एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करण्यासाठी नेमकं काय काय लागतं असा विचार केला तेव्हा नजरेसमोर या तीन गोष्टी आल्या-
१. माहिती (सांस्कृतिक संदर्भ इ.)
२. साधने (कोश इ.)
३. कौशल्ये (अनावश्यक अर्थ अनुवादात आणणे कसे टाळायचे इ.)
या मालिकेच्या तीन भागांत वरील तीन गोष्टींची चर्चा मी करेन. या तीन भागांतून अनुवादप्रक्रियेच्या विविध शक्यता धुंडाळण्याचा प्रयत्न करायचा आहे; त्यांद्वारे कोणतीही नियमात्मक (प्रिस्क्रिप्टिव्ह) मांडणी करायचा उद्देश नाही.
——————————————————————
माहिती
अनुवाद करण्यासाठी लागणारी किमान माहिती/ज्ञान-
१. स्रोतभाषेच्या (ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा) केवळ आकलनापुरते ज्ञान: म्हणजेच, इंग्रजीतील एखाद्या कथेचा अनुवाद करायचा असेल, तर इंग्रजीतील शब्द, त्यांचे अर्थ, ते शब्द एखाद्या प्रकारे मांडल्यावर कोणता अर्थ समोर येतो इ. इ. गोष्टींचे ज्ञान
२. लक्ष्यभाषेत (ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा) निर्मिती करण्यासाठी आवश्यक ज्ञान: म्हणजेच, जर मराठी भाषेत अनुवाद करायचा असेल, तर विशिष्ट अर्थ दर्शवणारे मराठीतले शब्द, आपल्याला हवा तो अर्थ अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांची कशी मांडणी करावी लागेल इ. इ. गोष्टीचे ज्ञान.
थोडक्यात काय, तर स्रोतभाषा समजणे महत्त्वाचे, वापरता येणे नव्हे. याउलट, लक्ष्यभाषा वापरता येणे मात्र फारच महत्त्वाचे. एवढे आले, म्हणजे अनुवाद करता येतो. हे एवढेच अनुवादकाचे ‘क्वालिफिकेशन’ आहे असा अनेक अनुवादकांचा आणि इतर जनतेचाही समज असतो. पण फक्त एवढ्याच ज्ञानाच्या बळावर स्रोतलेखनातले घेण्याजोगे सर्व काही घेऊन त्यापैकी लक्ष्यलेखनात (अनुवादात) देण्याजोगे सर्व काही देता येईल का? याचे उत्तर ‘नाही’ हे निश्चित.
एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करताना वर दिलेल्या दोन गोष्टींखेरीज आणखीही गोष्टींची माहिती लागते-
३. स्रोतसाहित्यकृतीच्या लेखकाची लेखनशैली आणि त्यातून समोर येणारी त्याची विचारपद्धती. उदा. लेखनाला विशिष्ट लय आणण्यासाठी काही लेखक शब्दांची पुनरावृत्ती करतात.
४. स्रोतसाहित्यकृती जेव्हा लिहिली गेली त्या काळाचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इ. इ. संदर्भ. उदा. सध्याच्या वृत्तपत्रीय लेखनातील ‘आदर्श’ या विशेषणाचे दोन वेगवेगळे अर्थ होतात, व त्यातील एक अर्थ हा काही विशिष्ट घडामोडींमुळे त्या विशेषणाला नव्याने प्राप्त झालेला आहे.
५. स्रोतसाहित्यकृतीच्या विषयवस्तुची माहिती. उदा. एखाद्या पुस्तकात मासेमारीच्या प्रक्रियेचे उल्लेख येत असतील, तर त्या मजकुराचा अनुवाद करताना ती प्रक्रिया व तिची लेखनात वापरलेली परिभाषा समजून घेणे.
थोडक्यात काय, तर स्रोतसाहित्यकृतीच्या विषयामुळे त्या साहित्यकृतीत नेहमीपेक्षा वेगळे असे जे जे शब्द वापरले जातात, त्याचप्रमाणे नेहमीच्या शब्दांत आणि त्यांच्या नेहमीच्या मांडणीत कालसापेक्ष आणि लेखकसापेक्ष असे जे जे बदल घडतात ते ते सर्व या माहितीमुळे कळून येतात आणि स्रोतसाहित्यकृतीतून काय काय घेण्याजोगे आहे, याच्या आकलनाची बाजू भक्कम होते.
मूळ लेखकाला त्याच्या साहित्यकृतीतून काय मांडायचे आहे ते नीट समजून घेऊन त्याचा अनुवाद करावा असे मानणारा ‘मूळलेखकनिष्ठ’ गट या शेवटच्या तीन मुद्द्यांवर विशेष भर देताना दिसतो.
ही साहित्यकृतीसापेक्षतेची चौकट काढून टाकून इंग्रजी-मराठी यासारख्या कोणत्याही एका भाषाजोडीत कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद करताना काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते पाहू.
६. स्रोत- आणि लक्ष्यभाषा यांची वैशिष्ट्ये, त्यांची बलस्थाने आणि मर्यादा, तसेच त्यांतील परस्परसंबंध. उदा. मराठीत कर्तरी प्रयोग केल्यास क्रियापदाला लागणार्या प्रत्ययाद्वारे कर्त्याचे लिंग सांगावे लागते. इंग्रजीत मात्र तसे नाही. यामुळे इंग्रजीतून मराठीत अनुवाद करताना वाक्यातील कर्त्याचे लिंग पुरेसे स्पष्ट नसल्यास अडचण येऊ शकते. परंतु, मराठीच्या वैशिष्ट्यांचा नीट विचार केलेला
असल्यास कर्तरीखेरीज इतर वाक्यरचना वापरून ही समस्या सोडवणेही शक्य होऊ शकते.
७. स्रोत- आणि लक्ष्यसंस्कृती यांचे स्वरूप व वैशिष्ट्ये. उदा. इंग्रजी भाषिकांत दगडाला खंबीरतेचे प्रतीक मानले जाते, तर मराठी भाषिकांत त्याच दगडाला मूर्खपणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे
अशा रूपकांचा अनुवाद करताना दोन्ही संस्कृतींचे नीट भान असणे आवश्यक असते. याखेरीज दोन्ही संस्कृतींतील सण, चालीरीती इ. इ. गोष्टी माहीत असणे आवश्यक असतेच.
८. स्रोत- आणि लक्ष्यभाषा यांतील वाङ्मयीन परंपरेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. उदा. एखादी विशिष्ट भावना अभिव्यक्त करण्यासाठी एखाद्या भाषेत कविता हा वाङ्मयीन प्रकार वापरला जात असेल,
तर तीच भावना अभिव्यक्त करण्यासाठी दुसर्या एखाद्या भाषेत गद्य हा वाङ्मयीन प्रकार वापरला जात असेल.
९. स्रोत- आणि लक्ष्यभाषा या ज्या समाजांत बोलल्या जातात, त्या समाजांचा सामाजिक, भौगोलिक, पर्यावरणीय इ. इ. इतिहास. याचे कारण असे, की या गोष्टींचा भाषेवर सतत परिणाम होत असतो.
या शेवटच्या चार गोष्टींमुळे आपला अनुवाद अधिकाधिक परिणामकारक कसा करावा, देण्याजोगे जे जे आहे, त्यातले किती देता येईल आणि जे देता येईल ते कसे द्यावे हे समजते.
आता ही भाषाजोडीसापेक्षतेचीही चौकट काढून टाकून आपल्या कक्षा आणखी विस्तारूया.
१०. भाषेचे स्वरूप- मानवी भाषा म्हणजे नेमके काय, तिच्याद्वारे संवाद कसा साधला जातो इ. गोष्टी. उदा. शब्द, प्रत्यय असा तुलनेने कमी संख्येचा कच्चा माल घेऊन मानवी भाषा तुलनेने खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप विविधता असलेले अर्थ अभिव्यक्त करू शकते. तसेच, प्रत्येक अर्थ मांडण्याचे सामर्थ्य प्रत्येक भाषेत असते. त्यासाठी ती भाषा कशी वाकवायची एवढे मात्र आपल्याला बघावे लागते. हे लक्षात घेतले की अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.
११. संस्कृतीचे स्वरूप- संस्कृती म्हणजे नेमके काय, तिचा आपल्या दैनंदिन जीवनावर किती आणि कसा प्रभाव पडतो, सर्व संस्कृतींमधील जागतिक घटक आणि त्यांचे संस्कृतीसापेक्ष आविष्कार इ. इ.
१२. वाङ्मयाचे स्वरूप- वाङ्मय म्हणजे नेमके काय, त्याचा समाजावर नेमका कसकसा प्रभाव पडतो, वाङ्मयाचा अर्थ लावण्याचा हक्क कोणाचा- मूळ लेखकाचा की वाचकाचा इ. इ.
१३. भाषा, संस्कृती आणि वाङ्मय यांच्यातील परस्परसंबंध- संस्कृती भाषेत कशी प्रतिबिंबित होते, भाषा वाङ्मय कसे घडवते आणि भाषा व वाङ्मय यांद्वारे संस्कृती कशी आकाराला येत जाते इ. इ.
१४. अनुवादाचे स्वरूप- अनुवाद म्हणजे नेमके काय, अनुवादप्रक्रियेत काय काय शक्यता असतात इ. इ. उदा. स्रोतसाहित्यकृतीच्या लेखकाने जे म्हटले आहे, तेच आणि तसेच अनुवादात तंतोतंत मांडणे अनिवार्य आहे का की अनुवादात स्रोतसाहित्यकृतीतले काय अनुवादायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार अनुवादकालाही आहे, तसे अनुवादकानेच ठरवल्यास अनुवाद चांगला की वाईट हे कसे ठरवायचे इ. इ.
या शेवटच्या पाच गोष्टींचा विचार केल्यास अनुवादासाठी पूर्वी बंद असलेले बरेचसे दरवाजे सताड उघडतात आणि अनुवादाच्या आणखी शक्यता निर्माण होतात.
अनुवादाबद्दल सिद्धांत मांडणार्या व्यक्ती या पाच गोष्टींचा विशेषत्वाने विचार करतात.
आता ही भाषामाध्यमसापेक्षतेचीही चौकट काढून टाकून माध्यमांतरापर्यंत (एखाद्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपट, एखाद्या सुरावटीवर आधारित एखादे नृत्य) आपले क्षितिज विस्तारता येईल. तसे केल्यास भाषा आणि तिच्यासारखी इतर माध्यमे कोणती, त्यांचे स्वरूप काय, कोणत्या माध्यमातून अर्थनिष्पत्ती कशी होते, विविध माध्यमांची बलस्थाने आणि मर्यादा काय इ. इ. गोष्टी बघाव्या लागतील.
सारांश: ‘संवाद’ हा घटक तोच राहतो, परंतु त्याच्या प्रकटीकरणासाठी वापरलेली भाषादि माध्यमे, अनेक भाषांतली एखादी विशिष्ट भाषा, प्रकटीकरण करणारा एखादा विशिष्ट भाषिक (म्हणजेच स्रोतसाहित्यकृतीचा लेखक) या घटकांमुळे अर्थ शोधायच्या जागा बदलतात. त्यानुसार ते अर्थ स्रोतसाहित्यकृतीत कोठे शोधावयाचे, त्यातले कोणते अर्थ अनुवादावेत अशी आपली इच्छा आहे, आपल्याला अनुवादायची इच्छा असलेल्या अर्थांपैकी कोणते अर्थ लक्ष्यभाषेत अनुवादणे शक्य आहे आणि ते अनुवादण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येतील हे ठरवण्यासाठी वरील १४ गोष्टींची माहिती/ज्ञान साह्यकारी ठरते.
जुलै 11, 2012 @ 04:27:32
भाषा हे अभिव्यक्तीचे एक साधन आहे.
अभिनय, नृत्य, संगीत, मूकबधीरांची (हावभाव) भाषा, पशुपक्षांची (ध्वनीसंकेत) भाषा, चित्रकारी, चलचित्रण, अवस्थानिर्मिती इत्यादी इतर साधनांनीही अभिप्रेत विचारांना अभिव्यक्त करता येऊ शकते.
भाषा हे भावभावना, परिस्थिती, निसर्ग, मानवी व्यवहार यांच्या वर्णनाचे एक साधन आहे.
अर्थातच वरील सर्व साधनेही त्याकरता वापरली जाऊ शकतातच.
अनुवादकर्त्यास स्त्रोत भाषेचे स्पष्ट आकलन आणि लक्ष्य भाषेतील सुरस रचनाकौशल्य असावे लागते. ह्या सद्गुणांच्या घरी माधुकरी मागण्याची तयारी असलेल्या आणि त्यांवर “भक्तिहिर्व्यभिचारिणी” स्वरूपाची निष्ठा असणार्यानेच अनुवादाचे शिवधनू उचलायचे ठरवल्यास त्यास ते साधू शकते.
अशी सर्व परिस्थिती असल्याने, अनुवादकौशल्याबाबत उत्साह आणि चर्चा करण्याची उमेद अत्यंत मोजक्या लोकांनाच असावी, ह्यात कुठलेली आश्चर्य नाही. अनुवादक्षेत्रात पुढाकाराने नवनिर्मिती करणारे, त्यामुळेच एका अत्यंत विरल गटाचे गुणवान लोक असतात. त्यांच्या नवनिर्मितीस “निर्मिती”ही मानण्यास समाज दुर्दैवाने नकार देतच राहिलेला आहे. समाजाला अशा नवनिर्मितीची खूप आवश्यकता असूनही समाज असे कसे वागू शकतो हा मला पडणारा अनुत्तरित प्रश्न आहे.
अशा अवस्थेत आपण संदर्भसाधन ठरावे असे विचार प्रकट करत आहात हे पाहून (खरे तर वाचून) आनंद झाला. अशा विचारांची संहिता वस्तुतः अनुवादकर्त्यांना म्हणजे आपल्यालाच उपयुक्त ठरण्यासारखी आहे. म्हणजे आपण लिहिलेले हे मनाचे श्लोकच म्हणायला हवेत. त्यांच्या रचनेस प्रवृत्त झल्याखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन! सोबतच आपल्या सर्व प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा!!
आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे २०१२०७११