कोणे एके नाताळी

 

कोणे एके नाताळी

नाताळची पूर्वसंध्या! भिंतीवर पायमोजे टांगून, दारं-खिडक्या फुलांच्या माळांनी सजवून, ‘खिसमस ट्री’ खाली भेटवस्तूंचा छोटासा ढीग रचून घर शांतपणे नाताळाच्या स्वागतासाठी सज्ज! हे प्रतीक्षेचे क्षण मी मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवते- दरवर्षी , न चुकता. माझं घर जणु त्या क्षणी भूतकाळाच्या आठवणींतून जिवंत होतं, गतकाळाबद्दल कृतार्थ होतं आणि वर्तमानाचा विचार करत भविष्याची वाट पाहत राहतं. या अशा ऊबदार क्षणांनीच कित्येक विलक्षण व आश्चर्यकारक घटनांना जन्म दिलाय; आणि आता तर मलाही सवय लागलीय, कोणत्यातरी अकल्पित घटनेची कल्पना करण्याची, अलौकिक आनंदाला सामोरं जायला तयार राहण्याची. ह्यावर्षी असा कोणता आनंदाचा ठेवा हा नाताळ माझ्या पदरात टाकणार आहे बरं?

आणि असा विचार करता करता, कशी कुणास ठाऊक, अशाच एका नाताळाने मला दिलेली एक दुर्लभ भेट आठवली. गोष्ट फार वर्षांपूर्वीची, इथून दूर…… खूप दूर घडलेली. मी त्यावेळी नुकतंच लग्न झालेली एक नवतरुणी होते. लग्न होऊन काही दिवस उलटूनही माझ्या नवर्‍याची मला पुरती ओळख पटली नव्हती. पटणार तरी कशी, त्या परंपरावादी चिनी समाजामध्ये एखाद्या तरूणीने एखाद्या तरुणाला लग्नापूर्वी एकांतात भेटणं फारसं शिष्टसंमत नव्हतं, त्यामुळे फारशा भेटी आमच्या नशिबात नव्हत्या. हा, पत्रांची देवाणघेवाण मात्र झाली. त्या छोट्याशा परंपरावादी चिनी शहरात एकमेकांना अनोळखी असलेले आम्ही दोघे अमेरिकन आता एकटेच राहू लागलो. आणि तरीही एकाकीपणाचा हा वेढा फोडण्यासाठी मी धडपडत होते. त्यातल्या त्यात समधानाची बाब अशी की, नाताळ एकत्र साजरा करायला माझे लाडके आईबाबा आमच्याकडे येणार होते. किती उत्सुकतेने वाट पाहत होते मी त्या दिवसाची! उत्साहाच्या भरात रात्रंदिवस खपून मी जंगी तयारी केली. त्या भागात टर्की मिळणं निव्वळ अशक्य. म्हणुन मी टर्कीऐवजी रानबदक शिजवलं- आयुष्यात पहिल्यांदा! तेही कुणाच्याही मदतीशिवाय! प्लम पुडिंग ऐवजी सुका मेवा आणि तांदूळ वापरून चिनी पद्धतीची आठ चविष्ट पुडिंग्ज तयार केली. सोबतीला हिरव्यागार पानांआड लपलेला अमृततुल्य बांबू आणि हॉलीऐवजी दुसरी तांबडी फळे ठेवून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न केला.

पण नाताळच्या आदल्याच दिवशी सकाळी एक तार आली- आईच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ती येऊ शकणार नाही व बाबांनाही तिच्या सोबत रहायला हवं आसल्यामुळे त्यांनाही येता येणार नाही, अशी बातमी घेऊन! झालं, माझा नूरच पालटला. एकाएकी माझ्या उत्साहाला ओहोटी लागली. माझी ही घोर निराशा लपवण्याच्या आटोकाट प्रयत्नातच दिवस मावळला. दिवेलागणीची वेळ झाल्यावर जरा बरं वाटलं. वीज नावाचा प्रकार आमच्या गावात अस्तित्वात नव्हताच, केरोसीनचे दिवे पेटवूनच नाताळचं स्वागत करावं लागलं. मी कॅरल्स म्हटली. आणि मग आम्ही दोघंच लहानपणी साजर्‍या केलेल्या नाताळबद्दल गप्पा मारू लागलो, झोप येईपर्यंत.

मला अजूनही आठवतंय, बिछान्यावर पडल्यावरही मला झोप लागत नव्हती. अखेर तासाभराने उठून मी बाहेरच्या खोलीच्या खिडकीत जाऊन उभी राहिले. मध्यरात्रीचा सुमार, येशूजन्माची वेळ. येशूच्या आगमनाची बातमी देणारा तो तारा चमकत असलेला मला दिसला. वेशीला लागूनच आहे असे भासवणारा पण प्रत्यक्षात खूप खूप दूर असलेला- आणि बरोब्बर त्याच क्षणी मी दरवाजावर थाप पडलेली ऐकली, द्विधा मनस्थितीत कुणीतरी हळुवारपणे (हलकेच ?)मारलेली थाप. इतक्या रात्री कोण आलं असेल? आमच्या भागात दरोडेखोरांचा सुळसुळाट झाला होता, त्यामुळे दार उघडणं खरं तर योग्य नव्हतं. पण तरीही मी दार उघडलंच. आणि पाहते तर काय, दारात एक ५ ते ६ वर्षांचा लहानसा चिनी मुलगा उभा. (त्याचं वय त्यावेळी १० वर्षं होतं हे नंतर त्यानेच मला सांगितलं.) त्याची शरीरयष्टी खूप कृश होती, अंगावरचे कपडे फाटले होते. पण याक्षणी प्रकर्षाने आठवणारी गोष्ट म्हणजे, त्याचे डोळे! एखाद्या बालदूतासारख्या मुखावर उठून दिसणारे ते टपोरे काळेभोर डोळे! सुंदर शांत चेहर्‍याला आकार देणारं विशाल कपाळ आणि निमुळती हनुवटी . त्याच्या फिकटलेल्या थकलेल्या चेहर्‍यावर शांत, धीरगंभीर पण आत्मविश्वासपूर्ण असे विलक्षण भाव होते. तो काहीच बोलला नाही, माझ्याकडे एकटक बघत तसाच उभा राहिला.

मी चिनी भाषेत त्याला विचारलं, ‘कोण रे तू?’
‘कुणीच नाही.’ शुद्ध पेकिंग लहेजात त्याने उत्तर दिलं.
‘पण तुझं नाव काय?’ मी पुन्हा प्रश्न केला.
‘मला नाव नाही.’
‘तुझे आईबाबा कुठे आहेत?’
‘मला आईबाबा नाहीत.’
हा आकाशातून टपकला की काय, अशा नवलाने मी त्याच्याकडे पाहत राहिले, कदाचित असेलही.
‘तू आलास तरी कुठून?’ माझा पुढचा सवाल.
‘मी कुठूनही आलेलो नाही.’
‘आणि कुठे जाणारही नसशील, नाही का?’
‘कुठेही नाही.’
‘मग माझ्याकडे का आलास?’
कदाचित त्यालाही ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसावं, त्याने नुसतीच मान हलवली. आणि परत त्याच्या तेजस्वी डोळ्यांनी माझ्याकडे एकटक बघत राहिला. मला तर जणु त्याच्या डोळ्यांची मोहिनीच पडली होती. हे सुंदर एकाकी मूल कोण असेल बरं? भिकारी? पण मग माझ्याच घरी का आलाय तो? तेही आजच रात्री? मध्यरात्री?
‘ये आत, तुला खूप भूक लागली असेल ना?’, मी म्हटलं.तो शांतपणे आत आला, तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं, तो किती थकला होता ते. थंडीमुळे काकडणारं शरीर तो बळंच काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तो शेगटीजवळ (शेगडीजवळ ?)आला. आग तर विझली होती. पण काही निखार्‍यांत अजूनही थोडी धुगधुगी होती. त्यांची ऊब मिळवण्यासाठी त्याने हात शेगटीवर (शेगडीवर ?) धरले, छोटेसे नाजूक हात. खराब झालेले त्याचे ते हात, धूळीने भरल्यामुळे तपकिरी झालेले त्याचे ते केस, अशा त्याच्या एकंदरीत अवतारावरून तो बरंच अंतर पायी चालत आला असावा असा अंदाज मी बांधला. कदाचित त्याला कोणत्यातरी घटनेचा जबर मानसिक धक्का बसला असावा, कारण त्याची स्मृती नष्ट झाली होती.
मुक्यानेच मी त्याला मोरीत (स्नानगृहात ?)नेलं, त्याला स्वच्छ आंघोळ घातली. एका पायजम्याचे हातपाय त्याच्या मापाप्रमाणे कापून ते त्याला घातले. आणि त्याच्या कमरेभोवती छोटासा पट्टा बांधला. मग मी त्याला शिजवलेली अंडी, पाव व डबाबंद दूध दिलं. त्याला दूध हा प्रकारच माहीत नसावा, त्याने ते हुंगून बाजूला ठेवून दिलं.

‘तू चहा घेशील का?’ मी विचारलं.
‘तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नका.’ तो उत्तरला. पण मी चहा बनवल्यावर मात्र घटाघटा प्यायला. मग मी बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर त्याच्यासाठी बिछाना घातला. आणि तो झोपी जाईपर्यंत त्याच्या उशाशी बसून राहिले. मग मीही माझ्या बिछान्याकडे वळले. आश्चर्य म्हणजे आता मात्र मलाही झोप लागली.
सकाळी उठून मी बाहेरच्या खोलीत जाऊन बघते, तर हा पठ्ठ्या आधीच उठला होता. जमिनीवर मांडी घालून बसला होता, खिसमस ट्री मजेने न्याहाळत.
‘काही आठवतं का तू कोण आहेस ते?’ मी विचारलं. त्याच्या चेहर्‍यावर एक लाघवी स्मित उमटलं. मान नकारार्थी हलवून तो म्हणाला, ‘मी तुमच्यासोबत रहायला आलो आहे.’ असं घडलं सारं!
तो नाताळ आम्ही त्याच्यासोबत साजरा केला. एकाकीपणाची ती जीवघेणी पोकळी त्याने जणु आपल्या अस्तित्वाने भरून काढली होती. मी त्याला बाजारात घेऊन गेले आणि त्याच्यासाठी कपडे विकत घेतले. तोही वर्षानुवर्ष आमच्याचबरोबर राहत असल्यासारखा वागत होता. आम्ही त्याला ‘नोएल’ असं नाव दिल. नोएल म्हणजे नाताळ, नोएल म्हणजे नाविन्य, नोएल म्हणजे अंधारावर मात करणारा प्रकाशाचा किरण.आमच्या चिनी मित्रमंडळींकडे, शेजार्‍यापाजार्‍यांकडे त्याच्याबद्दल चौकशी केली. पण कुणीच त्याला कधीही पाहिलं नव्हतं. जर ते त्याला ओळखत असले तरी त्यांनी तसं दाखवलं मात्र नाही. त्यालाही त्या संध्याकाळपूर्वीचं काहीही आठवत नव्हतं. तो खूप भुकेला होता आणि अशात त्याला कुणीतरी आमच्या घराचं दार ठोठावायला सांगितलं, एवढंच तो सांगू शकला. अर्थातच, तो बालयेशू असावा अशी माझी काही भाबडी समजूत नव्हती. पण त्याला पाहून नेहमीच बालयेशूची आठवण व्हायची, अगदी तो मरेपर्यंत. त्यालाही ऐन तारुण्यातच मृत्यूने कवटाळलं.आणि तेही अशा परिस्थितीत, की त्याचा मृत्यु म्हणजे समाजोन्नतीसाठी केलेलं बलिदान ठरावं!
पण हे फार वर्षांनी घडलं. त्याआधीचा मोठा काळ त्याने आमच्यासोबत घालवला. शाळेत जाऊ लागला, मोठा होऊ लागला. त्याने कधीही कुणालाही त्रास दिल्याचं मला आठवत नाही. अभ्यास त्याच्या खास आवडीचा! लोक त्याच्याकडे आकर्षित होत. पण त्याला जवळचा मित्र असा कुणी नव्हताच! लोकांच्या घोळक्यात राहूनही तो काहीसा अलिप्त, सगळ्यांचा आवडता, सगळ्यांना मदत करणारा, पण अलिप्त!
वर्षं सरली तसं त्या लाघवी निरागस मुलाचं रुपांतर एका उंच, शिडशिडीत, बुद्धिमान तरुणात झालं. डॉक्टर बनण्याची त्याची इच्छा होती. ती त्याने पूर्णही केली. तो एक आदर्श डॉक्टर बनला. धनवानांप्रमाणेच निर्धनांची, दुर्बलांचीही काळजी घेणार्‍या, प्रेमाने सेवाशुश्रुषा करणार्‍या फार थोड्या डॉक्टरांपैकी एक! तो कधीच कुणाला उमजला नाही; मला वाटतं, मलाही नाही. तो पूर्णपणे निस्वार्थी होता, पीडितांच्या सेवाकार्यात त्याने स्वत:ला झोकून दिलं होतं. अजूनही तो पूर्वीसारखाच होता, मितभाषी, स्वत:शीच चिंतन-मनन करणारा, त्याचे डोळेही तसेच, विशाल आणि शांत! त्याच्या नाजूक हातांनी शल्यचिकित्सकाचं कौशल्य व सफाईदारपणा आत्मसात केला. त्याच्या आयुष्याचा मार्ग ठरला होता, आणि त्याच्या उदात्त अंत:करणावर विसंबून, आम्ही तो स्वीकारलाही होता.
आणि मग ते युद्ध पेटलं. चिनी समाजात दुफळी माजली. जिथे तिथे साम्यवाद्यांनी राष्ट्रवाद्यांविरुद्ध रान उठवलं. आमच्या शहरात तर हे दोन्ही गट नोएलवर चिडले होते, कारण तो त्याच्याकडे येणार्‍या प्रत्येक माणसाची सारख्याच सेवाभावाने काळजी घेत होता. रुग्ण कोणत्या पक्षाचा आहे याची त्याने कधी साधी विचारपूस देखिल केली नाही. अखेर साम्यवादी जिंकले आणि आम्हाला इतर अमेरिकनांप्रमाणे चीन सोडावं लागलं. त्याने आमच्याबरोबर यावं अशी माझी फार इच्छा होती. मी त्याची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला, त्याला अमेरिकेतल्या वैद्यकशास्त्राच्या उच्चशिक्षणाचं आमिष दाखवलं. पण तो बधला नाही. नम्रपणे हसत हसत त्याने नकार दिला.
‘मी माझ्या माणसांबरोबरच राहिलं पाहिजे, आतातर त्यांना माझी जास्तच गरज आहे.’
मी विरोधाचा प्रयत्न केला, ‘पण हे साम्यवादी तुला तुझ्या तत्त्वांप्रमाणे जगू देतील असं वाटतं तुला?’
पण व्यर्थ…तो म्हणाला,’कितीही झालं तरी मी एक डॉक्टर आहे. त्यांना माझी गरज आहे. तेव्हा ते मला त्रास देऊ शकत नाहीत.’

आणि अशाप्रकारे आमची ताटातूट झाली. माझ्या धाकट्या भावालाच मागे टाकून मी चाललेय अशी भावना माझ्या मनात दाटून आली. सुरुवातीला आमच्यात पत्रव्यवहार चालू होता, पण नंतर तो थांबवण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला. कारण अमेरिकेहून पत्र आलेलं पाहून साम्यावाद्यांनी त्याच्यावर संशय घेतला असता आणि चीनहून पत्र आलेलं पाहून मी संशयित ठरले असते .
त्यानंतर काही वर्षांनी मला त्याच्या मृत्युचा वृत्तांत कळला. आमचा एक मित्र चीनहून पळून आला आणि मला भेटल्यावर त्याने मला सांगितलं. नोएल एकटा राहत असे. स्वत:ला कामात गाडून घेऊन तो स्वत:चेच हाल करून घेत होता. आजुबाजुच्या
शेकडो मैलांच्या परिसरात तो एकमेव डॉक्टर होता. लांबलांबून त्याच्याकडे लोक येत, त्यात राष्ट्रवादी व साम्यवादी दोन्ही गटांच्या सैनिकांचा भरणा अधिक होता. साम्यवाद्यांनी जिंकल्याच्या गुर्मीत त्याला धमकावलंही होतं- त्याने फक्त त्यांच्याच सैनिकांवर उपचार करावेत म्हणून. त्यावर तो हसला होता व काहीच न बोलता पुन्हा जो येईल त्याच्या शुश्रुषा करण्यात गढून गेला.

एका रात्री तो झोपलेला असताना, त्याला बोलवायला तीन माणसं आली. ती माणसं साधीशीच दिसत होती. जवळच राहणार्‍या एका आजारी माणसाला तपासण्यासाठी त्याला न्यायला आली होती. त्याने तत्परतेने आपला कोट अंगावर चढवला आणि त्यांच्याबरोबर घराबाहेर पडला. पुढच्या वळणावर वळल्यावर त्या तिघांनी घात केला , त्याला गोळी घातली. त्याचा जागीच अंत झाला.

मला कळलं ते एवढंच. पण आज, या क्षणाला मला तीव्रतेने आठवतो आहे, तो त्याचा मृत्यु नव्हे, माझ्या नजरेसमोर येतोय तो, एक लहानगा, खूप खूप वर्षांपूर्वी एका नाताळच्या आदल्या रात्री माझ्या दारावर थडकलेला, नाव-गाव-पूर्वेतिहास सगळ्याला पारखा!

Advertisements

१ प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Madhuri
    नोव्हेंबर 19, 2009 @ 07:23:47

    Hi friend!

    Mala kalach tujha blog sapadala aani khoop awadal suddha. Tu anuwad kharach chhan kartes. Ha war kelela anuwad pan chaan ahe. Hi story aamhala 12th la englishchya textbook madhe hoti. Wachun june diwas athawale. Asech aanakhi chhan anuwad karat raha. Shubhechha!

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: