स्वप्नवासवदत्तम- पार्श्वभूमी

भासाने उदयनकथेवर २ नाटकं लिहिली. त्यापैकी पहिलं ‘प्रतिज्ञायौगंधरायण’ आणि दुसरं ‘स्वप्नवासवदत्तम’. ‘प्रतिज्ञा….’ जिथे संपतं त्याच्या काही काळानंतर ‘स्वप्न….’ चं कथानक उलगडतं. त्यामुळे ‘प्रतिज्ञा….’ ची थोडी ओळख करून देणं गरजेचं आहे.

उदयन हा एक नवतरुण राजा आणि त्याला राज्यकारभारात सल्ला देऊन मदत करणारा त्याचा तीक्ष्णबुद्धी, अत्यंत विश्वासू असा अमात्य- यौगंधरायण यांच्याभोवती अख्खं कथानक फिरतं. आपला नायक- उदयन म्हणजे मोठा शौकिन राजा बरं का! त्याच्या वीणावादनातल्या प्रावीण्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली. इतकंच नव्हे, तर त्याच्या लाडक्या ‘घोषवती’ वीणेचं वादन करून रानटी हत्तींना भुलवायचं आणि ते जवळ आले की त्यांना पकडायचं हा त्याचा छंद. या कामातही तो फार कुशल होता. पण त्याच्या याच गुणांनी त्याचा घात केला. अशाच हत्तींच्या शिकारीवर उदयन निघालेला असताना, त्याचा शत्रूराजा प्रद्योत महासेन याने कपटाने खोट्या हत्तीत सैनिक लपवून पाठवले आणि उदयन रानात एकटा असताना त्याला पकडून आणून आपल्या कैदेत ठेवलं.

ही बातमी यौगंधरायणाला समजल्यावर त्याने उदयनाला कैदेतून सोडवून आणण्याचा चंग बांधला. वेषांतरं, क्लृप्त्या अशा मार्गांंची आखणी सुरू केली. पण इथे कैदेत उदयन अगदीच काही दु:खी वगैरे नव्हता. कारण, तिथे त्याला एक वेगळीच शिक्षा देण्यात आली होती. आणि ती म्हणजे प्रद्योत महासेनाची अत्यंत देखणी आणि स्वभावाने सुंदर अशी कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकवणं. झालं, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि उदयनासोबत वासवदत्तेलाही पळवून आणण्याची जबाबदारी यौगंधरायणावर पडली.

त्यानुसार नवीन योजना आखल्या गेल्या आणि काही अपयशांनंतर उदयन वासवदत्तेला पळवून आपल्या राज्यात घेऊन आला. या सगळ्या भानगडीत यौगंधरायण मात्र पकडला गेला, पण उदयनाच्या पायी वाहिलेल्या त्याच्या निष्ठेचं, राजकारणातल्या कौशल्याचं आणि बुद्धीचातुर्याचं कौतुक करून सन्मानाने त्याला परत पाठवण्यात आलं आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. इथे हे नाटक संपतं

तांत्रिकदृष्ट्या, ज्याला ‘फलप्राप्ती’ होते तो नाटकाचा नायक मानला जातो. त्या दृष्टीने उदयन हा या नाटकाचा नायक असला पाहिजे. कारण त्याला राज्य आणि वासवदत्ता अशी दुहेरी फलप्राप्ती होते. पण मजा म्हणजे उदयनच काय वासवदत्तासुद्धा अख्खं नाटकभर एकदाही रंगमंचावर अवतरत नाहीत. फक्त त्यांच्याबद्दलच्या बातम्याच आपल्याला कळतात आणि रंगमंचावर जे नाट्य घडतं ते म्हणजे यौगंधरायणाच्या क्लृप्त्या, त्यांना आलेलं अपयश, अखेर यश, मग त्याला झालेली अटक आणि मग सुटका अशा घडामोडी. त्या अर्थाने हे सगळं घडवून आणणारा यौगंधरायण हा या नाटकाचा नायक म्हणायला हवा.

त्यानंतर उदयन- वासवदत्ता यांचं लग्न होतं. ते सुखाने नांदू लागतात. पण या सुखातच उदयन इतका गुरफटून जातो, की राज्यकारभाराकडे त्याचं दूर्लक्ष होतं. जवळजवळ सगळंच राज शत्रूच्या घशात जातं. उदयनाला शुद्धीवर आणण्याची गरज निर्माण होते. त्यासाठी यौगंधरायण वासवदत्तेला विश्वासात घेऊन एक वेगळीच योजना आखतो. आणि त्यातून निर्माण होतं पुढचं नाट्य- ‘स्वप्नवासवदत्तम’!

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वप्नवासवदत्तम या नाटकाचं अंकवार कथानक आणि त्यातली मला लक्षात आलेली आणि आवडलेली काही सौंदर्यस्थळं पुढच्या लेखापासून…

Advertisements

3 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. प्रियंभाषिणी
  एप्रिल 19, 2007 @ 19:21:08

  मस्त! वाचायला मजा येईल. उत्सुक आहे.

  भासाचा काळ कोणता? सुमारे इ.स.पूर्व २ रे शतक ते इ.स.नंतर दुसरे शतक या दरम्यान असावा असे वाचल्याचे आठवते. कालिदासाच्या पूर्वी हे नक्की.

  हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट जाणवली. हत्तीत सैनिक लपवून आणले ही गोष्ट भासाने होमरच्या इलियडवरून तर नाही ना घेतली कारण अलेक्झांडर येथे आला तो काळ इ.स.पूर्व ४०० च्या सुमाराचा. अलेक्झांडर होमरचा चाहता होता आणि जेव्हा त्याला भारतीय विद्वानांशी चर्चा करायची संधी मिळाली तेव्हा त्यातील काहीजणांनी होमर वाचला आहे हे त्याला समजले आणि तो चकित आणि आनंदी झाला असा उल्लेख वाचल्याचे आठवते.

  भासाने मूळ इलियडमधील घोड्यात सैनिक लपवण्याच्या कल्पनेचा नाटकात उपयोग केला असेल असे वाटले.

  उत्तर

 2. प्रियंभाषिणी
  एप्रिल 19, 2007 @ 19:26:11

  अरे! या आधीची आता पोस्ट वाचली त्यात तू इ.स.पूर्व ५व्या शतकात म्हटले आहेस परंतु मी वाचलेल्या संदर्भात हा काळ इ.स.पूर्व २ र्‍या शतकातील असल्याचे लिहीले आहे.
  यावर अधिक माहिती मिळेल काय?

  उत्तर

 3. anu
  एप्रिल 20, 2007 @ 03:06:50

  Sundar.
  Svapnavasavadattam yeu dyat lavkar!

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: