होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स

लोकहो, खरे म्हणजे मला तुम्हाला घाबरवायचे नाही. पण वेळच तशी आली आहे. आपल्या पृथ्वीवर एक मोठी उलथापालथ झालेली आहे. मला त्या उलथापालथीचे नेमके स्वरुप लक्षात आलेले नाही हे खरे, पण I have got a shrewd idea and my shrewd ideas normally turn out to be accurate! मला असा संशय आहे, की पुढील दोनपैकी एक गोष्ट घडलेली आहे- एकतर या पृथ्वीतलावर एक सिल्व्हरटंग जन्माला आला आहे (सिल्व्हरटंग म्हणजे एखादी कथा मोठ्याने वाचून त्यातील एखादे पात्र पुस्तकातून बाहेर काढून वास्तव जगात आणू शकणारी व्यक्ती- संदर्भ: इंकवर्ल्ड ट्रिलजी) किंवा कोणीतरी बुकजंपिंगची कला अवगत केलेली आहे (बुकजंपिंग म्हणजे वास्तव जगातून एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या पुस्तकातून दुसर्‍या पुस्तकात उड्या मारणे व त्यातील पात्रांची इतरत्र ने-आण करणे- संदर्भ: थर्सडे नेक्स्ट कादंबर्‍या), कारण बीबीसीच्या नव्या ‘शेरलॉक’ या मालिकेतला ‘शेरलॉक होम्स’ हे पात्र साकारणारा आणि इतर वेळी ‘बेनेडिक्ट कंबरबाच’ या नावाने वावरणारा इसम हा तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानव नसून डॉयलच्या कथांतला शेरलॉक होम्सच आहे अशी माझी पक्की खात्री झाली आहे.

का ते सांगण्यासाठी या शेरलॉकचे वेगळे वर्णन करण्याची गरजच नाही (आता इथून पुढे कथेतील शेरलॉक होम्स या पात्राचा उल्लेख ‘होम्स’ असा केला जाईल आणि या टीव्हीमालिकेतील शेरलॉक होम्सचा उल्लेख ‘शेरलॉक’ असा केला जाईल. हेच तत्त्व जॉन वॉटसन या पात्रालाही लागू. याचे कारण पुढे कळेलच). वॉटसनने केलेले होम्सचे सगळे वर्णन आठवा आणि वेगवेगळ्या कथांतून आपल्याला दिसलेले त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आठवा, ते सगळे या शेरलॉकशी तंतोतंत जुळतात.

पण होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत एक मोठा फरक आहे. होम्स आणि वॉटसन आहेत व्हिक्टोरियन काळातील लंडनमध्ये राहणारे, तर शेरलॉक आणि जॉन आहेत आजच्या, २१व्या शतकातल्या लंडनमध्ये राहणारे. या फरकामुळे अर्थातच होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत वरवरचे असे बरेच आनुषंगिक फरक निर्माण झाले आहेत.  होम्स घोडागाड्यांतून फिरायचा, तर शेरलॉक कॅबा उडवतोय. वॉटसन त्याच्या कथा मासिकात पाठवायचा, तर जॉन त्या कथा त्याच्या ब्लॉगवर पोस्ट करतोय. होम्स लोकांची माहिती जमवून स्वतःचे कोश बनवायचा, तर शेरलॉक मोबाईल आणि लॅपटॉपवरून इंटरनेट वापरून आपला रिसर्च करतोय. होम्स छोट्या-मोठ्या चौकश्यांसाठी तार करायचा, तर शेरलॉक टेक्स्टिंग करतोय. होम्स-वॉटसन एकमेकांना आडनावाने हाक मारायचे, तर शेरलॉक-जॉन फर्स्ट नेम बेसिसवर आहेत.

परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे, हे सगळे फरक केवळ वरवरचे. दोघांचा ‘आत्मा’ मात्र एकच. होम्स आणि शेरलॉक दोघांसाठीही गुन्ह्यांचा छडा लावणे हे प्राणवायूसारखे आहे. सोडवायला केस नसताना दोघेही कंटाळून व्यसनांना कवटाळतात. दोघांचाही सायन्स ऑफ डिडक्शनवर विश्वास आहे. दोघांपैकी कुणालाही सूर्यमालेबद्दल काही माहिती नाही आणि दोघांपैकी कोणालाही भावना कळत नाहीत.

या शेवटच्या दोन परिच्छेदांतली एक गंमत लक्षात आली का तुमच्या? या आधीच्या परिच्छेदात होम्स आणि शेरलॉक या दोघांबद्दल बोलताना मी साधा वर्तमानकाळ वापरला आहे, जणू काही त्या विधानांतून मला
त्यांचे कालातीत होम्सत्व दाखवायचे आहे. याऊलट त्याआधीच्या परिच्छेदात मात्र त्या दोघांच्या या कालातीत होम्सत्वाची कालिक प्रकटने दर्शवण्यासाठी  मी होम्स-वॉटसनबद्दल बोलताना रीती भूतकाळ वापरलाय आणि शेरलॉक-जॉनबद्दल बोलताना चालू वर्तमानकाळ वापरलाय. मी नकळतपणे केलेल्या या वाक्यरचनेतूनच मालिकेचे मुख्य उद्दिष्ट सफल झालेले दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर शेरलॉकच्या पात्राद्वारे  होम्सची व्यक्तिरेखा तिच्या गाभ्याला जराही धक्का न लागता, जशीच्या तशी आजच्या काळात आलेली आहे.

या मालिकेत केवळ पात्रेच नव्हे, तर अख्ख्या कथावस्तुचाही असा ’कालानुवाद’ केलेला आहे. पहिल्या सिझनचा पहिला भाग हा ’स्टडी इन स्कार्लेट’ वर बेतलेला होता. शेवटच्या दोन भागांत मात्र एकच अशी कथा घेतली नव्हती. याऊलट सध्या चालू असलेल्या सीझनमध्ये मात्र तिन्ही भाग एकेका कथेवर आधारलेले आहेत. पहिला भाग ’अ स्कॅंडल इन बोहेमिया’ वर आधारलेला होता, दुसरा भाग ’द हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स’ वर बेतलेला होता तर तिसरा भाग हा ’फायनल प्रॉब्लेम’चे रुपांतरण असणार आहे. एकेका कथेवर आधारित असलेल्या भागांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी त्या त्या कथेतील महत्त्वाच्या घटना, त्यांची वैशिष्ट्ये या गोष्टींना फारसा धक्का लावलेला नाही. ’द हाऊंड्स इन बॅस्करव्हिल’मध्ये एक भयानक कुत्रा हे सूत्र समान आहे. परंतू, येथे बॅस्करव्हिल हॉलच्या जागी बॅस्करव्हिल रिसर्च सेंटर आले आहे. त्या भयानक कुत्र्याच्या मागे बॅस्करव्हिल कुटुंबावरील शाप नसून जेनेटिक एक्स्पेरिमेंटेशन आहे. एकुणात काय, तर कथेचे मुख्य घटक तेच ठेवले आहेत, पण त्यांची पार्श्वभूमी कालानुरूप बदलली आहे आणि त्यामुळे त्या कथाही अधिक विश्वसनीय झाल्या आहेत. मार्क गॅटिस या मालिकालेखकाने या भागाचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेबद्दल एका मुलाखतीत दिलेली माहिती वाचनीय आहे.

या मालिकेतला हा कालानुवाद एकुणातच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. हा कालानुवाद वेगवेगळ्या स्तरांवर झालेला आहे. सगळयात पहिला आणि लगेच डोळ्यात भरणारा स्तर म्हणजे शेरलॉक आणि वॉटसन यांची वेशभूषा (डिअरस्टॉकर आणि पाईप यांचं गायब होणं), त्यांचे घर, त्यांच्या आसपासच्या वस्तू (लॅपटॉप इ.)- थोडक्यात काय, तर नेपथ्य.

पुढचा स्तर आहे, एका शॉटमध्ये एस्टॅब्लिश न करता येणाऱ्या गोष्टींचा- पात्रांचे वागणे (टेक्स्टिंग), पात्रांच्या सवयी (निकोटिन पॅचेस), त्यांचा पूर्वेतिहास (वॉटसन आणि जॉन दोघेही अफगाणिस्तानात लढले आहेत असे दाखवले आहे, परंतू दोन्ही युद्धे वेगवेगळी). या स्तरावरील कालानुवादात दोन भाग आहेत- एक एक सवय घेऊन तिचा दुसऱ्या काळातला इक्विव्हॅलंट शोधणे हा एक भाग आणि त्या इक्विव्हॅलंटवर आजच्या काळातील सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय इ. इ. परिस्थितीचा कसा परिणाम होईल याचा विचार करणे हा दुसरा भाग. म्हणजे, होम्सच्या व्हिक्टोरियन काळातील पाईपसाठी सिगारेटी हा चांगला पर्याय होता, परंतु “It’s impossible to sustain a smoking habit in London these days” असे म्हणत शेरलॉक निकोटिन पॅचेसचा आश्रय घेताना दाखवला आहे.

याच्या पुढील स्तर आहे तो संवादांच्या कालानुवादाचा. या मालिकेत बरेचसे संवाद नव्याने लिहिले आहेत. नवीन संवादांबरोबरच होम्सच्या काही लोकप्रिय संवादांचाही समावेश आहे. जसे, ‘द गेम इज अफूट’. या कारणास्तव, संवादलेखनाचेही दोन भाग बनतात- नवे संवाद अशा प्रकारे लिहिणे, की जेणेकरून त्याची भाषा व सांस्कृतिक संदर्भ आजचे असतील, तरी त्यांतून केलेली विधाने व केलेली शब्दरचना व वाक्यरचना ही त्या त्या पात्राच्या स्वभावाशी सुसंगत असेल व त्याचबरोबर ते संवाद आपल्याला मांडावयाच्या कथेला पोषक असतील. जुन्या संवादांचा कालानुवाद करताना त्यांत जे वाक्यविशेष व रुपके वापरलेली असतात, त्यांचे त्या संवादातले स्थान, कार्य, प्रभाव, काव्यात्मकता, त्यामागचा त्या पात्राचा विचार इ. गोष्टी पाहून तशा प्रकारचे नव्या भाषेतले वाक्यविशेष व नव्या संस्कृतीतली रुपके वापरायची असतात. उदा. वर उल्लेखलेला संवाद या मालिकेत ‘द गेम इज ऑन’ हे रुप घेऊन आला आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, आपल्याला सूर्यमालिकेबद्दल काहीच माहिती का नाही हे वॉटसनला सांगत असताना होम्स आपल्या स्मरणशक्तीला अ‍ॅटिकची, म्हणजे घरातल्या माळ्याची उपमा देतो. शेरलॉक मात्र अशाच प्रकारच्या संवादात स्मरणशक्तीला कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हची उपमा देतो.

पुढील स्तर आहे तो मूळ कथेतल्या मुख्य घटकांसाठी एक्विव्हॅलंट्स शोधण्याचा (मूळ कथेतील नटी आयरीन ऍडलर ही मालिकेत डॉमिनेट्रिक्स बनली आहे, तर तिच्याकडे राजघराण्यातल्या ज्या व्यक्तीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे आहेत, ती  व्यक्ती एक स्त्री आहे). येथे त्या एलिमेंट्सचे कथेतले स्थान, त्याचा कथानकावर पडणारा प्रभाव आणि त्यांचे कार्य या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार इक्विव्हॅलंट्स शोधावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणाबाबत बोलायचे झाल्यास, मूळ कथेतील छायाचित्रांचे महत्त्व हे त्यांच्यामुळे विवाहपूर्व प्रेमप्रकरणाचे बिंग फुटण्याची शक्यता असल्याने वाढले होते. आताच्या काळात विवाहपूर्व प्रेमप्रकरणे असणे वावगे नाही. त्यामुळे या छायाचित्रांची स्फोटकता राखण्यासाठी आयरीनला डॉमिनेट्रिक्स बनवलं आहे आणि राजघराण्यातली ती व्यक्ती स्त्री आहे असं दाखवलं आहे.

याच्या पुढचा स्तर आहे, तो कालानुरुप बदललेली पात्रे, बदललेली परिस्थिती, कथेतले बदललेले घटक यांमुळे कथानकाच्या बदलत जाणारय़ा ओघावर नियंत्रण आणून ते पात्रांच्या स्वभावाशी, वागण्याशी सुसंगत करणे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर या मालिकेतील मॉली या नवीन पात्राचे द्यावे लागेल. व्हिक्टोरियन काळात एखादी मुलगी होम्सवर भाळून सतत त्याच्या मागेपुढे करणे कितपत कालसुसंगत होते ते माहीत नाही, परंतु आताच्या काळात शेरलॉकच्या दिशेने कोणत्याही मुलीने पाऊल न टाकणे निव्वळ अशक्य. या कारणास्तव कदाचित मॉलीची व्यक्तिरेखा कथानकात घालण्यात आली आहे. असे असूनही शेरलॉकचे मॉलीशी होणारे बोलणे, वर्तन हे खास शेरलॉकी शैलीतले आहे. त्यामुळे मॉलीच्या व्यक्तिरेखेचा प्रवास कुठेही खटकत नाही.

या सर्व स्तरांवरच्या या यशस्वी कालानुवादामुळे ‘शेरलॉक होम्स’ ही व्यक्तिरेखा आता संकल्पनेच्या पातळीवर गेली आहे आणि डॉयलचा होम्स व गॅटिस-मोफॅटचा शेरलॉक हे त्या सांकल्पनिक ‘शेरलॉक होम्स’चे दोन वेगवेगळे कालानुवाद झाले आहेत असे वाटते. होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स यांच्यात स्रोत पात्र-लक्ष्य पात्र असे नाते आहे, असा विचार केल्यास कदाचित या कालानुवादाकडे अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येईल.

या कालानुवादानंतर मोठे आव्हान उभे राहते, ते पुस्तक ते छोटा पडदा या माध्यमांतराचे. आणि या विशिष्ट मालिकेबाबत बोलायचे झाले, तर यात कथा ज्या क्रमाने घेतल्या आहेत, तो क्रम डॉयलच्या मूळ कथाक्रमापासून भिन्न आहे. त्यामुळे मालिकेच्या पटकथालेखकांना संपूर्ण मालिकेतून जी कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यादृष्टीने कथानकात बरेच बदल केले गेले आहेत (उदा. आयरीन ऍडलर आणि मॉरियार्टीचे संगनमत).

इतक्या लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि १२० वर्षे सतत लोकांच्या वाचनात राहिलेल्या व त्यामुळे वाचकांना तोंडपाठ झालेल्या कथा मालिकाबद्ध करताना मूळ कथांना व्यापून राहिलेली एक भावना- उत्कंठा टिकवून धरण्याचे शिवधनुष्यही पटकथालेखकांना पेलायचे होते. तेही त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे, मूळ कथेतला खलनायक- जॅक स्टेपलटन हा ’द हाऊंड्स ऑफ बॅस्करव्हिल’ या भागात नाहीच आहे. त्यामुळे हे सगळे कोण घडवून आणते आहे ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते.

प्रेक्षकांना या मालिकेत खास रस वाटण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला मालिकेत दिलेले दृश्य स्वरुप. शेरलॉक जेव्हा घटनास्थळावरची एक एक वस्तू पाहतो, तेव्हा ती पाहून त्याने काढलेले एकेक निष्कर्ष आपल्याला पडद्यावर लिखित स्वरुपात दिसतात. शेरलॉक जेव्हा लंडनच्या रस्त्यांचा नकाशा आठवायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आपल्यालाही दिसू लागतो. त्यामुळे शेरलॉकच्या मनात काय चालले आहे ते आपल्याला दिसत राहते आणि हेच इतरांना कळत नाही आहे हे पाहून शेरलॉकप्रमाणेच आपल्यालाही मजा वाटते. आजवर पडद्यावर अनेक शेरलॉक होम्स पाहिले असले, तरी मनाला सर्वाधिक भुरळ पाडणारी त्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मेंदूत फिरणारी चक्रे- ती या मालिकेत दिसतात, त्यामुळे हा शेरलॉक अधिक जवळचा वाटतो. खरे म्हणजे, शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला दृश्य स्वरुप देणे हे गेल्या दोन वर्षांत आलेल्या होम्स रूपांतरणांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रॉबर्ट डाऊनी ज्युनियर अभिनीत आणि गाय रिची दिग्दर्शित ’शेरलॉक होम्स’ या चित्रपटातही ’स्लो मोशन’च्या सहाय्याने होम्सची विचारप्रक्रिया दाखवली आहे. याच चित्रपटात होम्सचे वेषांतर ज्या पद्धतीने दाखवले आहे, तेही उल्लेखनीय.

’शेरलॉक’ मालिकेच्या या भागांचे कथालेखनाच्या दृष्टीने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व भागांत डॉयलच्या ६० होम्सकथांचे विखुरलेले संदर्भ आणि त्यांची विनोदपूर्ण हाताळणी. जॉनने आपल्या ब्लॉगवर लिहिताना कथांना ’द गीक इंटरप्रीटर’, ’द स्पेकल्ड ब्लॉंड’ अशी नावे दिली आहेत. एका भागात जॉनने लपवून ठेवलेल्या सिगारेटी धुंडाळताना शेरलॉक चपला उलट्यापालट्या करून बघतो. ’अ स्टडी इन पिंक’ मध्येही एका घरात एक प्रेत सापडते, इथेही RACHE ही अक्षरे लिहिलेली सापडतात. लगेच पोलिसांचा फॉरेन्सिक एक्स्पर्ट जर्मन भाषेतल्या ’राखं’ या शब्दाबद्दल बोलू लागतो, तर होम्स त्या खोलीचे दार त्याच्या तोंडावर आपटतो, व तो शब्द ’राखं’ नसून ’रेचल’ आहे असे सांगतो आणि आपली हसून हसून पुरेवाट होते.

आता इतके चर्‍हाट लावून झाल्यावर थोडक्या शब्दांत या मालिकेचे परीक्षण द्यायचे म्हटले तर मी असे म्हणेन- बेनेडिक्ट कंबरबाचचं होम्ससदृश रुपडं, त्याने विलक्षण समज आणि संयम दाखवून केलेला अभिनय, पटकथालेखकद्वयीने केलेला उत्तम कालानुवाद हा या मालिकेचा मुख्य ऐवज, त्यावर शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला  दृश्यस्वरुप देऊन, प्रेक्षकांची उत्कंठा कायम राखण्यासाठी मूळ कथेत बदल करून आणि मूळ होम्सकथांतील विविध संदर्भाची मधूनच पेरणी करून पटकथालेखकांनी ‘प्रतिमेहूनही वास्तव उत्कट’ असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. बाकी कोणाचे असो वा नसो, माझे मन मात्र या मालिकेने नक्कीच जिंकले आहे. यासाठी सिल्वरटंग मार्क गॅटिसला आणि बुकजंपर स्टिव्हन मोफॅटला माझे मनापासून धन्यवाद.

भाषांतरकाराकडे जाताना

हल्ली इंग्रजीमधून प्रादेशिक भाषांत भाषांतर करणे फारच गरजेचे बनले आहे. सात-बाराच्या उतार्‍यापासून आपल्या नव्या उद्योगासाठीच्या प्रेस रिलीजपर्यंत कोणत्याही कागदपत्राचे किंवा मजकुराचे व्यावसायिक भाषांतर करून घेण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ शकते. माझ्याकडे भाषांतर करून घेण्यासाठी असे बरेचजण येतात. परंतु, त्यांना आपल्या गरजा नेमक्या माहीत नसल्याने आणि त्यांनी वेळेचे व्यवस्थापन नीट न केल्याने अशा प्रकारच्या कामांमध्ये बर्‍याच अडचणी येतात. या कारणास्तव भाषांतर करून घेण्याच्या कामातील प्रत्येक टप्प्यावरील ‘ग्राहकाने पाळायच्या आणि टाळायच्या गोष्टी’ अशा स्वरूपाचा हा लेख लिहिला आहे.

स्वतंत्र भाषांतरकार की एजन्सी?-
हे ठरवण्यासाठी दोन गोष्टी विचारात घ्याव्यात-

१- कामाचा आकार व उपलब्ध कालावधी– जर काम फार मोठे (१००-१५० पाने) आणि उपलब्ध वेळ कमी असेल, तर अशा वेळी स्वतंत्र भाषांतरकाराकडे न जाता एखाद्या एजन्सीकडे जावे. याचे कारण असे, की एजन्सीजकडे एकाच प्रकारचे भाषांतर करणारी एकाहून अधिक माणसे असतात. त्यामुळे तुमचे काम एकाच वेळी अनेक जणांना विभागून देता येते व त्यामुळे कमी वेळात जास्त भाषांतर होते. परंतु यात दोन तोटे असतात. एजन्सीजचे दर स्वतंत्र भाषांतरकारांपेक्षा जास्त असतात; कारण त्यात भाषांतरकाराचे शुल्क, मुद्रितशोधकाचे शुल्क व शिवाय एजन्सीचे शुल्क अंतर्भूत असते. दुसरा तोटा म्हणजे, अनेकांनी एकाच भाषांतरावर काम केले तर वेगवेगळे भाषांतरकार एकाच पारिभाषिक शब्दासाठी वेगवेगळे प्रतिशब्द वापरतात व परिणामी त्या भाषांतराचा दर्जा खालावतो. अशा वेळी ग्राहकाने सजग राहून पारिभाषिक शब्दांच्या वापरातले सातत्य राखण्याचा आग्रह धरला पाहिजे.
२- भाषांतराचा अपेक्षित दर्जा– एका व्यक्तीने केलेले भाषांतर दुसर्‍या एखाद्या भाषांतरकाराकडून तपासले न गेल्यास त्यात त्रुटी राहण्याची शक्यता असते. बर्‍याचशा एजन्सीजमध्ये भाषांतरप्रक्रियेत अनेक टप्पे असतात. पहिला टप्पा भाषांतराचा. याला फॉरवर्ड ट्रान्सलेशन असे म्हणतात. दुसरा टप्पा मुद्रितशोधनाचा. तिसरा टप्पा पुनर्भाषांतराचा, म्हणजे बॅक ट्रान्सलेशनचा. या टप्प्यात ते मराठी भाषांतर दुसर्‍या एका भाषांतरकाराला पाठवून त्याचे पुन्हा इंग्रजीत भाषांतर करून घेण्यात येते. चौथा टप्पा परीक्षणाचा,  म्हणजेच रिव्ह्युइंगचा. यात पुनर्भाषांतर घेऊन त्याची मूळ इंग्रजी मजकुराशी तुलना करून अर्थात काही फरक पडला आहे का, ते पाहिले जाते. असे फरक आढळल्यास पाचव्या टप्प्यात संबंधित भाषांतरकाराकडून भाषांतर दुरुस्त करून घेतले जाते. प्रत्येक टप्प्यागणिक भाषांतरावरील खर्च वाढत जातो. काम किती महत्त्वाचे आहे, यानुसार यातल्या शेवटच्या चार टप्प्यांची २/३ अशी किती आवर्तने करायची ते ठरते. या प्रक्रियेमध्ये भाषांतर एकाच व्यक्तीने केले असल्यामुळे परिभाषेतले सातत्य तर राखले जातेच, शिवाय ते भाषांतर २-३ जणांच्या नजरेखालून गेल्याने त्यातल्या बर्‍याचशा त्रुटी काढून टाकल्या जातात.

भाषांतरकार किंवा भाषांतर एजन्सी कशी शोधावी?
बर्‍याच वेळा एजन्सीजची स्वतंत्र संकेतस्थळे असतात. स्वतंत्र भाषांतरकारांसाठी महाजालावर अनेक व्यासपीठे आहेत, तेथे भाषांनुसार आणि विषयानुसार भाषांतरकारांचा शोध घेता येतो. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असते. प्रत्येक भाषांतरकाराला प्रत्येक विषयातल्या मजकुराचे भाषांतर करता येत नसते. प्रत्येक भाषांतरकाराची एखाद्या खास विषयावर पकड असते. उदा.,  मी कायदेविषयक मजकूर सोडून इतर सर्व विषयांतील मजकुरांचे भाषांतर करते. परंतु माझ्याकडे सर्वाधिक अनुभव आणि सर्वाधिक कसब आहे ते वैद्यकीय मजकुराचे भाषांतर करण्यात.  भाषांतरकाराच्या त्या त्या विषयातील कसबानुसार आणि अनुभवानुसार त्याचे भाषांतराचे दरही बदलत जातात.

भाषांतरकार कसा निवडावा?
शक्यतो सर्वच भाषांतरकार ग्राहकाच्या मजकुराचे नमुना भाषांतर करून देतात.  अशा नमुना भाषांतरासाठी काही ठराविक शब्दमर्यादा असते. उदा. १०० शब्दांचे नमुना भाषांतर विनामूल्य व अधिक मोठा नमुना सशुल्क. या नमुन्याच्या आधारावर भाषांतरकार निवडता येतो.

भाषांतरकाराशी संपर्क कधी साधावा?
बर्‍याचदा असे होते, की ज्या दिवशी पूर्ण झालेले भाषांतर हातात हवे आहे, त्याच्या दोन दिवस आधी ग्राहक भाषांतरकाराचा शोध घ्यायला सुरुवात करतो व ग्राहक आणि भाषांतरकार या दोघांनाही खूप त्रास होतो. त्यामुळे असे न करता काही दिवस आधीच भाषांतरकाराशी संपर्क साधावा. याचे कारण असे, की भाषांतरकार इतर भाषांतरांच्या कामात गुंतलेले असतात. पुढच्या काही दिवसांचे (कधी कधी एका संपूर्ण महिन्याचेही) त्यांचे वेळापत्रक ठरून गेलेले असते व त्यात नवीन भाषांतराचे काम घुसवणे शक्य नसते. या कारणास्तव ज्या मजकुराचे भाषांतर करायचे आहे, तो लिहून झालेला नसला, तरी भाषांतरकाराशी संपर्क साधलेला चालतो, जेणेकरून आपले व त्या भाषांतरकाराचेही वेळापत्रक आधीच आखून ठेवता येते. परंतु ज्या दिवशी मजकूर पाठवण्याचे आश्वासन द्याल, त्याच दिवशी तो पाठवून आश्वासन पूर्ण करा. अन्यथा त्या भाषांतरकाराचे वेळापत्रक कोलमडून त्याला एखादे काम गमवावे लागते. दुसरा एक मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष भाषांतरासाठी लागणारा वेळ. शक्यतो काही दिवस हातचे राखूनच भाषांतरकाराशी संपर्क साधावा व आपल्या कामाच्या आकारानुसार त्याचे भाषांतर करण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यावा.

प्रत्यक्ष मजकूर देताना
आपल्याला भाषांतर नेमके कसे हवे आहे, याची स्पष्ट कल्पना ग्राहकाला असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी भाषांतराचा वाचकवर्ग कोणता आहे याचा विचार करून भाषांतरित मजकुराची काठिण्य-पातळी किती असावी हे आपण ठरवून तसे भाषांतरकाराला सांगावे.  तांत्रिक मजकूर असल्यास भाषांतरात मराठी परिभाषा वापरायची आहे का? मराठी परिभाषा उपलब्ध नसल्यास भाषांतरकाराने स्वतः नवीन शब्द घडवणे अपेक्षित आहे का? की इंग्रजी शब्द देवनागरीत लिहून वापरायचे आहेत? हे प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे शोधून ठेवावीत किंवा भाषांतरकाराशी चर्चा करून या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. जेणेकरून भाषांतरोत्तर प्रक्रियेचा कालावधी कमी होतो.
याचबरोबर, भाषांतर करून मिळाल्यावर आपण ते कोणत्या स्वरूपात सादर करणार आहोत याची ग्राहकाला आधीच स्पष्ट कल्पना असायला हवी. याचे कारण असे, की यावर फाँटची म्हणजेच टंकाची निवड अवलंबून असते. मंगल/युनिकोड फाँट कोरलड्रॉ मध्ये वापरता येत नाही. अशा वेळी बारहा वगैरे फाँट्स वापरावे लागतात. फाँट कन्व्हर्जन करणे सोपे असते हे खरे, परंतु तसे करताना फॉर्मँटिंग जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हा मुद्दा आधीच लक्षात घेऊन भाषांतरकाराला आपल्याला कोणता फाँट हवा आहे हे सांगावे.

हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर आपण भाषांतरकाराकडे गेलात, तर सर्व भाषांतरप्रक्रिया सुरळीत पार पडून तुम्हाला हवे तसे भाषांतर तुमच्या हातात पडेल.

‘अभ्यासू’ क्लायंट

गेली तीन वर्षे मी एक भाषांतरकार म्हणून काम करत आहे. या कामानिमित्त बर्‍याच एजन्सीज, स्वतंत्र क्लायंट्स यांच्याशी संबंध आला. काहींशी बर्‍यापैकी तारा जुळल्या, काहींशी भाषांतर या विषयावर दीर्घ चर्चा झाल्या व पुढे मैत्रीही झाली, काहींशी चांगले व्यावसायिक संबंध जुळले तर बर्‍याच जणांशी वाद झाले. काल म्हणजे १५ सप्टेंबरला ज्या क्लायंटने फोन केला, तिची मात्र गोष्टच न्यारी होती. तिच्याशी बोलून झाल्यावर मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. तिच्याशी झालेलं संभाषण खाली दिलं आहे ते वाचा आणि हसावं की रडावं ते आपलं आपण ठरवा.

क्लायंटः नमस्कार, मला तुमचं नाव अमुक तमुक यांनी सुचवलं. मला थोडं भाषांतर करून हवं आहे. २८ सप्टेंबरला देऊ शकाल का?
मी: ते सांगण्यासाठी थोडे तपशील लागतील. आधी सांगा विषय काय आहे?
क्लायंटः एस.वाय.बी.ए.च्या मानसशास्त्राच्या नोट्स.
मी: साधारण शब्दसंख्या सांगता येईल का?
क्लायंटः ते नाही मी मोजलं, पण पानं साधारण २००-२५० असतील.
मी: (तोंडाचं भोकाचं थालीपीठ) आज तारीख १५, तुम्हाला भाषांतर करून हवं आहे २८ ला. १३-१४ दिवसांत २००-२५० पाने कशी होतील?
क्लायंटः अगदीच नाही होणार का? १ ऑक्टोबरपासून माझी परीक्षा आहे हो. मला गेल्या वर्षी के.टी. बसली आहे या विषयात. या वर्षी काहीही करून पास व्हायला हवं. टी.वाय्.चं वर्ष आहे.
मी: अहो पण १३ दिवसात इतकी पानं कशी होतील? शिवाय परीक्षेची तारीख खूप आधी ठरते ना. तुम्ही आधीच का नाही चौकशी केलीत?
क्लायंटः (काहीतरी फुटकळ सबब)
मी: हे बघा, मला वाटत नाही, तुम्हाला कोणीही इतकी पाने इतक्या कमी वेळात भाषांतरित करून देऊ शकेल. फार फार तर १५-२० लोकांना एकाच वेळी थोडी थोडी पाने देऊन काम दिले तर एखाद वेळेस होईल. पण अशा वेळी दर्जा खूपच खालावतो. शिवाय, त्यासाठी तुम्हाला एखाद्या एजन्सीकडे जावे लागेल. पण त्यापूर्वी तुम्हाला एवढ्या पानांचं भाषांतर करून घेणं खरंच परवडणार आहे का?
क्लायंट: (गप्प)
मी: नाही म्हणजे तुम्ही विद्यार्थिनी आहात आणि भाषांतर करून घेण्याचा तुमचा हा पहिलाच अनुभव आहे म्हणून विचारते आहे. माझा स्वतःचाच दर १ रु. प्रति शब्द आहे. काही एजन्सीज प्रति पान दर लावतात. त्यांचा माझ्याहून कमी असेल. पण तोही २०० रु. प्रति पान हून कमी असणार नाही. म्हणजे २००-२५० पानांचे ४०-५० हजार रु. होतील.
क्लायंटः पण आता काय करणार ना?
मी: मराठीत मानसशास्त्राची पुस्तके/मार्गदर्शके काहीच नाही?
क्लायंटः आहे, पण त्यात काही मुद्दे गाळलेले आहेत.
मी: मग तेवढेच मुद्दे नाही तुम्हाला स्वतःहून लिहून काढता येणार?
क्लायंटः आता तेच करावं लागणार; पण मला अगदी अचूक उत्तरे हवी होती.
मी: तुम्हाला अगदीच असं नाही म्हणताना जीवावर येतंय म्हणून एका एजन्सीचा नंबर देते, तो घ्या.

मी त्या मुलीची अगदीच शाळा घेतली हे मान्य आहे, पण मला अजिबात रहावलं नाही. हे म्हणजे “कैच्या कै” होतं. स्वतः वर्षभर अभ्यास करायचा नाही. इतकंच काय, पुस्तकं पण नीट शोधायची नाहीत. आयत्या नोट्समध्ये स्वत:चे दोन रु. घालण्याचे श्रम घ्यायचीही इच्छा नाही. ४०-५० हजार (किंवा त्याहून जास्तच) रुपये फेकून तयार नोट्स मिळवण्याची तयारी. वर त्या नोट्सही १३ दिवसांत हव्या. एकूणात काय “पैसा फेको तमाशा देखो” असंच वाटत असतं बर्‍याच जणांना!

सुट्टीचा सदुपयोग

मी सिरीयसली, नीट विचार करून केलेला सर्वांत पहिला अनुवाद हा “The Adventure of The Reigate Squires” या होम्सकथेचा. हा अनुवाद मी १२वीची परीक्षा आटपल्यानंतरच्या सुट्टीत केला होता. होम्स आणि गुन्ह्याचा तपास करणारा पोलीस यांच्या संवादशैलीत थोडा फरक दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात अनुवाद कसा झाला आहे, माहित नाही. (थोडाही फरक न करता तेव्हाचा अनुवाद जसाच्या तसा देते आहे.) अनुवादाचं नाव मात्र मोठं मजेशीर आहे. पण पहिलाच प्रयत्न असल्याने कृपया समजून घ्या, हसू नका बरे!

 

सुट्टीचा सदुपयोग

 

नेदरलँड-सुमात्रा कंपनीच्या घोटाळ्याचा पाठपुरावा केल्यामुळे शेरलॉक होम्सची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्या आजारपणातून तो बरा होण्यापूर्वीची ही घटना-

१८८७ सालच्या वसंताचा मौसम! होम्स लॉयन्स येथील एका हॉटेलात आजारी अवस्थेत पडला असल्याची बातमी सांगणारी तार १४ एप्रिल रोजी माझ्याकडे येऊन थडकली. २४ तासांच्या आत मी त्याच्या खोलीत हजर झालो. काळजी करण्याजोगी कोणतीच लक्षणे त्याच्या आजारात दिसत नाहीत, हे पाहून मला हायसे वाटले. त्याच्या रक्तातील लोहाचं प्रमाण मात्र खूपच खाली गेलं होतं. २ महिन्यांच्या अथक तपासाचा, कामाचा जबर ताणच अखेर त्याला भोवला! मागाहून मला कळले, की हे महाशय दिवसाला १५ तासांहून अधिक वेळ काम करायचे. एक-दोनदा तर सलग ५-५ दिवस काम केल्याचंही त्याने मजजवळ कबूल केलं. त्याच्या परिश्रमांचं अखेर चीज झालं खरं, पण त्यातून उद्भवणाऱ्या आजाराच्या तडाख्यातून काही तो सुटू शकला नाही.

साऱ्या युरोपभर ’शेरलॉक होम्स’ हे नाव मोठ्या आदराने दुमदुमत होतं. त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता. परंतू तरीही, कुठेतरी काहीतरी बिनसलं होतं. जिथे ३ देशांच्या पोलिसदलांनी हात टेकले, तिथे ह्या पठ्ठ्याने बाजी मारली होती. अशावेळी आनंद साजरा करायचं तर राहिलं दूरच, पण होम्सच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता झाकोळून आलेली मला दिसली.

३ दिवसांतच आम्ही दोघे बेकर स्ट्रीटवरच्या आमच्या घरी परतलो. पण होम्सची तब्येत सुधारण्याचे चिह्न दिसेना, तेव्हा त्यानेच आपणहून हवापालटासाठी बाहेर जाण्याचा उपाय सुचवला. वसंत ऋतूची वनश्री मलाही खुणावत होतीच! सरे परगण्यातील रायगेट भागात राहणाऱ्या कर्नल हायटर यांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं. त्यांनी मला व होम्सला त्यांच्या घरी येऊन राहण्याचं निमंत्रण बऱ्याचदा दिलं होतंच, ते आता स्वीकारायचं असं मी ठरवलं. होम्सची थोडी मनधरणी करावी लागली खरी, पण कर्नल अविवाहित व एकटा राहत असल्यामुळे होम्सच्या तेथिल वावरावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत, अशी जेव्हा त्याची खात्री पटली, तेव्हा एकदाचा तो तयार झाला! तो आठवडा संपण्याच्या आतच आम्ही कर्नलसाहेबांच्या घरी दाखल झालो.

कर्नलसाहेब व होम्सच्या स्वभाववैशिष्ट्यांत थोडे-फार साम्य असल्याने, त्यांचे सूते जुळायला वेळ लागला नाही. असंच एकदा, रात्रीच्या जेवणानंतर त्यांच्या अवजारखान्यात आम्ही एकत्र बसलो असता, कर्नलसाहेबांना एकदम काहीतरी आठवलं, ” अरे, मी विसरलोच होतो, यातलं एक पिस्तूल काही गडबड झाली, तर हाताशी असावं, म्हणून मला बरोबर घ्यायला हवं.”

“कसली गडबड?” इति मी.

“अहो, काय सांगू तुम्हाला, आमच्या भागावर सध्या दरोडेखोरांचं सावट आलं आहे. गेल्या सोमवारीच ऍक्टन या अत्यंत श्रीमंत माणसाचं घर फोडलं त्यांनी. अजून काही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.”

“काही सुगावा लागला का?” लगेच होम्सचे प्रश्न सुरू झाले.

“काहीच नाही! अहो, पण हा प्रकार तुमच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकरणे सोडवणाऱ्या महान गुप्तहेरासाठी अगदीच किरकोळ!” होम्सने ही प्रशंसा झटकून टाकली खरी, पण चेहऱ्यावरचं आनंदी हसू काही तो लपवू शकला नाही. ” त्या दरोडेखोराच्या हाती काही घबाड लागलं का?”

“छे हो! त्या चोरांनी सारी लायब्ररी पालथी घातली, पण डोंगर पोखरून उंदीर बाहेर आला! पोप व होमरची पुस्तके, सोन्याचं पाणी चढवलेले मेणबत्त्यांचे स्टँड्ज, हस्तिदंती गोटा, लाकडी बॅरोमीटर व दोऱ्याचा गुंडा वगळता, काहीच सापडलं नाही त्यांना.”

“वा, काय पण घबाड आहे!” मी उद्गारलो.

“हाती लागलं ते लांबवलं असेल बदमाशांनी.”

होम्स सोफ्यात बसूनच करवादला, “इथल्या पोलिसांनी याचा वेळच्या वेळी बंदोबस्त केलाच पाहिजे. धडधडीत दिसतंय की….”

“मी तोंडावर बोट ठेवून होम्सला सक्त ताकीद दिली, ” अरे बाबा, तू इथे विश्रांतीसाठी आला आहेस. कृपा करून त्या लफड्यात अडकून आपली उरली-सुरली शक्ती गमावून बसू नकोस!”

माझ्या एवढ्या धमकावणीपुढे होम्स करतोय काय? त्याने खांदे उडवून तो विषय तिथेच संपवला. आमची गप्पांची गाडी मग कमी धोकादायक विषयांच्या रुळावर वळली. पण माझ्या प्रयत्नांना यश यायचंच नव्हतं म्हणून म्हणा, किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे म्हणा, घटना अशा काही क्रमाने घडत गेल्या, की होम्स व त्याच्यामागून मीही त्या ’लफड्या’त आपसूकच ओढले गेलो. आमच्या वाटेवर हे असंही वळण उभं असेल, याचे मला कल्पनाच नव्हती!

दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ता घेत असतानाच, घरातील आचारी अगदी गोंधळलेल्या अवस्थेत तिथे पळत आला. धापा टाकत, तो कसे-बसे बोलला, ” साहेब, श्री. कनिंगहॅमकडची बातमी ऐकलीत का?”

“अरे देवा, अजून एक घरफोडी वाटतं!” कर्नलसाहेबांना शंका आली.

“घरफोडी नाही काही, खून!”

” काय? कुणाचा? ऍलेकचा की त्याच्या वडिलांचा?”

“नाही हो, दोघेही सुखरूप आहेत. खून झाला आहे, त्यांच्या गाडीवानाचा- विल्यमचा. गोळी थेट ह्रदयात घुसली. हू का चू करायलाही वेळ नाही मिळाला.”

“आणि गोळी कुणी झाडली?”

“दरोडेखोराने. तो लगेच तीरासारखा धावत सुटला आणि पसार झाला. त्याने आधी खिडकीची काच फोडली व तो आत घुसणार, इतक्यात विल्यमने त्याच्यावर हल्ला केला व आपल्या धन्याची संपत्ती वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण गमावले.”

“कधी घडलं हे सारं?”

“रात्रीच, बाराच्या सुमारास असेल.”

आचारी गेल्यावर, कर्नलसाहेब म्हणाले, “अरेरे, जाऊ दे, आपल्याला त्यात लक्ष घालण्याचं काहीच कारण नाही. कनिंगहॅम इथला सगळ्यात धनवान माणूस! स्वभावानेही बरा आहे, शिवाय विल्यम हा त्याचा जुना विश्वासू नोकरमाणूस. तो सगळ्याची बरोबर व्यवस्था लावेल. पण हे सारं कर्म त्या बदमाश दरोडेखोराचंच असणार!”

“तो अजब साठा जमवणाऱ्या दरोडेखोरांचं?” होम्सने शेरा मारला.

“वाटतंय तरी असंच”

“फारच चमत्कारिक दिसतंय हे प्रकरण, नाही का? एखादी मुरब्बी दरोडेखोरांची टोळी, सर्वसाधारणपणे एकाच गावातील दोन घरं थोडक्या दिवसांच्या अंतराने फोडत नाही कधी. माझी तर मगासपर्यंत अशी पक्की धारणा होती की ही घरफोडी शेवटची! पुन्हा काही बराच काळ इथे चोरी होणे नाही.”

“अहो इथलेच भुरटे चोर असतील. म्हणूनच तर ऍक्टन व कनिंगहॅम ही बडी प्रस्थं निवडली ना घरफोडीला!”

“सर्वांत श्रीमंत आहेत का हे दोघे?”

“तसंच काहीसं. पण त्यांच्या मागच्या कायद्याच्या तगाद्याने दोघे पार हवालदिल झाले आहेत. कनिंगहॅमच्या अर्ध्या मालमत्तेवर ऍक्टनने हक्क सांगितला आहे.”

“मग काही प्रश्नच उरला नाही. ठीक आहे मित्रा वॉटसन, या भानगडीत मी लुडबुड करणार नाही.” इतक्यात आचाऱ्याने दरवाजा उघडून इन्स्पेक्टर फॉरेस्टर आल्याची वर्दी दिली.

इतक्यात एक तरतरीत व उत्साही दिसणारा तरुण खोलीत शिरला. नमस्कार- चमत्कार झाल्यावर तो पुढे बोलू लागला. “व्यत्ययाबद्दल माफ करा पण लंडनचे प्रख्यात गुप्तहेर होम्स येथे आले असल्याचे मला कळले आहे.” कर्नलसाहेबांनी होम्सकडे बोट दाखवताच इन्स्पेक्टरने त्याला लवून अभिवादन केले. “आपण या प्रकरणात लक्ष घातलं तर फारच मदत होईल, होम्ससाहेब.”

होम्स हसत हसत म्हणाला, “मित्रा वॉटसन, एकंदर तुझं नशीब काही तुला साथ देणार नाहीसं दिसतंय. इस्पेक्टर, आमची या प्रकरणाबद्दलच चर्चा चालली होती. तुम्ही आम्हाला जरा त्याचे तपशील सांगाल का?” एवढं बोलून तो खूर्चीला रेलून त्याच्या नेहमीच्या पावित्र्यात बसला. आता होम्सची केस माझ्याच हाताबाहेर गेली, हे मला कळून चुकलं.

“ऍक्टनप्रकरणात आमच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते. पण या प्रकरणात मात्र बरेच मिळाले आहेत. दोन्ही गुन्हे एकाच व्यक्तीने केले आहेत हे नक्की! श्री. कनिंगहॅम व त्यांच्या मुलाने त्या गुंडाला पाहिलेही होते. पण गोळी झाडताच तो सुसाट वेगाने पळून जाऊन नाहीसा झाला. पावणेबारा वाजता ही घटना घडली. श्री. कनिंगहॅम नुकतेच अंथरुणावर पडले होते. तर श्री. ऍलेक धुम्रपान करीत होते. त्या दोघांनीही विल्यमची मदतीसाठी मारलेली हाक ऐकली. ऍलेक ताबडतोब जिना उतरून खाली आले. जिन्याच्या पायथ्याशी पोहोचताक्षणीच त्याने पाहिले की, २ पुरुषांची आपापसात झटापट चालली आहे. त्यांतील एकाने गोळी झाडली व दुसरा खाली पडला. ऍलेक विल्यमला वाचवण्यासाठी थांबले असता, त्या चोराला बागेच्या दिशेने पळून जायची संधी मिळाली. गडद रंगाचे कपडे घातलेला मध्यम बांध्याचा इसम एवढीच त्याची माहिती मिळू शकली. त्याच्याबद्दल कसून चौकशी सुरू आहे.”

“पण हा विल्यम तिथे काय करीत होता? मरण्यापूर्वी तो काही बोलला का?”

“काहीच नाही. तो एका खोलीत आपल्या आईबरोबर राहतो. अत्यंत प्रामाणिक व स्वामीनिष्ठ नोकर होता तो. त्यामुळे मालकाच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना, हे पहायला आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ऍक्टनप्रकरणामुळे सगळेच धास्तावले आहेत. त्या दरोडेखोराने कुलुप तोडून दरवाजा उघडला असेल, इतक्यात विल्यमने त्याच्यावर हल्ला चढवला असेल.”

“विल्यमने निघताना त्याच्या आईला काहीच सांगितलं नव्हतं का?”

“त्या खूप म्हाताऱ्या आहेत, शिवाय कानाने अधूही आहेत. इतक्या मोठ्या धक्क्यातून त्या अद्यापि सावरलेल्याही नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण नजरेखालून घालावी, असं मला वाटतं, हे पहा.” असं म्हणून त्याने कागदाचा एक छोटासा फाटका कपटा उलगडून दाखवला. “हा तुकडा मयताच्या हातात सापडला. एका मोठ्या कागदापासून फाडलेला हा तुकडा असावा असं वाटतं. तुमच्या लक्षात आलं असेलच, की ही घटना घडली, ती जागा व वेळ यावर नमूद केली आहे. खुन्याने तो कागद फाडून त्याच्याकडून हिसकावून घेतला असणार. भेट ठरवण्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीचा हा बाज वाटतो.”

होम्सने तो चिटोरा हातात घेतला.

“ही एक पूर्वनियोजित भेट होती, असं जर मानून चाललं, तर त्यातून एक नवीन तर्क लढवता येईल. तो असा, की विल्यम किर्वान हा जरी प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध असला, तरी तो या दरोडेखोराला मिळालेला होता. तो त्याला घटनेच्या जागी भेटला असावा. त्याने दरवाजा फोडण्यात त्याला मदतही केली असावी, आणि नंतर त्यांचा आपापसात वाद झाला असावा.” इन्स्पेक्टरने त्याचा तर्क सांगितला.

“ह्या चिटोऱ्यात काहीतरी सापडेलसं वाटतं. हं… एकंदर मला वाटलं होतं, तितका हा प्रकार साधा नाही!” होम्सने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने आपल्या हातांवर डोके ठेवले व तो विचारमग्न झाला. आपल्या केसचा एका जगद्विख्यात गुप्तहेरावर झालेला परिणाम पाहून इन्स्पेक्टरला आनंद झाला.

“तुमचा सगळात शेवटचा, विल्यम व दरोडेखोरामधील संधानाचा तर्क काही अगदीच अशक्य नाही. पण हा चिटोरा….” पुन्हा एकदा तो विचारांत बुडाला. त्याने जेव्हा डोकं उचललं, तेव्हा मी पाहिलं,की त्याच्या डोळ्यांत पूर्वीसारखीच विलक्षण चमक आली होती. फिकटलेला चेहरा तरारला होता. सारी शक्ती जणु काही त्याच्या रोगजर्जर शरीरात परतली होती.

“मी या प्रकरणात नक्कीच लक्ष घालीन. या प्रकरणाने माझं कुतुहल चाळवलं आहे. कर्नलसाहेब, आपली परवानगी असेल, तर मी इन्स्पेक्टरबरोबर घटनास्थळी चक्कर मारून अर्ध्या तासात परत येतो. तुम्ही व वॉटसन इथेच थांबा.”

दीड तास उलटल्यावर इन्स्पेक्टर एकटेच आले. “होम्ससाहेब अंगणात इकडून तिकडे फेऱ्या मारीत आहेत. आपल्या सगळ्यांना त्यांनी तिथे बोलावले आहे.”

“पण कशाला?”

इन्स्पेक्टरने खांदे उडवत सांगितले,”मला माहित नाही. पण मला वाटतं होम्ससाहेब अजूनही बरे झाले नसावेत. ते फार विचित्र वागत आहेत.”

त्याला उत्तर देत मी म्हणालो,”घाबरू नका इन्स्पेक्टर. त्याच्या विक्षिप्तपणालाही कारणं असतात. हे अर्थातच माझे अनुभवाचे बोल!”

आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा होम्स खिशात हात घालून हनुवटी छातीला चिकटवून विचारमग्न अवस्थेत येरझाऱ्या घालत होता.

“वॉटसन, तुझी इथे हवापालटासाठी येण्याची कल्पना काही फारच टाकाऊ निघाली नाही. हे प्रकरण तर क्षणोक्षणी उत्कण्ठावर्धक होत चाललं आहे. मी सर्वप्रथम विल्यमचा मृतदेह पाहिला. पिस्तूलातून झाडलेल्या गोळीमुळेच त्याचा मृत्यू झाला हे नि:संशय!”

“म्हणजे, तुला त्याबाबत शंका होती की काय?”

“पण प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून घेतलेली काय वाईट? ती काही फुकट जायची नाही. मी मग कनिंगहॅम पितापुत्रांना भेटलो. दोघांनीही घटनास्थळ अगदी बरोबर दाखवलं. मग आम्ही त्या बिचाऱ्या विल्यमच्या आईला भेटायला गेलो. त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणा!”

“मग काही निष्कर्ष निघाला का?”

“ह्या प्रकरणात पाणी खोलवर मुरतंय ह्याची खात्री पटली. हा चिटोरा काहीतरी सुचवत आहे खास! यानेच विल्यमला मध्यरात्री घराबाहेर काढलं. पण याचा बाकीचा भाग गेला कुठे?”

“मी त्यासाठी जमीन काळजीपूर्वक तपासली.”- इन्स्पेक्टर.

“मयताच्या हातून हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात हा कागद फाटलेला आहे. हा कागद हाती लागण्यासाठी कोण बरं एवढी धडपड करत होता? आणि का? कदाचित हा चिटोरा पुढेमागे त्याच्या कुकर्माचा पुरावा ठरला असता. बरं, मग त्या माणसाने त्या कपट्याचं काय केलं असेल? बहुधा खिशात कोंबलं असेल. कागद फाटला आहे हे गडबडीत त्याच्या लक्षातही आलं नसेल. जर का आपल्याला हा उरलेला कागद मिळाला, तर हे प्रकरण कितीतरी पुढे जाईल!”

“पण तो मिळवणार कसा?”

“हं… चिठ्ठी त्या व्यक्तीने विल्यमला नक्कीच पोस्टाने पाठवली असणार.”

“मी केलेल्या चौकशीप्रमाणे काल दुपारी विल्यमला एक पत्र मिळाले होते. त्याने लिफाफा लगेच नष्ट केला होता.”

“शाब्बास! तू पोस्टापर्यंत पोहोचलास तर. तुझ्यासोबत काम करताना मला खरोखर खूप आनंद होत आहे, मित्रा.” होम्सने त्याची पाठ थोपटीत म्हटले.

नंतर मी व कर्नलसाहेब, होम्स आणि इन्स्पेक्टरबरोबर झटापट जिथे घडली, ती जागा पहायला गेलो. मग होम्सने सगळ्या घटनेचा पुन्हा एकदा आढावा घेतला. “जमीन फारच टणक आहे. पावलांचे ठसे सापडण्याची शक्यता नाही.”

इतक्यात कनिंगहॅम पितापुत्र तिथे आले. त्यांच्या एकंदर पोशाखावरून व अविर्भावांवरून झाल्या प्रकारामुळे त्यांना फारसं दु:ख झालेलं दिसत नव्हतं.

“हं…. तुम्ही लंडनचे लोक मला वाटलं त्याहूनही जास्त वेळ लावता बुवा!” ऍलेकने आल्या आल्याच होम्सला एक टोमणा मारला.

“थोडा वेळ तरी द्या आम्हाला, ऍलेकसाहेब” होम्स उत्तरला.

“वेळ तर तुम्हाला लागणारच. तसंही या प्रकरणाची आशा आम्हा सोडून दिलीये. कोणताही धागादोरा तर सापडत नाहीच आहे!”

“एकच आहे. आता फक्त एवढंच कळलं पाहिजे की तो…..” इन्स्पेक्टर म्हणाले.

“अरे देवा, होम्ससाहेब काय झाले तुम्हाला?” होम्सच्या चेहऱ्यावर एकाएकी भयंकर वेदना पसरली होती. त्याने डोळे फिरवले व तो दबल्या आवाजात कण्हू लागला. इतक्यात तो जमिनीवर कोसळला. आम्ही पटकन त्याला एका खोलीत नेले. आणि एका खुर्चीवर त्याला झोपवले. थोड्या वेळाने होम्स सावध झाला. आपल्या आजाराची सर्वांना कल्पना देऊन त्याने घडल्या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागितली.

“तुम्हाला माझ्या गाडीने घरी पाठवू का?” कनिंगहॅमने विचारले.

“नको. धन्यवाद. मला असं विचारायचं होतं, कशावरून तो चोर घरात घुसलाच नाही?”

“शक्यच नाही. अहो मला किंवा ऍलेकला त्याच्या वावराची लगेच चाहूल लागली असती.”

“तुम्हा दोघांच्याही खोल्यांत दिवे जळत होते?”

“अर्थात”

“हं… पण असा कोणता चोर घरातील माणसे जागी असताना चोरी करेल?”

“हे प्रकरण तितकंच विचित्र नसतं तर, आम्ही तरी तुम्हाला कशाला तसदी दिली असती, होम्ससाहेब?” ऍलेक वैतागला “आणि मला मुळात तुमचा तर्कच चुकीचा वाटतो. घरात अस्ताव्यस्त पडलेल्या किंवा गायब झालेल्या वस्तूंमुळे आम्हाला चोर घरात शिरला हे कळलं नसतं का?”

“पण एखादी गोष्ट गायब आहे, हे कळायला ती तितकीचा आवश्यक असायला लागते. तुम्हाला या दरोडेखोराने ऍक्टनसाहेबांच्या घरी जमवलेला विचित्र साठा ठाऊक असेलच. हस्तिदंती गोटा, दोऱ्याचा गुंडा आणि असलंच काहीतरी.”

“हे पहा होम्ससाहेब, हे प्रकरण आम्ही तुमच्यावर पूर्णपणे सोपवलं आहे. तुम्ही आणि इन्स्पेक्टर जे म्हणाल, ते आम्ही करायला तयार आहोत.”- कनिंगहॅम म्हणाले.

“मला वाटते तुम्ही आपल्या नावाने दरोडेखोरांना शोधण्यासाठी बक्षिस जाहिर केलेत, तर बरं होईल. ५० पौंड रक्कम पुरे होईल. हा पहा मी मसुदा तयार केला आहे, तुम्ही फक्त इथे सही करा.” होम्स म्हणाला.

“५० कशाला, ५०० ठेवा हवं तर! … अहो, पण यात एक चूक आहे.” मसुद्यावरून नजर फिरवत कनिंगहॅम उद्गारले.

“घाई-गडबडीत झाली असेल.” होम्स ओशाळून हसला.

“आता हेच पहा, तुम्ही घटनेची वेळ पाऊण लिहिली आहे. पण प्रत्यक्षात ती ’quarter to twelve’ म्हणजे पावणे बारा अशी आहे.”

“होम्सकडून एवढी क्षुल्लक चूक घडावी, याचं खरं तर मला फार वाईट वाटलं. खरं म्हणजे, होम्स अगदी बारीक-सारीक तपशीलांच्या बाबतीतही अगदी काटेकोर असे. पण आत्ताच्या आजारपणामुळे त्याच्याकडून या साध्या चूका घडत होत्या. त्याला स्वत:चीच शरम वाटणे स्वाभाविकच होते पण इन्स्पेक्टरने लगेच भुवया उंचावल्या आणि ऍलेक तर हसूच लागला.

“कनिंगहॅमने चूक दुरुस्त करून तो कागद होम्सकडे दिला. होम्सने तो जपून खिशात ठेवला. मग त्याने तोडलेल्या दरवाजाची तपासणी केली. छिन्नीने किंवा एखाद्या मजबूत सुरीने कुलुप उचकटलं होतं हे तर दिसत होतंच. लाकडावर खुणाही दिसत होत्या.

“तुम्ही खिडकीला गज का नाही लावून घेतले?”

“तशी गरज नाही भासली आम्हाला.”

“तुम्ही कुत्राही पाळलेला नाही का?”

“आहे की, पण तो घराच्या दुसऱ्या बाजूला साखळीला अडकवून ठेवला आहे.”

“तुमचे नोकर साधारणपणे किती वाजता झोपतात?”

“दहाच्या सुमारास.”

“विल्यमही?”

“हो”

“हं…. मग फक्त कालचीच रात्र का तो जागत होता? असो, कनिंगहॅमसाहेब, तुम्ही आम्हाला तुमचं घर दाखवाल का?”

वरच्या मजल्यावर जाताना मला होम्सच्या हावभावांवरून त्याला एखादा सुगावा लागल्याची शंका आली, पण कसला सुगावा याचा तर्क काही मी लढवू शकत नव्हतो.

कनिंगहॅम आता वैतागून म्हणाले, “अहो होम्ससाहेब, हे तितकंसं आवश्यक नाही, असं मला वाटतं. चोर आमच्या खोलीकडे आम्हाला चाहूल लागू न देता येऊच कसा शकेल?”

“तुम्ही दुसऱ्या ठिकाणी हातपाय मारायला हवेत, होम्ससाहेब.” ऍलेक कुचेष्टेने हसत बोलला.

“अहो, थोडा धीर धरा. तुमच्या खिडकीतून किती दूरवरचं दिसतं, एवढंच पहायचं आहे मला.” होम्स ऍलेकच्या खोलीत शिरला. “इथे तुम्ही धुम्रपान करीत बसला होतात तर! समोरच्या दिशेला उघडणारी खिडकी कोणती?” होम्सने काळजीपूर्वक तपासणी केली.

“आता तरी तुमचं समाधान झालं का?” कनिंगहॅमने विचारलं.

“हो”

“मग आता आपण माझ्या खोलीत जायचं का?”

“तुमची हरकत नसेल तर॒!”

कनिंगहॅमने उत्तरादाखल फक्त खांदे उडवले. आणि आपल्या खोलीत ते आम्हाला घेऊन गेले. साध्यासुध्या पद्धतीने त्यांची खोली सजवली होती. होम्स मुद्दामच खोलीत शिरताना सर्वांत मागे राहिला. माझ्या डोळ्यांदेखत त्याने कुणाला कळणार नाही, अशा बेताने मेजावरचा पाणाचा जग आणि संत्री खाली पाडली. “अरे वॉटसन, हे काय केलंस? जाजमाची पार वाट लावलीस.”

हा दोष माझ्यावर ढकलण्यामागे होम्सचं काहीतरी कारण असणार हे जाणून मीही तो दोष स्वत:वरच ओढवून घेतला आणि वाकून इतस्तत: विखुरलेली संत्री गोळा करू लागलो. इतरही मला मदत करू लागले.

“अरेच्चा, होम्ससाहेब कुठे अदृश्य झाले?” इन्स्पेक्टर अचानक ओरडले.

“थांबा इथेच. त्या मनुष्याचं डोकं फिरलं आहे. बाबा, चला त्या भ्रमिष्टाला शोधुया.” ऍलेक संतापाने बाहेर निघून गेला. त्याचे वडिलही त्याच्या पाठोपाठ गेले. एकमेकांकडे बघत राहण्याखेरीज आमच्याकडे करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.

“मलाही ऍलेकसाहेबांचं मत पटतंय. होम्ससाहेबांच्या डोक्यावर त्या दुखण्याचा परिणाम झाला असावा, कारण….” पण इन्स्पेक्टरचे शब्द बुडबुड्याप्रमाणे हवेतच विरले, कारण होम्सने एक भयसूचक किंकाळी मारली होती.

“वाचवा, वाचवा! खून खून!”

मी वेड्यासारखा आवाजाच्या दिशेने पळत सुटलो. त्याचा आवाज हळूहळू घोगरा होत होता. मी त्या खोलीत पोहोचलो व पाहतो तर काय, कनिंगहॅम पितापुत्र होम्सला मारण्याचा प्रयत्न करत होते. ऍलेक त्याचा गळा आवळत होता, तर कनिंगहॅम त्याचा हात मुरगळत होता. क्षणार्धात आम्ही तिघांनी मिळून होम्सला त्या दोघांच्या तावडीतून सोडवलं. होम्स झोकांड्या देत उभा राहिला. तो पांढराफटक पडला होता. आणि झाल्या प्रकारामुळे त्याच्यातले सारे त्राणच निघून गेले होते.

“इन्स्पेक्टर या दोघांना अटक करा”

“कोणत्या आरोपाखाली?”

“विल्यम किर्वान नावाच्या त्यांच्या गाडीवानाच्या हत्येच्या आरोपाखाली.”

इन्स्पेक्टर गोंधळून गेले. “होम्ससाहेब, काय म्हणताय काय?”

“त्या दोघांच्या तोंडांकडे एकदा पहा जरा.” होम्स गंभीरपणे म्हणाला. त्या दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना पसरली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील भावांनी हत्येची कबूलीच दिली जणू! कनिंगहॅम अजूनही भांबावलेला होता. तर ऍलेकच्या डोळ्यांत मात्र पाशवी हिंस्रपणाची चमक उतरलेली होती. इन्स्पेक्टरने पुढे काहीही न बोलता शिटी वाजवून दोन कॉन्स्टेबल्सना बोलावले.

“माझ्यापुढे कोणताच पर्याय उरलेला नाहीये, श्री. कनिंगहॅम. कदाचित हा गैरसमज असू शकेल. पण सध्या…….. ओह, हे काय, टाका ते खाली.” त्यांनी चपळाईने ऍलेकच्या हातावर फटका मारून पिस्तूल खाली पाडलं.

“ताब्यात घ्या हे पिस्तूल. ही केस कोर्टात उभी राहिल्यावर तुम्हाला त्याची गरज पडेलच! पण हे, सगळ्यांत जास्त महत्त्वाचं आहे.” त्याने हातातील कागद उंचावून दाखवीत म्हटले.

“ओह! तो कागद?”

“हो”

“कुठे सापडला?”

“मला वाटलं होतं तिथेच. मी हे सगळं सविस्तरपणे नंतर समजावीनच पण त्याआधी मला वाटतं वॉटसन, तू आणि कर्नलसाहेब दोघांनी घरी परतावं. मी ह्या दोघांशी बोलून तासाभरात परत येतोच.”

 

आपल्या शब्दाला पक्कं राहून होम्स एक वाजता कर्नल साहेबांच्या घरी पोहोचला. त्याने ऍक्टनसाहेबांनाही सोबत आणलं होतं.

“मला वाटतं, हे सगळं ऍक्टनसाहेबांनी जाणून घेणं फार गरजेचं आहे. कर्नलसाहेब, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व!”

“असं काय म्हणताय होम्ससाहेब? उलट मला तुमची कामाची पद्धत इतक्या जवळून बघायला दिल्याबद्दल मीच तुमचे आभ्यार मानले पाहिजेत.”

“असो, थोडी ब्रँडी मिळेल का? थोडीशी ब्रँडी पोटात गेल्यावर मला जरा बरं वाटेल. त्या मगासच्या हल्ल्याने मी पुरता हादरलो आहे.”

“तुमचा फेफरं येण्याचा त्रास आता गेला असेल ना?”

होम्स खळखळून हसत म्हणाला, “त्याबद्दल आपण नंतर बोलूच! मी आता माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, ही केस कशी सोडवली ते क्रमाक्रमाने तुम्हाला सांगतो. काही शंका असल्यास मला विचारा.

“गुप्तहेराला आपली शक्ती वाया जाऊ द्यायची नसेल, तर त्याने प्रथम कोणता पुरावा टाकाऊ आहे आणि कोणता महत्त्वाचा, हे ओळखायला शिकलं पाहिजे. सुरुवातीपासूनच मला तो कागदाचा कपटा महत्त्वाचा असणार, हे जाणवलं होतं. आता असं पहा, जर तो दरोडेखोर विल्यमला मारून लगेच पळाला, हे आपण खरं मानलं, तर त्यानेच तो कागद फाडण्याची शक्यता नाही, हेही मानावं लागेल. मग त्याने नाही, तर तो कागद ऍलेकने फाडला असणार. ही साधी गोष्ट इन्स्पेक्टरच्या लक्षात आली नाही, कारण कनिंगहॅम पितापुत्रांचं या प्रकरणाशी काहीच घेणंदेणं नाही, असं तो मानून चालला होता. पाहिलंत, कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता विचार करण्याचा परिणाम!

“मग मी त्या चिटोऱ्यावर लक्ष केंद्रित केलं. तुम्हाला यात काही विचित्र असल्याचं जाणवतंय का, पहा बरं! माझी पूर्ण खात्री आहे, की हे पत्र दोन व्यक्तींनी लिहिलेलं आहे. तेही अशाप्रकारे, की एका व्यक्तीने आधी एक सोडून एक असे शब्द लिहिले, आणि दुसऱ्याने गाळलेल्या जागा भराव्यात, त्याप्रमाणे मधले शब्द कमी जागेत बसवायचा प्रयत्न केला आहे. हे शद्बांमधील t च्या वेगवेगळ्या वळणांवरून लक्षात येईलच. शिवाय अक्षरावरून दोन्ही व्यक्तींच्या वयाचे अंदाजही वर्तवता येतात. एका माणसाचा हात मजबूत आणि स्थिर आहे. त्यावरून ते तरुण माणसाचं अक्षर असावं तर दुसरं जरा म्हाताऱ्या माणसाचं! शिवाय त्यातील तरुण माणूस हा म्होरक्या असावा.”

“भले शाब्बास” ऍक्टनसाहेब ओरडले.

“अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे, या हस्ताक्षरातील साम्यावरून दोघे रक्ताचे नातेवाईक असावेत हे स्पष्टपणे कळून येते. हे सगळे प्रकरण २३ बारीक-सारीक गोष्टींवरून सिद्ध होतं. त्यामुळे हे कृत्य कनिंगहॅम पितापुत्रांचे असावे यात माझी कोणतीच शंका उरली नाही.”

“पण ते पत्र दोघांनी मिळून का लिहिलं?” कर्नलसाहेबांनी विचारले.

“असं पहा, हे सगळंच प्रकरण मोठ्या जिकिरीचं होतं. जर का ते अंगावर शेकलं असतं, तर त्याचे परिणाम कोण्या एकानेच का भोगावेत तेव्हा दोघांचाही त्यात सारखाच सहभाग असावा असं वाटल्यामुळे हा खटाटोप!

“बरं, एवढं कळल्यावर मी इतर बाबींत लक्ष घातलं. घटनास्थळाचं परिक्षण केलं. मला असं दिसून आलं, की गोळी चार यार्डांच्या अंतरावरून झाडली असावी. म्हणजे ’झटापट चालू असताना गोळी झाडली’ हे ऍलेकचं विधान खोटं पडतं. पुन्हा कनिंगहॅम पितापुत्रांनी जी झटापटीची जागा दाखवली होती. तिथे झटापट घडल्याच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या. हे सर्व लक्षात घेता माझ्या डोक्यात आलं, की असा कोणी दरोडेखोर प्रत्यक्षात तिथे, त्या ठिकाणी, त्या वेळी अस्तित्वातच नसावा.

“एवढं समजल्यावर या हत्येमागचं कारण शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी मी आधी ऍक्टनसाहेबांकडे झालेल्या चोरीचा विचार केला. ऍक्टन व कनिंगहॅम यांच्यामधे खटला चालू असलेला मला कळला होता. तेव्हा त्या संदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे लांबवणे हाच या चोरीचा उद्देश असणार अशी माझी खात्री झाली.”

“तसम्च असावं. अहो, त्यांच्या अर्ध्या मालमत्तेवर माझा हक्क आहे. त्यांना हवी असलेली कागदपत्रं जर का त्यांना मिळाली असती, तर माझी बाजूच लुळी पडली असती. सुदैवाने ती कागदपत्रे माझ्या वकिलाकडे सुरक्षित आहेत.”

“हं…. या मूर्खपणाच्या प्रयत्नात मला ऍलेकचा धसमुसळेपणा डोकावताना दिसला. जेव्हा त्याला ती कागदपत्रे मिळाली नाहीत, तेव्हा त्याने ती साधी चोरी भासवण्यासाठी हाताला लागेल ते बरोबर घेतलं.

“आता तो फाटलेल्या कागदाचा चिटोरा शोधणं क्रमप्राप्त होतं. ऍक्टनने कागद फाडून खिशात ठेवला असणार. मग त्याचे कपडे मिळणार कुठे? तर त्याच्या खोलीत. पण तो कागद अजूनही त्याच्या खिशात असेल का? हे पहायला मी सर्वांना वरच्या खोलीत घेऊन गेलो.

“त्यांनी तो कागद नष्ट करू नये, म्हणून त्यांना त्या कागदाची आठवण होऊ न देण्यासाठी मला इन्स्पेक्टर कागदाबद्दल बोलणार, इतक्यात फेफरं आल्याचं नाटक करावं लागलं.”

“बापरे! म्हणजे ते सगळं नाटक होतं?”

“त्यानंतर मी कनिंगहॅमला थोडं बावळटपणाचं सोंग आणून एका कागदावर ’twelve’लिहायला लावलं. त्यामुळे चिटोऱ्यावरचं अक्षर त्याचंच असल्याची माझी खात्री पटली.”

“म्हणजे हे सगळं खोटं होतं तर! मी सुद्धा काय मूर्ख आहे.” मी हताशपणे उद्गारलो.

होम्स हसत म्हणाला, “तुला माझी दया वाटत होती, हे स्पष्ट दिसत होतं मित्रा. पण मला क्षमा कर. तसं करणं गरजेचं होतं. त्यानंतर आपण जेव्हा खोलीत गेलो, तेव्हा ऍलेकचे कपडे तपासून पाहता यावेत म्हणून तुम्हा सगळ्यांना गुंतवायला मी तो पाण्याचा जगाचा खाली पाडला. आणि हळूच ऍलेकच्या खोलीत सटकलो. माझ्या हाती तो कागद लागला आणि तेवढ्यातच कनिंगहॅम पितापुत्रांनी माझ्यावर झडप घातली. पण तुम्ही सगळे लगेच मदतीला धावून आलात म्हणून केवळ मी या जीवावरच्या संकटातून वाचलो. त्या दोघांचा मला ठार करून तो कागद हिसकावून घेण्याचा आटापिटा चालला होता. आतापर्यंत सगळं छान चाललेलं असताना, हा मधेच कोण उपटसुंभ टपकला, आम्हाला तुरुंगात पाठवणारा, या विचारामुळे ते फारच अस्वस्थ झाले. आणि स्वत:वरचं नियंत्रण पूर्णपणे गमावून बसले.

“त्यांना अटक केल्यावर मी दोघांशी बातचीत केली. कनिंगहॅअ थोडा मवाळ होता. पण ऍलेक मात्र शैतानाची औलाद निघाला. हाती येईल त्यांचं डोकं फोडण्याच्या तयारीत होता तो! आता सगळं संपलं अशी जाणीव झाल्यावर कनिंगहॅमने स्पष्टपणे कबुलीजबाब देऊन टाकला. ते दोघे ऍक्टनसाहेबांच्या घरी जाताना विल्यमने त्यांचा पाठलाग केला होता. आणि त्या जोरावर तो त्या दोघांवर दबाव आणत होता. पण ऍलेक काही असल्या फालतू खेळांत रमणारा नाही. त्याने दरोडेखोरांच्या वावडीचा उपयोग करून आपल्या मार्गातला विल्यम नावाचा काटा काढून टाकला. त्याला भुलवून बोलावलं आणि त्याचा खातमा केला. पण प्रत्येक गुन्हेगार काही ना काही चूक करत असतोच. जर त्याने वेळीच कागदाचे महत्त्व ओळखून तो नष्ट केला असता, तर हे प्रकरण सुटणं अशक्य होतं!”

मग त्याने तो कागद उलगडून त्याला तो तुकडा जोडून आमच्यासमोर धरला. ही ऍनी मॉरिसन वेगळीच भानगड दिसतेय. पण मासा गळाला अडकवायला ती चांगलीच उपयोगी पडली. चल तर मग वॉटसन, हवापालटाची कल्पना छान ठरली, नाही! आता नवीन जोमाने लंडनला परतायला मी तयार आहे.”

-समाप्त-

 

आता टाईप करून काढताना अनुवाद करतानाच्या बऱ्याच चूका लक्षात आल्या. उगाच शब्दसंपदा दाखवण्याच्या नादात चुकीचे शब्द वापरले गेल्याचं लक्षात आलं. पण चॅनलच्या ठिकाणी रूळ अशी छोटी रुपके चांगली वापरली आहेत. असो.

एका मुखपृष्ठाचे रसग्रहण

मला ‘अनुवाद’ ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा ‘कथांतर’ नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक! अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.

मुखपृष्ठcoverpage

हे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्‍या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर ‘रशियन कथांचा भावानुवाद’ हे उपशीर्षक, त्याखाली ‘कथांतर’ हे शीर्षक, सर्वांत खाली ‘भावानुवाद’ असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.

सर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. ‘कथांतर’ हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही ‘भाषांतर’ हा शब्द येत नाही, त्याजागी ‘भाव-अनुवाद’ हा शब्द वापरलेला आहे. ‘भावानुवाद’ या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.

भाषांतर या शब्दाचा विग्रह ‘दुसरी भाषा’ आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्‍या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्‍या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे! यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.

पण प्रत्यक्षात तसे होत नाही!

कथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत ‘दिवसाचा मध्य’ या अर्थाने वापरल्या जाणार्‍या ‘मध्याह्न’ या शब्दासाठी कुरुक भाषेत ‘जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा’ अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ ‘दुपारी १२ वाजताची वेळ’ असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी ‘आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी ‘जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा ‘उन्हे डोक्यावर येणे’ हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी ‘जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन’ असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक ‘मराठी’ वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.

म्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा ‘ती’च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.

अशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय?

वरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.

इथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना ‘भाषांतर’ न म्हणता ‘भाव-अनुवाद’ असे म्हणते.

मूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.

पण ही कथा आता ‘ती’च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे ‘कथांतर’ झाले आहे!

असे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची ‘सावली’ आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.

इतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्‍या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.

चंद्रकोर- ७

नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवं वर्षं तुम्हाला सुखासमाधानाचं आणि समृद्धीचं जावो.

गेलं वर्षंभर मी हे असं पांढऱ्यावर खरडलेलं काळं, तुम्ही न कंटाळता वाचत राहिलात, या बद्दल धन्यवाद. व पुढच्यावर्षीही असंच ते सहन करत रहा अशी विनंती. गेल्या वर्षी सुरू केलेल्या चंद्रकोर या अनुवादमालिकेला आपणा सर्वांचा आलेला प्रतिसाद पाहून हुरूप चढला. मूळ पुस्तकातील जितके लेख मला तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले, तेवढ्या लेखांचा अनुवाद मी केला.

तेव्हा याच लेखांचा अनुवाद आधीही कोणी केला असेल, मग आपण का करावा, असा विचार माझ्या मनात आला नाही. आपल्या आवडत्या साहित्यकृतीचा अनुवाद करताना आपण आणखी खोलात जाऊन तिचा आस्वाद घेतो. इथे हाच शब्द का वापरला, त्याच अर्थाचा दुसरा शब्द का नाही, या अर्थछटेतल्या सूक्ष्म फरकातून लेखकाला काय सांगायचं आहे? इथे लेखकाने हे रूपक कसं विकसित केलं आहे? तेच रूपक आपल्या भाषेत आपल्याला मांडता येईल का? असा विचार करता करता, मूळ लेख ज्या भाषेत लिहिला आहे व अनुवाद ज्या भाषेत करायचा आहे अशा त्या दोन्ही भाषांच्या मर्यादा, बलस्थानं थोडी थोडी लक्षात येऊ लागतात. मूळ कलाकृतीतले आधी न कळलेले असे काही अर्थाचे नवे पदर उलगडतात. एकच कल्पना, ती मूळ लेखकाने एका भाषेत मांडणं आणि मग अनुवादकाने त्याच्या मर्यादा सांभाळत दुसऱ्या भाषेत मांडणं, यात एकच मातीचा गोळा दोन वेगवेगळ्या साच्यात घडवल्यावर त्याच्या रंगरूपात पडलेल्या फरकाइतकं अंतर असतं. ते पाहणंही फार रोचक असतं. कदाचित म्हणूनच हा लेख/ कथा/ कविता छोटी आहे की मोठी, नामवंत लेखकाची आहे की अपरिचित लेखकाची, नवी आहे की बऱ्याच अनुवादकांनी वेध घेतलेली असा विचार न करता, तिचा अनुवाद करावासा वाटतो. त्यातलं काय काय वाचावं हे वाचकावर अवलंबून आहे. मोठ्या आणि नव्या कथा वाचाव्याशा ज्यांना वाटतात, त्यांना वाचायला या ब्लॊगवर ‘देहदंड’, ‘स्मृतींची चाळता पाने’, ‘पावसाची गोष्ट’ असे अनुवाद आहेत. पण ज्यांना एकाच कल्पनेची वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत (अनुवादकांमार्फत) घडलेली वेगवेगळी प्रकटीकरणे पाहायची आहेत, त्यांना वाचायला चंद्रकोर आहे. (याचा दुसऱ्या कोणी केलेला अनुवाद माझ्या वाचनात आलेला नाही. परंतू आधीच्या अनुवादावर कुणीतरी दिलेल्या प्रतिसादातून तसे समजते.) तेव्हा ‘जो जे वांछिल तो ते लाहो!’ 🙂

असो, ही शेवटची चंद्रकोर गायत्री यांच्या फर्माईशीवरून. मला हा अनुवाद काही नीट जमलेला नाही. जवळजवळ महिनाभर हा अनुवाद भिजत घातला होता, तरी काही तो मनासारखा झालेला नाही. असो.

 

त्या समुद्रकिनाऱ्यावर

 

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात.

डोक्यावरचं अथांग आकाश निपचित पडून राहिलेलं आणि अस्थिर पाण्याला उधाण आलेलं. अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं आरडाओरडा करत, नाचत भेटतात.

ते वाळूने घरं बनवतात आणि रिकाम्या शिंपल्यांशी खेळत बसतात, सुकलेल्या पानांच्या नावा विणतात आणि हसत हसत त्या नावा त्या खोल अथांग पाण्यावर सोडूनही देतात.अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलांचे हे असे खेळ चालतात.

त्यांना पोहणं माहित नाही, त्यांना पाण्यात जाळी फेकणं माहित नाही. तिथे मोती गोळा करणारे मोती वेचण्यासाठी पाण्यात सूर मारतात, व्यापारी त्यांच्या बोटींतून प्रवास करतात, पण इथे लहान मुलं मात्र गोटे गोळा करतात आणि पुन्हा ते पसरून देतात. ते गुप्त खजिन्याचा शोध घेत नाहीत व जाळीही फेकत नाहीत.

समुद्राला हास्याचं भरतं येतं आणि सूर्यकिरणांत त्याचं हसू परावर्तित होतं. मृत्युशी संधान साधणाऱ्या लाटा आईने बाळाचा पाळणा हलवत म्हणावीत तशी निरर्थक बडबडगीतं म्हणतात.समुद्र मुलांशी खेळतो आणि सूर्यकिरणांत त्याचं हसू परावर्तित होतं.

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात. मोकळ्या आभाळात वादळं घोंघावतात, अज्ञात पाण्यात बोटी बुडतात, मृत्यु समुद्रावर हिंडत असतो आणि मुलं मात्र किनाऱ्यावर खेळत असतात.

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात.

 

चंद्रकोर- ६

दुष्ट पोस्टमनकाका

ए आई, तू अशी जमिनीवर इतकी गप्प गप्प का बसलीयेस गं, ए आई सांग ना गं?

अगं बघ तरी, तुझ्या मागची खिडकी उघडीच राहिलीये आणि त्यातून पावसाचे मोठाले थेंब आत येऊन तुला भिजवतायत. तू तिथून उठत का नाहीस?

 ते ऐकलंस का? ४ चे ठोके वाजले. दादाची शाळेतून घरी यायची वेळसुद्धा झाली. काय झालंय तरी काय, तुझा चेहरा का एवढा पडलाय?

तुला आज बाबांचं पत्र नाही का मिळालं? ते पोस्टमनकाका बरे अख्ख्या गावाला आपल्या पिशवीतून पत्रं वाटत फिरत असतात, फक्त आपल्या बाबांचंच पत्र तेवढं स्वतः:जवळ ठेवून घेतात होय! दुष्ट कुठले!

पण आई, तू कशाला याचं एवढं वाईट वाटून घेतेस? एक काम कर, उद्या शेजारच्या गावात आठवड्याचा बाजार भरणार आहे. तिथून आपल्या कामवाल्या बाईंना थोडे कागद आणि पेन घेऊन यायला सांग.

मी स्वतः: माझ्या हातांनी लिहीन बाबांची सगळी पत्र. तुला शोधूनही एकसुद्धा चूक सापडणार नाही. मी क पासून ध पर्यंत सगळं लिहीन.

पण तू अशी हसतेस काय गं? मी बाबांसारखी छान छान पत्र लिहू शकत नाही असं वाटतंय का तुला?

पण तू बघच, मी त्या कागदावर नीट ओळी आखून घेईन आणि त्यावर छान मोत्याच्या दाण्यासारख्या अक्षरात लिहीन.

आणि पत्र लिहून पूर्ण झाल्यावर ते बाबांप्रमाणे त्या दुष्ट पोस्टमनकाकांच्या पिशवीत टाकून देण्याइतका मूर्ख वाटलो का मी तुला? मी स्वतः: येईन तुझ्याकडे ते पत्र घेऊन, कुणासाठीही न थांबता आणि माझ्या पत्रातलं अक्षर अन अक्षर वाचायला तुला मदत करीन.

मला माहीत आहे, त्या पोस्टमनकाकांना तुला सर्वांत छान पत्र दिलेली आवडत नाहीत ते!

चंद्रकोर- 5

लेखक

आई, तू तर म्हणतेस की बाबा बरीच पुस्तकं लिहितात, पण त्यात ते एवढं काय लिहितात? मला तर बुवा काही समजतच नाही. आज ते संध्याकाळभर तुला त्यांची पुस्तकं वाचून दाखवत होते ना, तुला तरी कळला का गं त्याचा अर्थ?

तू आम्हाला किती छान छान गोष्टी सांगतेस गं! मला नेहमी प्रश्न पडतो की बाबा असं का नाही लिहू शकत बरं? आज्जीने त्यांना कधीच राक्षसांच्या आणि पऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या नाहीत का गं? की ते त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेत?

तसे ते विसरळूच आहेत. नेहमी जेव्हा त्यांना आंघोळीला जायला उशीर होतो, तेव्हा तुला त्यांच्या मागे लागून शंभरदा आंघोळीची आठवण करून द्यावी लागते. तू त्यांच्यासाठी जेवायची थांबतेस, सतत जेवण गरम करत राहतेस आणि ते मात्र लिहितच राहतात आणि जेवायला यायचं विसरून जातात. पहावं तेव्हा ते आपले पुस्तकं लिहिण्याच्या खेळातच बुडालेले!

पण मी जर कधी बाबांच्या खोलीत खेळायला गेलो, तर तू लगेच धावतपळत येतेस आणि मला म्हणतेस, “किती रे मस्ती करतोस?”

मी एवढुस्सा जरी आवाज केला तरी ओरडतेस, “बाबा काम करतायत, कळत नाही का?”

छे बुवा, नुस्तं लिहित राहण्यात कसली आलीये मजा?

आणि मग मी जर बाबांचं पेन किंवा पेन्सिल घेतली आणि त्यांच्या वह्यांवर त्यांच्याप्रमाणेच क, ख, ग, घ…. लिहायला लागलो, तर तू माझ्यावर का चिडतेस गं आई?

बाबा जेव्हा लिहितात, तेव्हा त्यांना मात्र एक शब्दसुद्धा बोलत नाहीस.

जेव्हा बाबा असे कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे वाया घालवतात, तेव्हा तुला काहीच फरक पडत नाही. पण जर मी त्यातला एकच कागद घेतला, तोही चांगली नाव बनवायला तर मात्र लगेच म्हणतेस, “बाळा, किती रे त्रास देशील?”

बाबा मात्र कागदांमागून कागदांवर दोन्ही बाजूंनी शाई फासतात आणि त्यांचा पार बट्ट्याबोळ करतात, ते बरं चालतं होय तुला!

चंद्रकोर-४

हे म्हणजे अगदी स्वैर-स्वैर-स्वैर भाषांतर आहे.

 

चाफा

 

समज, मी जर असंच मजा म्हणून चाफ्याचं फूल झालो तर? मग मी झाडाच्या सर्वांत उंच फांदीवर चढून बसेन आणि वाऱ्याच्या झुळकेबरोबर मजेत झोके घेत पालवीवर नाचेन, मग तू मला ओळखशील का गं आई?

तू हाक मारत राहशील, “सोन्या, कुठे आहेस रे तू?” तेव्हा मी स्वत:शीच हसेन पण अगदी चिडीचूप बसेन.

नंतर तू तुझ्या कामात गुंतल्यावर मी माझ्या पाकळ्या अलगद उघडून तुझ्याकडे पाहत राहीन.

मग न्हाऊन झाल्यावर तू तुझे मोकळे ओले केस घेऊन अंगणात येशील आणि चाफ्याच्या सावलीतल्या तुझ्या नेहमीच्या जागी उभी राहून स्तोत्रं म्हणशील. तेव्हा माझा गंध तुझ्यापर्यंत पोहोचेल, पण तो गंध माझा आहे, हे काही तुझ्या लक्षात येणार नाही.

मग दुपारच्या जेवणानंतर जेव्हा तू खिडकीत रामायण वाचत बसशील तेव्हा झाडाची सावली तुझ्या केसांवर आणि मांडीवर पडेल. तेव्हा मी असा उभा राहीन की माझी इवलीशी सावली पुस्तकाच्या पानावरच्या तू वाचत असलेल्या ओळीवर नेमकी पडेल.

पण ती सावली तुझ्या सोन्याची आहे, हे तुला कळेल का?

मग संध्याकाळी जेव्हा तू एका हातात कंदील घेऊन गोठ्यात जाशील, तेव्हा मी टपकन जमिनीवर पडेन, परत एकदा तुझं छोटं बाळ होईन आणि तुझ्याकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरेन.

मग तू विचारशील “बदमाशा, होतास कुठे तू दिवसभर?”

आणि मी एवढंच म्हणेन “ते किनई आमचं गुपित आहे.”

चंद्रकोर ३

हेमंतकाकांनी म्हटल्याप्रमाणे टागोरांच्या लेखनाला अर्थाचे विविध पदर असतात. पण तरीही मला जमेल तसं समजून घेत त्याचं मराठीत रुपांतर करण्याचं धाडस करते आहे, जरा सांभाळून घ्या.

 

खगोलशास्त्रज्ञ

 

मी फक्त एवढंच म्हणालो, “संध्याकाळच्या वेळी किनई तो गोलमटोल चांदोबा जेव्हा कदंबाच्या फांद्यांत अडकून पडतो, तेव्हा कुणाला तो हातात घेता येईल का?”

पण दादा जोरात हसला आणि म्हणाला, “तू जगातला सगळ्यात बावळट मुलगा आहेस. अरे तो चंद्र आपल्यापासून इतका दूर असतो मग त्याला कोणी कसं पकडू शकेल?”

मी म्हणालो, ” दादा, किती मूर्ख आहेस तू! आपण अंगणात खेळत असताना जेव्हा आई खिडकीतून आपल्याला पाहते आणि हसते तेव्हा ती काय दूर असते का?”

पण तरी दादा म्हणाला, ” तू ना वेडपटच आहेस. पण मग मला सांग आपल्याला चंद्र मावेल एवढं मोठं जाळं मिळणार कुठून?”

मी म्हणालो, “आपल्या हातांनी नाही का पकडता येणार?”

तरीही दादा आपला हसतच होता. तो म्हणाला, “वेडा रे वेडा, तो चंद्र जर कधी जवळ आला ना, तर तुला कळेल तो किती मोठा आहे ते.”

मी म्हटलं, “दादा, तुम्हाला शाळेत काहीही काय शिकवतात! अरे आपली आई जेव्हा आपला पापा घ्यायला जवळ येते, तेव्हा तिचा चेहरा मोठ्ठाला दिसतो का?”

पण तरी दादाचं टुमणं चालूच, “तू येडपट आहेस.”

 

Previous Older Entries