द शिपिंग न्युज
आजच एक सुंदर चित्रपट पाहिला- ’द शिपिंग न्युज’. केव्हिन स्पेसी, ज्युडी डेंच, केट ब्लॅंचेट आणि ज्युलिऍन मूर यांच्या प्रमुख भुमिका त्यात आहेत.
हा चित्रपट फिरतो तो न्युफाऊंडलॅंड मधील एका हिरव्या घराभोवती. हे घर इतर साध्या घरांसारखं नाही. हे घर आहे जवळच्याच एका बेटावर राहणाऱ्या, लूटमार करणाऱ्या घराण्याचं. त्यांना गावाबाहेर घालवल्यावर ते लोक स्वत:बरोबर ते घरही दोरखंडांनी ओढून वाहून घेऊन जातात. नव्या ठिकाणी आल्यावर ते घर उडून जाऊ नये म्हणून त्याला दोरखंडांनी जमिनीशी जखडून ठेवतात. अखेर काही वर्षांनी एक एक करून सगळे दाही दिशांना पांगतात आणि ते घर ५० वर्षांसाठी रिकामं राहतं. त्यात राहणारी एक मुलगी ५० वर्षांनी म्हातारी झाल्यावर परत येते. येताना सोबत घेऊन येते आपल्या सावत्र भावाच्या मुलाला आणि नातीला.
पूर्ण चित्रपटभर एक गुढ वातावरण भरून राहिलेलं आहे. छोट्या मुलीला रात्री खिडकीबाहेर दिसणारं भूत आणि त्याचा पांढरा कुत्रा, दर आठवड्याला होणारे अपघात, जमिनीवर जितकी माणसं राहतात त्याहून अधिक माणसं पाण्यात बुडालेली आहेत असं एका पात्राचं विधान, चित्रपटभर विविध व्यक्तींच्या मृत्यूची उकलत जाणारी कोडी, नायकाच्या बॉसच्या अंतिम संस्कारांच्या वेळी तो बॉस खोकत खोकत शुद्धीवर येणं, भर मे महिन्यात आणि नंतरही सदोदित बर्फाने आच्छादलेलं न्युफाऊंडलॅंड आणि तरीही उन्हाळा येण्याची वाट पाहणारी म्हातारी…..
ही कथा आहे ती आत्या, भाचा आणि नात ही तीन पात्रे आणि ते घर यांची आपल्या सुटकेसाठी चाललेल्या धडपडीची. हे घर म्हणजे ’भूतकाळा’चं प्रतीक आहे. या घरात राहणाऱ्या प्रत्येकजणाने एकीकडे स्वत:ला आपल्या निसटून जाऊ पाहणाऱ्या भूतकाळाशी दोरखंडांनी घट्ट बांधून घेतलेलं आहे तर दुसरीकडे त्याच भूतकाळाच्या पाशांतून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. म्हातारीच्या मनावर एक मोठं ओझं आहे- तिच्या सावत्र भावाने ती १२ वर्षांची असताना तिच्यावर केलेल्या बलात्काराचं आणि त्यातून उद्भवलेल्या बाळाच्या हत्येचं. तिच्या भाच्याच्या शिरावर भार आहे तो आपल्या अपयश-मालिकेचा, आपल्या प्रतारणा करणाऱ्या मृत बायकोवरील विशुद्ध प्रेमाचा तर त्या लहानग्या मुलीच्या मनात एकच शंका- आपण बोरिंग आहोत म्हणून आपली आई आपल्याला सोडून गेली का?
चित्रपटाच्या शेवटाकडे हे तिघेही आपापल्या पाशांतून मुक्त होतात आणि शेवटी ते घरही दोरखंड तोडून विखरून- उडून जातं…. चित्रपटाच्या शेवटी एक सुंदर वाक्य आहे- Deadly Storm Takes House. Leaves… Excellent View.
मे 29, 2009 @ 15:56:10
हम्म..
कथा तर छान वाटतेय.
केव्हिन स्पेसी, ज्युडी डेंच, केट ब्लॅंचेट आणि ज्युलिऍन मूर.. मोठी मोठी मंडळी आहेत.. पाहायची उत्सुकता लागली आहे.