कुसुमाग्रज, शांताबाई आणि कालिदास

जगातल्या अनेक साहित्यकृतींचे एकाहून अधिक भाषांत अनुवाद झालेले आहेत. त्यातील काहींचे तर एकाच भाषेत वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळे अनुवाद झाले आहेत. उदाहरणार्थ मेघदूत, ‘कविकुलगुरू’ कालिदासाने इ.स. ४थ्या शतकाच्या आसपास संस्कृत भाषेत रचलेले अभिजात काव्य. अनेक आधुनिक भारतीय भाषांतच नव्हे, तर काही परदेशी भाषांतही मेघदूताचे अनुवाद केले गेले आहेत. एकट्या मराठीतच मेघदूताचे डझनभर अनुवाद आहेत. अर्थात, मेघदूताचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. मेघदूत लिहिले गेल्यावर ते इतके प्रसिद्ध व लोकप्रिय झाले, की त्याकाळच्या इतर कवींनीही कालिदासाचे अनुकरण करायला सुरुवात केली आणि दूतकाव्यांची एक लाट आली. संस्कृत काव्यांचा काळ संपला पण मेघदूताची जनमानसावरची मोहिनी काही संपली नाही. वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या अनुवादकांकडून आजवर झालेले मेघदूताचे अगणित अनुवाद त्याची साक्ष देतात.

एकाच साहित्यकृतीचे दोन अनुवाद पाहिले की वाटते, त्यांत फरक असून असून कितीसा असणार? शेवटी आशय तर एकच आहे, तो आशय एकाच भाषेत लिहून लिहून किती वेगवेगळ्या शब्दांत लिहिणार? परंतु वास्तव परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शवते. उदाहरणार्थ, मेघदूताचे सर्वच मराठी अनुवाद वैविध्यपूर्ण आहेत. सी. डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी आहे तर वसंत बापटांचा मुक्तछंदात आहे. कुसुमाग्रजांचा अनुवाद १९५६ सालचा आहे तर शांताबाईंचा अनुवाद १९९४चा. वृत्त आणि निर्मितीचा काळ हे दोन्ही अनुवादांच्या बाबतीतले महत्त्वाचे घटक असले, तरीही दोन काव्यानुवादांतला फरक केवळ त्यापुरताच सीमित नसतो. अनुवादकाची पार्श्वभूमी, संवेदनशीलता, प्रतिभा, अनुभवविश्व, त्या साहित्यकृतीकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन या सर्वांचेच प्रतिबिंब त्याच्या अनुवादात पडते व परिणामी इतर अनुवादांपेक्षा त्याचा अनुवाद वेगळा होतो. कुसुमाग्रज आणि शांताबाईंनी मेघदूताच्या केलेल्या अनुवादांची जेव्हा मी तुलना केली, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली.

या दोघांच्या साहित्यिक व शैक्षणिक पार्श्वभूमीची तुलना करता लक्षात येते, की दोघांपैकी केवळ शांताबाईंनाच साहित्यकृतींच्या अनुवादाचा मोठा अनुभव होता. त्यांनी आसामी, जपानी, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांतील काव्यांचे मराठीत अनुवाद केले होते. याखेरीज त्यांनी आपले पदवीचे व पदव्युत्तर शिक्षण संस्कृत साहित्य हा विषय घेऊन पूर्ण केले होते. याचा अर्थ असा नव्हे की कुसुमाग्रजांना संस्कृत येत नव्हते किंवा त्यांनी कधीच अनुवाद केले नव्हते. पण या दोन्ही बाबतींत शांताबाईंना त्यांच्याहून अधिक अनुभव होता, हे मात्र नक्की.

या सर्वांचे पडसाद उमटले ते अनुवादात. शांताबाईंनी अनुवादाच्या वेळी प्राधान्य दिले ते कालिदासाच्या शब्दांना व त्याने वापरलेल्या त्याकाळच्या सामाजिक संदर्भांना. याउलट कुसुमाग्रजांनी शब्दांवर व संदर्भांवर भर न देता, त्यांतून व्यक्त होणार्‍या काव्यावर आपले लक्ष केंद्रित केले.

म्हणजे काय, ते कळण्यासाठी पुढील श्लोक व अनुवाद पाहू.

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तंगमितमहिमाा वर्षभोग्येण भर्तु:|
यक्ष: चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु||

– मूळ मेघदूतातला पहिला श्लोक

१- कोणी एक ; ३- स्वतःच्या कर्तव्यात चूक केलेला; २- लाडक्या
पत्नीच्या विरहामुळे दु:सह झालेल्या; ५- वर्षभरासाठी भोगावयाच्या ;
भर्तु: शापेन- मालकाच्या शापाने; ४- सर्व अतिमानवी शक्ती नष्ट झालेला
; ६- यक्ष; ७- सीतेने स्नान केल्याने पवित्र झालेले पाणी / तलाव असलेल्या
; ८- दाट सावली देणार्‍या वृक्षांनी वेढले गेलेल्या; ९- रामगिरीवरील
आश्रमांत; वसतिं चक्रे- वसती करता झाला .

सुभग जलाशय- यांत नाहली वनवासी मैथिली
घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली
रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होऊनी
वर्षाचा निर्वास ललाटी- विव्हल विरहानली
– कुसुमाग्रजांनी केलेला वरील श्लोकाचा अनुवाद

कुबेरसेवक यक्ष एक कुणि सेवेमाजीं अपुल्या चुकला
प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला
जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथें जलाशय
घनच्छाय त्या रामगिरीवर विविधआश्रमीं घेई आश्रय

– शांताबाईंनी केलेला वरील श्लोकाचा अनुवाद

शाब्दिक पातळीवर विचार करता लक्षात येते, की शांताबाईंनी मूळ श्लोकातला ‘अस्तंगमितमहिमा’ हा शब्द सोडता इतर प्रत्येक शब्दाचा अनुवाद केला आहे. कुसुमाग्रजांनी मात्र कश्चित् , स्वाधिकारात्प्रमत्त:, अस्तंगमितमहिमा, भर्तु:, आश्रमेषु असे तब्बल ५ शब्द अनुवादातून वगळले आहेत. ‘अस्तंगमितमहिमा’ गाळण्यासाठी शांताबाईंकडे चपखल प्रतिशब्द नसल्याचे किंवा प्रतिशब्द वृत्तात बसत नसल्याचे कारण होते. पण कुसुमाग्रजांनी जे शब्द गाळले आहेत, त्यांचे स्वरूप पाहता ही कारणे त्यांना लागू होणार नाहीत. अशा अनुवादांवर साधारणपणे मूळ साहित्यकृतीशी अप्रामाणिक असा शिक्का बसतो. पण आपण जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू-

पूर्वपक्ष- अनुवादकाने मूळ साहित्यकृतीतील प्रत्येक शब्दाचा व अर्थाचा अनुवाद करायला हवा; फारच अशक्य असल्यास एखादा शब्द सोडणे क्षम्य आहे, पण इतके शब्द गाळणे योग्य नाही.

उत्तरपक्ष- मूळ साहित्यकृतीतला एखादा शब्द गाळला तर काय होते?

पूर्वपक्ष- शब्दासोबत त्याचा अर्थही गाळला जातो.

उत्तरपक्ष- अर्थ गाळला गेला तर काय होते?

पूर्वपक्ष- तो शब्द ज्या वाक्यात/ साहित्यकृतीत आहे, तिचा नीट अर्थ लागत नाही.

उत्तरपक्ष- पण समजा, एकूण साहित्यकृतीचा अर्थ उमगण्यासाठी एखाद्या विशिष्ट शब्दाचा किंवा त्याच्या अर्थाचा फारसा उपयोग नसेल तर? मग तो शब्द गाळला तर काय फरक पडेल?

पूर्वपक्ष- ह्म्म्म्म्…

यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो.

पूर्वपक्ष- एखादा शब्द व त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे किंवा नाही, हे कसे ठरवणार?

उत्तरपक्ष- साहित्यकृती ही एखाद्या नक्षीदार कापडासारखी असते. कापडावर आखून घेतलेल्या भागात कलाकुसर केलेली असते व उरलेला भाग मोकळा ठेवलेला असतो. अशावेळी मोकळ्या भागात एखादे भोक पडले, तर ते तितकेसे नजरेत भरत नाही व ते झाकूनही टाकता येते. परंतू नक्षीतच भोक पडले, तर त्या नक्षीचे व परिणामी त्या संपूर्ण कापडाचेही सौंदर्य कमी होते. त्याचप्रमाणे कोणत्याही साहित्यकृतीत, विशेषत: काव्यांमधे, प्रत्येक शब्दाला वाक्यात एक विशिष्ट स्थान असते, त्याचे एक विशिष्ट कार्य असते. त्या शब्दाने त्या वाक्याचा, काव्याचा अर्थ व संदर्भ परिपूर्ण होत असतो. तो शब्द तिथून हलवला किंवा काढून टाकला तर सबंध वाक्य, किंवा काही वेळा तर सबंध काव्यही निरर्थक, संदर्भहीन, सौंदर्यहीन होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनुवाद करताना एखाद्या शब्दाचा अनुवाद न करण्याचा निर्णय घेणे जोखमीचे असते. म्हणजेच एखादा शब्द महत्त्वाचा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आधी साहित्यकृतीतल्या अर्थाच्या, अलंकारांच्या छुप्या नक्षीदार रचना शोधून काढायला हव्यात. मग तो विशिष्ट शब्द त्या रचनेचा एक भाग आहे, की त्या रचनेच्या बाहेर आहे, हे समजून घ्यायला हवे. जर तो त्या रचनेचा भाग असेल, तर तो शब्द महत्त्वाचा आहे व गाळून चालणार नाही, अन्यथा चालेल.

आता कुसुमाग्रजांच्या अनुवादाला ही कसोटी लावू. थोडक्यात, त्यांनी अनुवादिलेल्या शब्दांची एक एकसंध रचना कशी बनते, व गाळलेले शब्द त्या रचनेच्या बाहेर कसे पडतात, ते पाहू. नीट पाहिल्यास लक्षात येईल, की हे गाळलेले शब्द श्लोकात वर्णिलेल्या घटनेचे तपशील सांगतात. म्हणजे श्लोकात एक घटना सांगितली आहे, की एका यक्षाला आपल्या सेवेत हलगर्जीपणा केल्यामुळे एक वर्ष घरापासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. कुसुमाग्रजांनी केवळ प्रमादामुळे घरापासून वर्षभरासाठी दूर राहणारा यक्ष अनुवादात दाखवला आहे. शिक्षा कुणी दिली, शिक्षेचे इतर परिणाम काय झाले वगैरे तपशील त्यांनी वगळलेले आहेत. कुसुमाग्रजांच्या अनुवादातले इतर श्लोक पाहिले, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी असेच तपशील गाळलेले दिसतात. परंतू वर दिलेला श्लोक हा काव्याचा पहिला श्लोक असल्याने, त्याचे महत्त्व वेगळे आहे. काव्याच्या पहिल्या श्लोकात कथावस्तुचे निवेदन व पात्रपरिचय केला जातो, अशावेळी त्यातले तपशील गाळला तर त्याचे पडसाद पुढे पूर्ण काव्याच्या बांधणीवर पडतात.

असे असतानाही शब्द गाळण्याच्या कुसुमाग्रजांच्या निर्णयाचे कारण त्यांच्या एका लेखात सापडते. त्यात त्यांनी मेघदूताविषयी व त्यांच्या मेघदूताकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयी लिहिले आहे. संस्कृत साहित्यशास्त्रानुसार मेघदूताला ‘खंडकाव्य’ मानले जाते. ‘खंडकाव्य’ म्हणजे ‘महाकाव्या’चे छोटेखानी रुप! त्याची श्लोकसंख्या, कथेचा जीव, पात्रसंख्या सर्वच कमी असते. परंतू महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबंध खंडकाव्य एका कथासूत्राने बांधलेले असते. मेघदूताची कथा इथे थोडक्यात सांगते. एक यक्ष एकदा आपल्या कामात मोठी चूक करतो. त्याची शिक्षा म्हणून त्याचा मालक कुबेर त्याला एक वर्ष तडीपार करतो. वर्षभरासाठी घरापासून व आपल्या प्रिय पत्नीपासून दूर रहावे लागल्याने यक्ष खूप व्याकुळ होतो व पहिल्या पावसाच्या पहिल्या मेघाला आपला दूत बनवून आपल्या पत्नीकडे आपला निरोप घेऊन धाडतो. आपल्या गावी जायचा रस्ता मेघाला सांगतो. अशी नाट्यपूर्ण कथा असली, तरीही मेघदूत वाखाणले जाते, ते त्यातील निसर्गाच्या रमणीय व कल्पक वर्णनांबद्दल! मेघदूताची पात्रसंख्या फारच लहान आहे- एक् यक्ष, मेघ आणि यक्षाची पत्नी. मेघदूताचा जीवही लहान, साधारण १२० श्लोकांचा फक्त. या लक्षणांनुसार मेघदूत हे खंडकाव्य ठरते.

परंतु कुसुमाग्रजांच्या मते मात्र मेघदूताला खंडकाव्य म्हणता येणार नाही, कारण त्याला कथाच नाही. जी काही कथेसदृश यक्षशापाची गोष्ट आहे, ती कालिदासाने पहिल्या श्लोकापुरतीच मर्यादित ठेवली आहे. पुढे त्या कथेकडे कालिदासाने शेवटच्या श्लोकांत सोडता निर्देश केलेला नाही. कुसुमाग्रजांच्या मते, खुद्द कालिदासालाही मेघदूतातून तेवढी कथाच फक्त सांगायची नव्हती. त्याला केवळ वेळोवेळी सुचलेल्या कल्पनांना शब्दरूप द्यायचे होते व पुढे अशा कडव्यांना एक निश्चित आकार मिळावा म्हणून त्यांना त्या कथेच्या सूत्रात बांधले, इतकेच! म्हणूनच कुसुमाग्रजांनीही त्या कथेला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व न देता, सगळे लक्ष पहिल्या श्लोकातल्या काव्यात्मकतेकडे वळवले आहे. कथेच्या तपशीलांमधे शिरण्यापेक्षा श्लोकात वर्णिलेला मनोरम निसर्ग व त्याच्या पार्श्वभूमीवर नायकाची उदास मनस्थिती यांतला विरोधाभास टिपण्याला कुसुमाग्रजांनी प्राधान्य दिले आहे. हीच भूमिका त्यांनी अनुवादभर अंगिकारली आहे.

पुढे ते असेही म्हणतात, की मेघदूताला जर एखाद्या काव्यप्रकाराच्या चौकटीत बसवायचेच असेल, तर त्याला ‘भावकाव्य’ म्हणावे, कारण कालिदासाने त्यात श्लोकाश्लोकांतून भोवती निसर्गाचा चालणारा अद्भुत खेळ व तो पाहून मनात दाटून येणार्‍या भावभावना व कल्पना यांना मूर्तरूप दिले आहे. कुसुमाग्रजांच्या मते मेघदूतातला यक्ष म्हणजे स्वत: कालिदासच. कारण श्लोकांतून व्यक्त होणाऱ्या भावभावना त्याच्या स्वत:च्या आहेत. कालिदास हे संबंध काव्य प्रथम पुरुषातही लिहू शकला असता. (उदा.- मी मेघ पाहिला, मग मी त्याला बोलावले … अशा प्रकारे) परंतु काव्य प्रथम पुरुषात लिहिणे हे त्याकाळच्या संकेतांना धरून नसल्याने त्याला तसे करता आले नाही, असे कुसुमाग्रजांचे म्हणणे. कुसुमाग्रज मेघदूताची तुलना उमर खय्याम यांच्या ‘रुबायत’ या ग्रंथाशी करतात. त्यांच्यासाठी रुबायांप्रमाणेच मेघदूतातला प्रत्येक श्लोक ही स्वतंत्र कविता आहे. म्हणूनच की काय, ते अनुवादित श्लोकांसाठी ‘रुबाई’चाच साचा अनुसरतात. शिवाय एखाद्या श्लोकात आधीच्या श्लोकातील एखाद्या वस्तुचा / जागेचा संदर्भ सूचित केला असेल, तर अनुवादात तसे करणे कुसुमाग्रजांनी शक्यतो टाळलेले आहे. जेणेकरून प्रत्येक अनुवादित श्लोक हा स्वतंत्र कविता वाटावा व तो समजून घेण्यासाठी आधीचा अनुवादित श्लोक वाचण्याची गरज पडू नये. असे केल्याने कुसुमाग्रजांच्या अनुवादाला एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या अनुवादाचे कुठलेही पान मधेच उघडले आणि वाचायला सुरुवात केली तरी आधीचा श्लोक न वाचताही त्या श्लोकाचा आस्वाद घेता येतो.

याऊलट शांताबाईंनी मात्र मेघदूताला ‘खंडकाव्य’ मानले जाण्याबद्दल आक्षेप व्यक्त केलेला दिसत नाही. त्यांच्याकरता मेघदूत हे एक कथासूत्रात बांधले गेलेले काव्य आहे हे काही गोष्टींवरून सहज दिसून येते. उदा.- मेघदूताच्या श्लोकांच्या खर्‍या क्रमाबद्दल बरेच मतभेद आहेत. काही विद्वान मेघदूताचे श्लोक ज्या क्रमात प्राचीन हस्तलिखितांतून सापडतात, तोच क्रम योग्य मानतात. तर इतर काही विद्वान काही विशिष्ट श्लोकांचा क्रम एका विशिष्ट प्रकारे बदलून निर्माण झालेला वेगळा क्रम योग्य मानतात. त्यांच्या मते त्या क्रमात श्लोक वाचल्यास त्यांचा अर्थ अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होतो, कारण ते श्लोक समजण्यासाठी आवश्यक ते संदर्भ त्या विशिष्ट क्रमातच उलगडत जातात. शांताबाईंनी श्लोकांचा हा दुसरा – श्लोकांच्या आशयाला व कथेच्या प्रवाहाला पूरक क्रम अनुसरला आहे. कुसुमाग्रज मात्र मूळ श्लोकक्रमाचेच पालन करतात, कारण त्यांच्या मतानुसार दोन श्लोकांत काहीच संबंध नाही, तेव्हा त्यांचा क्रम बदलल्याने काहीही फायदा किंवा तोटा होत नाही.

दुसरी एक गोष्ट म्हणजे, शांताबाईंचा अनुवादासाठी वापरलेला साचा हा रुबायांसारखा प्रत्येक श्लोकाची स्वतंत्रता अधोरेखित करणारा नसून, साध्या कवितेच्या कडव्यांसारखा कवितेची एकसंधता सूचित करणारा आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे शांताबाईंनी अनुवाद करताना मूळ श्लोकांतील शब्द, त्यांचे वाक्यातील स्थान, आशय व तत्कालीन संदर्भ यांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे मेघदूतात जे जे काही वर्णन केले आहे, त्याचा बराच मोठा अंश शांताबाईंच्या अनुवादात येतो. त्यांनी फार कमी शब्द / संदर्भ गाळलेले आहेत. याकरता शांताबाईंना सलाम; कारण एका अभिजात काव्यातील शब्दन् शब्द त्याच्या अर्थाच्या व संदर्भांच्या कंगोर्‍यांसहित, त्याच्या आशयाला मुळीच धक्का न देता, काव्यात्मक रीतीने कवितेतून मांडणे, याला अनन्यसाधारण प्रतिभा लागते.

आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे, दोन्ही अनुवादांत वापरलेली वृत्ते. मूळ मेघदूतात ‘मंदाक्रांता’ नावाचे अक्षरगणवृत्त वापरले आहे. कुसुमाग्रजांनी माझ्या माहितीप्रमाणे ‘साकी’ नावाचे मात्रावृत्त वापरले आहे. अनुवादासाठी मात्रावृत्त वापरणे केव्हाही चांगलेच! कारण त्यामुळे लघु-गुरूची जाचक चौकट नसूनही मात्रांत बांधलेली सुंदर, लयबद्ध रचना करता येते. ‘साकी’ या वृत्तात लागणार्‍या मात्रांची संख्या व ‘मंदाक्रांता’ या वृत्तातील मात्रांची संख्या सारखीच, म्हणजेच २७ इतकी आहे. एक मात्रा म्हणजे एखादा नाद उच्चारण्यासाठी लागणारा विशिष्ट कालावधी. केवळ व्यंजन उच्चारण्यासाठी अर्धी मात्रा, एखादा लघु (र्‍हस्व) स्वर उच्चारण्यासाठी एक मात्रा, तर एखादा गुरू (दीर्घ) स्वर उच्चारण्यासाठी दोन मात्रा एवढा कालावधी लागतो. थोडक्यात, वृत्तबद्ध कवितेचा प्रत्येक चरण म्हणायला विशिष्ट कालावधी लागतो. ‘मंदाक्रांता’ आणि ‘साकी’ यांची मात्रासंख्या सारखीच असल्याने मेघदूत व कुसुमाग्रजांचा अनुवाद या दोन्हींत प्रत्येक ओळ उच्चारण्यासाठी सारखाच कालावधी लागतो. परंतु मेघदूतात ओळींतील लघु-गुरूंचा एक विशिष्ट क्रम आहे, तर साकीत तसे बंधन नसल्याने तेवढ्याच कालावधीच्या चौकटीत राहूनही कुसुमाग्रजांना अनुवाद करण्यासाठी तुलनेने अधिक स्वातंत्र्य मिळते.

शांताबाईंनी सुद्धा मात्रावृत्तच वापरले आहे. त्यांनी वापरलेल्या वृत्ताचे नाव पादाकुलका. परंतु या वृत्तात मात्रासंख्या होते ३२. म्हणजे मंदाक्रांता व साकीच्या मात्रासंख्येहून अधिक. मूळ श्लोकाच्या वृत्ताहून अधिक मात्रासंख्या असलेले वृत्त अनुवादासाठी वापरणे ही शांताबाईंच्या अनुवादाची गरज होती. कारण त्यांना मेघदूतातील प्रत्येक बारीकसारीक तपशील अनुवादात टिपायचा होता. तसे करायचे असल्यास मूळ श्लोकाच्या वृत्ताच्या कालावधीतच, तितक्याच मात्रासंख्येत ते संपादन करणे कठीण. म्हणून अधिक मात्रासंख्या असलेले वृत्त निवडले, ज्यायोगे अधिक व्यंजने व स्वर वापरून शब्दसंख्या वाढवता येईल व ठरवलेल्या चौकटीत मेघदूतातील जास्तीत जास्त भागाचा अनुवाद करता येईल. याउलट कुसुमाग्रज बरेच तपशील गाळणार असल्यामुळे त्यांना तेवढ्याच मात्रासंख्येत रचना करणे जमण्यासारखे होते.

अशाप्रकारे दोन्ही अनुवादांची एकमेकांशी व मेघदूताशी तुलना केल्यास लक्षात येते की दोन्ही अनुवाद मेघदूताला सारखेच जवळचे असले तरी एकमेकांहून पूर्णतया भिन्न आहेत, कारण दोन्ही अनुवादकांचे अनुवादामागचे हेतू भिन्न आहेत. एकाला मेघदूतातील काव्यात्मकता पकडायची आहे तर दुसर्‍याला त्यातला आशय. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, अनुवाद करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात- १- काय सांगितले आहे. २- त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे. शांताबाई व कुसुमाग्रज या दोघांनीही या दोन्ही गोष्टी अनुवादात पकडायचा प्रयत्न केला असला, तरी शांताबाईंनी त्यांतल्या पहिल्या गोष्टीला झुकते माप दिले आहे, तर कुसुमाग्रजांनी दुसरीला!

पण म्हणून अमुक एकाचाच अनुवाद चांगला, तमुकच वाईट; असे मुळीच नाही. प्रत्येक अनुवादाचे यशापयश हे अनुवादकाने स्वत:समोर ठेवलेल्या ध्येयाप्रत तो कितपत पोहोचू शकला यावरून ठरवायचे असते. माझ्यामते हे दोघेही अनुवाद आपापल्या जागी अत्यंत सुंदर आहेत, कारण त्यांच्या अनुवादकांनी ठरवल्याप्रमाणेच ते अनुवाद उतरले आहेत. त्या ध्येयांनुसार त्यांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. शांताबाईंचा अनुवाद हा संस्कृत किंवा प्राचीन भारतीय समाजाच्या अभ्यासकांसाठी मूळ मेघदूत वाचण्यापूर्वीची पहिली पायरी आहे, तर कुसुमाग्रजांचा अनुवाद हा काव्यप्रेमींसाठी मेघदूताचा मायबोलीतून आस्वाद घ्यायचे एक साधन आहे.

थोडक्यात काय, तर जर कोणी मला विचारले, या दोन्हींपैकी तुझा आवडता अनुवाद कोणता? तर माझं उत्तर असेल- ‘दोन्ही!’

Advertisements

20 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. Dhananjay
  डिसेंबर 29, 2008 @ 04:26:02

  सुरेख विवेचन. मेघदूत माझेही आवडते काव्य आहे. संस्कृत भाषेशी फारशी सलगी नसल्यामुळे मी मराठी अनुवादांवरच समाधान मानतो. मी शांताबाई, कुसुमाग्रज आणि बोरकर यांचे अनुवाद आस्वादले आहेत पण त्या वेगवेगळ्या अनुवादांमागील अनुवादकाची भुमिकेवर कधी विचार केला नव्हता. आपल्या लेखामुळे मेघदूताच्या (किंवा अनुवादाच्या) आस्वादाला/अभ्यासाला एक नवीन dimension मिळाले. लेखाबद्दल धन्यवाद. आपण वसंत बापट व चिंतामणराव देशमुख यांच्या अनुवादांचा उल्लेख केला आहे. ते कुठे उपलब्ध होतील यावर काही प्रकाश टाकू शकाल काय?

  उत्तर

 2. Anonymous
  एप्रिल 28, 2009 @ 18:33:37

  It is plain wrong to split the word: shaapenaasta.nga… into shaapen + asta.ng… because the line ceases to be in Mandakranta once the sandhi is undone.

  Thanks for quoting lines from the two translations.

  उत्तर

 3. Anonymous
  एप्रिल 30, 2009 @ 02:04:41

  Your comment that both Mandakranta and Saki have 27 maatraa-s in a single line got me curious about how a line of Saki splits. With Mandrakranta having yati on 4th and 10th letter, the maatraa spread in it is: 8 + 7 + 12. But the split in Saki is slightly different: 8 + 8 + 11.

  I also realized that even a letter with yati on it, and not just the last letter of a line, can be considered to be guru even when it is laghu. Check the line in verse # 31.

  शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थना चाटुकारः |

  The ‘v’ in ‘iva’ should be guru, but is laghu. Yet it does not jar because the letter has yeti (nyaas) on it.

  While Kusumagraj’s lines attest to his superior prowess as a poet when compared to Shantabai Shelke, I think his opening quatrain would have read better if it had had the reference to the yaksha in the very first line, instead of postponing it to the third line.

  उत्तर

 4. Archana
  एप्रिल 30, 2009 @ 03:10:33

  Dhananjay,
  Thanks for the comment. I found those translations in the library of the University of Mumbai. Dunno if they are still available in bookshops.

  Dear Anonymous,
  Thanks for sharing this. I agree to your first comment, and i am going to make the necessary changes as soon as i finish writing this comment. As to your second comment, thanks again for sharing that the letter with yati on it, can be considered to be guru. Which is obvious, as that letter is followed by a pause, just like the last letter of the line. Anyway, you seem to have hung up on the technicalities of Vrutta and lost the main point. Even with your additions, my main point remains the same- the total number of matras in both Vruttas remains the same, wherever the yati might come. This point is crucial, as it shows that it takes exactly the same amount of time to recite lines from both- the original and the translation (when recited using the same tune). This leads to the next point, that Kusumagraj had edited on the content part of the poem and thats why he could afford to use a Vrutta with the same number of matras, in spite of the fact that translations generally have a tendency to expand. (which is evident in Shantabai’s translation).

  The opinions you have mentioned in the last para of your second comment… I respect your opinions, but I disagree. First of all, I dont think that you can compare these two translations (look at the last para of the post), so you can not compare the prowess as a poet of both translators. Secondly, by mentioning yaksha in third line and not in the first line- right in the spotlight of the readers’ attention, Kusumagraj has made a point there, that yaksha is not ‘the most important’ character in Meghdut and that he wishes to point out things different than the storyline and the story-characters of the Meghdut.

  Btw, I dont chuck stones at people who point out my mistakes. So dont be afraid of using your real name and email- id 🙂

  उत्तर

  • Anonymous
   एप्रिल 30, 2009 @ 04:55:13

   I am not sure how you deduced that I ignored, much less lost, the main point, but I will let is pass. And I am not aware that I am pointing out any mistakes except the obvious one where the sandhi was undone, perhaps to isolate the word whose meaning you later noted in the original post.

   As for my email address, can YOUR email address be found via the site? Just curious. Please don’t be hung up about it because not using email-id hasn’t so far been hindrance to our ability to communicate.

   It is not general practice, you will surely agree, to take the liberty of using a laghu where there is yati though the liberty would be fairly justifiable.

   As for Shantabai translating every word except अस्तंगतमहिमा, while Kalidas and Kusumagraj have made specific mention of trees (taru and vrukshaavaL), Shantabai has only alluded to their shadow. But this is a nitpick for the sake of it; nothing crucial hangs on it.

   I think Poet Borkar had also translated Meghdoot into Marathi. Vasant Bapat had mentioned in a speech of his that Borkar had asked him to write an introduction. Bapat told him that he had some issues with Borkar’s translation and wasn’t enthusiastic about writing introduction to it. But Borkar told him that he had decided to ask Bapat to write an introduction to his effort, and Bapat was free to be as critical as he wanted but he it must be who wrote the foreword. I have read neither Bapat’s introduction nor Borkar’s translation.

   Finally, Shantabai almost dropped the idea of translating Meghdoot when she found just how many of its translations existed in Marathi. But Kusumagraj strongly urged her to not allow the thought to be an impediment to her intention; she said it helped her focus her mind on the task she had been contemplating for quite some time.

   – Anon

   उत्तर

  • Anonymous
   एप्रिल 30, 2009 @ 05:02:27

   You have written: “Kusumagraj had edited on the content part of the poem and thats why he could afford to use a Vrutta with the same number of matras.”

   It is also possible that Kusumagraj was hung up on using the same number of maatraas, which would normally result in massive editing of the content. His assertion that there is no story behind Meghdoot could be a rationalizaion arising out of the decision to stick to the same number of maatraas.

   उत्तर

 5. Archana
  मे 01, 2009 @ 10:57:49

  Well sorry if i sounded rude. I didn’t really mean to. Just because you didnt comment on any point other than Vruttas I deduced that you ignored and lost the whole point of the article. Anyway, you claim that you haven’t. So lets leave it at that.

  My personal opinion is that a lot of things depend on the translator’s choice of words and the translator’s choice of words depends on a lot of things. All my views are based on the published texts. I didn’t know of any correspondence or conversation that took place between Shantabai and Kusumagraj on the topic of Meghdut and its translation. Thanks for sharing this and the anecdote of the foreword to Borkar’s translation.

  The point you have raised in your latest comment is very curious. That could have been the case. Whatever the cause was, the result still remains the same- editing of the original text. I dont have that article in which he says that Meghdut has no story in front of me right now. But as far as i remember, that article was written some time before he made the translation. Maybe he wasnt thinking about the translation yet, maybe he was.

  BTW, I dont think MY email id will be displayed anywhere on the site. But i get to know the ids of the people who comment on this. 😀 perks of being the almost omniscient creator of a blog!

  उत्तर

 6. Anonymous
  मे 18, 2009 @ 07:11:51

  अर्चनाताई: तुम्ही त्या दोन भाषांतरांबाबत फारच कीस पाडला आहे, म्हणून मी पण थोडा तसा प्रकार केला; आणि क्वचित थट्टेचा सूर पण लावला असेल. पण तुम्ही केलेली चिरफाड योग्य आहे. मी नुसताच स्वतःला विरंगुळा म्हणून तो धागा पुढे चालवला. तुम्ही उद्धटपणा केला असा माझा अजिबात आरोप नाही, तेव्हा ते मनाला लावून घेऊ नका.

  तुमचा एक मुद्‌दा असा की फक्त समोर असलेल्या लेखांवर तुमची टीका आधारलेली आहे. त्यावर मात्र माझा असा आक्षेप आहे की माझीही प्रतिक्रिया त्यावरच आधारित आहे. एकदा योगायोग म्हणून माझी एक मैत्रीण शांताबाईंशी बोलत असताना, आणि मी तिथे असताना, त्यांनी उल्लेख केला की कुसुमाग्रजांनी असा आग्रह धरला की शांताबाईंनी आधी ठरवल्याप्रमाणे मेधदूताचं भाषांतर करावंच. म्हणून मला ती माहिती मिळाली. आणि तिचा या चर्चेशी संबंध असल्याने मी तो उल्लेख केला. एरवी त्या माहितीमुळे माझ्या प्रतिक्रियेवर काहीही फरक पडलेला नाही, आणि मी तुमच्याप्रमाणेच समोर असलेल्या लेखांवरूनच माझी मते बनवलीत. त्यांतली काही मते इथे मांडायला तुमची हरकत नसावी.

  तुमचं विवेचन अभ्यासपूर्ण आहे. पण विवेचनाचा समारोप करताना ‘दोघांमधला जास्त आवडता अनुवाद कोणता’ असा प्रश्न उगीचच विचारून त्याचं ‘दोन्ही आवडते आहेत’ असं गोडगोड उत्तर देऊन चटकदार शेवट करण्याचा प्रकार जरा वरवरचा वाटला. दोन वेगळ्या अंगांनी विचार करून सादर झालेले दोन सुंदर अनुवाद आणि त्यांच्यावर अनुवादकाच्या स्वतंत्र दृष्टीकोनाचा पडलेला प्रभाव एवढी ओळख पुरेशी होती.

  तुमच्या लेखात ‘पहिल्या पावसाचा ढग’ असा उल्लेख आहे. तो कालिदासाने किंवा शांताबाईंनी केला आहे का? आषाढाचा पहिला दिवस म्हणजे पावसाळ्याचा काळ हे तर आहेच. तसा ज्येष्ठ आणि आषाढ यांचा ग्रीष्माशी संबंध लावला असला तरी ७ जूनला मृग नक्षत्र येतं आणि बरोबर पाऊस आणतं असं मी ऐकून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातला हा पाऊस पडतो तो बहुतेक ज्येष्ठांत, आणि कधी कधी तर वैशाखातच. कालिदासाच्या काळी रामगिरीला पावसाची सुरुवात कधी होत असे? तो पाऊस किंवा तो ढग पहिलाच कशावरून होता?

  दुसर्‍या श्लोकाविषयी मला ही माहिती निळाली:

  तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।
  नीत्वा मासांकनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः॥
  आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
  वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥

  पूर्वमेघ – कालीदासाचे मूळ संस्कृत काव्य

  सम मंथ्स वेअर गॉन, द लोनली लव्हर्स पेन ।
  हॅड लूज्ड हिज गोल्डन ब्रेसलेट डे बाय डे ॥
  अर ही बिहेल्ड द हरबिंजर ऑफ रेन ।
  अ क्लाऊड दॅट चार्ज्ड द पीक इन मिमिक फ्रे ॥
  ऍज ऍन एलिफंट ऍटॅक्स अ बँक ऑफ अर्थ इन प्ले ॥२॥
  Some months were gone, the lonely lover’s pain
  Had loos’d his golden bracelet day by day ||
  Ere he beheld the harbinger of rain
  A cloud that charged the peak in mimic fray ||
  As an elephant attacks a bank of earth in play ||
  पूर्वमेघ – देखमुखांचा समकालीन इंग्रजी अनुवाद

  प्रेमी कांता-विरही अचली घालवी मास काही ।
  गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही॥
  आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे ।
  दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेळताहे ॥२॥

  – देशमुखांचा समवृत्ती संस्कृतप्रचुर मराठी अनुवाद

  कृश हातांतून गळून पडले सोन्याचे कंकण ।
  कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण! ॥
  आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी ।
  नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण! ॥२॥

  – कुसुमाग्रजांचा भिन्नवृत्ती मराठी अनुवाद
  (चालः औदुंबर)

  देशमुखांनी मंदाक्रांतेतच अनुवाद केला खरा, पण ‘गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही’ ही फक्त शब्दांची वृत्तात बसते म्हणून केलेली मांडणी आहे. वाचताना तिचा अर्थ अजिबात लागत नाही. कुसुमाग्रजांनी यक्षाच्या विरहव्याकुळतेवर इथे भर दिलेला आहे.

  आता मूळच्या चार ओळींसाठी अनुवादकाला पाच ओळी वापराव्या लागल्या, यावरून अजून एका अशाच, विनोबांच्या, भाषांतराची आठवण झाली. याचा उल्लेख मी फक्त तुम्ही अनुवादाविषयी असलेल्या तुमच्या आवडीचा उल्लेख केला, म्हणून केलेला आहे. देशमुखांना उत्तम कवितेचं अंग होतं; पण त्यांचा हा पाच ओळींचा इंग्रजी अनुवाद मात्र फारच भोळसट भाषेत, आणि मूळ काव्याच्या सामर्थ्याचा स्पर्शही न झालेला, असा मला वाटला. मात्र मला इंग्रजी काव्याचं मराठी काव्याइतपतदेखील, म्हणजे अगदीच जेमतेम, अंग सुद्‌धा नाही. तेव्हा त्यापलीकडे तो विषय सोडून दिलेला बरा. तरीही ‘Some months were gone’ ही कवितेत शोभणारी भाषा नाही हे मात्र वाटत राहतं.

  (दोन ओळी मुद्‌दाम चार भागात पसरवल्या आहेत. एरवी मूळ ओळींची संख्या दोनच.)

  ईशावास्यं इदं सर्वं
  यत् किञ्च जगत्यां जगत |
  तेन त्यक्तेन भुञ्जिथाः
  मा गृधः कस्य स्विद् धनम्||१||

  (पुढल्या दोन ओळींचाही थोडा प्रभाव विनोबांच्या भाषांतरावर असू शकेल.
  कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः |
  एवं त्वयि नान्यथेतो स्ति न कर्म लिप्यते नरे||२|| )

  विनोबांचे शब्द ‘गणगोत’ मधल्या लेखांतून घेतलेले आहेत.

  ईश का आवास है सारा जगत्‌
  जो है यहाँ वह सब उसीसे व्याप्त है |
  अत एव कर के त्याग उस के नाम से
  तू भोगता जा वह तुझे जो प्राप्त है ||
  धन की किसी के भी न रख तू वासना …

  काय सुंदर, कळायला सोपी आणि प्रवाही भाषा आहे पहा विनोबांची; साधी आणि परिणामकारक.

  आता आपण देशमुखांचा अनुवाद बाजूला ठेऊ, आणि फक्त कुसुमाग्रजांच्याच ओळी बघू. तुमचं म्हणणं असं दिसतंय की कुसुमाग्रजांना त्या कथेचं महत्त्व वाटत नसल्यामुळे त्यांनी गोष्टींचा क्रम बदलू दिला असेल, किंवा कथेचं महत्त्व कमी दाखवण्यासाठी तो मुद्दाम बदलला असेल. हे शक्य आहे. पण माझ्यापुरती प्रतिक्रिया अशी की विरहव्यथित यक्षाचा उल्लेख पहिले आला असता, आणि सीतेचा वगैरे उल्लेख नंतर, तर ते जास्त योग्य ठरलं असतं. तो एक मुद्‌दा सोडला तर विरहावस्थेचं सर्वात परिणामकारक वर्णन या तीन श्लोकांपैकी कुसुमाग्रजांच्या शब्दांत मला जाणवलं. तसं पाहता ‘अमुक कवीचा एक शब्दही बदलता येत नाही’ वगैरे गोष्टी वाचायला ठीक असतात, पण बरेचदा तशी काही गोष्ट नसते. मेघदूतातल्या पहिल्या श्लोकातल्या मुख्य बाबी म्हणजे कांतेपासून दूर लोटल्या गेलेला यक्ष, त्यामुळे त्याला छळणारा विरह, आणि ढगाच्या हालचालीचा प्रारंभ झालेलं ठिकाण म्हणून रामगिरी. त्यातला सीतेचा उल्लेख तसा अनावश्यक आहे. तिच्यामुळे जलाशय पावन झालं हा कालिदासाचा आणि शांताबाईंचा आग्रह आहे. पण ती तिथे नाहली इतकाच फक्त कुसुमाग्रज उल्लेख करतात, आणि त्याच्यासाठी एक पूर्ण ओळच नाही तर पहिली ओळ खर्च करतात. कथेत यक्षच हवा असा भाग नाही. तो महत्त्वाच्या कामासाठी आलेला दूतही असू शकतो, आणि त्याकाळी प्रवासाला लागणार्‍या वेळेमुळे प्रवास म्हटला म्हणजे विरह हा आलाच. पण दूत देशकार्याच्या भावनेनी वावरतो, आणि शिक्षा भोगणार्‍या मनाला अशाही दिलासा देणार्‍या भावनेचा आधार नसतो. तेव्हा तो शापित आहे हेच कथेला जास्त साजेसं आहे. शापित यक्ष पृथ्वीवर आला म्हणजे त्याचा महिमा अस्तंगत होणारच; त्याचा विशेष उल्लेख होणं, ही (अनावश्यक?) द्विरुक्ती आहे. कालिदास पहिल्या ओळीत कांताविरहाचा लगेच उल्लेख करतो आणि ‘यक्ष’ शब्द तिसर्‍या ओळीत प्रवेशतो. शांताबाई मात्र पहिल्या ओळीत यक्षाच्या कर्तव्यच्युतीचा उल्लेख करतात आणि विरहाचा भाग दुसर्‍या ओळीवर ढकलतात. आणि ‘कांता’ ऐवजी ‘प्रिया’ हा मोघम शब्द वापरतात. कुसुमाग्रज कुठलाच तसा शब्द वापरत नाहीत, आणि तरीही जास्त परिणाम साधतात. म्हणून मी त्यांची कवित्वशक्ती सरस असल्याचा उल्लेख केला. कालिदास स्वतः ‘विरहगुरुणा’ हा एकच शब्द वापरतो. कुसुमाग्रज विरहरसाला पोषक वातावरणाची समर्थ निर्मिती करतात. ‘विव्हल’ शब्दानी मनात उमटणारी दुःख खोलवर गेल्याची भावना आणि चहु बाजूंनी घेरणारा, दशदिशा तमोमय करणारा, अनल; यक्ष नशिबाला दोष देत असणारच, तेव्हा ‘ललाटी’ शब्दाचा वापर; आणि त्यायोगे ललाट-विव्हल-विरहानल अशी ‘ल’ ची पुनरुक्ती; ‘ निर्वास’ शब्दाभोवतीचं दूर लोटल्या गेल्याचं वलय; यामुळे त्या विरहाची धग कालिदासापेक्षाही कुसुमाग्रजांच्या शापांकित-विव्हल वगैरे वर्णनात, विशेषतः ‘वर्षाचा निर्वास ललाटी, विव्हल विरहानली’ या ओळीत, जास्त जाणवते. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ चा हा एक प्रकार मला वाटला. शांताबाई या कवी म्हणून मोठ्या, आणि मला त्यांचं सगळंच लेखन आवडतं. पण निव्वळ ‘शब्दांचा कस’ हा निकष लावला तर त्यांची कुसुमाग्रजांशी तुलना करणं कोणालाही कठीणच जाईल असा माझा समज आहे. यात शांताबाईंना कसलाही कमीपणा नाही. ‘कुसुमाग्रजांची कविता छापून येते कधी आणि आपण ती वाचतो कधी यावर आम्ही अनेक काळ टपून बसलेलो होतो’, अशी आठवण शांताबाईंनीच लिहून ठेवलेली आहे.

  तुम्ही मूळ तीन कवितांची चिरफाड केली म्हणूनच मी तसलाच प्रकार करून पाहिला एवढेच, बरे का. एरवी तीनही श्लोक सुंदर आहेत हे बहुतेक सर्वांना मान्य होईल. तुम्ही तो सगळा शब्दच्छल मनापासून केलात, आणि कविता कशी वाचावी याबद्दल आम्हां वाचकांना मार्गदर्शन केलंत. मी आभारी आहे.

  उत्तर

 7. Sujata
  जुलै 04, 2009 @ 11:52:13

  Archanatai, farch abhays purn ani vivechak lekh ahe ha! Sanskrit gheun B.A kelela aslyamule muL “meghdoot” aasvadila ahech,tyach pramane kusumagraj ani shantabai ya doghani kelele anuvad hi vachale hote..pan tumhi ji ‘tulana’ nahi mhanta yenar pan donhi anuvadatla vegalepana lakshat anuan dila ahe tyani kahi navech pailu samajale. Tumcha abhays ani vivechak drushti pan yatun disate ahe! dhanyavad! 🙂

  उत्तर

 8. Anonymous
  जुलै 18, 2009 @ 10:57:12

  मी ३० एप्रिल २००९ रोजी दावा केला की पुढील ओळीत दहावे अक्षर लघु असूनही त्यावर यति असल्याने ते दीर्घ मानण्याची कविश्रेष्ठाने सवलत घेतली आहे. पण यतिवर लघु अक्षर वापरून यतिवरच्या न्यासामुळे त्याला गुरू समजल्याचे दुसरे उदाहरण मला आठवेना.

  शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थना चाटुकारः |

  वरील ओळीतही ‘व’ नन्तर ‘प्रा’ हे जोडाक्षर येत असल्याने ‘जोडाक्षराच्या आधीचे अक्षर’ म्हणून त्याला गुरू धरण्यात आले असावे, आणि तिथे ‘व’ वरच्या यतिचा ते अक्षर गुरूस्थानी वापरले जाण्यात काही हातभार नसावा. आता हा नियम जेव्हा पुढील जोडाक्षराच्या आघाताने आधील अक्षराच्या उच्चरणावर परिणाम होतो तेव्हाच वापरात आणावा हे खरे आहे, पण तिथे कालिदासाने कविस्वातंत्र्य घेतले असावे. कारण ‘व’-वरील यतिमुळे ‘प्रा’ अक्षराचा ‘व’-वर काहीच जोर येत नाही.

  मात्र यतिस्थानावरचे अक्षर गुरू समजावे असा नियम नसला तरी या ओळीत ते लघु अक्षर गुरू अक्षराप्रमाणे एकापेक्षा जास्त मात्रांचे वाटते ते त्यावरील यतिमुळेच.

  शिप्रावातः प्रियतम इव – प्रार्थनाचाटुकारः |
  ऐवजी
  शिप्रावातः प्रियतम इव – याचनाचाटुकारः

  असे म्हणून पहा. आता अकराव्या स्थानातले ‘प्रा’ हे जोडाक्षर तिथून काढलेले आहे. पण ओळीचे उच्चरण जोडाक्षराच्या ध्वनीचा आघात दशमाक्षरावर नसताही मंदाक्रांतेच्या ओळीसारखेच राहते. अर्थात या मताविरुद्‌ध इतर लोक ‘नियमाची निष्कारण मोडतोड’ किंवा ‘वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य’ असा आक्षेपही घेऊ शकतील.

  ध्वन्याघातासम गुण यति – दीर्घता साधताहे
  मंदाक्रांता रुदन करुनी – क्रौर्य हे भोगताहे
  (हातांमाजी झणी अश्यां गवसले – आता करावे कसे)

  उत्तर

 9. Anonymous
  जानेवारी 21, 2010 @ 13:16:31

  > सुभग जलाशय- यांत नाहली वनवासी मैथिली
  > कुसुमाग्रजांनी माझ्या माहितीप्रमाणे ‘साकी’ नावाचे मात्रावृत्त वापरले आहे.
  >
  तुमच्या लेखात ही एक चूक झालेली आहे. गेल्या महिन्यात ‘साकी’ची माहिती काढत असताना या ठेवणीची अनेक मात्रावृत्ते मला आढळली. हे ‘सूर्यकांत’ नावाचं वृत्त आहे, पण माझ्या मते या वृत्तात आणि साकीत फरक असा नाहीच.

  चन्द्रकान्त : ८-८-८ – २ वा ८-८-६-४ (२६ मात्रा)
  सूर्यकान्त : ८-८-८ – १-२
  साकी वा लवंगलता : ८-८-८ – २-२ (२८ मात्रा)
  हरिगीतिका : हिंदीत हरिगीतिका नावाचा २८ मात्रांचा, आणि साकीप्रमाणेच १६ आणि १२ मात्रांनंतर यति असलेला, प्रसिद्‌ध छंद आहे, पण त्याची अंतर्गत रचना वेगळी आहे.
  हरिभगिनी : ८-८-८-६

  चन्द्रकांत उर्फ़ पतितपावन :
  पतीतपावन नाम ऐकुनी – आलो मी द्‌वारा
  पतीतपावन न होसि म्हणुनी – ज़ातो माघारा (१६+१०, नामदेव)

  चंद्रकांत राजाची कन्या – तरुण रूपखाणी
  पतिव्रता सद्‌गुणी शहाणी, पतिही वाखाणी (१६+१०, गोविंद बल्लाळ देवल)
  तीन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
  (पण या कवितेला या छन्दाचा नाद असा नाही. आणि हृदयनाथची चाल तर एकदमच स्वैर आहे.)
  गुलाब, जाई, जुई, मोगरा, चांफा, शेवंती
  बागेमाजी एकसराने फुलूनियां डुलती (दा वि फफे)

  सूर्यकान्त :
  सुभग जलाशय- यांत नाहली – वनवासी मैथिली
  घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली (८-८-११, कुसुमाग्रज)

  उषःकालचे प्रकाशमंडल येता प्राचीवर
  निळे पाखरू त्यातुन कोणी – अवतरले सुंदर (८-८-११, अन्त्याक्षर गुरु कल्पून)
  फुलराणीचे विलासतारू निळी उभारुन शिडे
  सोनेरी दरियातुन आले आले माझ्याकडे (कुसुमाग्रज)

  कशी काळनागिणी सखे ग वैरिण झाली नदी
  (भास्कर रामचन्द्र ताम्बे)
  इथे ताम्ब्यांनी ‘सखे गे’ शब्दरचना वापरली असती तर मात्रा अचूक बसल्या असत्या. पण ‘शिप्रावात: प्रियतम इव प्रार्थना चाटुकार’ मधे ‘इव’ वरचा यति त्याला गुरुत्व देऊ शकतो, तसे इथे ‘ग’ अक्षर त्याच्यावरच्या न्यासामुळे दोन मात्रांचे आहे. खरे म्हणजे कालिदासाने ‘व’ नन्तरच्या ‘प्रा’ या ज़ोडाक्षरामुळे ‘व’ गुरु मानण्याची सूट घेतली आहे वा असावी. पण त्या ‘प्रा’ चा ‘इव’ शब्दाच्या उच्चारणावर काडीचाही परिणाम होत नाही. मात्र ओळीतल्या शेवटच्या अक्षराला गुरुच मानतात, त्याप्रमाणे ओळीत मधे येणार्‍या यतिस्थानावरचे कुठलेही अक्षर गुरु मानण्याचा नियमही नाही, आणि तशी सवलत घेण्याचा काव्यपरंपरेत प्रघातही नाही.

  समुदितमदने रमणीवदने चुम्बनवलिताधरे
  मृगमदतिलकं लिखति सपुलकं मृगमिव रजनीकरे
  (सूर्यकांत ज़ाती, जयदेवकृत गीतगोविन्द)

  साकी वृत्त हिंदीत नाही, पण हिंदीत साकीसमान (१६+१२) मात्रांचा ‘सार’ म्हणून मात्राछन्द आहे, अशी माहिती जगन्नाथ प्रसाद ‘भानु’ यांच्या ‘छंद: प्रभाकर’ या हिंदीतील ग्रंथात आहे.
  साकी :
  नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
  कोण मला वठ~णीला आणू – शकतो ते मी – पाहे
  ब्राह्‌मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा
  तेच पतित की ज़े आखडिती प्रदेश साकल्याचा (केशवसुत)

  साकी वा लवंगलता वा सार, संस्कृत उदाहरण :
  धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली। (जयदेवाची अष्टपदी)
  मुखरमधीरं त्यज मंजीरं रिपुमिव केलिसुलोलम्‌
  चल सखि कुञ्जं सतिमिरपुञ्जं शीलय नीलनिचोलम् (गीत गोविंद ११:४, जयदेव)

  सार (साकी-चे हिंदी नाव) :
  लेकर पीला – पीला थैला, पत्र बाँटने – आता,
  यह है मुन्शीराम डाकिया, सब की चिठ्ठी लाता ।। (8-8 + 8-4)

  हरिगीतिका : हिंदीत हरिगीतिका नावाचा २८ मात्रांचा, आणि साकीप्रमाणेच १६ आणि १२ मात्रांनंतर यति असलेला, प्रसिद्‌ध छंद आहे, पण त्याची अंतर्गत रचना साकीपेक्षा फार वेगळी आहे. मराठीतलं वल्लभा ज़ातीवृत्त आणि हरिगीतिका एकच आहेत असं म्हणायला हरकत नाही.
  The harigiitikaa requires a laghu-guru at the end of each foot, and also has a distinct structure [2,3,4,3,4,3,4,5 maatraa-s]; and there must be no ja-gaNa (lSl) in any of the chaturmaatrik blocks in this structure.’ (पादाकुलकेत ‘कुबेरसेवक यक्ष एक कुणी’ मधे ज़सा ‘कुबेर’ हा ज-गण चालतो, पण पादाकुलकेचा उपभाग असलेल्या, आणि चर्पटपंजरी आणि श्रीगंगास्तोत्रात शंकराचार्यांनी वापरलेल्या, पज्झटिका छंदात मात्र कुठलाच चतुर्मात्रिक समूह ज-गणात चालत नाही. ‘पुनरपि – जननं – पुनरपि – मरणं’ मधला ‘ननं पु’ हा ज-समूह पज्झटिकेत चालतो कारण तो या ओळीतला चतुर्मात्रिक घटक नाही.)
  मम – मातृ-भूमिः – भार-तं धन-धान्य-पूर्णं – स्यात् सदा । (2- 3,4, – 3,4, – 3,4, – 5) यति १६-व्या आणि २८-व्या मात्रेवर. इथे शब्दाच्या मधेच ‘भार’वर एक मात्रिक गट सम्पून तसा घोटाळा झाला आहे हे म्हणायला वाव आहे. ‘धन’, ‘धान्य’ यांवरचा न्यास त्या शब्दाच्या अंतर्गत रचनेशी ज़ुळणारा आहे. आणि म्हणूनच ‘धन’ वरचा यतीही चूक म्हणता येणार नाही.
  मम मातृभूमिः भारतं धनधान्यपूर्णं स्यात् सदा ।
  नग्नो न क्षुधितो कोऽपि स्यादिह वर्धतां सुखसन्ततिः ।

  हरिगीतिका मात्राछंदात हिंदीतले उदाहरण :

  मंगल करनि कलिमल हरनि तुलसी कथा रघुनाथ की
  गति कूर कबिता सरित की ज्योँ सरित पावन पाथ की
  (बालकाण्ड, राम चरित मानस)

  आधुनिक उदाहरण :

  भू लोक का गौरव प्रकृति का पुण्य लीला स्थल कहाँ
  फैला मनोहर गिरि हिमालय और गङ्गाजल जहाँ
  सम्पूर्ण देशों से अधिक किस देश का उत्कर्ष है
  उसका कि जो ऋषिभूमि है, वह कौन, भारतवर्ष है |
  (मैथिली शरण गुप्त)

  हरिभगिनी :
  याच मालिकेत पुढे हरिभगिनी हा अन्तिम चरणांत साकीपेक्षा दोन मात्रा ज़ास्त असलेला मात्रिक छन्द आहे. (८-८-८-६)

  पंचतुंड नररुण्ड मालधर पार्वतीश आधी नमितो
  (अण्णासाहेब किर्लोस्कर, संगीत शाकुंतल, नान्दी)
  सत्यं ज्ञानम~नंतम्‌ नित्यम~नाकाशं पर~माकाशं
  सत्यं ज्ञानमनंतम्‌ नित्यमनाकाशं परमाकाशं
  (गोविन्दाष्टक, आदि शंकर)
  बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
  (अनन्तफंदीचा फटका)
  दीन तुका विनवी कर ज़ोडुनि नाम तुझे जगपाळा रे
  (तुकाराम)

  – – – –

  उत्तर

 10. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 09:09:14

  अर्चनाताई : एवीतेवी एखाद्‌या धाग्यावर किती प्रतिसाद द्‌यावेत याचा विवेक मी या धाग्याबाबत कधीचाच सोडला आहे, तेव्हा ही अज़ून एक खरड. शिवाय मेघदूताचा कुसुमाग्रज, शान्ताबाई शेळके आणि इतर अनेकांनी अनुवाद केल्याचे मी फक्त ऐकून होतो. खुद्‌द शान्ताबाई त्याबद्‌दल माझ्याशी दोनच वाक्यें का होईना पण बोलल्या होत्या. तरीही मी त्या भाषान्तरांबद्‌दल फार उत्सुकता दाखवली नव्हती. ते कुतुहल माझ्या मनात निर्माण झाले याची ज़बाबदारी सर्वस्वी तुमची आहे; त्यामुळे त्याबद्‌दल मला अधूनमधून काही लिहावेसे वाटले तर ते वाचण्यावाचून तुम्हाला इतर कुठला मार्गचि नुरे. ‘या विषयावरील पत्रव्यवहार आता बन्द करण्यात येत आहे’ असे महाराष्ट्र टाइम्समधे एके काळी बरेचदा छापून येत असे. तशी वेळ तुमच्यावर बहुतेक येणार.

  तर काही दिवसांपूर्वी मी नागपूरला राजाराम लायब्ररीत चिन्तामणराव देशमुख, बा भ बोरकर आणि शान्ता शेळके यांचे अनुवाद मिळवू शकलो. कुसुमाग्रजांचा मात्र मिळाला नाही. मुम्बईत एका दुकानात मिळण्याची आशा दिसली, पण मी तिथे फक्त २४ तासांसाठीच काय तो होतो. पुढल्या वर्षी तो वाचता येईल अशी आशा आहे. वसन्त बापटांनी बोरकरांच्या पुस्तकाला दिलेली प्रस्तावना वाचायला मिळाली, हा फारच मोठा लाभ झाला. बापटांनी प्रस्तावना लिहिली ती शान्ताबाईंचे भाषान्तर प्रकाशित होण्याआधी. कुसुमाग्रजांनी मात्राछन्दात भाषान्तर केल्याचा उल्लेख बापटांनी केला आहे. मात्र हे भाषान्तर नुसतेच समश्लोकी नको तर गणछन्दातच असावे, आणि त्यांतही मन्दाक्रान्तेतच असावे, असा रा श्री ज़ोग यांचा आग्रह होता; ज़ोगांचे ते मत बापटांना मान्य होते असे दिसते. बोरकरांनी समश्लोकी-समछन्दी भाषन्तर केले, याचा बापटांना आनन्द आहे. शान्ताबाईंनी ही प्रस्तावना अर्थातच वाचली असेलच. त्यांचा असा आग्रह नव्हता हे त्यांनी स्वत: फक्त समश्लोकी भाषान्तर करायचे ठरवून मात्राछन्द निवडला यावरून उघडच आहे. मराठीची कवितेतली सयमक रचनेची परंपरा या सर्वच कवींनी पाळली आहे, यात आश्चर्य नाही. मन्दाक्रान्ता छन्द कायम ठेवण्यात जास्त अडचणी आहेत, हे कोणीही मान्य करेल. पण मात्राछन्दातल्या अनुवादातूनही श्रेष्ठ आनन्द मिळू शकतो, असे माझे मत आहे. मात्र बापट म्हणतात : ‘कुसुमाग्रजांसारख्या सिद्‌धहस्त कवीकडून उतरलेला अनुवाद शब्दकळा व रचनासौंदर्य यांच्यामुळे एखाद्‌या सरस मराठी काव्यासारखा वाटल्यामुळे काही वाचक हरखून गेलेले आढळतात. पण आपली जिच्यावर प्रीत ज़डली ती ही नव्हे, भले ती कितीही सुंदर असो, असेच या कवितेविषयी म्हणावेसे वाटते.’ हे मत बाळगायचा बापटांना हक्क तर आहेच, शिवाय तसा त्यांना अधिकारही आहे. बापट पुढे लिहितात : कविवर्य बोरकरांच्या अनुवादाची तुलना करण्यासाठी खरे म्हणजे चिंतामणराव देशमुख आणि गणेश नीलकंठ कात्रे यांचेच अनुवाद समोर ठेवले पाहिजेत. या दोघांनी (बोरकरांप्रमाणेच) समवृत्त, समश्लोक, सयमक अनुवाद केलेले आहेत हा त्यांचा एक विशेष झाला. … या दोघांबद्दल आदरभाव बाळगूनही ते आणि बोरकर यांच्यातील एक फरक येथे सांगितलाच पाहिजे. देशमुख आणि कात्रे यांचा संस्कृत भाषेवरचा अधिकार बोरकरांहून मोठा आहे … पण ते दोघे रचनाकार आहेत, कवी नव्हेत. बोरकरांचे कवित्व वादातीत आहे, आणि मेघानुवाद करताना बोरकरांच्या आंगच्या कवित्वाचा पुष्कळ उपयोग झालेला आहे.

  उत्तर

 11. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 09:15:54

  फ्रेंच राज्यक्रांतीवरच्या कार्लाईल आणि डिकिन्स यांच्या पुस्तकांची तुलना करताना चेस्टरटननी नेमका हाच मुद्‌दा मांडला आहे. चेस्टरटन म्हणतो की कार्लाईलचा त्या इतिहासाचा अभ्यास जास्त होता, पण त्याचा पिंड फक्त अभ्यासकाचा होता. उलट डिकन्स १७८९ साली पॅरिस किंवा व्हर्सायमधे असता तर त्यानी कदाचित प्रत्यक्ष बंडात भागही घेतला असता. तेव्हा त्या इतिहासाचा त्याचा अभ्यास कमी असला तरी तो इतिहास ज्या वृत्तीमुळे घडला (अन्यायाची चीड, त्याविरुद्‌ध अगदी अतिरेकी पण प्रामाणिक प्रतिक्रिया देणे वगैरे) ती डिकन्सच्या रक्तातच होती. त्यामुळे त्या इतिहासाची पुस्तके न वाचावी लागताच तो त्यामागची भावना उपज़तच समज़ू शकत होता. बोरकर काव्य अनुवादत होते तेव्हा त्यांच्या रक्तातल्या कवीची अशीच त्यांना साथ मिळाली.

  ‘मी बोरकरांच्या भाषान्तरावर प्रस्तावनेत टीका केली’ असा टोकाचा सूर बापटांनी १९९४ की १९९५ या इसवी सनात (शके १९१६ वा १९१७) आषाढ शुक्ल प्रतिपदेला टिळक स्मृतिमन्दिरात झालेल्या कार्यक्रमात लावल्याचे मला स्पष्ट स्मरते. किंवा बापट १९९२ साली मॅजेस्टिक गप्पांमधे हे बोलले असतील. मूळ प्रस्तावनेत मात्र त्यांनी तुलनेने सौम्य सूर लावलेला आढळतो. त्याबाबत एक स्वतंत्र नोन्दच करावी लागेल. बापटांचा एक महत्त्वाचा मुद्‌दा म्हणजे मन्दाक्रान्ता गणवृत्त वापरणार्‍यांतले सी डी देशमुख हे रचनाकार होते, हाडाचे कवी नव्हते. तर बोरकर हे अस्सल कवी होते. हे सूत्र धरून बापटांनी काही कालिदासाच्या मूळ ओळी घेऊन त्यांचे झालेले अनुवाद तुलनेसाठी दिले आहेत. (१९८१ सुमारास महाराष्ट्र टाइम्समधे एका लेखात किंग लियरच्या स्वगतांचा विंदा करंदीकरांनी केलेला मिळमिळीत अनुवाद आणि कुसुमाग्रजांचा तेजस्वी अनुवाद यांची अशीच एक तुलना आली होती.)

  (क्रमश:, कारण सर्व टिपणी एका झटक्यात टाकू पाहता ती शब्दमर्यादेच्या फार वर ज़ात आहे. त्यामुळे ती ४-५ टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे.)

  उत्तर

 12. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:03:57

  (काय भानगड आहे हे कळायला मार्ग नाही. पण माझ्या पुढल्या काही ओळी वर्डप्रेसला मान्य नाहीत. ~n.h ऐवजी फक्त ~n असा बदल केला, तरीही काही तरी गडबड होतेच आहे. yaach.h~naa ऐवजी yaach~naa वापरून पहावे लागेल. पण हे दोन्ही शब्द तसे साधे आणि सरळ आहेत.)

  उत्तर

 13. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:12:23

  उत्सुक वाचकांना बापटांची उदाहरणे प्रत्यक्ष त्यांच्याच प्रस्तावनेत वाचता येतीलच. तेव्हा माझ्या वतीने मी मला सुचलेले एक उदाहरण देतो. ‘याच्‌ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा’ ही ओळ मला अनेक वर्षांपासून खुणावत आलेली आहे. ञ्‌ – या व्यंजनाला स्वर लागून आल्याचे मला फारच आकर्षण वाटायचे, आणि अज़ूनही वाटते.

  उत्तर

 14. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:17:05

  (त्याविषयी थोडेसे विवेचन :
  येथे)

  शिवाय त्या सगळ्या शृंगारिक वातावरणात अचानक हे तत्त्वज्ञान सांगण्याचा कालिदासाला साधनशुचितेचा गांधीवादी झटका आला, याचीही मजा वाटते. ‘याचनेचा अव्हेर गुणी माणसाकरवी झालेला एक वेळ चालेल, पण अधम व्यक्ती/वृत्तीचा आश्रय घेऊन कार्यपूर्ती नको.’ हे सर्व पुराण कालिदासाची ओळ पुढे ठेऊन मन्दाक्रान्तेच्या एका ओळीत मराठीत सांगायचे ही एक परिक्षाच आहे. ‘अव्हेरावे खलऋण, बरी सज्जनांची उपेक्षा’ या ओळीत बोरकरांच्या प्रतिभेची भरारी दिसते. शान्ताबाईंनी जास्त पसरट छन्द निवडूनही त्यांना असे नेमके शब्द सापडले नाहीत.

  म्हणुन याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी
  क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजनविनवणी — या शान्ताबाईंच्या शब्दांत कवित्व फार कमी आणि रचनाकारपणाच जास्त आहे.
  त्यापेक्षा सी डीं चे शब्द जास्त परिणामकारक आहेत, पण तरी ते शब्द अडखळतच चालतात :
  ‘ना’ श्रेष्ठांची तरि हि बरवी, ‘हो’ नको दुर्जनांची

  कात्र्यांचे भाषान्तर तर देशमुखांपेक्षाही सरस वाटते :
  दुष्टात्म्यांची उपकृति नको, थोर नाही म्हणोत
  बोरकरांच्या भाषान्तरातले लालित्य मात्र मला इतर कुठल्याच ओळीत दिसत नाही. ‘खलऋण’ हा एक शब्दच काय थोर सुचला आहे !

  उत्तर

 15. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:19:07

  (त्याविषयी थोडेसे विवेचन : ht tp://sanskritsubhashite.blo gspot.com/2010/10/blog-post.ht ml) शिवाय त्या सगळ्या शृंगारिक वातावरणात अचानक हे तत्त्वज्ञान सांगण्याचा कालिदासाला साधनशुचितेचा गांधीवादी झटका आला, याचीही मजा वाटते. ‘याचनेचा अव्हेर गुणी माणसाकरवी झालेला एक वेळ चालेल, पण अधम व्यक्ती/वृत्तीचा आश्रय घेऊन कार्यपूर्ती नको.’ हे सर्व पुराण कालिदासाची ओळ पुढे ठेऊन मन्दाक्रान्तेच्या एका ओळीत मराठीत सांगायचे ही एक परिक्षाच आहे. ‘अव्हेरावे खलऋण, बरी सज्जनांची उपेक्षा’ या ओळीत बोरकरांच्या प्रतिभेची भरारी दिसते. शान्ताबाईंनी जास्त पसरट छन्द निवडूनही त्यांना असे नेमके शब्द सापडले नाहीत.

  म्हणुन याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी
  क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजनविनवणी — या शान्ताबाईंच्या शब्दांत कवित्व फार कमी आणि रचनाकारपणाच जास्त आहे.
  त्यापेक्षा सी डीं चे शब्द जास्त परिणामकारक आहेत, पण तरी ते शब्द अडखळतच चालतात :
  ‘ना’ श्रेष्ठांची तरि हि बरवी, ‘हो’ नको दुर्जनांची

  कात्र्यांचे भाषान्तर तर देशमुखांपेक्षाही सरस वाटते :
  दुष्टात्म्यांची उपकृति नको, थोर नाही म्हणोत
  बोरकरांच्या भाषान्तरातले लालित्य मात्र मला इतर कुठल्याच ओळीत दिसत नाही. ‘खलऋण’ हा एक शब्दच काय थोर सुचला आहे !

  उत्तर

 16. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:21:19

  बापट म्हणतात (मूळ मज़कूराच्या क्रमात मला येथे मांडायला योग्य वाटला तसा फेरफार केला आहे) : मराठी मेघानुवाद करणार्‍या सर्वांना फार श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे लागते. लौकिक व्यवहारात अर्थाच्या बारीक-सारीक भेदांचे अवधान ठेवून देशी भाषा अनेक शब्द उपयोगात आणतात. या वैभवापासून विदग्ध-भाषा संस्कृत नेहमीच वंचित राहिलेली आहे. याबद्‌दल दासोपंताने संस्कृताभिमान्यांना हाणलेला टोला त्यांच्या वर्मी लागण्यासारखाच आहे. पण नुसत्या वावदुकीमुळे एका भाषेचे सामर्थ्य दुसरीला प्राप्त होत नाही. (मराठी भाषेचा दुरभिमान आपल्या मनात फडा काढायला टपून बसलाच असतो. अशा संदर्भात आपल्यापेक्षा मराठी भाषेचे कितीतरी जास्त ज्ञान असलेले बापट जे सांगतात ते लक्षात ठेवायला हवे. दोन्ही भाषांवर अधिकार असणारी एखादी व्यक्ती बापटांशी सहमत होईल वा होणारही नाही. पण निदान संस्कृतचे ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्यांनी बापटांच्या मताची निदान नोन्द घ्यायला हवी.) संस्कृत भाषेत संधी, समास यांच्या सहाय्याने शब्दबंधांचा संकोच करून आशयबंध मात्र समृद्‌ध करता येतो. आपल्या आधुनिक भारतीय भाषांमधे अशी सोय नाही. संस्कृतमध्ये मूलधातूला विकार होऊन असंख्य शब्द सिद्‌ध होतात. याही बाबतीत आज़च्या भाषांची शक्ती कमी पडते. समानार्थी शब्दांच्या राशीच्या राशी संस्कृतमध्ये आहेत; हे समानार्थी शब्द चांदोरचनेच्या सौकर्याला फार उपयोगी पडतात. एका अर्थाचे भिन्न भिन्न शब्द वापरले तर संस्कृतज्ञ वाचक क्लिष्टतेची तक्रार करत नाही; उलट तथाकथित पर्यायवाचक शब्दांच्या अंतर्यामी आशयाच्या सूक्ष्म छटा लपलेल्या असल्यामुळे कवीने समर्पक शब्द वापरला की सहृदय रसिक अधिकच सुखावून ज़ातो. कालिदासाच्या साहित्यात तर हे विशेष घडते. अशी शब्दश्रीमंती आज़च्या आपल्या एकाही प्रांतिक भाषेत नाही.

  बोरकरांच्या अस्सल कवित्वाचा प्रत्यय म्हणून बापट काही उदाहरणे देतात. ज्याने संस्कृत कवितेची गोडी मुळात चाखली त्याचे पूर्ण समाधान होणे शक्य नाही ही मर्यादा लक्षात घेऊनच अनुवादकाला आपली कामगत करून दाखवावी लागणार, हे बापटांचे प्रतिपादन. मात्र ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट’ असे शक्यच नाही असा पवित्रा बापट का घेतात हे कळत नाही. ‘विरहगुरुणा’ हा एकमेव शब्द पहिल्या श्लोकात कालिदास वापरतो. फार तर ‘भोग्येण’ शब्दही येतो, पण हे दोन शब्द एकमेकांपासून फार दूर रचले आहेत. कुसुमाग्रजांनी ‘वर्षाचा निर्वास-ललाटी—विव्हल-विरहानली’ असे विरहाची छाया जास्तच दाट करणारे चार शब्द सलग वापरले आहेत. ते असो. ‘संतप्तानां त्वमसि शरणम्‌’ बद्दल ‘तप्तांची तू कणव जलदा’ असा सुखदायक शब्दबंध बोरकरांनी योजला, असे बापट म्हणतात.

  गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः
  सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः
  या नवव्या श्लोकाचा अनुवाद बोरकर करतात तेव्हा ‘अनुवादकाने संपूर्ण मराठी वाटणारे श्लोक लिहिण्यात यश मिळविले असल्याचे लक्षात येऊ लागते’ :
  गर्भाधानस्मृति उमलुनी व्योमलेखा बलाका
  स्वांगे बंधो, रचितिल तुला कंठरेखा सुरेखा

  मात्र याहीपेक्षा कसून परिक्षा घेणारे चरण आहेत. केवळ एका शब्दाचा हा सामासिक पाद पहा :
  बाह्‌योद्‌यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या

  पाही तेथे धवलित उमानाथचन्द्रे निवास – असा गोळाबेरीज़ अर्थ कात्र्यांना द्‌यावा लागला आहे.

  देशमुखांनी : — सौध जेथ
  बाह्योद्यानी वसत हर तच्चंद्रिका द्योतवीत , अशी बर्‍यापैकी वाट काढली आहे.

  बोरकरांनी याच पंक्तीचे भाषांतर :
  बाह्योद्यानी स्थिरहर जिथें, राउळां चंद्रशोभा – असे केले आहे.
  ते असमाधानकारक आहे हे नमूद केले पाहिजे. (हे बापटांचे टीकेचा सर्वाधिक तीव्र सूर असलेले वाक्य. ते सौम्यच म्हणायला हवे.)

  उत्तर

 17. Anonymous
  नोव्हेंबर 16, 2010 @ 14:22:12

  बापटांच्या प्रस्तावनेतले आता दोन मुद्‌दे राहिले. त्यातले मेघदूताशी आणि बोरकरांशी संबंधित मुद्‌दे नन्तर कधी तरी लिहीन. भाषान्तराच्या एकूण तंत्राविषयी बापटांनी फार छान विचार मांडले आहेत : छंदोबद्ध कवितेच्या अनुवादात गद्य साहित्याच्या अनुवादापेक्षा अधिक अडचणी असतात. (हे म्हणजे ‘एव्हरेस्ट चढण्याच्या प्रयत्नात क्रिकेटची मॅच गुबगुबीत गादीवर बसून पाहण्यापेक्षा अधिक अडचणी असतात’ किंवा ‘पुरणपोळी करणे हे पाणी उकळण्याइतके सोपे नाही’ सांगण्यासारखे झाले.) काव्याचा आकृतिविशेष शाबूत ठेवून त्याचा अनुवाद करावयाचा तर मंदाक्रांता हे मूळ वृत्त कायम ठेवले पाहिजे, काव्याच्या श्लोकसंख्येत फेरफार करू नयेत, मराठी परंपरेनुसार (कालिदासाला हे बंधन नव्हते तरीही) चरणयुगले सयमक हवीत … म्हणजे रूपांतरकाराने समवृत्त, समश्लोक, सयमक या तिहेरी पेचातून वाट काढणे आले. हे केवळ रचनाबंधाचे विवेचन. हा रचनाबंध ज्या आशयासाठी स्वीकारणे अपरिहार्य ठरते तो मेघदूताचा आशय इतका नाज़ुक आणि श्रीमंत आहे की त्याची मिजास, नज़ाकत आणि सूचकता यांना धक्का न लावता तो मराठीत आणता आणता अतोनात सायास सोसावे लागतात. सर्व शब्द सांभाळावे तर क्लिष्टता येते. सर्व अर्थ सांभाळण्याचा यत्न करावा तर शब्दकळा बिघडून ज़ाते. म्हणजे ज्ञानदेवाने म्हटल्याप्रमाणे ‘मस्तकी पांघुरलें तों तळवटीं उघडें पडलें’ अशी दशा होऊन ज़ाते.

  उत्तर

 18. Anonymous
  नोव्हेंबर 22, 2010 @ 09:28:06

  बोरकरांच्या भाषान्तराला वसंत बापटांनी लिहिलेली सगळीच प्रस्तावना वाचण्यासारखी आहे. बोरकर संस्कृत फार उशीरा शिकले आणि त्यांचे त्या भाषेचे ज्ञानही बेताचेच राहिले, असा उल्लेख स्वत: बोरकर करतात. उलट बापट संस्कृत-मराठी या दोन्ही भाषांवर अधिकार असलेले. म्हणूनच त्यांची प्रस्तावना घेण्याचा बोरकरांचा आग्रह होता. गीतेचे भाषान्तर करण्याची मराठी लोकांना हौसच आहे, आणि ज्ञानोबांपासून विनोबांपर्यंत तशी परम्परा घडलेली आहे, याचा बापट उल्लेख करतात. मेघदूताकडे मराठी कवींचा मोहरा त्यामानाने उशीरा वळला. एकदा तो वळल्यानन्तर मात्र अनेकांना ते भाषान्तर करण्याचा मोह झाला. शब्द, आशय, अंत:संगीत, नादगुणाने मिळणारी ध्वन्यर्थाची वलये आणि कालिदासाच्या प्रतिभेने लीलया धारण केलेली इतर काही कोमल आयुधे यांचा मेघदूतात एकजीव झाला आहे, आणि त्याच्या प्रभावाखाली अनेक रसिक आले आहेत. अनुवाद करायची इच्छा असलेले पण प्रत्यक्ष करायला न धज़ावलेले अनेक लोक दिसतात. (शान्ताबाई या गटात ज़मा होऊच घातल्या होत्या.) मेघानुवाद केलेले भाषान्तरकार किती भिन्न क्षेत्रांतले होते याचा बापट उल्लेख करतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा चिं श्रीखंडे, रा प सबनीस, वि वा शिरवाडकर, ना ग गोरे, अर्थतज्ञ वसंत पटवर्धन, श्री हवालदार, शान्ता शेळके यांनी मात्राछन्द वापरून अनुवाद केला. त्यामुळे त्यांच्या काव्याचा आकृतिबंधच बिघडला. इतकेच नाही तर त्यांच्या अनुवादांत आकृती आणि आशय यांच्या गळामिठीत व्यत्यय निर्माण झाला.

  मंदाक्रांतेत अनुवाद केलेले तिघे म्हणजे ग नी कात्रे, चिं द्‌वा देशमुख आणि बा भ बोरकर.

  बोरकरांना विशेष स्तुतिपर प्रस्तावना देण्याची इच्छाच नसल्यामुळे बापटांनी त्याबद्‌दल टाळाटाळ केली होती, हे ते भाषणात बोलले होते खरे. पण बोरकरांच्या हयातीत त्यांच्या उत्तम अनुवादाला प्रस्तावना लिहिताना बापटांनी स्वत:चे सुसंस्कार दर्शवणारी, म्हणजे प्रत्यक्ष खरमरीत टीका टाळणारी, पळवाट काढली आहे. बापटांनी त्या भाषान्तरावर घेतलेले काही आक्षेप बोरकरांना मान्य असावेत, कारण तसा सूर बापटांनी प्रस्तावनेत एका ठिकाणी लावला आहे. वसन्त बापट : “कविवर्य बोरकरांच्या तुलनेत मी सर्वतोपरी लहान आहे हे मी ज़ाणतो. त्यांची बरोबरी मी करतो ती फक्त एकाच गोष्टीत – कवितेवरच्या प्रेमात, आणि मुख्यत: मेघदूतावरच्या प्रेमात. हे अंतरीचे नाते ओळखूनच आपल्या अनुवादाला प्रस्तावना लिहिण्याची त्यांनी मला आज्ञा केली. कैक शतके चालत आलेल्या आणि चालणार असणार्‍या मेघदूत क्लबाचे दोघेही मेंबर, या नात्याने मी त्यांची आज्ञा मानली. पण मी पडलो मुलखाचा ढिसाळ ढकलकाम्या.” (आणि म्हणून प्रस्तावना लिहिण्यास उशीर झाला, असे ते दर्शवतात.) पुढे: “मेघदूताशी घेतलेल्या झोंबीत … बोरकर आपली हार कबूल करतील, हे मला माहीत आहे.”

  बोरकरांची मुलगी त्यांना एकदा मेघदूत शिकवण्याबद्‌दल बोलली. शाळेत शिकवलेले तिच्या डोक्यावरून गेले होते. त्यानिमित्तें बोरकरांनी मेघदूताकडे जास्त लक्ष दिले, आणि त्याचे भाषांतरही सुरु केले. पण ६-७ श्लोकानन्तर एका श्लोकाच्या भाषान्तराला त्यांना फार त्रास झाला, आणि तो प्रयत्न त्यांनी ज़वळज़वळ सोडून दिला. बापटांच्या मते मेघदूतात अशा अनेक ज़ागा आहेत जिथे मराठी अनुवादकारांने काय करावे हा न सुटणारा प्रश्न आहे. अशा रचनाकाराची परिक्षा पाहणार्‍या पंक्तींचे झालेले क्षीण रूपान्तर पाहून, त्यातील उणीव पाहून मूळ शब्दांचा रसास्वाद जास्त उत्कटतेने घेण्याची शक्यता आणि वृत्तीही बापट सूचित करतात. बोरकरांच्या मते एका कठीण श्लोकाचे अडकलेले भाषान्तर त्यांना स्वप्नातच अक्षरश: दिसले. (खरे-खोटे स्वत: बोरकरच ज़ाणोत.) नंतर त्या काव्यात ते काही काळ इतके बुडाले होते की एकदा कालिदासाने स्वत: भाषान्तराविषयी विचारणा केल्याचा त्यांना भास झाला. (हे जास्त शक्य वाटते; याचीही सत्यासत्यता कविंना स्वत:लाच ठाऊक.) चिंतामणराव देशमुख आणि गणेश नीलकंठ कात्रे यांनीही मुळाबरहुकूम आशय वठावा आणि तरी रचनालालित्य कायम राहावे यासाठी अक्षरश: वर्षानुवर्षे प्रयास घेतले, असा बापट उल्लेख करतात. दुर्गा भागवतांना मेघदूताबद्‌दल अप्रीती होती की काय, अशी मला शंका आहे. ‘कालिदास हा त्या काळचा ना सी फडके होता’ अशी त्यांनी कुठल्यातरी संदर्भात टीका केली आहे. ‘दुर्गाबाईंसारख्या विदुषीनी असली शेरेबाजी करावी?’ अशी त्यांच्या टीकेवर आपली टीका बापट करत.

  प्रत्येकच भाषान्तरात थोडीफार कमतरता राहतेच आणि तरीही अशा प्रयत्नांमुळे मेघदूतप्रेमींच्या चर्चासत्रांतील मजा वाढते, असे बापटांचे मत आहे. ते म्हणतात : “मेघदूत हे बोलूनचालून एक आह्‌वान आहे. सुंदर रसील्या आह्वानांचा मुकाबला करणे ही विदग्ध रसिकांची अवीट गोडीची क्रिया आहे. ही क्रीडा आयुष्यभर संपत नाही. ‘माघे मेघे वयो गतम्‌’ असे म्हणणार्‍या रसिकाचा तरी अभिप्राय हाच आहे. आपल्या लाडक्या मेघदूताचा अनुवाद करीत असताना भल्याभल्यांच्या प्रयत्नांत हीण कसे राहिले आहे, ते पाहात राहणे आणि त्यानिमित्ताने मूळ मेघदूतामधील ती ती सौंदर्ये आवडीने चुंफत राहणे हा धीमंतांचा एक षोक आहे. मग कोठे तरी कधीतरी मेघदूत-प्रेमिकांचा अड्डा ज़मतो आणि मेघानुवादाच्या मीमांसेचे मद्‌य सारे प्रेमिक अलकेतल्या यक्षांसारखेच चवीने लहान लहान घुटके घेत आस्वादत राहतात. यापुढे बा भ बोरकरांच्या अनुवादामुळे अशा मैफिलींची रंगत अधिकच वाढणार आहे. मेघदूताशी घेतलेल्या झोंबीत आपली हार अटळ असते हे आज़वरच्या सर्व अनुवादकांनी, रसलोलुप पंडितांनी मान्यच केलेले आहे. बोरकर देखील आपली हार कबूल करतील, हे मला माहीत आहे. हे प्रकरण थोडे प्रेमकलहासारखेच आहे. हार खाण्यातही मोठा आनंदच आहे. हे प्रेमाचे युद्‌ध लढण्यातच कृतार्थता आहे, जिंकण्यात नाही.”

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: