माझं जॉब हंटिंग

एम्प्लॉयमेन्ट न्युज हा पेपर माझ्या रूमच्या दारात पडण्याचा दिवस हा माझ्यासाठी पर्वणीचा दिवस असतो. मी लगबगीने मेसमध्ये जाते, ब्रेकफास्ट आणि मग भरून चहा रूमवर घेऊन येते आणि मग आरामात एम्प्लॉयमेन्ट न्युजचं एक एक पान उलटत नाश्ता करते. थेट माझ्या विषयाशी संबंधित जाहिराती फारच कमी असतात. मग माझ्या आवडीच्या इतर क्षेत्रांतल्या जाहिराती बघून आपल्याला हा जॉब मिळाला असता तर…. असा विचार करत बसते.

या आठवड्याच्या इशुमध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (आर्किऑलॉजीच्या लोकांचं लाडकं ए.एस.आय) या संस्थेसाठी फोटोग्राफर पाहिजे आहे अशी जाहिरात आली आहे. जर मला हा जॉब मिळाला असता तर… मला चक्क आर्किऑलॉजिकल साईट्सवर मुक्त प्रवेश मिळाला असता. खोदकामाचे, मातीच्या थरांचे, पडक्या भिंतींचे, मडक्यांच्या फुटक्या अवशेषांचे, क्वचित मानवी सांगाड्यांचेही (बापरे!) फोटो काढायला मिळाले असते. तिथे बसून आर्किऑलॉजिस्टना काम करताना बघायला मिळालं असतं. कित्येक युरेकांचं साक्षीदार व्हायला मिळालं असतं. ही माती अमुक शतकातील ज्वालामुखीच्या वेळी उडालेली राख आहे की तमुक घटनेची निर्देशक आहे अशा इंटरेस्टिंग चर्चा ऐकायला मिळाल्या असता. ह्म्म्म्म……. पण दुर्दैवाने मी फोटोग्राफीचा कोर्सच केलेला नाही. 😦

मला गेल्या काही वर्षांपासून खुणावणारी एक पोस्ट पहा- साहित्य अकादेमीत रिजनल ऑफिसरची. मला जर हा जॉब मिळाला असता तर…. मला एखाद्या भारतीय भाषेतील साहित्य वाचायला पैसे मिळाले असते. मग मी ठरवलं असतं कुठल्या साहित्याचं इंग्रजी / हिंदी / मराठीत भाषांतर करवून घ्यायचं आणि कुठल्याचं नाही ते. मग मी पुस्तकांसाठी नवनवीन कल्पना सुचवल्या असत्या, लगेच त्या अमलात आणण्याच्या कामाला लागले असते. त्या निमित्ताने मोठ-मोठ्या लेखकांशी मला बोलायला मिळालं असतं. त्या पुस्तकांच्या मार्केटिंगसाठी मी अभिनव स्ट्रॅटेजीज आखल्या असत्या. पण हाय रे कर्मा, या पोस्टच्या बेसिक रिक्वायरमेंट्स मी पूर्ण करत नाही- ना माझं कुठलं पुस्तक प्रकाशित झालंय ना मला मराठी आणि मोडकी-तोडकी मैथिली सोडून इतर कुठली भारतीय भाषा येत. :((

अशाच माझ्या एका लाडक्या जॉबची जाहिरात २ आठवड्यांपूर्वी आली होती- परदेशी भाषा शिकवण्यासाठी उभारलेल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये लायब्रेरियनची पोस्ट. हा जॉब मला मिळाला असता तर…. मी दिवसातले ९-१० तास पुस्तकांच्या घरात राहिले असते. आजूबाजूला जर्मन, फ्रेंच, रशियन, मॅंडरिन, कोरियन, जॅपनीज अशा म्हणाल त्या भाषांतील पुस्तकेच पुस्तके असती. मला वाचता येतील अशी त्यांची इंग्रजी भाषांतरंही असती. पुस्तकं शेल्व्ह्जमध्ये लावण्याच्या निमित्ताने किंवा त्यांची मोजदाद करून ती बाइंडिंगसाठी देण्याच्या निमित्ताने म्हणा प्रत्येक पुस्तकाला किमान एकदातरी स्पर्श झाला असता. मग मी मला फार काम करायला लागू नये आणि जास्तीत जास्त वेळ वाचनात घालवता यावा यासाठी नवनवीन कॢप्ती शोधून काढल्या असत्या. विद्यार्थ्यांनाच सगळे फॉर्म्स भरायला लावून स्वत:कडे फक्त शिक्का मारण्याचं काम ठेवणं, अमुक पुस्तक मिळत नाहीये असं सांगत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर डाफरणं- जेणेकरून ते विद्यार्थी पुन्हा माझ्याकडे मदत मागायला येणार नाहीत इ. इ. ह्म्म्म्म आता मला अनेक लायब्रेरियन्सच्या वर्तनाचा थोडा-थोडा उलगडा होतोय. पण दुर्दैवाने मी लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा अथवा डिग्री घेतलेली नाही. :(((

सगळ्यात जबराट जाहिरात एकदा आली होती ती म्हणजे सी.बी.आय का तत्सम कुठल्यातरी संस्थेसाठी फॉरेन्सिक लिंग्विस्ट पाहिजे अशी. अहाहा, हा जॉब मला मिळाला असता तर काय बहार आली असती! हस्ताक्षर तपासणे, भाषाशैली तपासणे, टेप केलेला आवाज आणि आरोपीचा आवाज मॅच करणे, न्यायालयात जबानीच्या वेळी गरज पडल्यास इंटरप्रीटरचं काम करणे अशी रोमहर्षक कामं करायला मिळाली असती. मोठमोठ्या गोपनीय केसेसमधली आतल्या गोटातली माहिती मला मिळाली असती. प्रत्यक्ष खटले बघायला मिळाले असते. ह्म्म्म्म्म पण कसचं काय माझी डिग्री फॉरेन्सिक लिंग्विस्टिक्समधली नाहीच.

तात्पर्य काय, तर आता झेरॉक्स मशिन चालवणे, भाज्या चिरून प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्या विकणे, चांदी, पितळ इ. धातूंच्या वस्तू घासून लखलखीत करण्यासाठी ’ए चांदी-पितल का बर्तन सफाई…ए’ अशा आरोळ्या ठोकत गल्लीबोळांतून फिरणे, कपड्यांना इस्त्री करणे यांपैकी कुठले काम अधिक चांगले हे ठरवण्याकडे परत एकदा वळावे लागेल.

2 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Nivedita Barve
  ऑक्टोबर 18, 2009 @ 06:04:20

  chan post ahe. if you are interested, there is an archaeological site called Lothal only about a 100 kms from Ahmedabad. http://en.wikipedia.org/wiki/Lothal
  I visited Lothal about a month back and can completely identify with your feelings for the archaeological job 🙂
  Mast writing ahe, keep up the good work!

  उत्तर

 2. Anonymous
  नोव्हेंबर 09, 2009 @ 02:01:27

  You are a gifted writer. You should seriously consider writing more often.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: