देहदंड

खरं म्हणजे ह्या कथेला अनुवाद / स्वैरअनुवाद/ रुपांतरण/ स्वतंत्र कथा किंवा चक्क चोरी यापैकी काय म्हणावे ते मला कळत नाहीये. इथे मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. ही कथा आधारलेली आहे मार्क ट्वेनलिखित The Death Disk ह्या सत्यकथेवर! ही घटना घडली कॉमनवेल्थच्या काळातील हुकूमशहा ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या कारकिर्दीत. त्याला मराठीत आणताना महाराज अशी बिननावाची एक काल्पनिक व्यक्ती मी योजली आहे. —————————————–

देहदंड

आभाळ झाकोळून आलं होतं. ढगांनाच पावसाचा भार सहन होत नव्हता. पण तरी त्यांनी पावसाच्या रेट्याला कसाबसा बांध घातला होता. कारण पावसाची निराधार वेलींना झोडपण्याची, निष्पाप फुलांना चुरगाळण्याची, सगळं सगळं वाहून नेण्याची खुमखुमी त्यांना चांगलीच ठाऊक होती. या प्रयत्नांत होणारा ढगांचा गडगडाट , विजांचा लखलखाट सारी सृष्टी श्वास रोखून निस्तब्धपणे पाहत होती. रुक्मिणी खिडकीत उभी राहून मूकपणे हे सगळं बघत होती. बाहेरचं आभाळ तरी अजून शाबूत होतं, घरातलं मात्र उसवलं होतं. ठिगळं लावणार तरी किती अन् कुठे? आतापर्यंत दाबून ठेवलेला उमाळा एकदम वर आला. आणि ती खिडकीच्या गजांवर डोके टेकवून रडू लागली. तिचा भावनावेग ओसरेपर्यंत तिचा नवरा कृष्णाजी तिला थोपटत राहिला मग म्हणाला,

“अगं वेडे, काय मनाला लावून घेतेस एवढं? तुझा हा मर्द मराठा नवरा रणांगणावरच शहीद झाला असं समज. हे बघ, तू एका मावळ्याची शूर बायको आहेस. धिराने घेतलं पाहिजे तुला हे सगळं.”

हे वाक्य ऐकता क्षणीच रुक्मिणीने डोकं वर उचललं आणि डोळे पुसून ती पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली.

“हे बघ दादाला पत्र टाकलं आहे. माझ्यानंतर तुम्हा दोघींची सारी व्यवस्था तो बघेल. आणि महाराजही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत.”

“नाव काढू नका त्या महाराजांचं.” रुक्मिणी एकाएकी उसळली. “तुम्ही इतकी वर्षं त्यांची, या मुलुखाची सेवा केलीत. हातातल्या बळाच्या जोरावर जुमलेदाराचे सरनौबत झालात. आणि आता….. आता एका एवढ्याश्या चुकीने तुम्ही त्यांना नकोसे झालात? तेही इतके की त्यांनी तुम्हाला तोफेच्या तोंडी द्यायचं फर्मान काढावं?”

“रुक्मिणी…….एक शब्द बोलू नकोस महाराजांविरुद्ध. जन्मभर त्यांचीच चाकरी केली आहे मी. माझी आताची चूक ही चूक नव्हती तर अक्षम्य गुन्हा होता आणि म्हणूनच………”

पण त्याचं बोलणं अपूरंच राहिलं कारण “अय्या, बाबा तुम्ही आलात?” असं म्हणत ७ वर्षांच्या एका चिमुरडीने धावत येऊन त्याच्या पायांना विळखा घातला होता. तिला पाहून कृष्णाजीला एकदम वात्सल्याचं भरतं आलं. त्याने तिला एकदा डोळे भरून पाहून घेतलं. ८ महिन्यांपूर्वी तो मोहिमेला निघाला होता, त्याहून आता ती थोडी वेगळी दिसत होती. उंची वाढली होती. तिला कुरवाळत त्याने तिचे पटापट मुके घेतले. ती बिचारी तर एकदम भांबावूनच गेली.

“हे हो काय बाबा? माझे केस विस्कटतील ना!”

“अचं का? बरं बरं चिमणाबाई, नाही हो आम्ही तुमचे मुके घेणार.” असं म्हणून त्याने तिला कडेवरून उतरवलं व रुसल्याचं नाटक करत भिंतीला टेकून बसला.

“असं काय हो बाबा, चुकून बोलले. नाही बोलणार पुन्हा असं”

कृष्णाजीने तोंड दुसरीकडे फिरवलं. आता मात्र त्या छोट्याश्या ‘सखुला’ अगदी रडू रडू झालं आपल्यामुळे बाबा रुसले असं वाटून तिने भीत भीत आईकडे पाहिलं तर आईही रडत होती. आता तर तिला अगदी कसंसंच होऊ लागलं. तिने आपली रडवेली नजर पुन्हा बाबांकडे वळवली तर ते आपले गालातल्या गालात हसत तिच्याकडेच पाहत होते. आता त्यांचा कावा तिच्या लक्षात आला आणि ती गाल फुगवत म्हणाली,”आम्ही नाही जा, तुम्ही नेहमी आम्हाला चिडवता.”

तिच्या गोबऱ्या गालांचा गालगुच्चा घेत कृष्णाजीने तिला पुन्हा जवळ ओढलं व म्हणाला ,”बरं बाईसाहेब, नाही हं चिडवणार आम्ही तुम्हाला.”

“खोटं, तुम्ही खोटारडेच आहात. नेहमी असं म्हणता आणि परत परत मला चिडवता.”

त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत सखु म्हणाली. तर त्याने तिल पुन्हा पोटाशी धरलं आणि स्वतःचे कान पकडून विचारलं”चुक झाली बाईसाहेब, सांगा काय शिक्षा आहे आम्हाला? कान पकडून उठाबशा काढू?” या विचारासरशी ती खुदकन हसली व त्याच्या गळ्यात पडत म्हणाली,

” नको. मी सांगू काय करायचं…… अं……. तुम्ही किनई मला एक गोष्ट सांगा.”

“गोष्ट?” असं तो विचारणार इतक्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. आत वळलेली रुक्मिणी पुन्हा एकदा खिडकीशी धावली. भेदरलेल्या डोळ्यांनी पुन्हा रस्त्याकडे पाहू लागली. २-३ पाईक समोरून चालले होते. पण त्यांच्या घराकडे न वळता तसेच सरळ चालत गेले. रुक्मिणीने एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. कृष्णाजी काय ते समजला. त्याच्याकडे वेळ फार कमी होता. त्याने विचारलं,” गोष्ट? कोणती गोष्ट? आटपाट नगराची की भुताची की दूसरी एखादी?”

थोडा विचार करून सखु म्हणाली, “नको ,बाबा तुम्ही तुमच्या मोहिमेची गोष्ट सांगा ना.”

ते ऐकून कृष्णाजी कडवटपणे हसला पण लगेच ‘सांगतो’ असंही म्हणाला.सखुने आईला खाली बसायला सांगितलं आणि तिच्या मांडीत सावरू न बसत म्हणाली ,”हं करा सुरु.”

त्या परिस्थितीतही कृष्णाजीला हसू फुटलं. एवढी चुरू चुरू बोलणारी आपली ही लेक, आपल्यानंतर हिचं कसं होईल? पैशाची तर ददात पडणार नाही, पण बापाच्या प्रेमाचं काय? या विचारासरशी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. सखुच्या ”सांगा ना हो बाबा” या आर्जवाने तो भानावर आला. डोळ्यात भरून आलेलं पाणी मागे रेटत मग तोही गोष्ट सांगायला सरसावून बसला. “आताच काही दिवसांपूर्वीची गोष्ट! आम्ही गेलो होतो वाईला- मोहिमेवर. आणि तिथे आमचा गनिमांशी सामना झाला.”

“गनिम म्हणजे काय हो बाबा?”

“गनिम म्हणजे शत्रू बेटा. मग त्यांच्याशी लढाई सुरू झाली. आपले मावळे संख्येने खूप कमी होते. लढाई जिंकणं पुढच्या दृष्टीने चांगलं नव्हतं. पण त्या मावळ्यांना तर वाचवायचं होतं. म्हणून मग तीन सरनौबतांना आपापल्या तुकड्या घेऊन गनिमांवर मागून हल्ला करण्याची सेनापतीने आज्ञा दिली. जेणकरून त्यांना कोंडीत पकडता येईल.”

सखुला काही कळलंसं वाटत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिह्न उभं राहिलं होतं. आईला काही कळलं का ते बघायला तिने मान वर केली तर ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडत होती. सखु आईचे गाल कुरवाळत म्हणाली, “आई, अशी कशी गं तू भित्री भागुबाई? बाबा एवढे जाऊन लढाई करतात आणि तू लढाईचं नाव ऐकूनच रडतेस?”

सखुच्या निरागस डोळ्यांतून तिची नाराजी स्पष्ट दिसत होती. आतापर्यंत रुक्मिणीच्या मनात घोळणारे आत्महत्येचे विचार सखुच्या या प्रश्नाने जणू हवेतच विरून गेले नाही ,या लेकरासाठी जगायला हवं मला. “नाही रडणार गं पोरी.”

असं म्हणून ती आणखी जोरजोरात हुंदके देऊन रडू लागली. कृष्णाजी तिला हलकेच थोपटू लागला. मानेवरची टांगती तलवार दोघांनाही स्पष्ट दिसत होती. पण तरीही उसनं बळ आणून कृष्णाजी म्हणाला, “मग काय झालं माहितीये का गं सखु? त्या तीन सरनौबतांनी गनिमांवर मागून हल्ला चढवला. अपेक्षेप्रमाणे गनिम गोंधळला व पुढच्या मावळ्यांवरची त्याची पकड ढिली झाली. ते मावळे मग सुखरूप छावणीत परतले. पण या तिघा सरनौबतांनी मात्र उत्साहाच्या भरात करू नये ते केलं. गनिमांना केवळ घाबरवण्याचं काम त्यांना दिलं होतं, पण त्यांनी तर गनिमांना हरवून टाकलं.”

सखुने आनंदाने टाळ्या पिटल्या, “गनिम हरले, गनिम हरले”

कृष्णाजीचा चेहरा मात्र दुःखाने काळवंडून गेला. “नाही बाळ, ही आनंदाची गोष्ट नव्हे. गनिमाला इतक्यात हरवून सतर्क करणं परवडणारं नव्हतं, म्हणून मग महाराज त्या तीन सरनौबतांवर रागावले.”

सखुला अजूनही काही उमजत नव्हतं. गनिम हरले पण ते हरायला नको होते एवढंच तिला कळलं ” मग काय झालं बाबा?”तिनं विचारलं.

“महाराज त्यांच्यावर खूप चिडले.”

“महाराज…..” सखुला काहीतरी आठवत होतं, “महाराज म्हणजे, गडावर राहणारे ते ना उंचसे? तुम्ही सगळे मोहिमेवर गेलात तेव्हा किनई ते या रस्त्यावरून गेले होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं. सगळे त्यांना खूप खूप घाबरतात पण मी नाही घाबरले. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा. मी त्यांच्याकडे पाहून हसले तर ते पण हसले. बाबा ते किनई फार फार छान आहेत, त्यांचा राग लगेच जाईल.”

सखुच्या आईने एक जोरदार हुंदका दिला. सखु उठून तिचे डोळे पुसत म्हणाली,” आई नको गं रडूस. मी सांगते ना तुला, महाराजांचा राग अस्सा पळून जाईल बघ!”

“महाराजांनी त्यांना तोफेच्या तोंडी द्यायचं फर्मान काढलं आहे.”

सखुला अर्थातच या शिक्षेतलं गांभीर्य कळलं नाही. “त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची खूप मनधरणी केली,की हे बरोबर नाही. इतर सैन्याला धडा शिकवायचाच असेल, तर कुणा एकालाच मृत्युदंड व्हायला हवा. तिघांना का? होना करत शेवटी महाराजांनी हे म्हणणं मानलं.” कृष्णाजी स्वतःशीच बोलत होता.

“मृत्युदंड म्हणजे काय हो बाबा?”

“त्या माणसाला शिक्षा म्हणून देवाघरी पाठवणार राजा. त्या तिघांपैकी कुणाला पाठवायचं ते आज ठरवणार.”

” कसं हो बाबा? ‘अटकमटक चवळीचटक’ करून?” तिच्या त्या निरागस प्रश्नाने त्याचं काळीज पुन्हा हेलावलं. पण त्याच्यावर उत्तर देण्याची वेळ कधी आलीच नाही. दरवाज्यावर जोरजोरात टकटक होत होती.

“दार उघडा”

रुक्मिणीने सखुला उराशी गच्च कवटाळलं आणि भयचकित नजरेने दरवाज्याकडे पाहू लागली. उठण्यापूर्वी कृष्णाजीने काही क्षण डोळे मिटले. मन काबूत आणलं आणि मगच पाईकांना सामोरा गेला. पाईकांनी त्याला महाराजांचं फर्मान ऐकवून दाखवलं. ते ऐकून घेताना त्याच्या चेहऱ्यावरची एकही रेषा हलली नव्हती. जाताना त्याने एकवार मागे वळून पाहिलं. डोळ्यांनीच रुक्मिणीचा निरोप घेतला. सखुच्या कपाळावर ओठ टेकले व एक शब्दही न बोलता पाईकांच्या बरोबर चालू लागला. रुक्मिणी मागोमाग उंबरठ्यापर्यंत धावली. कृष्णाजी नजरेआड व्हायला आणि आभाळ फाटायला एकच गाठ पडली. पाऊस आडवा तिडवा कोसळू लागला. इकडे रुक्मिणी चक्कर येऊन उंबरठ्यातच कोसळली होती.

आता बाहेर लख्खं उन्ह पडलं होतं. जागोजागी पाण्याची छोटीछोटी तळी साचली होती. अश्याच एका तळ्यात सखु कागदाच्या होड्या करून सोडत होती. पण ते लवकरच कंटाळली. कारण आईला बरं वाटत नव्हतं. तिची काळजी घ्यायला शेजारीपाजारी जमले होते त्यात हिची लुडबुड नको म्हणून हिला बाहेर घालवण्यात आलं होतं.

खरं म्हणजे ह्याचा सखुला राग आला होता. बाबा आले कामाहून की त्यांच्याकडे या सगळ्यांची तक्रार करायची, असं तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं. पण बाबा येणार तरी कधी? काल रात्रीपासून गेलेत ते अजून आलेले नाहीत. आईला बरं नाही असं सांगितलं तर ते पटकन परत येतील, या सगळ्यांना घालवून टाकतील मग आईसुद्धा बरी होईल. मग आम्ही तिघं मजा करू. आपल्याच अश्या विचारांवर सखु जाम खूष झाली. बाबांपर्यंत ही बातमी आपणच पोचवली पाहिजे असं ठरवून ती उठली.बाबा गडावर गेलेत, हे तिला माहित होतं. घरात कुणालाही न सांगता गुपचूप ती सटकली आणि गडाच्या दिशेने चालू लागली.

महाराज आपल्या दालनात येरझाऱ्या घालत होते. त्या तिघा सरनौबतांपैकी कुणाला देहदंड ठोठावायचा हा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. त्या तिघांनी मात्र या निर्णयाला विरोध केला होता. “मरू तर तिघे एकत्रच, कारण चढाईचा निर्णय तिघांचा होता.”

असं बाणेदार उत्तर त्या तिघांनी पाठवलं होतं.महाराजांना त्यांचा फार अभिमान वाटत होता. असे निधड्या छातीचे लोक आपण बाळगले म्हणून हे राज्य उभं राहिलं , हे त्यांना जाणवत होतं.पण पुन्हा कुणी अशी चुक करू नये म्हणून त्यांना धडा शिकवणंही गरजेचं होतं. शेवटी काही वेळाने काहीतरी ठरवून ते बाहेर आले. त्या तिघांना बाजूच्या दालनात एका रांगेत पाठमोरं उभं करण्याची आज्ञा त्यांनी पाईकांना दिली. आणि दुसऱ्या एका पाईकाला खाली गावात उतरून पहिलं दिसेल ते लहान मूल वर आणायला सांगितलं. आणि महाराज पुन्हा येरझाऱ्या घालू लागले. आपण करतोय ते बरोबर आहे ना, ही चिंता त्यांचं काळीज पोखरत होती.

मूल शोधायला गेलेल्या पाईकाला गडाच्या पायथ्याशीच एक चिमुरडी दिसली. परकराचा काचा मारून गडाचे अवघड चढायची तिची मोठी शिकस्त चालली होती. तो लगबगीने तिच्याकडे गेला. तिला तशीच कडेवर घेतली आणि पळाला गडाकडे.

“महाराज” असं म्हणून त्याने महाराजांचं लक्ष वेधून घेतलं. त्या मुलीला त्यांच्या पुढ्यात उभं करून तीन वेळा लवून कुर्निसात केला आणि मागच्या मागे बाहेर पडला. त्या मुलीला महाराज क्षणभर न्याहाळतच राहिले. परकराचा काचा मारलेला, केस अस्ताव्यस्त विस्कटलेले, मातीचे हात गालाला लागून गाल खराब झालेले. एवढ्या मोठ्या दालनात येऊन तीही बिचकली होती. महाराजांना ही लहानगी मुलगी खूपच आवडली. त्यांनी तिला कडेवर उचललं आणि तिचं नाव विचारलं.

“सखु”

“बरं सखुबाई, तुम्हाला एक गंमत सांगू? तुम्ही फार फार गोड दिसता.”

“खरं?”

आपली स्तुती तीही खुद्द महाराजांकडून ऐकून तिची कळी खुलली आणि टकळी सुरू झाली.

“महाराज, तुम्हाला माहितीये? मी शूरपण आहे. त्यादिवशी तुम्ही आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जात होतात ना, तेव्हा किनई मी खिडकीत उभी होते. तुम्हाला सगळे घाबरले पण मी नाही घाबरले.”

“शाब्बास!”

“आणि……..आणि मी तुमच्याकडे पाहून हसलेदेखिल. मग तुम्हीही माझ्याकडे बघून हसलात, आठवतं तुम्हाला?”

महाराजांनी आठवण्याचं नाटक केलं.

“अहो, त्यादिवशी मी ते नाही का, नारळी रंगाचं परकरपोलकं घातलं होतं.”

तरी आपले महाराज गप्पच!

“जरीकाठाचं……?”

तिचा हिरमुसलेला चेहरा महाराजांना पाहवला नाही.

“माफी असावी , सखुबाई. पण यापुढे आम्ही तुम्हाला अजिबात विसरणार नाही. तुम्ही तर थेट आमच्या रेणुकेसारख्या दिसता…….” असं म्हणताना क्षणभर त्यांना गहिवरून आलं. त्यांची मुलगी रेणुका ५-६ वर्षांची असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली होती.

“शप्पथ?”

सखुच्या प्रश्नाने महाराज भूतकाळातून वर्तमानात आले. चिमटीत आपला गळा पकडून ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होती. हसत हसत त्यांनी देखिल आपल्या गळ्याचे कातडी चिमटीत ओढली आणि “शप्पथ” असं म्हणाले. तसं करताना त्यांच्या बोटातली राजमुद्रेची अंगठी विलक्षण चमकली.

“अय्या, हे काय आहे?” सखु राजमुद्रा पहिल्यांदाच पाहत होती.

“ही………. ही आमची अंगठी आहे.”

“किती सुंदर आहे!”

“आवडली?”

“खूप”

“बरं, मग माझं एक काम कराल का?”

“सांगा ना !”

महाराजांचं काम आपण करणार या विचाराने तिला एकदम स्वतःचा अभिमान वाटू लागला. महाराजांनी तिला कडेवरून खाली उतरवलं. तिचा पेहराव ठीकठाक केला. आणि ती अंगठी काढून तिच्या हातात दिली.

“बाजूला तो पडदा आहे ना, त्याच्यामागचं दार उघडून आत जा. तिथे तिघेजण पाठमोरे उभे असतील आणि त्यांनी आपले हात पाठीमागे ओंजळीसारखे पसरलेले असतील. त्यापैकी कुणाही एकाच्या हातात ही अंगठी ठेवाल?”

सखुने मान हलवली.तिची नजर त्या अंगठीवरून हटतच नव्हती. ती त्या दालनात गेली आणि एक बोट गालावर ठेवून तिने त्या तिघांकडे एकवार पाहिलं.

“अरे हे तर बाबा” तिने मनात म्हटलं.

कृष्णाजीची पाठमोरी आकृती तिने बरोबर ओळखली. ही छानदार अंगठी आपण त्यांनाच द्यायची. आनंदाने ती जाऊन कृष्णाजीला बिलगली; “बाबा, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय!” असं म्हणत तिने ती अंगठी त्याच्या ओंजळीत टाकली.

दारातून आत येणारे महाराज थबकले. दालनातल्या सगळ्यांच्या नजरा कृष्णाजीवरून महाराजांवर आळीपाळीने फिरू लागल्या. कृष्णाजी आपल्या मुलीला भेटायला वळला तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. थरथरत्या हातांनी त्याने तिला पंखाखाली घेतलं……… शेवटचं! महाराज जागच्या जागीच थिजले होते.

“चला बाबा, मी तुम्हाला न्यायला आलेय. तुम्ही गेल्यापासून आई खूप आजारी पडलीये. तुम्ही चला ना, मग ती ठीक होईल.”

“हे…. हे तुमचे बाबा आहेत?” महाराज कसेबसे पुटपुटले.

“हो”

इतक्यात दोन पाईक पुढे झाले व कृष्णाजीला घेऊन जाऊ लागले.

“कुठे घेऊन चाललात त्यांना?”

पाईकांना काय उत्तर द्यावं, काहीच उमजेना. असहायपणे ते तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागले. ते काही बोलत नाहीसं पाहून मग तिने आपला मोर्चा महाराजांकडे वळवला. “बघा ना महाराज, ते लोक त्यांना घेऊन चाललेत. त्यांना सांगा ना माझ्या बाबांना सोडायला. मी त्यांना न्यायला आलेय.”

महाराजांची मुद्रा झाकोळली. “ते शक्य नाही.”

“शक्य नाही? असं कसं? तुम्ही महाराज आहात. तुम्ही सांगितलं तर तुमची आज्ञा त्यांना ऐकावीच लागेल.”

“अरे देवा! हे काय करून बसलो मी?” महाराजांना काहीच सुचेना. सखु मात्र एव्हाना रडकुंडीला आली होती. अखेरचा उपाय म्हणून तिने आपलं अश्रूंचं शस्त्र उपसलं. रडत रडत म्हणाली, “पण तुम्ही म्हणालात मी रेणुकेसारखी दिसते……. माझं ऐकायलाच हवं तुम्हाला.”

महाराज एकदम चमकले. हळू हळू चालत जाऊन ते खिडकीपाशी उभे राहिले. दोन मिनिटे डोळे बंद करून चिंतन केल्यावर त्यांनी अखेर डोळे उघडले.बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाकडे पाहत गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, “देवा तुझी लीला अगाध आहे. आज माझ्या हातून एक मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच तू मला थांबवलंस.”

आत वळण्यापूर्वी त्यांनी डोळ्यातून गालावर ओघळणारा एकुलता एक अश्रू हाताने निपटला व निश्चयाने पाईकांना फर्मावलं,” सोडा त्या तिघांना, देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.”

१ प्रतिक्रिया (+add yours?)

 1. मिलिंद भांडारकर
  मे 26, 2006 @ 17:35:04

  छान!
  अनुवाद या वाङमयप्रकाराला म्हणावा तसा अादर अापल्याकडे मिळत नाही. ते मी लवकरच बदलण्याचा माझ्या परीने प्रयत्न करणार अाहे. घोषणे ची वाट बघत रहा 🙂

  – मिलिंद

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: