नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही!

वर्ग चालू असेल आणि बाईंना कळू न देता आपल्या शेजारच्या मैत्रिणीशी बोलायचं असेल, तर आपण काय करतो? आपण बाईंची नजर चुकवून हळूच तिच्या कानात पुटपुटतो. नाहीतर, आपल्या वहीवर लिहून तिला ’वाच’ असं खुणेनं सांगतो. तीच गोष्ट चार बाकं पलिकडे बसलेल्या मित्राला सांगायची असेल तर आपण काय करतो? बाईंची पाठ वळली, की हातवारे करून नाहीतर डोळ्यांनी खाणाखुणा करून त्याला सांगतो. पण सगळ्याच गोष्टी काही खाणाखुणांनी सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ, ’मला भूक लागली’ हे खूण करून सांगता येईल. पण ‘काल बाबांनी रविवारच्या आयपीएल मॅचची तिकिटं आणली’ हे खूण करून कसं सांगणार? मग चिठ्ठीवर लिहून ती पास करण्याला पर्याय उरत नाही. पण इथे एक प्रॉब्लेम असतो. ती चिठ्ठी बाईंच्या हातात सापडली, तर त्या ती वाचणार आणि आपण काय लिहिलंय ते त्यांना कळणार आणि आपल्याला ओरडा मिळणार. यावर एक-दोन उपाय आहेत, पण ते उपाय मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही कुणाला सांगणार नसाल तरच मी सांगेन. बघा हं! नंतर तुमच्या बाईंनी मला पत्रातून ओरडा दिला, तर मी पुन्हा असे उपाय सांगणार नाही!

काय करायचं, की एकतर ’च’च्या भाषेसारखी इतरांना कळणार नाही आणि फक्त आपल्या मित्रमैत्रिणींना कळेल अशी एक सिक्रेट भाषा बनवायची. आणि त्या भाषेत चिठ्ठी लिहायची. म्हणजे काय होईल, की बाईंच्या हातात चिठ्ठी पडली, तर त्यांना काय लिहिलंय ते वाचता आलं तरी त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. पण अशी भाषा बनवण्याचं काम वाटतं तितकं सोपं नाही, बरं का! पण थांबा, आपल्याकडे दुसरा उपाय आहे. शब्द तेच ठेवायचे, पण लिहिताना ते आपल्या सिक्रेट अक्षरांत लिहायचे. ती अक्षरं ’क’, ’ख’, ‘a’, ‘b’ पेक्षा वेगळी, तुम्ही स्वत: बनवलेली असायला हवीत. म्हणजे काय होईल, की बाईंना त्या शब्दांचा अर्थ कळणं तर सोडाच, पण ते शब्द वाचताही येणार नाहीत. आहे की नाही छान उपाय!

पण हा उपाय काही माझ्या सुपीक डोक्यातून उगवलेला नाही. आधी बऱ्याच गुप्तहेरांनी आणि इतरही अनेकांनी हा उपाय वापरलेला आहे. पण आज मी गोष्ट सांगणार आहे, ती चीनमधल्या एका छोट्याशा भागात बनवलेल्या सिक्रेट अक्षरांची. कोणे एके काळी चीनमधल्या हुनान प्रांतातल्या एका छोट्याशा भागात एक लिपी (म्हणजे एखादी भाषा लिहून काढण्यासाठीची अक्षरं. उदाहरणार्थ, आपली वर्णमाला किंवा इंग्रजीमधली ’alphabet’) जन्माला आली. काय झालं, त्या काळात तिथे बायकांना बऱ्याच गोष्टी करायला मनाई होती. पण त्याच गोष्टी करायचं स्वातंत्र्य पुरुषांना मात्र होतं. आपल्याकडे कसं, आपले दादालोक रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर घराबाहेर भंकस करू शकतात आणि आपल्या तायांना मात्र संध्याकाळी सातच्या आत घरात यावंच लागतं. तसेच आणि त्याहून कडक नियम होते तेव्हा चीनमध्ये.

त्या काळात चीनमधल्या पुरुषांना लिहाय-वाचायला शिकण्याचं स्वातंत्र्य होतं, आणि बायकांवर मात्र ते शिकायची बंदी होती. पण तिथल्या बायकांना तर लिहाय-वाचायचं होतं. त्यांना मुळात एकत्र जमून गाणी गायला खूप आवडायचं. त्यामुळे त्या सतत नवनवीन गाणी रचायच्या. पण त्यांना लिहिता येत नसल्याने ती गाणी जपून ठेवता यायची नाहीत. किंवा दुसऱ्या एखाद्या गावातल्या आपल्या मैत्रिणीला पाठवताही यायची नाहीत. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सरळ आपली एक सिक्रेट लिपीच तयार केली. तिचं नाव ’नु शु’. ’नु शु’ याचा त्यांच्या भाषेतला अर्थ म्हणजे ’बायकांचं लिखाण’. नु शुमधली अक्षरं बनवली ती पुरुष जी अक्षरं वापरायचे त्यांच्यात थोडे-फार फेरफार करून, जेणेकरून पुरुषांना नु शु वाचता येणार नाही. दोन्हींतला एक महत्त्वाचा फरक म्हणजे, पुरुषांची अक्षरं थोडी रुंद असायची आणि नु शुमधली अक्षरं मात्र उभट, चिंचोळी आणि तिरकी असायची. पण दिसायची मात्र फारच सुरेख!

लहान मुलींना नु शु शिकवायच्या त्या त्यांच्या आया किंवा गावातल्या इतर मोठ्या बायका. ती शिकवायची त्यांची तऱ्हाही वेगळीच होती. त्या अक्षराभोवती गुंफलेलं एक गाणं त्या गायच्या. गाताना त्या लहान मुलीचा हात हातात घेऊन तिच्या तळहातावर आपल्या बोटाने ते अक्षर रेखाटायच्या. मग ती छोटुकली ते अक्षर कागदावर लिहायचा सराव करायची आणि अशा पद्धतीने नु शु शिकायची.

नु शुमध्ये लिहिलेली गाणी ही कधी कागदावर लिहिलेली असत तर कधी कापडावर भरतकाम करून काढलेली असत. त्यामुळे त्यांचं हे लिखाण कागदाच्या पंख्यांवर आणि भरतकाम केलेल्या रुमालांवर सहज लपवता येत असे. भरतकाम करून अक्षरं काढणे हा प्रकार बहुधा फक्त याच लिपीत केला गेला आहे. तुम्हाला तर माहीत आहेच, की आपण कशाने लिहितो यानुसार आपल्या अक्षरांच्या आकारात बारीक बारीक फरक पडतात. बॉलपेनने काढलेलं अक्षर आणि शाईपेनाने काढलेलं अक्षर यांत रेषांच्या जाडीत थोडा फरक असतो. त्यातही, वेगवेगळ्या निबांची शाईपेनं वापरली तर आपल्याला एकाच अक्षराचे वेगवेगळे आकार मिळू शकतात. त्याचप्रमाणे, भरतकामाच्या या पद्धतीची छाप नु शुमधील अक्षरांवरही पडली होती. यातल्या बऱ्याचशा अक्षरांचा आकार हा भरतकामाच्या टाक्यांवर आधारित आहे.

हा एवढा खटाटोप कशासाठी, तर दोन कारणांसाठी. एक म्हणजे बायकांना लिहाय-वाचायला येतं हे पुरुषांना कळू द्यायचं नव्हतं. कारण तसं झालं असतं तर बायकांना त्याची शिक्षा भोगायला लागली असती आणि लिहिण्या-वाचण्याचा हा मार्ग त्यांना बंदही झाला असता. आणि दुसरी, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायकांच्या या लिखाणात बऱ्याचदा त्या पुरुषांबद्दल केलेल्या तक्रारी असायच्या. त्या तक्रारी पुरुषांनी वाचल्या असत्या तर…?

अशाप्रकारे, चीनमधल्या बायकांनी आपली स्वत:ची खास लिपी तयार केली. त्यातून लिहिण्यासाठी भरतकामासारख्या पद्धतींचा अभिनव वापर केला. एवढंच नव्हे, तर ही लिपी त्यांनी शतकानुतकं पुरुषांपासून लपवूनही ठेवली. आहे की नाही भारी!

हे एवढं सगळं सांगितलं पण चिनी पुरुष वापरायचे ती लिपी आणि नु शु यांच्यातला एक महत्त्वाचा फरक मी सांगितलेलाच नाही. पुरुष वापरायचे ती चित्रलिपी. म्हणजे एखादा शब्द लिहिण्यासाठी ते त्या शब्दातली अक्षरं एकापुढे एक मांडून त्यांची मालगाडी बनवत नसत, तर अख्ख्या शब्दासाठी मिळून एकच चिह्न वापरत असत. नु शुमध्ये काही शब्द एका चिन्ह्नाने लिहिले जात, तर काही शब्द अक्षरांची मालगाडी बनवून लिहीत. अख्ख्या शब्दासाठी एक चिह्न वापरणं आणि अक्षरांची मालगाडी करणं यांत काय फरक आहे, ते आपण पुढील लेखात पाहू.

———————————–

कलावृत्त या वृत्तपत्रात पूर्वप्रकाशित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: