला.”

महाराज एकदम चमकले. हळू हळू चालत जाऊन ते खिडकीपाशी उभे राहिले. दोन मिनिटे डोळे बंद करून चिंतन केल्यावर त्यांनी अखेर डोळे उघडले.बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाकडे पाहत गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, “देवा तुझी लीला अगाध आहे. आज माझ्या हातून एक मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच तू मला थांबवलंस.”

आत वळण्यापूर्वी त्यांनी डोळ्यातून गालावर ओघळणारा एकुलता एक अश्रू हाताने निपटला व निश्चयाने पाईकांना फर्मावलं,” सोडा त्या तिघांना, देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.”

Next Newer Entries