‘बिफोर सनराईज’ आणि ‘बिफोर सनसेट’ हे दोन्ही चित्रपट मला अनेक कारणांसाठी आवडतात. मुळात, दोनच पात्र असणं आणि चित्रपटभर त्यांनी फक्त गप्पा मारणं, त्या गप्पांत म्हटलं तर काहीच समान नसणं आणि म्हटलं तर त्या गप्पा आणि त्यांमधलं मौन यातनं दोघांनी एकमेकांना “तू मला आवडतोस/तेस” ही एकच एक गोष्ट सांगत राहणं या गोष्टी फार आवडल्या मला. त्यातल्या छोट्या छोट्या कल्पनाही मोह पाडणार्या आहेत- (भाबड्या फिल्मीपणाचा आरोप होण्याची पूर्ण जाणीव असूनही येथे यादी देते आहे) ‘सनराईज’मधले ते रेस्तराँमध्ये झालेले खोट्या फोनवरचे खोटे संभाषण, ‘सनराईज’ मधलाच ‘तुमच्या आयुष्यात माझ्या कवितेने काही चांगल्या क्षणांची भर घातली, तरच पैसे द्या’ म्हणणारा भिकारी, ‘सनसेट’मधली ब्रिजवरची बाग आणि बरेच काही.
या सर्वांहून जास्त आवडली ती दिग्दर्शकाने दोन्ही चित्रपटांत वापरलेली एक क्लृप्ती. ‘सनराईज’ मध्ये सूर्योदयापूर्वी ते दोघे ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणांचे सूर्योदयानंतरचे शॉट्स चित्रपटाच्या शेवटी एकामागोमाग एक दाखवले आहेत. ‘सनसेट’ मध्ये हाच प्रकार उलट्या क्रमाने केला आहे. म्हणजे ते दोघे दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणांचे सकाळच्या कोवळ्या उन्हातले शॉट्स चित्रपट सुरू होण्यापूर्वीच क्रमाने दाखवले आहेत.
‘सनराईज’ मधले हे शॉट्स पाहताना मनात वेगवेगळे विचार उमटतात. एकतर रात्रीच्या अर्धवट अंधारातले आणि अर्धवट प्रकाशातले ते जादुई वातावरण स़काळच्या उन्हात कुठेतरी हरवून गेलेले असते. त्यात ते दोघे जिथे बसले/उभे राहिले होते, त्या जागा रिकाम्या दिसतात, त्या दोघांशिवाय वेगळ्याच, अनोळखी आणि निरर्थक वाटतात. एखाद्या ठिकाणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतच्या काही खास आठवणी असतील, तर कालांतराने त्याच ठिकाणी त्या व्यक्तीशिवाय गेल्यावर ‘इथे आपण हे बोललो, इथे आपण हे केलं’ अशा आठवणी मनात गर्दी करतात आणि थोड्या वेळाने रितेपणाची भावना मनात येते. अगदी असंच काहीसं हे शॉट्स पाहतानाही होतं
‘सनसेट’ पहिल्यांदा बघताना वेगळीच मजा झाली. त्या सर्व जागांचे शॉट्स सुरुवातीलाच पाहिलेले होते व ते पाहताना मन तितकेसे सावधही नव्हते. त्यामुळे ते दोघे त्या त्या ठिकाणी गेल्यावर सतत ‘देजा वू’चा फील येत राहिला. ‘सनसेट’ दुसर्यांदा बघायला घेतला तेव्हा ते शॉट्स बघून दिग्दर्शकाने काय केले आहे ते लगेच ध्यानात आले व त्या शॉट्सची एक वेगळीच रंगत आली. त्या ठिकाणांना त्या दोघांच्या त्या गप्पांचा, त्या हसण्याचा स्पर्श अजून व्हायचा आहे हे लक्षात आलं आणि जणू काही ती ठिकाणे काहीतरी वेगळे घडण्याच्या प्रतीक्षेत आपापल्या जागी उभी आहेत असं काहीसं वाटलं. शिवाय त्याच्या जोडीला ‘नाऊ वी आर टुगेदर, सिटिंग आउटसाईड इन द सनशाईन…. सून वी विल बी अपार्ट अँड सून इट विल बी नाईट’ हे पुन्हा ‘तेव्हा आणि आता’ मधला फरक अधो
ही प्रेक्षकांच्या स्मृती आणि भावना मॅनिप्युलेट करण्याची एक क्लृप्ती इतर दिग्दर्शकांनीही वापरली असेल. मी मात्र ती प्रथम पाहिली ती या चित्रपटद्वयींत आणि ती मला फार म्हणजे फार आवडली. असे आणखी काही चित्रपट माहीत असल्यास त्यांची नावे जरूर सुचवा.
जानेवारी 05, 2012 @ 01:47:26
Typlical Chickflick . But i have also liked both. Before Sunrise is better than after sunset…
जानेवारी 12, 2012 @ 16:23:42
Before Sunset is my personal favourite !
जानेवारी 22, 2012 @ 10:24:39
हेरंब आणि महेंद्र, प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! 🙂