वर्णमाला- शेवट

वर्णमालेमधले वर्ण आपण आधीच्या लेखापर्यंत पाहिले. पण या वर्णमालेत आहेत ते संस्कृतभाषेमधले उच्चार. अर्थात, तेच उच्चार मराठीतही आहेत. पण मराठीत केवळ हेच उच्चार नाहीत, याहूनही अधिक आहेत. या वर्णमालेबाहेरच्या उच्चारांसाठी वेगळी अक्षरचिन्हे नाहीत. पण तरीही या उच्चारांना स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे, हे उच्चार मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत, म्हणून आता आपण त्यांचा विचार करूया.

या वर्णांचे मी चार गट करते आहे-

Affricates- च़, ज़, झ़
Flaps- ड़, ढ़
महाप्राण- न्ह्, म्ह्, व्ह्, ल्ह्, ण्ह्, र्‍ह्
पराश्रित- अनुस्वार, विसर्ग, जिह्वामूलीय, उपध्मानीय
१) Affricates- ‘च्, ज्, झ्’ हा गट आणि ‘च़, ज़, झ़’ हा गट , या दोहोंतला फरक पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल-

पहिला गट दुसरा गट
वाचन काच़
जेवण वज़न
झकास झ़रा

व्यंजनांवरील लेखात च्, छ्, ज्, झ् ही स्पृष्ट व्यंजने आहेत हे आपण पाहिले. ज्याला पाश्चात्य उच्चारशास्त्र plosives /stops असे म्हणते. च़, ज़, झ़ ही देखील व्यंजनेच आहेत. परंतु त्यांसाठी केला गेलेला ‘प्रयत्न’ वेगळा आहे. अर्थातच ही व्यंजने संस्कृतमधे नसल्याने या उच्चारांचा व पर्यायाने त्यासाठी केल्या जाणार्‍या ‘प्रयत्ना’चा उल्लेख कुठे सापडत नाही. (किमान मला तरी सापडलेला नाही.) पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र जगातल्या सर्व मानवी भाषांतील उच्चारांचा अभ्यास करत असल्याने या तिघांचाही अभ्यास करते व त्यांना Affricates असे नाव देते व त्यांची व्याख्या – “When a ‘stop’ is released into a homorganic ‘fricative’ ” अशी करते. stop म्हणजे स्पृष्ट व्यंजने व fricative म्हणजे ईषद्विवृत्त व्यंजने हे तर आपण पाहिलेच आहे. homorganic म्हणजे सारखीच उच्चारस्थाने असलेले. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादे स्पृष्ट व्यंजन त्याच्याप्रमाणेच उच्चारस्थाने असलेल्या ईषद्विवृत्तात सोडले जाते, तेव्हा Affricate निर्माण होते.
च़ निर्माण करण्यासाठी दन्त्य अघोष स्पृष्ट व्यंजन – त् हे दन्त्य अघोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच स् मधे सोडले जाते.
ज़ निर्माण करण्यासाठी दन्त्य घोष स्पृष्ट व्यंजन- द् हे दन्त्य घोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच z मधे सोडले जाते. हा z मराठीत नसल्याने तो त्याला IPA (International Phonetic Alphabet) ने नेमून दिलेल्या चिन्हानुसार दर्शवला आहे.
झ़ हा बाकी ज़ प्रमाणेच उच्चारून नंतर त्याला महाप्राण केले जाते.
छ चा मात्र छ़ असा काही बंधूवर्ण मराठीत नाही. त्याचा अभाव रोचक आहे.

२)Flaps- ड्, ढ् या एक गट व ड़, ढ़ हा दुसरा गट यांच्यातील फरक लक्षात येण्यासाठी पुढील उदाहरणे-

पहिला गट दुसरा गट
डमरू माड़
ढोंग वाढ़

हे चारही वर्ण मूर्धन्यच आहेत पण ड् व ढ् हे स्पृष्ट आहेत, तर ड़ व ढ़ यांना पाश्चात्य उच्चारशास्त्र flap अशी संज्ञा देते. या संज्ञेचे स्पष्टीकरण मी ळ् चा विचार करताना दिलेले आहेच. flap च्या वेळी दोन्ही उच्चारकांचा अत्यंत क्षणिक असा स्पर्श होतो. ळ् हा सुद्धा मूर्धन्य flap च आहे. पण तो lateral flap म्हणून गणला जातो. असो, फार तांत्रिक बाबींत शिरण्यात अर्थ नाही.

यांचा विचार करताना एक रोचक गोष्ट लक्षात येते. ड्, ढ्, ड़, ढ़ हे उच्चार शब्दांत कुठे कुठे वापरलेत याचा नीट विचार केल्यास असे लक्षात येईल, की ड् व ढ् हे नेहमी शब्दाच्या सुरुवातीलाच येतात. जसे- डमरू, डोकं, डोळा, डाळ, ढोकळा, ढाल, ढेकळ, ढोल, ढीग वगैरे.

शब्दाच्या शेवटी मात्र ड् किंवा ढ् नसतो. त्यांच्याजागी ड़ किंवा ढ़ येतात. जसे- माड़, पड़, वड़, झाड़,लाड़, ताड़, गड़, वेड़, गाड़, कढ़, वाढ़, दाढ़, काढ़ वगैरे.
शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी न येता, मधे जर ड्, ढ् आला तर मात्र २ शक्यता असतात-
पहिली म्हणजे दोन स्वरांच्या मधे ड् किंवा ढ् जर आला (मराठीभाषेत) तर त्यांचे अनुक्रमे ड़ व ढ़ होतात. (वैदिक संस्कृतात अनुक्रमे ळ् व ळ्ह् होतात हे आपण आधीच पाहिले आहे) जसे- (नुक्ता दिलेल्या अक्षराला काना-मात्रा-वेलांटी लावता येत नसल्याने ते अक्षर व त्याला लागून आलेला स्वर वेगवेगळे लिहिण्याची कसरत करावी लागते आहे, कृपया सांभाळून घ्यावे)- वड़ई, काड़ई, वड़आ, सड़आ, बेड़ऊक, खेड़ऊत, कढ़ई, काढ़आ, वेढ़आ, आढ़ं, तिढ़आ वगैरे

दुसरी शक्यता म्हणजे जर ड् / ढ् च्या आधी एखादे अनुनासिक आले तर मात्र ते मूळस्वरूपात म्हणजेच ड्, ढ् असेच राहतात. जसे- खोंड, तोंड, सोंड, भोंडला, बंड, थंड, खंड, ओंडका, पेंढा, कोंढाणा वगैरे.

म्हणजेच शब्दात ज्या ठिकाणी ड् व ढ् उच्चारले जातात, तेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जात नाहीत. आणि जेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जातात, तेथे ड् व ढ् उच्चारले जातात. या चार वर्णांचे उच्चार अशा प्रकारे नियमबद्ध आहेत. हे नीट कळायला पुढील तक्ता पहा-

सुरुवात मध्य शेवट
डोके भोंडला तोंड
ड़ पड़ला वड़
ढोपर कोंढाणा पेंढ
ढ़ कढ़ई दाढ़

३) महाप्राण- स्पृष्ट व्यंजनांपैकी अननुसासिक म्हणजेच अनुनासिक नसलेल्या व्यंजनांच्या (क्, ग् वगैरे) महाप्राण व्यंजनांसाठी (ख्, घ् वगैरे) वेगळे अक्षरचिह्ने तर आहेतच, शिवाय त्यांना जोडाक्षर न मानता एकच अक्षर किंवा वर्ण मानले जाते. परंतू इतरही काही व्यंजनांचे व अर्धस्वरांचे महाप्राण होतात, पण त्यांना जोडाक्षर मानले जाते. जसे-ण्ह्, न्ह्, म्ह्, र्‍ह्, ल्ह्, व्ह्. हे वर्ण आलेले शब्द पुढीलप्रमाणे-
ण्ह्- कण्हणे
न्ह्- पुन्हा, गुन्हा
म्ह्- म्हणून
र्‍ह्- र्‍हास, कर्‍हाड
ल्ह्- कल्हई
व्ह्- व्हायला, केव्हा इ.
महाप्राण म्हणजे काय ते आधीच व्यंजनांवरील लेखात सांगितले आहेच, तेव्हा पुन्हा सांगत नाही.

४) पराश्रित- पराश्रित या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे ‘दुसर्‍याचा आश्रय घेणारे’. हा अर्थ उच्चारशास्त्रात लावायचा झाला, तर जे वर्ण एकेकटे, आपलेआपण उमटू शकत नाहीत, ज्यांना स्वर किंवा व्यंजनांच्या आधाराची गरज पडते ते पराश्रित. स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे मात्र ‘स्वयंभू’ असतात. उरलेले वर्ण म्हणजे अनुस्वार, विसर्ग, उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे ‘पराश्रित’ असतात.

अनुस्वार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वरानंतर आलेले अनुनासिक. म्, न् आणि ण् यांचे जरी स्वयंभू अस्तित्त्व असले, तरी ते ज्यावेळी आपापले, एकटे एखाद्या शब्दात येतात तेव्हा अनुस्वाराच्या अर्थाने नाही. त्यामुळे ही तीन अनुनासिके व बाकीची ङ् व ञ् ही अनुनासिके पराश्रित मानली जातात. अनुनासिकांबद्दल व कुठे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार करावा याबद्दल आधीच्या एका लेखात माहिती दिली असल्याने, पुन्हा सांगत नाही.

विसर्ग हा देखील स्वरानंतरच येतो. स्वराशिवाय विसर्गाला अस्तित्त्व मिळू शकत नाही. विसर्गाचा उच्चार कसा करायचा ते मात्र सांगणे आवश्यक आहे. “त्या त्या स्वरानंतर येणार्‍या विसर्गाचा उच्चार ‘ह्’ असा होतो आणि पूर्वीच्या स्वराची छटा त्या ह् मधे मिसळते. जसे- देवः- देवह्, जना:- जनाह्, कवि:- कविहि, भानु:- भानुहु, नदी:-नदीहि, कवे:- कवेहे, भानो:- भानोहो वगैरे. मात्र ऐ आणि औ पुढे येणार्‍या विसर्गाचा उच्चार देवै:- देवैहि, गौ:- गौहु असा केला जातो” (संदर्भ- सुगम संस्कृत व्याकरण)

परंतू विसर्गाचे नेमके उच्चारस्थान कोणते व त्याला महत्त्व किती याबद्दल मतभेद असलेले आढळतात.

जिह्वामूलीय- विसर्गाच्या पुढे क् किंवा ख् आल्यास विसर्गाच्या जागी ह् चा घशातून केलेला उच्चार केला जातो. हा उच्चार जिभेच्या मुळाशी होतो असे मानले जाते, म्हणून त्याला जिह्वामूलीय असे नाव मिळाले आहे. जसे- श्यामः करोति- श्यामह् करोति|, श्यामः खादति- श्यामह् खादति| वगैरे

उपध्मानीय- विसर्गापुढे प् किंवा फ् आल्यास विसर्गाच्या जागी ओठ मिटून केलेला ह् चा उच्चार केला जातो. त्यामुळे विसर्गाच्या पुढे येणारा प् /फ् वर्ण दोनदा उच्चारला जातो. जसे- श्यामः पश्यति- श्यामह् प्पश्यति| श्यामः फलं खादति- श्यामह् फ्फलं खादति| वगैरे.

अशाप्रकारे हे वर्णमालेबाहेरचे विविध वर्ण आहेत. जरी त्यांना आपल्या लेखी वर्णमालेत स्थान मिळाले नसले (अनुस्वार व विसर्गास सोडून, पण त्यांची गणना स्वरांत केलेली आहे), तरी आपल्या दैनंदिन वापरल्या जाणार्‍या भाषेत त्यांचे अस्तित्व दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.

वर्णमालेच्या या विशिष्ट संरचनेचा उपयोग ‘संधी’चे नियम बांधताना होतो. संधी म्हणजे काय, तर दोन उच्चारांचा संयोग झाल्यावर जो तिसरा उच्चार निर्माण होतो तो. त्यामुळे संधी उच्चारशास्त्रावर व पर्यायाने वर्णमालेवर काही अंशी अवलंबून आहेत. असो. संधी हा स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. परंतू त्याची माहिती सर्वच व्याकरणसंबंधी पुस्तकांत असल्याने वाचकांना अधिक त्रास देत नाही.

धन्यवाद.

संदर्भग्रंथ-
१- Phonetics संबंधीची अभ्यासक्रमातील काही पुस्तके
२- An introduction to Sanskrit Linguistics- Murti
३- सुगम संस्कृत व्याकरण- प्र. शं. जोशी
याखेरीज मला पुढील पुस्तकांची नावे मिळाली होती, परंतू ही पुस्तके मात्र मिळू शकली नाहीत. वाचू इच्छिणार्‍यांच्या सोयीसाठी त्यांचीही नावे देते आहे. मिळाल्यास जरूर वाचावीत.
१-Sanskrit Phonetics- विधाता मिश्रा
२-Phonetics in Ancient India- W.S.All

Advertisements

3 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. अनिल पेंढारकर
  जुलै 16, 2009 @ 12:28:41

  वर्णमालेसंबंधी आपण लिहिलेली मालिका आवडली. पण “ये दिल मांगे मोअर” असे झाले आहे. संपूर्ण व्याकरण आपण ब्लॉगवर उतरवू शकणार नाही हे खरे पण उदात्त/ अनुदात्त स्वरांविषयी आणि labial fricatives विषयी लिहावे ही विनंती. (“राजते” ह्या रूपाविषयीही कुतूहल आहे. कारण धातू कोणत्या गणाचा आहे ते आता आठवत नाही.). इतके सकस लेखन आपण करीत आहात त्याबद्दल धन्यवाद.

  उत्तर

 2. Parag
  सप्टेंबर 13, 2009 @ 14:20:52

  Archana,

  I read all your posts on ‘Varnmala’ and I think they are immensely informative. Reminded me some of the stuff read in Marathi grammer book ( I guess H.A. Bhave? ) years back in school.

  Parag.

  उत्तर

 3. Anonymous
  नोव्हेंबर 17, 2009 @ 03:23:53

  अर्चनाताई: मी आतापर्यंत च-वर्गाला दंततालव्य आणि ट-वर्गाला तालव्य हे शब्द आहेत असे मानत होतो. पण विनोबांनी गीताई लिहिताना ‘ज’ आणि ‘ज़’ हे हिंदीत लिहितात त्याप्रमाणे वेगळ्या तर्‍हेनी लिहिण्याचा नियम कटाक्षाने पाळला होता. ‘मेल्याजित्याविषीं शोक – ज्ञानवंत न ज़ाणती’ यात आपल्याला हे ‘ज’ आणि ‘ज़’ ( j-vs-z ) पाहायला मिळतात. तसेच, ‘चिंता’ मधला ‘च’ नेहमी मराठीत लिहितो तसा, आणि ‘तसेच़’ मधला च हा त्याला नुक्ता ज़ोडून ‘च़’ असा लिहिण्याचा आग्रह विनोबांनी धरिला होता. पण मला ‘अक्षरमाला’ सॉफ्टवेअर वापरून ‘च’ ला कसा नुक्ता ज़ोडायचा हे माहित नाही. मी तो वर्ण तुमच्या लिखाणातून उचलला आणि ज़ोडला. तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरता आणि तो ‘च़’ कसा टाइप करता? विनोबांनी एक अज़ूनच नवीन भानगड काढली. त्यांनी ‘ज’ ला तालव्य नाव दिलं (दंततालव्य ऐवजी), आणि ‘ज़’ ला दंततालव्य म्हटलं. तेव्हा दंततालव्याचा उच्चार करताना जिथे टाळूखाली दाताचं मूळ ज़ाणवतं तिथे जिभेचा अग्रामागचा भाग किंचित पसरटरित्या लागतो हे लक्षात आलं, आणि तालव्यासाठी जीभ त्यापेक्षा जास्त आत वळवून तिच्या टोकाचा वापर करावा लागतो, हे ही लक्षात आलं. पण ‘ज’ या तालव्य उच्चारापेक्षाही जास्त जीभ आत वळवून केलेले ट-गणाचे उच्चार यांना काय संज्ञा आहे, हा प्रश्न पडला. कारण मी तर ट-गणाला तालव्य समज़त होतो. त्या वर्गाला मूर्धन्य म्हणतात, हे तुमच्या लेखांतून कळलं. मी आपला ऋणी आहे.

  तो नुक्ता ज़ोडून ‘च़’ कसा लिहायचा हे कळवल्यास फार मदत होईल.

  ———–

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: