अ मॅन इज नोन बाय द बुक ही रिड्स?

एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारची पुस्तके वाचते किंवा वाचत नाही यावरून त्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याची एक वाईट खोड मला आहे याचा आज मला साक्षात्कार झाला.

जशा सर्व मुंबईकर नोकरदारांच्या ऑफिसला येण्याजाण्याच्या बसेस/ट्रेन्स ठरलेल्या असतात, तशी मीही ऑफिसला एका ठराविक बसने जाते. त्या बसमध्ये नेहमीचे चेहरेही ठरलेले असतात. रोज रोज एकमेकांना पाहिल्यावर आम्ही सौजन्य म्हणून एकमेकांकडे पाहून हसतो. पण ते तेवढ्यापुरतेच. गेल्या आठवड्यात एका दिवशी त्या बसमध्ये अतिप्रचंड गर्दी होती. मला बसायला जागा मिळाली नव्हती. त्यात हा सकाळचा प्रवास दीड तासाचा. जवळजवळ तासभर तिष्ठल्यावर माझे पाय दुखायला लागले होते. इतक्यात माझ्या बाजूच्या खुर्चीवरची मुलगी उठली आणि तिने स्वतःची जागा मला देऊ केली. मी धन्यवाद म्हणून तिच्या जागेवर बसले. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, की त्या मुलीचा उतरायचा स्टॉप यायला अजून बराच वेळ होता. तिने एक मदत म्हणून मला तिची जागा देऊ केली होती. हे लक्षात आल्यावर मी तिला मनोमन आणखी धन्यवाद दिले. इतक्यात माझ्या हेही लक्षात आले, की मी तिला आधी कोठेतरी पाहिले आहे, व तेव्हाही माझे तिच्याबद्दल फार चांगले मत झाले होते. मग आठवडाभर रोज ती बसमध्ये दिसली, की माझ्या मनात एक भुंगा पिंगा घालायला लागायचा, ‘कोठे बरे पाहिले आहे हिला?’

आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. झाले असे, की आज जेव्हा माझे त्या मुलीकडे लक्ष गेले, तेव्हा ती ‘ट्वायलाईट’ हे पुस्तक वाचत होती. लगेच मी मनातल्या मनात माझे नाक मुरडले. व्हँपायर्स आवडणार्‍या व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखा आवडणारी माणसे नक्कीच विकृत असली पाहिजेत, असे माझे मत आहे (यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास, क्षमस्व). पण पुढच्याच क्षणी मी त्या मुलीला आधी कुठे पाहिले होते ते अचानक आठवले. तो आसनदानाचा प्रसंग घडण्यापूर्वी काही दिवस त्याच बसमध्ये मी तिला असेच एक पुस्तक वाचताना पाहिले होते. त्यावेळीही मला तिच्या बाजूलाच उभे राहण्यास जागा मिळाली होती. आणि उभे राहिल्यापासून काही सेकंदांतच ती ‘हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज’ वाचते आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यानंतरचा अर्धा तास ती वाचते आहे ते प्रकरण नक्की कुठले आहे याचा अंदाज करण्यात अगदी आनंदात गेला होता. मजा म्हणजे, बस मध्येच हलल्यावर माझ्या पर्सचा धक्का तिच्या पुस्तकाला बसत होता. ती समोर धरून वाचत असलेल्या पुस्तकाला धक्का बसत होता, तरी तिच्या डोळ्याची पापणीही लवत नव्हती. ती अगदी पूर्णपणे समरसून एचपी वाचत होती. हे पाहिल्यावर माझं तिच्याबद्दल फार म्हणजे फारच चांगलं मत बनलं होतं. एकतर एचपी वाचणं, तेही इतकं समरसून! हे फक्त मनाने चांगल्या माणसांनाच जमतं! 😛

तर अशाप्रकारे तिच्याबद्दल माझ्या मनात एक खूप चांगली प्रतिमा तयार झाली होती. आणि तिला मी आज ‘ट्वायलाईट’ वाचताना पाहिल्यावर ती प्रतिमा क्षणार्धात वाईट झाली. त्यामुळे आता माझ्या मनात असा प्रश्न उभा राहिला आहे, की माणसांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांवरून जज करणं कितपत बरोबर आहे?

7 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. गीतांजली शेलार
  ऑक्टोबर 14, 2011 @ 08:52:55

  अर्चना, मला ना वाचणाऱ्या सर्वांबद्दल आदर आहे! आणि सगळ वाचाव आणि चांगल ते घ्यावं या गोष्टीवर विश्वास आहे !

  उत्तर

 2. Raj
  ऑक्टोबर 14, 2011 @ 15:32:24

  All generalizations are dangerous, including this one. 🙂

  उत्तर

 3. अर्चना
  ऑक्टोबर 15, 2011 @ 05:29:11

  गीतांजली आणि राज, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. मलाही आता तुमचे म्हणणे पटू लागले आहे. 🙂

  उत्तर

 4. jaggu9v
  ऑक्टोबर 19, 2011 @ 08:15:03

  छान लिहीलय !
  माफ करा, पण पुस्तक कोणतं वाचत आहे यावरून मानसाचा स्वभाव ओळखणं अवघडच आहे. असं मला वाटतं.

  उत्तर

 5. अर्चना
  ऑक्टोबर 21, 2011 @ 03:09:09

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, jaggu9v.

  उत्तर

 6. khirapat
  जानेवारी 05, 2012 @ 11:48:59

  आज प्रथमच इथे थांबले आणि तुमचं लिखाण आवडलं. मला वाटतं की अनोळखी माणसाला त्याच्या हातातल्या पुस्तकावरूनच नव्हे तर इतरही गोष्टींवरून वेगवेगळ्या साच्यांत विभागायची खोड जगभरात जवळजवळ सगळयांनाच असावी. अनेकदा अशी अनुमानं बरेचदा खरीही असतात पण त्यात अपवाद कोणता हे अनोळखी व्यक्तीत समजणं अशक्यच! तरी हा खेळ तसा निरुपद्रवी आहें असं मला वाटतं आणि मला सुपरमार्केटमध्ये लोकांनी त्यांच्या ट्रॉलीत काय घेतलं आहें यावरून त्यांच्या आयुष्याबद्दल अनुमानं काढायची खोड आहें. 🙂

  उत्तर

 7. अर्चना
  जानेवारी 22, 2012 @ 10:26:37

  ट्रॉलीतील सामानावरून माणसाची परीक्षा करणं खूपच मजेदार वाटलं. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! 🙂

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: