चंद्रकोर- ७

नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवं वर्षं तुम्हाला सुखासमाधानाचं आणि समृद्धीचं जावो.

गेलं वर्षंभर मी हे असं पांढऱ्यावर खरडलेलं काळं, तुम्ही न कंटाळता वाचत राहिलात, या बद्दल धन्यवाद. व पुढच्यावर्षीही असंच ते सहन करत रहा अशी विनंती. गेल्या वर्षी सुरू केलेल्या चंद्रकोर या अनुवादमालिकेला आपणा सर्वांचा आलेला प्रतिसाद पाहून हुरूप चढला. मूळ पुस्तकातील जितके लेख मला तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले, तेवढ्या लेखांचा अनुवाद मी केला.

तेव्हा याच लेखांचा अनुवाद आधीही कोणी केला असेल, मग आपण का करावा, असा विचार माझ्या मनात आला नाही. आपल्या आवडत्या साहित्यकृतीचा अनुवाद करताना आपण आणखी खोलात जाऊन तिचा आस्वाद घेतो. इथे हाच शब्द का वापरला, त्याच अर्थाचा दुसरा शब्द का नाही, या अर्थछटेतल्या सूक्ष्म फरकातून लेखकाला काय सांगायचं आहे? इथे लेखकाने हे रूपक कसं विकसित केलं आहे? तेच रूपक आपल्या भाषेत आपल्याला मांडता येईल का? असा विचार करता करता, मूळ लेख ज्या भाषेत लिहिला आहे व अनुवाद ज्या भाषेत करायचा आहे अशा त्या दोन्ही भाषांच्या मर्यादा, बलस्थानं थोडी थोडी लक्षात येऊ लागतात. मूळ कलाकृतीतले आधी न कळलेले असे काही अर्थाचे नवे पदर उलगडतात. एकच कल्पना, ती मूळ लेखकाने एका भाषेत मांडणं आणि मग अनुवादकाने त्याच्या मर्यादा सांभाळत दुसऱ्या भाषेत मांडणं, यात एकच मातीचा गोळा दोन वेगवेगळ्या साच्यात घडवल्यावर त्याच्या रंगरूपात पडलेल्या फरकाइतकं अंतर असतं. ते पाहणंही फार रोचक असतं. कदाचित म्हणूनच हा लेख/ कथा/ कविता छोटी आहे की मोठी, नामवंत लेखकाची आहे की अपरिचित लेखकाची, नवी आहे की बऱ्याच अनुवादकांनी वेध घेतलेली असा विचार न करता, तिचा अनुवाद करावासा वाटतो. त्यातलं काय काय वाचावं हे वाचकावर अवलंबून आहे. मोठ्या आणि नव्या कथा वाचाव्याशा ज्यांना वाटतात, त्यांना वाचायला या ब्लॊगवर ‘देहदंड’, ‘स्मृतींची चाळता पाने’, ‘पावसाची गोष्ट’ असे अनुवाद आहेत. पण ज्यांना एकाच कल्पनेची वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत (अनुवादकांमार्फत) घडलेली वेगवेगळी प्रकटीकरणे पाहायची आहेत, त्यांना वाचायला चंद्रकोर आहे. (याचा दुसऱ्या कोणी केलेला अनुवाद माझ्या वाचनात आलेला नाही. परंतू आधीच्या अनुवादावर कुणीतरी दिलेल्या प्रतिसादातून तसे समजते.) तेव्हा ‘जो जे वांछिल तो ते लाहो!’ 🙂

असो, ही शेवटची चंद्रकोर गायत्री यांच्या फर्माईशीवरून. मला हा अनुवाद काही नीट जमलेला नाही. जवळजवळ महिनाभर हा अनुवाद भिजत घातला होता, तरी काही तो मनासारखा झालेला नाही. असो.

 

त्या समुद्रकिनाऱ्यावर

 

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात.

डोक्यावरचं अथांग आकाश निपचित पडून राहिलेलं आणि अस्थिर पाण्याला उधाण आलेलं. अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं आरडाओरडा करत, नाचत भेटतात.

ते वाळूने घरं बनवतात आणि रिकाम्या शिंपल्यांशी खेळत बसतात, सुकलेल्या पानांच्या नावा विणतात आणि हसत हसत त्या नावा त्या खोल अथांग पाण्यावर सोडूनही देतात.अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलांचे हे असे खेळ चालतात.

त्यांना पोहणं माहित नाही, त्यांना पाण्यात जाळी फेकणं माहित नाही. तिथे मोती गोळा करणारे मोती वेचण्यासाठी पाण्यात सूर मारतात, व्यापारी त्यांच्या बोटींतून प्रवास करतात, पण इथे लहान मुलं मात्र गोटे गोळा करतात आणि पुन्हा ते पसरून देतात. ते गुप्त खजिन्याचा शोध घेत नाहीत व जाळीही फेकत नाहीत.

समुद्राला हास्याचं भरतं येतं आणि सूर्यकिरणांत त्याचं हसू परावर्तित होतं. मृत्युशी संधान साधणाऱ्या लाटा आईने बाळाचा पाळणा हलवत म्हणावीत तशी निरर्थक बडबडगीतं म्हणतात.समुद्र मुलांशी खेळतो आणि सूर्यकिरणांत त्याचं हसू परावर्तित होतं.

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात. मोकळ्या आभाळात वादळं घोंघावतात, अज्ञात पाण्यात बोटी बुडतात, मृत्यु समुद्रावर हिंडत असतो आणि मुलं मात्र किनाऱ्यावर खेळत असतात.

अनंत विश्वांच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलं एकमेकांना भेटतात.

 

4 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. hemant_surat
  जानेवारी 01, 2007 @ 08:54:31

  अर्चना,
  भावनांचा हा महासागर. शब्दांचे हे बुडबुडॆ. कोणी त्या महासागरात मोठमोठ्या कादंबर्यांच्या विशालकाय जहाजे हाकतात, कोणी दीर्घकथांच्या नावा, तर काही स्फ़ुटके जणू वल्हवणार्या होडी. आपण सर्व महाजालाच्या काठाशी खेळतोय. आपणही मुलेच आहोत. पण शब्दांच्या ह्या बुडबुड्यांतून, टागोरांच्या जहाजातली रत्नं तू आमच्यासमोर किनार्यावर ऊधळून देतेस व नंतर आम्ही मुले ती लुटतो व खेळतो हे शक्य होतय केवळ तुझ्यामुळे!

  उत्तर

 2. गायत्री
  जानेवारी 31, 2007 @ 13:59:04

  नक्कीच वाचत राहू ‘पांढऱ्यावरचं काळं’..अहो आम्ही इतक्या आवडीने वाचतो त्याला तुम्ही ‘सहन करणं’ म्हणता हे बरोबर नाही हां! 🙂
  आणि फर्माईश पुरी केलीत..खूप खूप आनंद झाला! नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

  उत्तर

 3. Rajendra
  मार्च 13, 2007 @ 14:22:47

  चंद्रकोर सगळी वाचली. अनुवाद छान झाला आहे. गुरुदेवांच्या लिखाणात निसर्गाचे किती
  सुंदर चित्रण असते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अजून गुरूदेव वाचायला आवडतील.

  उत्तर

 4. Vidya
  मे 04, 2007 @ 21:01:14

  Archana,
  Tujhe sarv ‘Chandrakor’ anuvaad ekdamach vachale. I havent read the original book, but your translations give are amazing. I liked all of them.

  -Vidya.

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: