लेखक
आई, तू तर म्हणतेस की बाबा बरीच पुस्तकं लिहितात, पण त्यात ते एवढं काय लिहितात? मला तर बुवा काही समजतच नाही. आज ते संध्याकाळभर तुला त्यांची पुस्तकं वाचून दाखवत होते ना, तुला तरी कळला का गं त्याचा अर्थ?
तू आम्हाला किती छान छान गोष्टी सांगतेस गं! मला नेहमी प्रश्न पडतो की बाबा असं का नाही लिहू शकत बरं? आज्जीने त्यांना कधीच राक्षसांच्या आणि पऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या नाहीत का गं? की ते त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेत?
तसे ते विसरळूच आहेत. नेहमी जेव्हा त्यांना आंघोळीला जायला उशीर होतो, तेव्हा तुला त्यांच्या मागे लागून शंभरदा आंघोळीची आठवण करून द्यावी लागते. तू त्यांच्यासाठी जेवायची थांबतेस, सतत जेवण गरम करत राहतेस आणि ते मात्र लिहितच राहतात आणि जेवायला यायचं विसरून जातात. पहावं तेव्हा ते आपले पुस्तकं लिहिण्याच्या खेळातच बुडालेले!
पण मी जर कधी बाबांच्या खोलीत खेळायला गेलो, तर तू लगेच धावतपळत येतेस आणि मला म्हणतेस, “किती रे मस्ती करतोस?”
मी एवढुस्सा जरी आवाज केला तरी ओरडतेस, “बाबा काम करतायत, कळत नाही का?”
छे बुवा, नुस्तं लिहित राहण्यात कसली आलीये मजा?
आणि मग मी जर बाबांचं पेन किंवा पेन्सिल घेतली आणि त्यांच्या वह्यांवर त्यांच्याप्रमाणेच क, ख, ग, घ…. लिहायला लागलो, तर तू माझ्यावर का चिडतेस गं आई?
बाबा जेव्हा लिहितात, तेव्हा त्यांना मात्र एक शब्दसुद्धा बोलत नाहीस.
जेव्हा बाबा असे कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे वाया घालवतात, तेव्हा तुला काहीच फरक पडत नाही. पण जर मी त्यातला एकच कागद घेतला, तोही चांगली नाव बनवायला तर मात्र लगेच म्हणतेस, “बाळा, किती रे त्रास देशील?”
बाबा मात्र कागदांमागून कागदांवर दोन्ही बाजूंनी शाई फासतात आणि त्यांचा पार बट्ट्याबोळ करतात, ते बरं चालतं होय तुला!
नोव्हेंबर 30, 2006 @ 22:51:13
तुमचे “The Crescent Moon’ चे भाषांतर अगदी पहिल्या पासून वाचत आहे. फार छान भाषांतर केले आहेत तुम्ही. मी “The Crescent Moon” काही वाचले नाही. पण चंद्रकोर ने ती उणीव भरून काढली.
डिसेंबर 01, 2006 @ 18:55:36
faarach chhan!