मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.
नाट्याचे १० वेगवेगळे प्रकार आहेत, पैकी एक नाटक. त्यात नायक व नायिका राजघराण्यातले असणे आवश्यक असते. त्यामुळे संस्कृतात भरजरी नाटकांची रेलचेल आहे. स्वप्नवासवदत्तमलाही त्याच नाटकांच्या यादीत बसवणे थोडे अन्यायकारक होईल असे मला तरी वाटते. केवळ नाटकाला राजेशाही दिमाख यावा म्हणून यातली मुख्य पात्रे राजघराण्यातली नाहीत. एक तर हे नाटक ज्या लोककथेवर आधारित आहे, त्यात ही सर्व पात्रे राजकुलीन आहेत. परंतू त्या मूळ लोककथेतील बऱ्याच गोष्टी बदलून घेणाऱ्या भासाला उदयन व वासवदत्ता एक ब्राह्मण व ब्राह्मणी म्हणून सुद्धा दाखवता आले असते. पण या सर्व नाट्याला कारणीभूत ठरलेली राजकीय पार्श्वभूमी या नाटकात फारच महत्त्वाची आहे. हे नाट्य सुरू व्हायला ही राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत आहे व नाट्य संपायलाही! त्यामुळेच सर्व पात्रे राजघराण्यातली असणे आवश्यक आहे.
त्यांच्या या राजेशाही पार्श्वभूमीतले नाट्यनिर्मितीचे बीज ओळखून भासाने त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. माझे स्वत:चे असे मत आहे, की सर्व राजपुत्र व राजकन्यांना लहाणपणापासूनच ‘आपलं जीवन हे प्रजेसाठी आहे’ या विचाराचं बाळकडू देण्यात येत असावं. या एकाच विचाराने राजांना पूर्वी इंद्रियदमन वगैरे करायला शिकवले जात असावे. अर्थातच सर्व राजे/ राण्या या तत्त्वाचे पालन करत असतीलच असे माझे म्हणणे नाही. परंतू वासवदत्ता या तत्त्वाचे पालन करणाऱ्यांपैकी असावी, म्हणूनच तर तिने सर्व धोके, जोखीम स्वीकारून यौगंधरायणाला साथ द्यायचा निर्णय घेतला. जर तिला हे प्रजेचे व राजाच्या कर्तव्याचे महत्त्व पटले नसते तर तिने एवढा मोठा निर्णय निश्चितच घेतला नसता.
तिच्या या पार्श्वभूमीचा उपयोग भासाने पहिल्या अंकातल्या पहिल्या प्रसंगातही करून घेतला आहे. पद्मावतीच्या नोकरांचं वागणं तिला अपमानास्पद वाटलं ते ती एक राजकन्या असल्यामुळेच!
पहिल्या अंकातला ब्रह्मचाऱ्याचा प्रवेश, दुसऱ्या व तिसऱ्या अंकातले मुख्य घटना पडद्याआड ठेवून केवळ वासवदत्तेच्या प्रतिक्रिया पडद्यावर दाखवण्याचे तंत्र, चौथ्या अंकातले द्विकेंद्री दृश्य व त्याहून महत्त्वाची दोन केंद्रांना जोडणारी ती बगळ्यांची माळ, पाचव्या अंकातली वातावरणनिर्मिती व त्यानंतरचा स्वप्नप्रसंग, सहाव्या अंकातली चित्रे, घोषवती वीणा या सर्वच क्लृप्त्या अत्यंत नावीन्यपूर्ण, नाट्यपूर्ण, सहज व म्हणूनच सुंदर आहेत.
स्वप्नप्रसंगामध्ये कितीतरी symbolic गोष्टी दडलेल्या आहेत. उदयन व वासवदत्ता २ वेगवेगळ्या विश्वांत आहेत. उदयन स्वप्ननगरीत तर वासवदत्ता वास्तवात. या दोन विश्वांना जोडणारा त्यांचा संवाद. तसं बघायला गेलं तर उदयन जागेपणीही खोट्या विश्वातच आहे की! तो जिला मृत समजतो आहे ती त्याची वासवदत्ता तर जिवंत आहे. आणि इथे वासवदत्ता मात्र वास्तवाचे खरे चटके झेलते आहे.
उदयन मला आवडतो तो २ गोष्टींमुळे- एक तर त्याचा स्वभाव व त्याने चौथ्या अंकात भुंग्यांना दाखवलेली सह-अनुभूती यांमुळे. संस्कृत नाट्यशास्त्रात नायकाचे ४ प्रकार सांगितले आहेत- धीरोदात्त, धीरललित, धीरोद्धत व धीरशांत. उदयन हा धीरललित नायक आहे. म्हणजेच वीणावादन वगैरे ललितकलांत प्रविण. कला म्हटलं की भावनाप्रधानता आलीच. उदयनही अत्यंत भावनाप्रधान आहे- अगदी प्रेमापुढे आपली कर्तव्ये ओवाळून टाकण्याइतका! टोकाचा प्रेमवेडा असला तरीही त्याचे एक एक संवाद वाचल्यावर उदयनाला सगळं माफ!
उदयन आणि वासवदत्ता यांचं दु:ख एकच- विरहाचं! पण दोघांच्या दु:खाचा पोत किती वेगवेगळा! उदयनाचं दु:ख अज्ञानजनित आहे. विरहाचा स्वीकार करण्यावाचून त्याला काहीच पर्याय नाही व त्यामुळे आपल्या नशीबाला दोष द्यायला तो मोकळा आहे. वासवदत्तेचं मात्र तसं नाही. तिला आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण राजकीय कारणांमुळे व पतीवरील प्रेमामुळेच तिने स्वत: विरहाचा पर्याय निवडला आहे. सुख समोर असूनही ते डावलून दु:खाला स्वीकारणं हा वासवदत्तेच्या भूमिकेचा गाभा आहे. म्हणूनच ती बॉलिवूडपटांतील नायिकांप्रमाणे कितीही मुळूमुळू रडली, तरी ती त्या इतर नायिकांप्रमाणे कणाहीन नक्कीच नाही. ती त्या सर्वांहून वेगळी आहे.
भासाला वासवदत्तेचं पात्र किती वेगवेगळ्या रंगांनी रंगवता आलं असतं! विरहयातना असह्य होऊन व मुख्य म्हणजे सवत स्वीकारायला लागू नये म्हणून खऱ्या रुपात प्रकट होणारी, भावनेच्या आहारी जाणारी वासवदत्ता तो उभी करू शकला असता. किंवा भावनांपुढे कर्तव्याला टोकाचं महत्त्व देऊन emotionally cold झालेली वासवदत्ता तो दाखवू शकला असता. पण भासाच्या वासवदत्तेत आवेग आणि संयम यांचं एक सुंदर मिश्रण आहे. ती भावनिक आहे, पण तरीही तिला कर्तव्याची जाणीव आहे. ती आवेगी आहे, त्या नादात ती नको ते बोलूनही जाते पण लगेच स्वत:ला बांध घालण्याइतकी संयतही आहे. उदयन एकांतात दिसल्यावर त्याच्याशी बोलण्याची इच्छा तिला अनावर होते, पण लगेच भानावर येऊन ती बोलणं थांबवतेदेखिल. तिच्या या वरकरणी परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांमुळेच ती मला आवडते. ती खऱ्या अर्थाने माणूस आहे. तिच्यात सतत एक द्वंद्व चाललेलं आहे- ‘श्रेयस’ व ‘प्रेयस’ यांच्यामधलं! तिचा निर्णय हे उसनं अवसान नाही. त्याला एक वैचारिक बैठक आहे.
तिचा पद्मावतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र मला कोड्यात पाडतो. सवतीवरही इतकं प्रेम? अगदी एकदासुद्धा तिच्याबद्दल मत्सर, राग, द्वेष नाही वाटत? पण वासवदत्ता अशी आहे, म्हणूनच आवडते ना!
पद्मावतीतही भावनेचा ओलावा व संयम हे दोन्ही असले तरी ती वासवदत्तेहून खूप वेगळी आहे. कारण तिच्यात संयमाचे प्राबल्य आहे. शिवाय उदयनाचे आपल्यावर प्रेम नाही हे तिला कळलेलं असल्याने पद्मावती ही एक अत्यंत वेगळी व्यक्ती बनली आहे. तिला प्रेमाची आस आहे. तिचं स्वत:चं उदयनावर खूप प्रेम आहे. पण त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता येणार नाही हेही तिला माहित आहे, ते तिला मान्य आहे. त्यामुळे ती काहीशी एका बाजूला पडली आहे, किंबहुना स्वत:च प्रकाशझोतापासून थोडी दूर सरकली आहे.
यौंगधरायण तर या नाटकाचा खरा सूत्रधार. पहिल्या अंकात सर्व पात्रांचे दोर आपल्या हाती गोळा करून जो जातो तो थेट शेवटच्या अंकात उगवतो- दोर ज्याच्या त्याच्या हाती सोपवायला. हे सगळं नाट्य घडवतो व संपवतो तो हा यौगंधरायण. पण बुद्धिबळासारखा प्याद्यांना आपल्या तालावर नाचवणारा नाही. इतर पात्रांच्या मनस्थितीचा विचार करून त्याचा उपयोग करून घेत व तरीही त्यांना त्रास होणार नाही याची शक्य तितकी काळजी घेत तो एक एक चाली खेळतो, तेही आपल्या स्वार्थासाठी नाहीच.
अशी सुंदर पात्रं, असं सुंदर कथानक आणि असे सुंदर प्रसंग एकत्र आणणं तो एक भासच करू जाणे!
हे नाटक ज्यांना वाचायचं असेल त्यांना ते हिंदी भाषांतर व संस्कृत टीकेसहित http://www.vedamu.org/home.asp येथे वाचता येईल. skip intro -> learn sanskrit -> kaavyas-> svapnavasavadattam या मार्गाने जावे.
मे 12, 2007 @ 17:34:55
अप्रतिम!
या सुंदर विषयावर लेखमाला सुरू केल्याबद्दल आपले अभिनंदन! भासाची नाट्यशैली ही संस्कृत नाटकांची आदर्श शैली असल्याचे ऐकले होते. स्वप्नवासवदत्तावरील आपले भाष्य सुबोध आहे.
शैलेश
मे 14, 2007 @ 13:00:41
faarach chaan
archana, you have it in you, girl !!! so keep writing. i will have to visit this blog if you are going to keep writing about sanskrit plays.
how about the first play of Bhas ?when can we have its translation? i remember you have said that the two so-called “leading characters” never appear on stage? is that correct? how interesting
please keep it coming. looking forward to more
मे 18, 2007 @ 16:51:55
सगळेच भाग सुरेख जमलेत. विशेषतः ह्या शेवटच्या भागातील रसग्रहण अतिशय सुंदर! आपलं अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
संस्कृत नाटकं हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणखीही संस्कृत नाटकांबद्दल, विशेषतः ‘मालविकाग्निमित्रम्’ बद्दल वाचायला उत्सुक आहे.