Feeds:
Posts
Comments

आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमके काय होते? आपल्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, lyrinx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. ही सर्व प्रक्रिया चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे भांडे बनवण्यासारखी वाटते मला. त्या मातीच्या गोळ्याला कसा हाताने वेगवेगळ्या ठिकाणी दाब देऊन आकार दिला जातो, हात जवळ ठेऊन दाब दिल्यास चिंचोळ्या मानेचे सुरईसदृश भांडे तयार होते, तेच वेगळ्या तर्‍हेने दाब दिल्यास बसके, पसरट भांडे बनते! उच्चाराचेही तसेच आहे. हवा तीच, पण पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

ही प्रक्रिया आणखी स्पष्ट होण्यासाठी आपण खालील चित्र पाहू.

Vocal tract

vocal tract

या चित्रात आपल्याला vocal tract म्हणजे उच्चारक्रियेत जे जे अवयव भाग घेतात ते सर्व अवयव दिसत आहेत. या चित्रात दाखवले गेलेले सर्वच अवयव आपण मराठी बोलताना वापरत नाही. आपण वापरतो ते velum म्हणजे पडजीभ, palate म्हणजे टाळू, nasal cavity म्हणजे नासिका विवर, lips म्हणजे ओठ, teeth म्हणजे दात, tip of the tongue म्हणजे जिभेचे टोक, body of the tongue म्हणजे जिभेचा मधला भाग, root of the tongue म्हणजे जिभेची मागची बाजू हे. pharynx, lyrinx इत्यादि अवयव तर वापरले जातातच. पण पडजीभेच्या मागचा भाग ज्याला uvula असे नाव दिले आहे (चित्रात हा भाग दाखवलेला नाही), तो भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो, असे म्हणतात. जसे- क़, ख़, ग़ वगैरे. उर्दूभाषिक व्यक्ती हे चूक की बरोबर ते सांगू शकेल.

या सर्व अवयवांना articulators असे म्हणतात. आपण त्यांना उच्चारक म्हणू. वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून आपण बरेच वेगवेगळे उच्चार करतो. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार आपण ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

१-कण्ठ्य – पडजीभ व जीभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण- जसे क्,ख्, ग्, घ्, ङ्
२-तालव्य – टाळू व जीभ यांचा एकमेकांशी स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण- जसे च्, छ्, ज्, झ्, ञ्, श्
३-मूर्धन्य – या प्रकारातही टाळू व जीभ यांचाच एकमेकांना स्पर्श होतो, पण वेगळ्या प्रकारे. तालव्याच्या वेळी आपली जीभ सरळ , समोरच्या दिशेला असते. तर मूर्धन्याच्या वेळी जीभ थोडी आतल्या बाजूच्या दिशेने वळवून घेतली जाते. जसे- ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ष्
४-दन्त्य – दातांना जीभेचा स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण- जसे त्, थ्, द्, ध्, न्,स्
५-ओष्ठ्य – दोन्ही ओठ एकत्र येऊन त्यांचा स्पर्श झाल्यास निर्माण होणारे वर्ण- जसे प्, फ्, ब्, भ्, म्

इथे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, दन्त हा उच्चारक आहे व त्याचा जीभेशी संयोग करून उच्चारल्या जाणार्‍या व्यंजनाला दन्त्य व्यंजन असे म्हणतात. हेच इतर प्रकारांनाही लागू होते.

uvula सारखाच आणखी एक उच्चारकही आपण वापरत नाही तो म्हणजे alveolar ridge. हा उच्चारक तोंडाच्या आतील बाजूस दातांच्या वर आहे.- त्याच्या व जीभेच्या टोकाच्या संयोगातून ट्, ठ्, ड्, ढ् हे इंग्रजी भाषेतले उच्चार निर्माण होतात. हे वर्ण आपल्या ट्, ठ्, ड्, ढ् हून वेगळे आहेत, कारण दोन्ही भाषांत वेगवेगळ्या अवयवांच्या संयोगातून ते निर्माण झाले आहेत. दोन्हीं वर्णगटांचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करून पाहिल्यास, त्यांतला फरक लक्षात येईल.

आता आपण पाहिलेली माहिती एका तक्त्यात मांडून आपण पाहू, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे ते आपल्या लक्षात येईल.

क् ख् ग् घ् ङ् - कण्ठ्य
च् छ् ज् झ् ञ् श् तालव्य
ट् ठ् ड् ढ् ण् ष् मूर्धन्य
त् थ् द् ध् न् स् दन्त्य
प् फ् ब् भ् म् - ओष्ट्य

ज्यांना ही दन्त्य वगैरे ‘प्रकरणे’ पूर्वी माहित नव्हती, किंवा माहिती होती पण त्यांचा अर्थ माहिती नव्हता (म्हणजे माझ्यासारखे लोक) त्यांना आता आपल्या वर्णमालेत पहिल्या ५-५ व्यंजनांच्या गटांच्या वर्गीकरणामागचे कारण कळले असेल. आता यावरून पुढे असा प्रश्न पडतो, की जर स्, श्, ष् हे ही या ५ पैकी ४ गटांत समाविष्ट होतात, तर मग त्यांना पहिल्या २५ व्यंजनांच्या बरोबरीने का ठेवले नाही? या व इतर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यंजनांबद्दल अधिक माहिती देणार्‍या पुढच्या भागात मिळेल.

गेल्या वेळी ‘श्’ व ‘ष्’ यांत फरक काय असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. सर्व वाचकांनी वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे लक्षात येईल.

काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की ‘इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?’ तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती. मी बेधडक उत्तर दिले- ‘संस्कृतभाषेत सर्व उच्चार असल्याने, आपल्या जिभेला आपण हवे तसे वळवू शकतो. परिणामी इतर कुठल्याही भाषेतले उच्चार आत्मसात करणे सोपे जाते.’ मजा म्हणजे प्रश्नकर्त्या व्यक्तीलाही हे उत्तर पटले. त्यानंतर २-३ वर्षांनी मी भाषाशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या अशा अनेक गैरसमजांना धडाधड सुरूंग लागत गेले.

आपणा सर्वांच्याच मनात असे अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ अक्षरांनाच उच्चार मानणे. जसे इंग्रजी भाषा शिकवताना आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलेले असते की या भाषेत ५ स्वर आहेत- a, e, i, o, u. पण ही तर केवळ अक्षरे झाली. उच्चारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मात्र या भाषेत ५-१० नाही तर चांगले २०च्या आसपास स्वर आहेत. याचाच अर्थ, आपण लिहितो ती अक्षरे व त्यांचे उच्चार यांत बराच फरक आहे.

दुसरा गैरसमज म्हणजे मी वरील प्रसंगात उल्लेखलेला ‘संस्कृतभाषेत सर्व उच्चार आहेत’ हा गैरसमज. कोणत्याही भाषेत जगातले सगळे उच्चार नसतात. संस्कृतभाषेत जे आहेत, ते सर्वच इंग्रजीत नाहीत (उदाहरणार्थ-’भ’) व इंग्रजी भाषेतले काही संस्कृतात नाहीत(उदाहरणार्थ- ‘ऍ’). या दोन्ही भाषांत नसलेले असे आणखी अनेक उच्चार आहेत, जे जगातल्या इतर भाषांत आहेत. त्यामुळे माझ्या वरच्या प्रसंगातल्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरत नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतभाषा ही इतर भाषांप्रमाणेच मानवनिर्मित आहे व तिला स्वतःच्या मर्यादा आहेत. पण आपण लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या भाषेत अनेक गमती जमती आहेत आणि त्या हेरून प्राचीन काळातल्या भाषाभ्यासकांनी तिचे स्वतंत्र तर्कसंगत शास्त्र निर्माण केले आहे. हे शास्त्र उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र अशा विविध पातळ्यांवर बांधले गेले आहे.

संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. ऋ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.

या लेखाचे प्रयोजन लेखमालेची थोडीशी पार्श्वभूमी देणे हे आहे. म्हणजे ही लेखमाला वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी जेव्हा थ्, द्, न् , आ अशी अक्षरे लिहीन तेव्हा त्यांकडे लिखित अक्षरे या दृष्टीने न पाहता, आपल्या मुखातून बाहेर पडणारे उच्चार या दृष्टीकोनातून पहावे. व्यंजने लिहिताना या लेखांत ती पाय मोडूनच (हलंताच्या चिह्नासह) लिहिलेली आहेत. याचे कारण म्हणजे त्या व्यंजनात कुठलाही स्वर मिसळलेला नाही, हे दाखवणे. उदाहरणार्थ्- ‘ण’ या उच्चारात ‘ण्’ आणि ‘अ’ हे दोन उच्चार आहेत, एक व्यंजन आणि एक स्वर आहे. हे टाळण्यासाठी हलन्त व्यंजने योजली जातील.

हे आणखी नीट समजून घेण्यासाठी अणू-रेणू सारखी संकल्पना लक्षात घेतलीत तरी चालेल. जसे ‘ण्’ हा एक अणू आहे. ‘अ’ हा दुसरा अणू आहे. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा ‘ण’ हा रेणू बनतो. त्याचप्रमाणे ‘क्ष’ हा ‘क्’, ‘ष्’, ‘अ’ या अणूंपासून बनलेला रेणू आहे तर ‘ज्ञ’ हा मराठीत आजच्या काळानुसार ‘द्’, ‘न्’, ‘य्’ या अणूंपासून बनलेला रेणू आहे. (आजच्या काळानुसार असे अशासाठी म्हटले की पूर्वीच्या काळी ‘ज्ञ’ या उच्चारात ‘ज्’ व ‘ञ्’ हे दोन उच्चार होते असे मानले जाते.) वर्णमालेत जरी आपण इतर व्यंजन-स्वरांसोबत ‘क्ष’ व ‘ज्ञ’ यांचाही समावेश करत असलो, तरीही आपल्याला फक्त ‘अणूं’त रस असल्याने, या दोन ‘रेणूं’चा विचार आपल्याला येथे करायचा नाही.

आणि सर्वांत महत्त्वाचे – मी जे काही थोडेफार वाचले व त्यातून मला वर्णमालेतील ज्या काही बाबींचा उलगडा झाला, त्या माझ्या कुवतीनुसार येथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मी या विषयातील तज्ज्ञ नसून केवळ एक विद्यार्थिनी आहे, त्यामुळे वाचकांच्या सर्वच प्रश्नांना मला उत्तरे देता येतील असे नाही. परंतू अशा प्रश्नांचे स्वागतच आहे, कारण असे प्रश्न उत्तरे शोधण्यासाठी विचारांना चालना देतील.

पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत- उच्चार करण्याच्या क्रियेत सहभागी असलेले विविध अवयव (vocal tract). तोवर मी येथे वर्णमाला देते आहे, जेणेकरून ज्यांना पाठ नसेल त्यांना वर्णमालेवर विचार करता येईल.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ

क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ्
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्
प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्

स्, श्, ष्, ह्

ळ्

मी सिरीयसली, नीट विचार करून केलेला सर्वांत पहिला अनुवाद हा “The Adventure of The Reigate Squires” या होम्सकथेचा. हा अनुवाद मी १२वीची परीक्षा आटपल्यानंतरच्या सुट्टीत केला होता. होम्स आणि गुन्ह्याचा तपास करणारा पोलीस यांच्या संवादशैलीत थोडा फरक दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात अनुवाद कसा झाला आहे, माहित नाही. (थोडाही फरक न करता तेव्हाचा अनुवाद जसाच्या तसा देते आहे.) अनुवादाचं नाव मात्र मोठं मजेशीर आहे. पण पहिलाच प्रयत्न असल्याने कृपया समजून घ्या, हसू नका बरे!

 

सुट्टीचा सदुपयोग

 

नेदरलँड-सुमात्रा कंपनीच्या घोटाळ्याचा पाठपुरावा केल्यामुळे शेरलॉक होम्सची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्या आजारपणातून तो बरा होण्यापूर्वीची ही घटना-

१८८७ सालच्या वसंताचा मौसम! होम्स लॉयन्स येथील एका हॉटेलात आजारी अवस्थेत पडला असल्याची बातमी सांगणारी तार १४ एप्रिल रोजी माझ्याकडे येऊन थडकली. २४ तासांच्या आत मी त्याच्या खोलीत हजर झालो. काळजी करण्याजोगी कोणतीच लक्षणे त्याच्या आजारात दिसत नाहीत, हे पाहून मला हायसे वाटले. त्याच्या रक्तातील लोहाचं प्रमाण मात्र खूपच खाली गेलं होतं. २ महिन्यांच्या अथक तपासाचा, कामाचा जबर ताणच अखेर त्याला भोवला! मागाहून मला कळले, की हे महाशय दिवसाला १५ तासांहून अधिक वेळ काम करायचे. एक-दोनदा तर सलग ५-५ दिवस काम केल्याचंही त्याने मजजवळ कबूल केलं. त्याच्या परिश्रमांचं अखेर चीज झालं खरं, पण त्यातून उद्भवणाऱ्या आजाराच्या तडाख्यातून काही तो सुटू शकला नाही.

साऱ्या युरोपभर ’शेरलॉक होम्स’ हे नाव मोठ्या आदराने दुमदुमत होतं. त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता. परंतू तरीही, कुठेतरी काहीतरी बिनसलं होतं. जिथे ३ देशांच्या पोलिसदलांनी हात टेकले, तिथे ह्या पठ्ठ्याने बाजी मारली होती. अशावेळी आनंद साजरा करायचं तर राहिलं दूरच, पण होम्सच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता झाकोळून आलेली मला दिसली.

३ दिवसांतच आम्ही दोघे बेकर स्ट्रीटवरच्या आमच्या घरी परतलो. पण होम्सची तब्येत सुधारण्याचे चिह्न दिसेना, तेव्हा त्यानेच आपणहून हवापालटासाठी बाहेर जाण्याचा उपाय सुचवला. वसंत ऋतूची वनश्री मलाही खुणावत होतीच! सरे परगण्यातील रायगेट भागात राहणाऱ्या कर्नल हायटर यांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं. त्यांनी मला व होम्सला त्यांच्या घरी येऊन राहण्याचं निमंत्रण बऱ्याचदा दिलं होतंच, ते आता स्वीकारायचं असं मी ठरवलं. होम्सची थोडी मनधरणी करावी लागली खरी, पण कर्नल अविवाहित व एकटा राहत असल्यामुळे होम्सच्या तेथिल वावरावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत, अशी जेव्हा त्याची खात्री पटली, तेव्हा एकदाचा तो तयार झाला! तो आठवडा संपण्याच्या आतच आम्ही कर्नलसाहेबांच्या घरी दाखल झालो.

कर्नलसाहेब व होम्सच्या स्वभाववैशिष्ट्यांत थोडे-फार साम्य असल्याने, त्यांचे सूते जुळायला वेळ लागला नाही. असंच एकदा, रात्रीच्या जेवणानंतर त्यांच्या अवजारखान्यात आम्ही एकत्र बसलो असता, कर्नलसाहेबांना एकदम काहीतरी आठवलं, ” अरे, मी विसरलोच होतो, यातलं एक पिस्तूल काही गडबड झाली, तर हाताशी असावं, म्हणून मला बरोबर घ्यायला हवं.”

“कसली गडबड?” इति मी.

“अहो, काय सांगू तुम्हाला, आमच्या भागावर सध्या दरोडेखोरांचं सावट आलं आहे. गेल्या सोमवारीच ऍक्टन या अत्यंत श्रीमंत माणसाचं घर फोडलं त्यांनी. अजून काही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.”

“काही सुगावा लागला का?” लगेच होम्सचे प्रश्न सुरू झाले.

“काहीच नाही! अहो, पण हा प्रकार तुमच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकरणे सोडवणाऱ्या महान गुप्तहेरासाठी अगदीच किरकोळ!” होम्सने ही प्रशंसा झटकून टाकली खरी, पण चेहऱ्यावरचं आनंदी हसू काही तो लपवू शकला नाही. ” त्या दरोडेखोराच्या हाती काही घबाड लागलं का?”

“छे हो! त्या चोरांनी सारी लायब्ररी पालथी घातली, पण डोंगर पोखरून उंदीर बाहेर आला! पोप व होमरची पुस्तके, सोन्याचं पाणी चढवलेले मेणबत्त्यांचे स्टँड्ज, हस्तिदंती गोटा, लाकडी बॅरोमीटर व दोऱ्याचा गुंडा वगळता, काहीच सापडलं नाही त्यांना.”

“वा, काय पण घबाड आहे!” मी उद्गारलो.

“हाती लागलं ते लांबवलं असेल बदमाशांनी.”

होम्स सोफ्यात बसूनच करवादला, “इथल्या पोलिसांनी याचा वेळच्या वेळी बंदोबस्त केलाच पाहिजे. धडधडीत दिसतंय की….”

“मी तोंडावर बोट ठेवून होम्सला सक्त ताकीद दिली, ” अरे बाबा, तू इथे विश्रांतीसाठी आला आहेस. कृपा करून त्या लफड्यात अडकून आपली उरली-सुरली शक्ती गमावून बसू नकोस!”

माझ्या एवढ्या धमकावणीपुढे होम्स करतोय काय? त्याने खांदे उडवून तो विषय तिथेच संपवला. आमची गप्पांची गाडी मग कमी धोकादायक विषयांच्या रुळावर वळली. पण माझ्या प्रयत्नांना यश यायचंच नव्हतं म्हणून म्हणा, किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे म्हणा, घटना अशा काही क्रमाने घडत गेल्या, की होम्स व त्याच्यामागून मीही त्या ’लफड्या’त आपसूकच ओढले गेलो. आमच्या वाटेवर हे असंही वळण उभं असेल, याचे मला कल्पनाच नव्हती!

दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ता घेत असतानाच, घरातील आचारी अगदी गोंधळलेल्या अवस्थेत तिथे पळत आला. धापा टाकत, तो कसे-बसे बोलला, ” साहेब, श्री. कनिंगहॅमकडची बातमी ऐकलीत का?”

“अरे देवा, अजून एक घरफोडी वाटतं!” कर्नलसाहेबांना शंका आली.

“घरफोडी नाही काही, खून!”

” काय? कुणाचा? ऍलेकचा की त्याच्या वडिलांचा?”

“नाही हो, दोघेही सुखरूप आहेत. खून झाला आहे, त्यांच्या गाडीवानाचा- विल्यमचा. गोळी थेट ह्रदयात घुसली. हू का चू करायलाही वेळ नाही मिळाला.”

“आणि गोळी कुणी झाडली?”

“दरोडेखोराने. तो लगेच तीरासारखा धावत सुटला आणि पसार झाला. त्याने आधी खिडकीची काच फोडली व तो आत घुसणार, इतक्यात विल्यमने त्याच्यावर हल्ला केला व आपल्या धन्याची संपत्ती वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण गमावले.”

“कधी घडलं हे सारं?”

“रात्रीच, बाराच्या सुमारास असेल.”

आचारी गेल्यावर, कर्नलसाहेब म्हणाले, “अरेरे, जाऊ दे, आपल्याला त्यात लक्ष घालण्याचं काहीच कारण नाही. कनिंगहॅम इथला सगळ्यात धनवान माणूस! स्वभावानेही बरा आहे, शिवाय विल्यम हा त्याचा जुना विश्वासू नोकरमाणूस. तो सगळ्याची बरोबर व्यवस्था लावेल. पण हे सारं कर्म त्या बदमाश दरोडेखोराचंच असणार!”

“तो अजब साठा जमवणाऱ्या दरोडेखोरांचं?” होम्सने शेरा मारला.

“वाटतंय तरी असंच”

“फारच चमत्कारिक दिसतंय हे प्रकरण, नाही का? एखादी मुरब्बी दरोडेखोरांची टोळी, सर्वसाधारणपणे एकाच गावातील दोन घरं थोडक्या दिवसांच्या अंतराने फोडत नाही कधी. माझी तर मगासपर्यंत अशी पक्की धारणा होती की ही घरफोडी शेवटची! पुन्हा काही बराच काळ इथे चोरी होणे नाही.”

“अहो इथलेच भुरटे चोर असतील. म्हणूनच तर ऍक्टन व कनिंगहॅम ही बडी प्रस्थं निवडली ना घरफोडीला!”

“सर्वांत श्रीमंत आहेत का हे दोघे?”

“तसंच काहीसं. पण त्यांच्या मागच्या कायद्याच्या तगाद्याने दोघे पार हवालदिल झाले आहेत. कनिंगहॅमच्या अर्ध्या मालमत्तेवर ऍक्टनने हक्क सांगितला आहे.”

“मग काही प्रश्नच उरला नाही. ठीक आहे मित्रा वॉटसन, या भानगडीत मी लुडबुड करणार नाही.” इतक्यात आचाऱ्याने दरवाजा उघडून इन्स्पेक्टर फॉरेस्टर आल्याची वर्दी दिली.

इतक्यात एक तरतरीत व उत्साही दिसणारा तरुण खोलीत शिरला. नमस्कार- चमत्कार झाल्यावर तो पुढे बोलू लागला. “व्यत्ययाबद्दल माफ करा पण लंडनचे प्रख्यात गुप्तहेर होम्स येथे आले असल्याचे मला कळले आहे.” कर्नलसाहेबांनी होम्सकडे बोट दाखवताच इन्स्पेक्टरने त्याला लवून अभिवादन केले. “आपण या प्रकरणात लक्ष घातलं तर फारच मदत होईल, होम्ससाहेब.”

होम्स हसत हसत म्हणाला, “मित्रा वॉटसन, एकंदर तुझं नशीब काही तुला साथ देणार नाहीसं दिसतंय. इस्पेक्टर, आमची या प्रकरणाबद्दलच चर्चा चालली होती. तुम्ही आम्हाला जरा त्याचे तपशील सांगाल का?” एवढं बोलून तो खूर्चीला रेलून त्याच्या नेहमीच्या पावित्र्यात बसला. आता होम्सची केस माझ्याच हाताबाहेर गेली, हे मला कळून चुकलं.

“ऍक्टनप्रकरणात आमच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते. पण या प्रकरणात मात्र बरेच मिळाले आहेत. दोन्ही गुन्हे एकाच व्यक्तीने केले आहेत हे नक्की! श्री. कनिंगहॅम व त्यांच्या मुलाने त्या गुंडाला पाहिलेही होते. पण गोळी झाडताच तो सुसाट वेगाने पळून जाऊन नाहीसा झाला. पावणेबारा वाजता ही घटना घडली. श्री. कनिंगहॅम नुकतेच अंथरुणावर पडले होते. तर श्री. ऍलेक धुम्रपान करीत होते. त्या दोघांनीही विल्यमची मदतीसाठी मारलेली हाक ऐकली. ऍलेक ताबडतोब जिना उतरून खाली आले. जिन्याच्या पायथ्याशी पोहोचताक्षणीच त्याने पाहिले की, २ पुरुषांची आपापसात झटापट चालली आहे. त्यांतील एकाने गोळी झाडली व दुसरा खाली पडला. ऍलेक विल्यमला वाचवण्यासाठी थांबले असता, त्या चोराला बागेच्या दिशेने पळून जायची संधी मिळाली. गडद रंगाचे कपडे घातलेला मध्यम बांध्याचा इसम एवढीच त्याची माहिती मिळू शकली. त्याच्याबद्दल कसून चौकशी सुरू आहे.”

“पण हा विल्यम तिथे काय करीत होता? मरण्यापूर्वी तो काही बोलला का?”

“काहीच नाही. तो एका खोलीत आपल्या आईबरोबर राहतो. अत्यंत प्रामाणिक व स्वामीनिष्ठ नोकर होता तो. त्यामुळे मालकाच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना, हे पहायला आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ऍक्टनप्रकरणामुळे सगळेच धास्तावले आहेत. त्या दरोडेखोराने कुलुप तोडून दरवाजा उघडला असेल, इतक्यात विल्यमने त्याच्यावर हल्ला चढवला असेल.”

“विल्यमने निघताना त्याच्या आईला काहीच सांगितलं नव्हतं का?”

“त्या खूप म्हाताऱ्या आहेत, शिवाय कानाने अधूही आहेत. इतक्या मोठ्या धक्क्यातून त्या अद्यापि सावरलेल्याही नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण नजरेखालून घालावी, असं मला वाटतं, हे पहा.” असं म्हणून त्याने कागदाचा एक छोटासा फाटका कपटा उलगडून दाखवला. “हा तुकडा मयताच्या हातात सापडला. एका मोठ्या कागदापासून फाडलेला हा तुकडा असावा असं वाटतं. तुमच्या लक्षात आलं असेलच, की ही घटना घडली, ती जागा व वेळ यावर नमूद केली आहे. खुन्याने तो कागद फाडून त्याच्याकडून हिसकावून घेतला असणार. भेट ठरवण्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीचा हा बाज वाटतो.”

होम्सने तो चिटोरा हातात घेतला.

“ही एक पूर्वनियोजित भेट होती, असं जर मानून चाललं, तर त्यातून एक नवीन तर्क लढवता येईल. तो असा, की विल्यम किर्वान हा जरी प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध असला, तरी तो या दरोडेखोराला मिळालेला होता. तो त्याला घटनेच्या जागी भेटला असावा. त्याने दरवाजा फोडण्यात त्याला मदतही केली असावी, आणि नंतर त्यांचा आपापसात वाद झाला असावा.” इन्स्पेक्टरने त्याचा तर्क सांगितला.

“ह्या चिटोऱ्यात काहीतरी सापडेलसं वाटतं. हं… एकंदर मला वाटलं होतं, तितका हा प्रकार साधा नाही!” होम्सने प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने आपल्या हातांवर डोके ठेवले व तो विचारमग्न झाला. आपल्या केसचा एका जगद्विख्यात गुप्तहेरावर झालेला परिणाम पाहून इन्स्पेक्टरला आनंद झाला.

“तुमचा सगळात शेवटचा, विल्यम व दरोडेखोरामधील संधानाचा तर्क काही अगदीच अशक्य नाही. पण हा चिटोरा….” पुन्हा एकदा तो विचारांत बुडाला. त्याने जेव्हा डोकं उचललं, तेव्हा मी पाहिलं,की त्याच्या डोळ्यांत पूर्वीसारखीच विलक्षण चमक आली होती. फिकटलेला चेहरा तरारला होता. सारी शक्ती जणु काही त्याच्या रोगजर्जर शरीरात परतली होती.

“मी या प्रकरणात नक्कीच लक्ष घालीन. या प्रकरणाने माझं कुतुहल चाळवलं आहे. कर्नलसाहेब, आपली परवानगी असेल, तर मी इन्स्पेक्टरबरोबर घटनास्थळी चक्कर मारून अर्ध्या तासात परत येतो. तुम्ही व वॉटसन इथेच थांबा.”

दीड तास उलटल्यावर इन्स्पेक्टर एकटेच आले. “होम्ससाहेब अंगणात इकडून तिकडे फेऱ्या मारीत आहेत. आपल्या सगळ्यांना त्यांनी तिथे बोलावले आहे.”

“पण कशाला?”

इन्स्पेक्टरने खांदे उडवत सांगितले,”मला माहित नाही. पण मला वाटतं होम्ससाहेब अजूनही बरे झाले नसावेत. ते फार विचित्र वागत आहेत.”

त्याला उत्तर देत मी म्हणालो,”घाबरू नका इन्स्पेक्टर. त्याच्या विक्षिप्तपणालाही कारणं असतात. हे अर्थातच माझे अनुभवाचे बोल!”

आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा होम्स खिशात हात घालून हनुवटी छातीला चिकटवून विचारमग्न अवस्थेत येरझाऱ्या घालत होता.

“वॉटसन, तुझी इथे हवापालटासाठी येण्याची कल्पना काही फारच टाकाऊ निघाली नाही. हे प्रकरण तर क्षणोक्षणी उत्कण्ठावर्धक होत चाललं आहे. मी सर्वप्रथम विल्यमचा मृतदेह पाहिला. पिस्तूलातून झाडलेल्या गोळीमुळेच त्याचा मृत्यू झाला हे नि:संशय!”

“म्हणजे, तुला त्याबाबत शंका होती की काय?”

“पण प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून घेतलेली काय वाईट? ती काही फुकट जायची नाही. मी मग कनिंगहॅम पितापुत्रांना भेटलो. दोघांनीही घटनास्थळ अगदी बरोबर दाखवलं. मग आम्ही त्या बिचाऱ्या विल्यमच्या आईला भेटायला गेलो. त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणा!”

“मग काही निष्कर्ष निघाला का?”

“ह्या प्रकरणात पाणी खोलवर मुरतंय ह्याची खात्री पटली. हा चिटोरा काहीतरी सुचवत आहे खास! यानेच विल्यमला मध्यरात्री घराबाहेर काढलं. पण याचा बाकीचा भाग गेला कुठे?”

“मी त्यासाठी जमीन काळजीपूर्वक तपासली.”- इन्स्पेक्टर.

“मयताच्या हातून हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात हा कागद फाटलेला आहे. हा कागद हाती लागण्यासाठी कोण बरं एवढी धडपड करत होता? आणि का? कदाचित हा चिटोरा पुढेमागे त्याच्या कुकर्माचा पुरावा ठरला असता. बरं, मग त्या माणसाने त्या कपट्याचं काय केलं असेल? बहुधा खिशात कोंबलं असेल. कागद फाटला आहे हे गडबडीत त्याच्या लक्षातही आलं नसेल. जर का आपल्याला हा उरलेला कागद मिळाला, तर हे प्रकरण कितीतरी पुढे जाईल!”

“पण तो मिळवणार कसा?”

“हं… चिठ्ठी त्या व्यक्तीने विल्यमला नक्कीच पोस्टाने पाठवली असणार.”

“मी केलेल्या चौकशीप्रमाणे काल दुपारी विल्यमला एक पत्र मिळाले होते. त्याने लिफाफा लगेच नष्ट केला होता.”

“शाब्बास! तू पोस्टापर्यंत पोहोचलास तर. तुझ्यासोबत काम करताना मला खरोखर खूप आनंद होत आहे, मित्रा.” होम्सने त्याची पाठ थोपटीत म्हटले.

नंतर मी व कर्नलसाहेब, होम्स आणि इन्स्पेक्टरबरोबर झटापट जिथे घडली, ती जागा पहायला गेलो. मग होम्सने सगळ्या घटनेचा पुन्हा एकदा आढावा घेतला. “जमीन फारच टणक आहे. पावलांचे ठसे सापडण्याची शक्यता नाही.”

इतक्यात कनिंगहॅम पितापुत्र तिथे आले. त्यांच्या एकंदर पोशाखावरून व अविर्भावांवरून झाल्या प्रकारामुळे त्यांना फारसं दु:ख झालेलं दिसत नव्हतं.

“हं…. तुम्ही लंडनचे लोक मला वाटलं त्याहूनही जास्त वेळ लावता बुवा!” ऍलेकने आल्या आल्याच होम्सला एक टोमणा मारला.

“थोडा वेळ तरी द्या आम्हाला, ऍलेकसाहेब” होम्स उत्तरला.

“वेळ तर तुम्हाला लागणारच. तसंही या प्रकरणाची आशा आम्हा सोडून दिलीये. कोणताही धागादोरा तर सापडत नाहीच आहे!”

“एकच आहे. आता फक्त एवढंच कळलं पाहिजे की तो…..” इन्स्पेक्टर म्हणाले.

“अरे देवा, होम्ससाहेब काय झाले तुम्हाला?” होम्सच्या चेहऱ्यावर एकाएकी भयंकर वेदना पसरली होती. त्याने डोळे फिरवले व तो दबल्या आवाजात कण्हू लागला. इतक्यात तो जमिनीवर कोसळला. आम्ही पटकन त्याला एका खोलीत नेले. आणि एका खुर्चीवर त्याला झोपवले. थोड्या वेळाने होम्स सावध झाला. आपल्या आजाराची सर्वांना कल्पना देऊन त्याने घडल्या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागितली.

“तुम्हाला माझ्या गाडीने घरी पाठवू का?” कनिंगहॅमने विचारले.

“नको. धन्यवाद. मला असं विचारायचं होतं, कशावरून तो चोर घरात घुसलाच नाही?”

“शक्यच नाही. अहो मला किंवा ऍलेकला त्याच्या वावराची लगेच चाहूल लागली असती.”

“तुम्हा दोघांच्याही खोल्यांत दिवे जळत होते?”

“अर्थात”

“हं… पण असा कोणता चोर घरातील माणसे जागी असताना चोरी करेल?”

“हे प्रकरण तितकंच विचित्र नसतं तर, आम्ही तरी तुम्हाला कशाला तसदी दिली असती, होम्ससाहेब?” ऍलेक वैतागला “आणि मला मुळात तुमचा तर्कच चुकीचा वाटतो. घरात अस्ताव्यस्त पडलेल्या किंवा गायब झालेल्या वस्तूंमुळे आम्हाला चोर घरात शिरला हे कळलं नसतं का?”

“पण एखादी गोष्ट गायब आहे, हे कळायला ती तितकीचा आवश्यक असायला लागते. तुम्हाला या दरोडेखोराने ऍक्टनसाहेबांच्या घरी जमवलेला विचित्र साठा ठाऊक असेलच. हस्तिदंती गोटा, दोऱ्याचा गुंडा आणि असलंच काहीतरी.”

“हे पहा होम्ससाहेब, हे प्रकरण आम्ही तुमच्यावर पूर्णपणे सोपवलं आहे. तुम्ही आणि इन्स्पेक्टर जे म्हणाल, ते आम्ही करायला तयार आहोत.”- कनिंगहॅम म्हणाले.

“मला वाटते तुम्ही आपल्या नावाने दरोडेखोरांना शोधण्यासाठी बक्षिस जाहिर केलेत, तर बरं होईल. ५० पौंड रक्कम पुरे होईल. हा पहा मी मसुदा तयार केला आहे, तुम्ही फक्त इथे सही करा.” होम्स म्हणाला.

“५० कशाला, ५०० ठेवा हवं तर! … अहो, पण यात एक चूक आहे.” मसुद्यावरून नजर फिरवत कनिंगहॅम उद्गारले.

“घाई-गडबडीत झाली असेल.” होम्स ओशाळून हसला.

“आता हेच पहा, तुम्ही घटनेची वेळ पाऊण लिहिली आहे. पण प्रत्यक्षात ती ’quarter to twelve’ म्हणजे पावणे बारा अशी आहे.”

“होम्सकडून एवढी क्षुल्लक चूक घडावी, याचं खरं तर मला फार वाईट वाटलं. खरं म्हणजे, होम्स अगदी बारीक-सारीक तपशीलांच्या बाबतीतही अगदी काटेकोर असे. पण आत्ताच्या आजारपणामुळे त्याच्याकडून या साध्या चूका घडत होत्या. त्याला स्वत:चीच शरम वाटणे स्वाभाविकच होते पण इन्स्पेक्टरने लगेच भुवया उंचावल्या आणि ऍलेक तर हसूच लागला.

“कनिंगहॅमने चूक दुरुस्त करून तो कागद होम्सकडे दिला. होम्सने तो जपून खिशात ठेवला. मग त्याने तोडलेल्या दरवाजाची तपासणी केली. छिन्नीने किंवा एखाद्या मजबूत सुरीने कुलुप उचकटलं होतं हे तर दिसत होतंच. लाकडावर खुणाही दिसत होत्या.

“तुम्ही खिडकीला गज का नाही लावून घेतले?”

“तशी गरज नाही भासली आम्हाला.”

“तुम्ही कुत्राही पाळलेला नाही का?”

“आहे की, पण तो घराच्या दुसऱ्या बाजूला साखळीला अडकवून ठेवला आहे.”

“तुमचे नोकर साधारणपणे किती वाजता झोपतात?”

“दहाच्या सुमारास.”

“विल्यमही?”

“हो”

“हं…. मग फक्त कालचीच रात्र का तो जागत होता? असो, कनिंगहॅमसाहेब, तुम्ही आम्हाला तुमचं घर दाखवाल का?”

वरच्या मजल्यावर जाताना मला होम्सच्या हावभावांवरून त्याला एखादा सुगावा लागल्याची शंका आली, पण कसला सुगावा याचा तर्क काही मी लढवू शकत नव्हतो.

कनिंगहॅम आता वैतागून म्हणाले, “अहो होम्ससाहेब, हे तितकंसं आवश्यक नाही, असं मला वाटतं. चोर आमच्या खोलीकडे आम्हाला चाहूल लागू न देता येऊच कसा शकेल?”

“तुम्ही दुसऱ्या ठिकाणी हातपाय मारायला हवेत, होम्ससाहेब.” ऍलेक कुचेष्टेने हसत बोलला.

“अहो, थोडा धीर धरा. तुमच्या खिडकीतून किती दूरवरचं दिसतं, एवढंच पहायचं आहे मला.” होम्स ऍलेकच्या खोलीत शिरला. “इथे तुम्ही धुम्रपान करीत बसला होतात तर! समोरच्या दिशेला उघडणारी खिडकी कोणती?” होम्सने काळजीपूर्वक तपासणी केली.

“आता तरी तुमचं समाधान झालं का?” कनिंगहॅमने विचारलं.

“हो”

“मग आता आपण माझ्या खोलीत जायचं का?”

“तुमची हरकत नसेल तर॒!”

कनिंगहॅमने उत्तरादाखल फक्त खांदे उडवले. आणि आपल्या खोलीत ते आम्हाला घेऊन गेले. साध्यासुध्या पद्धतीने त्यांची खोली सजवली होती. होम्स मुद्दामच खोलीत शिरताना सर्वांत मागे राहिला. माझ्या डोळ्यांदेखत त्याने कुणाला कळणार नाही, अशा बेताने मेजावरचा पाणाचा जग आणि संत्री खाली पाडली. “अरे वॉटसन, हे काय केलंस? जाजमाची पार वाट लावलीस.”

हा दोष माझ्यावर ढकलण्यामागे होम्सचं काहीतरी कारण असणार हे जाणून मीही तो दोष स्वत:वरच ओढवून घेतला आणि वाकून इतस्तत: विखुरलेली संत्री गोळा करू लागलो. इतरही मला मदत करू लागले.

“अरेच्चा, होम्ससाहेब कुठे अदृश्य झाले?” इन्स्पेक्टर अचानक ओरडले.

“थांबा इथेच. त्या मनुष्याचं डोकं फिरलं आहे. बाबा, चला त्या भ्रमिष्टाला शोधुया.” ऍलेक संतापाने बाहेर निघून गेला. त्याचे वडिलही त्याच्या पाठोपाठ गेले. एकमेकांकडे बघत राहण्याखेरीज आमच्याकडे करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.

“मलाही ऍलेकसाहेबांचं मत पटतंय. होम्ससाहेबांच्या डोक्यावर त्या दुखण्याचा परिणाम झाला असावा, कारण….” पण इन्स्पेक्टरचे शब्द बुडबुड्याप्रमाणे हवेतच विरले, कारण होम्सने एक भयसूचक किंकाळी मारली होती.

“वाचवा, वाचवा! खून खून!”

मी वेड्यासारखा आवाजाच्या दिशेने पळत सुटलो. त्याचा आवाज हळूहळू घोगरा होत होता. मी त्या खोलीत पोहोचलो व पाहतो तर काय, कनिंगहॅम पितापुत्र होम्सला मारण्याचा प्रयत्न करत होते. ऍलेक त्याचा गळा आवळत होता, तर कनिंगहॅम त्याचा हात मुरगळत होता. क्षणार्धात आम्ही तिघांनी मिळून होम्सला त्या दोघांच्या तावडीतून सोडवलं. होम्स झोकांड्या देत उभा राहिला. तो पांढराफटक पडला होता. आणि झाल्या प्रकारामुळे त्याच्यातले सारे त्राणच निघून गेले होते.

“इन्स्पेक्टर या दोघांना अटक करा”

“कोणत्या आरोपाखाली?”

“विल्यम किर्वान नावाच्या त्यांच्या गाडीवानाच्या हत्येच्या आरोपाखाली.”

इन्स्पेक्टर गोंधळून गेले. “होम्ससाहेब, काय म्हणताय काय?”

“त्या दोघांच्या तोंडांकडे एकदा पहा जरा.” होम्स गंभीरपणे म्हणाला. त्या दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना पसरली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील भावांनी हत्येची कबूलीच दिली जणू! कनिंगहॅम अजूनही भांबावलेला होता. तर ऍलेकच्या डोळ्यांत मात्र पाशवी हिंस्रपणाची चमक उतरलेली होती. इन्स्पेक्टरने पुढे काहीही न बोलता शिटी वाजवून दोन कॉन्स्टेबल्सना बोलावले.

“माझ्यापुढे कोणताच पर्याय उरलेला नाहीये, श्री. कनिंगहॅम. कदाचित हा गैरसमज असू शकेल. पण सध्या…….. ओह, हे काय, टाका ते खाली.” त्यांनी चपळाईने ऍलेकच्या हातावर फटका मारून पिस्तूल खाली पाडलं.

“ताब्यात घ्या हे पिस्तूल. ही केस कोर्टात उभी राहिल्यावर तुम्हाला त्याची गरज पडेलच! पण हे, सगळ्यांत जास्त महत्त्वाचं आहे.” त्याने हातातील कागद उंचावून दाखवीत म्हटले.

“ओह! तो कागद?”

“हो”

“कुठे सापडला?”

“मला वाटलं होतं तिथेच. मी हे सगळं सविस्तरपणे नंतर समजावीनच पण त्याआधी मला वाटतं वॉटसन, तू आणि कर्नलसाहेब दोघांनी घरी परतावं. मी ह्या दोघांशी बोलून तासाभरात परत येतोच.”

 

आपल्या शब्दाला पक्कं राहून होम्स एक वाजता कर्नल साहेबांच्या घरी पोहोचला. त्याने ऍक्टनसाहेबांनाही सोबत आणलं होतं.

“मला वाटतं, हे सगळं ऍक्टनसाहेबांनी जाणून घेणं फार गरजेचं आहे. कर्नलसाहेब, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व!”

“असं काय म्हणताय होम्ससाहेब? उलट मला तुमची कामाची पद्धत इतक्या जवळून बघायला दिल्याबद्दल मीच तुमचे आभ्यार मानले पाहिजेत.”

“असो, थोडी ब्रँडी मिळेल का? थोडीशी ब्रँडी पोटात गेल्यावर मला जरा बरं वाटेल. त्या मगासच्या हल्ल्याने मी पुरता हादरलो आहे.”

“तुमचा फेफरं येण्याचा त्रास आता गेला असेल ना?”

होम्स खळखळून हसत म्हणाला, “त्याबद्दल आपण नंतर बोलूच! मी आता माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, ही केस कशी सोडवली ते क्रमाक्रमाने तुम्हाला सांगतो. काही शंका असल्यास मला विचारा.

“गुप्तहेराला आपली शक्ती वाया जाऊ द्यायची नसेल, तर त्याने प्रथम कोणता पुरावा टाकाऊ आहे आणि कोणता महत्त्वाचा, हे ओळखायला शिकलं पाहिजे. सुरुवातीपासूनच मला तो कागदाचा कपटा महत्त्वाचा असणार, हे जाणवलं होतं. आता असं पहा, जर तो दरोडेखोर विल्यमला मारून लगेच पळाला, हे आपण खरं मानलं, तर त्यानेच तो कागद फाडण्याची शक्यता नाही, हेही मानावं लागेल. मग त्याने नाही, तर तो कागद ऍलेकने फाडला असणार. ही साधी गोष्ट इन्स्पेक्टरच्या लक्षात आली नाही, कारण कनिंगहॅम पितापुत्रांचं या प्रकरणाशी काहीच घेणंदेणं नाही, असं तो मानून चालला होता. पाहिलंत, कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता विचार करण्याचा परिणाम!

“मग मी त्या चिटोऱ्यावर लक्ष केंद्रित केलं. तुम्हाला यात काही विचित्र असल्याचं जाणवतंय का, पहा बरं! माझी पूर्ण खात्री आहे, की हे पत्र दोन व्यक्तींनी लिहिलेलं आहे. तेही अशाप्रकारे, की एका व्यक्तीने आधी एक सोडून एक असे शब्द लिहिले, आणि दुसऱ्याने गाळलेल्या जागा भराव्यात, त्याप्रमाणे मधले शब्द कमी जागेत बसवायचा प्रयत्न केला आहे. हे शद्बांमधील t च्या वेगवेगळ्या वळणांवरून लक्षात येईलच. शिवाय अक्षरावरून दोन्ही व्यक्तींच्या वयाचे अंदाजही वर्तवता येतात. एका माणसाचा हात मजबूत आणि स्थिर आहे. त्यावरून ते तरुण माणसाचं अक्षर असावं तर दुसरं जरा म्हाताऱ्या माणसाचं! शिवाय त्यातील तरुण माणूस हा म्होरक्या असावा.”

“भले शाब्बास” ऍक्टनसाहेब ओरडले.

“अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे, या हस्ताक्षरातील साम्यावरून दोघे रक्ताचे नातेवाईक असावेत हे स्पष्टपणे कळून येते. हे सगळे प्रकरण २३ बारीक-सारीक गोष्टींवरून सिद्ध होतं. त्यामुळे हे कृत्य कनिंगहॅम पितापुत्रांचे असावे यात माझी कोणतीच शंका उरली नाही.”

“पण ते पत्र दोघांनी मिळून का लिहिलं?” कर्नलसाहेबांनी विचारले.

“असं पहा, हे सगळंच प्रकरण मोठ्या जिकिरीचं होतं. जर का ते अंगावर शेकलं असतं, तर त्याचे परिणाम कोण्या एकानेच का भोगावेत तेव्हा दोघांचाही त्यात सारखाच सहभाग असावा असं वाटल्यामुळे हा खटाटोप!

“बरं, एवढं कळल्यावर मी इतर बाबींत लक्ष घातलं. घटनास्थळाचं परिक्षण केलं. मला असं दिसून आलं, की गोळी चार यार्डांच्या अंतरावरून झाडली असावी. म्हणजे ’झटापट चालू असताना गोळी झाडली’ हे ऍलेकचं विधान खोटं पडतं. पुन्हा कनिंगहॅम पितापुत्रांनी जी झटापटीची जागा दाखवली होती. तिथे झटापट घडल्याच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या. हे सर्व लक्षात घेता माझ्या डोक्यात आलं, की असा कोणी दरोडेखोर प्रत्यक्षात तिथे, त्या ठिकाणी, त्या वेळी अस्तित्वातच नसावा.

“एवढं समजल्यावर या हत्येमागचं कारण शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी मी आधी ऍक्टनसाहेबांकडे झालेल्या चोरीचा विचार केला. ऍक्टन व कनिंगहॅम यांच्यामधे खटला चालू असलेला मला कळला होता. तेव्हा त्या संदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे लांबवणे हाच या चोरीचा उद्देश असणार अशी माझी खात्री झाली.”

“तसम्च असावं. अहो, त्यांच्या अर्ध्या मालमत्तेवर माझा हक्क आहे. त्यांना हवी असलेली कागदपत्रं जर का त्यांना मिळाली असती, तर माझी बाजूच लुळी पडली असती. सुदैवाने ती कागदपत्रे माझ्या वकिलाकडे सुरक्षित आहेत.”

“हं…. या मूर्खपणाच्या प्रयत्नात मला ऍलेकचा धसमुसळेपणा डोकावताना दिसला. जेव्हा त्याला ती कागदपत्रे मिळाली नाहीत, तेव्हा त्याने ती साधी चोरी भासवण्यासाठी हाताला लागेल ते बरोबर घेतलं.

“आता तो फाटलेल्या कागदाचा चिटोरा शोधणं क्रमप्राप्त होतं. ऍक्टनने कागद फाडून खिशात ठेवला असणार. मग त्याचे कपडे मिळणार कुठे? तर त्याच्या खोलीत. पण तो कागद अजूनही त्याच्या खिशात असेल का? हे पहायला मी सर्वांना वरच्या खोलीत घेऊन गेलो.

“त्यांनी तो कागद नष्ट करू नये, म्हणून त्यांना त्या कागदाची आठवण होऊ न देण्यासाठी मला इन्स्पेक्टर कागदाबद्दल बोलणार, इतक्यात फेफरं आल्याचं नाटक करावं लागलं.”

“बापरे! म्हणजे ते सगळं नाटक होतं?”

“त्यानंतर मी कनिंगहॅमला थोडं बावळटपणाचं सोंग आणून एका कागदावर ’twelve’लिहायला लावलं. त्यामुळे चिटोऱ्यावरचं अक्षर त्याचंच असल्याची माझी खात्री पटली.”

“म्हणजे हे सगळं खोटं होतं तर! मी सुद्धा काय मूर्ख आहे.” मी हताशपणे उद्गारलो.

होम्स हसत म्हणाला, “तुला माझी दया वाटत होती, हे स्पष्ट दिसत होतं मित्रा. पण मला क्षमा कर. तसं करणं गरजेचं होतं. त्यानंतर आपण जेव्हा खोलीत गेलो, तेव्हा ऍलेकचे कपडे तपासून पाहता यावेत म्हणून तुम्हा सगळ्यांना गुंतवायला मी तो पाण्याचा जगाचा खाली पाडला. आणि हळूच ऍलेकच्या खोलीत सटकलो. माझ्या हाती तो कागद लागला आणि तेवढ्यातच कनिंगहॅम पितापुत्रांनी माझ्यावर झडप घातली. पण तुम्ही सगळे लगेच मदतीला धावून आलात म्हणून केवळ मी या जीवावरच्या संकटातून वाचलो. त्या दोघांचा मला ठार करून तो कागद हिसकावून घेण्याचा आटापिटा चालला होता. आतापर्यंत सगळं छान चाललेलं असताना, हा मधेच कोण उपटसुंभ टपकला, आम्हाला तुरुंगात पाठवणारा, या विचारामुळे ते फारच अस्वस्थ झाले. आणि स्वत:वरचं नियंत्रण पूर्णपणे गमावून बसले.

“त्यांना अटक केल्यावर मी दोघांशी बातचीत केली. कनिंगहॅअ थोडा मवाळ होता. पण ऍलेक मात्र शैतानाची औलाद निघाला. हाती येईल त्यांचं डोकं फोडण्याच्या तयारीत होता तो! आता सगळं संपलं अशी जाणीव झाल्यावर कनिंगहॅमने स्पष्टपणे कबुलीजबाब देऊन टाकला. ते दोघे ऍक्टनसाहेबांच्या घरी जाताना विल्यमने त्यांचा पाठलाग केला होता. आणि त्या जोरावर तो त्या दोघांवर दबाव आणत होता. पण ऍलेक काही असल्या फालतू खेळांत रमणारा नाही. त्याने दरोडेखोरांच्या वावडीचा उपयोग करून आपल्या मार्गातला विल्यम नावाचा काटा काढून टाकला. त्याला भुलवून बोलावलं आणि त्याचा खातमा केला. पण प्रत्येक गुन्हेगार काही ना काही चूक करत असतोच. जर त्याने वेळीच कागदाचे महत्त्व ओळखून तो नष्ट केला असता, तर हे प्रकरण सुटणं अशक्य होतं!”

मग त्याने तो कागद उलगडून त्याला तो तुकडा जोडून आमच्यासमोर धरला. ही ऍनी मॉरिसन वेगळीच भानगड दिसतेय. पण मासा गळाला अडकवायला ती चांगलीच उपयोगी पडली. चल तर मग वॉटसन, हवापालटाची कल्पना छान ठरली, नाही! आता नवीन जोमाने लंडनला परतायला मी तयार आहे.”

-समाप्त-

 

आता टाईप करून काढताना अनुवाद करतानाच्या बऱ्याच चूका लक्षात आल्या. उगाच शब्दसंपदा दाखवण्याच्या नादात चुकीचे शब्द वापरले गेल्याचं लक्षात आलं. पण चॅनलच्या ठिकाणी रूळ अशी छोटी रुपके चांगली वापरली आहेत. असो.

मला ‘अनुवाद’ ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा ‘कथांतर’ नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक! अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.

मुखपृष्ठcoverpage

हे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्‍या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर ‘रशियन कथांचा भावानुवाद’ हे उपशीर्षक, त्याखाली ‘कथांतर’ हे शीर्षक, सर्वांत खाली ‘भावानुवाद’ असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.

सर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. ‘कथांतर’ हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही ‘भाषांतर’ हा शब्द येत नाही, त्याजागी ‘भाव-अनुवाद’ हा शब्द वापरलेला आहे. ‘भावानुवाद’ या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.

भाषांतर या शब्दाचा विग्रह ‘दुसरी भाषा’ आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्‍या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्‍या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे! यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.

पण प्रत्यक्षात तसे होत नाही!

कथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत ‘दिवसाचा मध्य’ या अर्थाने वापरल्या जाणार्‍या ‘मध्याह्न’ या शब्दासाठी कुरुक भाषेत ‘जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा’ अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ ‘दुपारी १२ वाजताची वेळ’ असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी ‘आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी ‘जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा ‘उन्हे डोक्यावर येणे’ हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी ‘जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन’ असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक ‘मराठी’ वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.

म्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा ‘ती’च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.

अशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय?

वरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.

इथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना ‘भाषांतर’ न म्हणता ‘भाव-अनुवाद’ असे म्हणते.

मूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.

पण ही कथा आता ‘ती’च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे ‘कथांतर’ झाले आहे!

असे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची ‘सावली’ आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.

इतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्‍या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.

नाट्याचे १० वेगवेगळे प्रकार आहेत, पैकी एक नाटक. त्यात नायक व नायिका राजघराण्यातले असणे आवश्यक असते. त्यामुळे संस्कृतात भरजरी नाटकांची रेलचेल आहे. स्वप्नवासवदत्तमलाही त्याच नाटकांच्या यादीत बसवणे थोडे अन्यायकारक होईल असे मला तरी वाटते. केवळ नाटकाला राजेशाही दिमाख यावा म्हणून यातली मुख्य पात्रे राजघराण्यातली नाहीत. एक तर हे नाटक ज्या लोककथेवर आधारित आहे, त्यात ही सर्व पात्रे राजकुलीन आहेत. परंतू त्या मूळ लोककथेतील बऱ्याच गोष्टी बदलून घेणाऱ्या भासाला उदयन व वासवदत्ता एक ब्राह्मण व ब्राह्मणी म्हणून सुद्धा दाखवता आले असते. पण या सर्व नाट्याला कारणीभूत ठरलेली राजकीय पार्श्वभूमी या नाटकात फारच महत्त्वाची आहे. हे नाट्य सुरू व्हायला ही राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत आहे व नाट्य संपायलाही! त्यामुळेच सर्व पात्रे राजघराण्यातली असणे आवश्यक आहे.

त्यांच्या या राजेशाही पार्श्वभूमीतले नाट्यनिर्मितीचे बीज ओळखून भासाने त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. माझे स्वत:चे असे मत आहे, की सर्व राजपुत्र व राजकन्यांना लहाणपणापासूनच ‘आपलं जीवन हे प्रजेसाठी आहे’ या विचाराचं बाळकडू देण्यात येत असावं. या एकाच विचाराने राजांना पूर्वी इंद्रियदमन वगैरे करायला शिकवले जात असावे. अर्थातच सर्व राजे/ राण्या या तत्त्वाचे पालन करत असतीलच असे माझे म्हणणे नाही. परंतू वासवदत्ता या तत्त्वाचे पालन करणाऱ्यांपैकी असावी, म्हणूनच तर तिने सर्व धोके, जोखीम स्वीकारून यौगंधरायणाला साथ द्यायचा निर्णय घेतला. जर तिला हे प्रजेचे व राजाच्या कर्तव्याचे महत्त्व पटले नसते तर तिने एवढा मोठा निर्णय निश्चितच घेतला नसता.

तिच्या या पार्श्वभूमीचा उपयोग भासाने पहिल्या अंकातल्या पहिल्या प्रसंगातही करून घेतला आहे. पद्मावतीच्या नोकरांचं वागणं तिला अपमानास्पद वाटलं ते ती एक राजकन्या असल्यामुळेच!

पहिल्या अंकातला ब्रह्मचाऱ्याचा प्रवेश, दुसऱ्या व तिसऱ्या अंकातले मुख्य घटना पडद्याआड ठेवून केवळ वासवदत्तेच्या प्रतिक्रिया पडद्यावर दाखवण्याचे तंत्र, चौथ्या अंकातले द्विकेंद्री दृश्य व त्याहून महत्त्वाची दोन केंद्रांना जोडणारी ती बगळ्यांची माळ, पाचव्या अंकातली वातावरणनिर्मिती व त्यानंतरचा स्वप्नप्रसंग, सहाव्या अंकातली चित्रे, घोषवती वीणा या सर्वच क्लृप्त्या अत्यंत नावीन्यपूर्ण, नाट्यपूर्ण, सहज व म्हणूनच सुंदर आहेत.

स्वप्नप्रसंगामध्ये कितीतरी symbolic गोष्टी दडलेल्या आहेत. उदयन व वासवदत्ता २ वेगवेगळ्या विश्वांत आहेत. उदयन स्वप्ननगरीत तर वासवदत्ता वास्तवात. या दोन विश्वांना जोडणारा त्यांचा संवाद. तसं बघायला गेलं तर उदयन जागेपणीही खोट्या विश्वातच आहे की! तो जिला मृत समजतो आहे ती त्याची वासवदत्ता तर जिवंत आहे. आणि इथे वासवदत्ता मात्र वास्तवाचे खरे चटके झेलते आहे.

उदयन मला आवडतो तो २ गोष्टींमुळे- एक तर त्याचा स्वभाव व त्याने चौथ्या अंकात भुंग्यांना दाखवलेली सह-अनुभूती यांमुळे. संस्कृत नाट्यशास्त्रात नायकाचे ४ प्रकार सांगितले आहेत- धीरोदात्त, धीरललित, धीरोद्धत व धीरशांत. उदयन हा धीरललित नायक आहे. म्हणजेच वीणावादन वगैरे ललितकलांत प्रविण. कला म्हटलं की भावनाप्रधानता आलीच. उदयनही अत्यंत भावनाप्रधान आहे- अगदी प्रेमापुढे आपली कर्तव्ये ओवाळून टाकण्याइतका! टोकाचा प्रेमवेडा असला तरीही त्याचे एक एक संवाद वाचल्यावर उदयनाला सगळं माफ!

उदयन आणि वासवदत्ता यांचं दु:ख एकच- विरहाचं! पण दोघांच्या दु:खाचा पोत किती वेगवेगळा! उदयनाचं दु:ख अज्ञानजनित आहे. विरहाचा स्वीकार करण्यावाचून त्याला काहीच पर्याय नाही व त्यामुळे आपल्या नशीबाला दोष द्यायला तो मोकळा आहे. वासवदत्तेचं मात्र तसं नाही. तिला आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण राजकीय कारणांमुळे व पतीवरील प्रेमामुळेच तिने स्वत: विरहाचा पर्याय निवडला आहे. सुख समोर असूनही ते डावलून दु:खाला स्वीकारणं हा वासवदत्तेच्या भूमिकेचा गाभा आहे. म्हणूनच ती बॉलिवूडपटांतील नायिकांप्रमाणे कितीही मुळूमुळू रडली, तरी ती त्या इतर नायिकांप्रमाणे कणाहीन नक्कीच नाही. ती त्या सर्वांहून वेगळी आहे.

भासाला वासवदत्तेचं पात्र किती वेगवेगळ्या रंगांनी रंगवता आलं असतं! विरहयातना असह्य होऊन व मुख्य म्हणजे सवत स्वीकारायला लागू नये म्हणून खऱ्या रुपात प्रकट होणारी, भावनेच्या आहारी जाणारी वासवदत्ता तो उभी करू शकला असता. किंवा भावनांपुढे कर्तव्याला टोकाचं महत्त्व देऊन emotionally cold झालेली वासवदत्ता तो दाखवू शकला असता. पण भासाच्या वासवदत्तेत आवेग आणि संयम यांचं एक सुंदर मिश्रण आहे. ती भावनिक आहे, पण तरीही तिला कर्तव्याची जाणीव आहे. ती आवेगी आहे, त्या नादात ती नको ते बोलूनही जाते पण लगेच स्वत:ला बांध घालण्याइतकी संयतही आहे. उदयन एकांतात दिसल्यावर त्याच्याशी बोलण्याची इच्छा तिला अनावर होते, पण लगेच भानावर येऊन ती बोलणं थांबवतेदेखिल. तिच्या या वरकरणी परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांमुळेच ती मला आवडते. ती खऱ्या अर्थाने माणूस आहे. तिच्यात सतत एक द्वंद्व चाललेलं आहे- ‘श्रेयस’ व ‘प्रेयस’ यांच्यामधलं! तिचा निर्णय हे उसनं अवसान नाही. त्याला एक वैचारिक बैठक आहे.

तिचा पद्मावतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र मला कोड्यात पाडतो. सवतीवरही इतकं प्रेम? अगदी एकदासुद्धा तिच्याबद्दल मत्सर, राग, द्वेष नाही वाटत? पण वासवदत्ता अशी आहे, म्हणूनच आवडते ना!

पद्मावतीतही भावनेचा ओलावा व संयम हे दोन्ही असले तरी ती वासवदत्तेहून खूप वेगळी आहे. कारण तिच्यात संयमाचे प्राबल्य आहे. शिवाय उदयनाचे आपल्यावर प्रेम नाही हे तिला कळलेलं असल्याने पद्मावती ही एक अत्यंत वेगळी व्यक्ती बनली आहे. तिला प्रेमाची आस आहे. तिचं स्वत:चं उदयनावर खूप प्रेम आहे. पण त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता येणार नाही हेही तिला माहित आहे, ते तिला मान्य आहे. त्यामुळे ती काहीशी एका बाजूला पडली आहे, किंबहुना स्वत:च प्रकाशझोतापासून थोडी दूर सरकली आहे.

यौंगधरायण तर या नाटकाचा खरा सूत्रधार. पहिल्या अंकात सर्व पात्रांचे दोर आपल्या हाती गोळा करून जो जातो तो थेट शेवटच्या अंकात उगवतो- दोर ज्याच्या त्याच्या हाती सोपवायला. हे सगळं नाट्य घडवतो व संपवतो तो हा यौगंधरायण. पण बुद्धिबळासारखा प्याद्यांना आपल्या तालावर नाचवणारा नाही. इतर पात्रांच्या मनस्थितीचा विचार करून त्याचा उपयोग करून घेत व तरीही त्यांना त्रास होणार नाही याची शक्य तितकी काळजी घेत तो एक एक चाली खेळतो, तेही आपल्या स्वार्थासाठी नाहीच.

अशी सुंदर पात्रं, असं सुंदर कथानक आणि असे सुंदर प्रसंग एकत्र आणणं तो एक भासच करू जाणे!

हे नाटक ज्यांना वाचायचं असेल त्यांना ते हिंदी भाषांतर व संस्कृत टीकेसहित http://www.vedamu.org/home.asp येथे वाचता येईल. skip intro -> learn sanskrit -> kaavyas-> svapnavasavadattam या मार्गाने जावे.

Recap-

पद्मावतीला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं वृत्त समजताच उदयन आणि वासवदत्ता तिला भेटायला जातात. पद्मावती तिथे नसतेच व उदयन वासवदत्तेची भेट होते, पण एका वेगळ्याच प्रकारे- उदयन झोपी जातो व स्वप्नातल्या वासवदत्तेला प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्यक्षातली वासवदत्ता त्याच्या समोर उभी राहून त्याला उत्तरं देते. निघताना त्याच्या हाताला स्पर्श करण्याचं निमित्त होतं व अर्धवट जागा झालेल्या उदयनाला वासवदत्ता जिवंत असल्याची खात्री पटते. इतक्यात उदयनाच्या शत्रुचा नायनाट होऊन उदयनाचे सर्व राज्य परत मिळाल्याची बातमी घेऊन कांचुकीय येतो. आता पुढे-

अंक सहावा-

यौगंधरायाच्या योजनेचा हेतू सफल झाल्यावर आता वासवदत्तेने आणखी काही काळ अज्ञातवासात राहण्यास काहीच प्रयोजन उरत नाही. सहाव्या अंकात उदयन-वासवदत्तेची पुनर्भेट भासाने रंगवली आहे.

राज्य परत मिळाल्यावर उदयनाने पद्मावतीसोबत आपला मुक्काम सासुरवाडीहून आपल्या स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या महालात हलवला आहे. एक दिवस असंच महालातून फिरत असताना उदयनाच्या कानी वीणेचे सूर पडतात. ते सूर त्याच्या ‘घोषवती’ नामक वीणेचे असल्याचे ते लगेच ओळखतो. मग ती वीणा वाजवणाऱ्या माणसाला पाचारण करून ‘ही तुला कुठे मिळाली?’ वगैरे विचारण्यात येते. ती वीणा खरोखरीच ‘घोषवती’ असल्याचे सिद्ध होते. उदयनाला आपल्या पहिल्या प्रेमाची साक्षीदार अशी ती वीणा परत मिळाल्यावर आनंद तर होतोच परंतू त्यापाठोपाठ वासवदत्तेची आठवण होऊन त्याचा जीव कासावीस होतो. ‘घोषवती तर मिळाली, पण घोषवती जिची लाडकी होती, ती काही दृष्टीस पडत नाही’ असे म्हणून तो शोक करू लागतो.

इतक्यात वासवदत्तेच्या माहेराहून त्यांचा कांचुकीय वासवदत्तेची दाई- वसुंधरा हिच्यासोबत उदयनाला भेटायला येतो. तेव्हा पद्मावतीही ‘वासवदत्तेचे नातेवाईक ते माझे नातेवाईक’ असे म्हणत उदयनासोबत कांचुकीय व वसुंधरेला सामोरी जाते. उदयनाच्या मनाला मात्र एका वेगळ्याच भीतीने घेरलेले असते. तो पद्मावतीला म्हणतो- “त्यांच्या कन्येचे मी हरण केले, परंतू तिचे रक्षण मात्र करू शकलो नाही! आता ते काय म्हणतील बरे!”

परंतू कांचुकीयाच्या बोलण्यावरून महासेन (वासवदत्तेचे वडिल) उदयनावर चिडलेले नसल्याचे लक्षात येते. तो प्रथम राज्य परत मिळवल्याबद्दल उदयनाचं अभिनंदन करतो. पुढे वसुंधरा त्याला वासवदत्तेच्या आईचा- राणी अंगारवतीचा निरोप सांगते- “महासेन महाराजांना सुरुवातीपासूनच तुम्ही जावई म्हणून पसंत होतात, म्हणूनच खोट्या हत्तीचा बनाव रचून तुम्हाला आमच्या महाली आणले व वीणा शिकवण्याच्या निमित्ताने तुमची व वासवदत्तेची भेट घडवून आणली. तुम्हा दोघांचं लग्न लावण्याचा विचार सुरू असतानाच, तुमच्या उतावीळ स्वभावाला अनुसरून तुम्ही दोघं पळून गेलात. म्हणून त्यानंतर तुम्हा दोघांची हुबेहुब चित्रे बनवून घेऊन विवाहविधी उरकला. आता ती चित्रे तुम्हाला भेट देण्यासाठी आणली आहेत.”

वासवदत्ता दिसायला होती तरी कशी या कुतूहलाने पद्मावती तिचे चित्र पाहते. ते चित्र पाहून तिला आपली प्रोषितभर्तृका सखी आठवते. चित्रे खरेच हुबेहुब आहेत का हे पहायला ती उदयनाचे चित्र पाहते. चित्रे हुबेहुब असल्याची खात्री झाल्यावर ती उदयनाला आपल्या सखीबद्दल सांगते. परंतू ती स्त्री एका ब्राह्मणाची बहिण असल्याचे पद्मावतीकडून समजल्यावर उदयनाची आशा मावळते. या जगात एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असतात असे म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो.

इतक्यात प्रतिहारी (म्हणजे दारावर उभी असणारी स्त्री संरक्षक) येते व दाराशी एक ब्राह्मण पद्मावतीकडे ठेव म्हणून सांभाळायला दिलेल्या आपल्या बहिणीला न्यायला आला आहे असे सांगते. तो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवेषातला यौंगधरायण काहीसा बिचकतच प्रवेश करतो. ‘मी एवढा कट केला खरा, आणि त्याला यश आलं हेही खरं पण आता उदयन महाराज मला काय म्हणतील?’ अशी चिंता त्याच्या मनाला लागून राहिलेली असते.

ब्राह्मणवेषातल्या यौंगधरायणाला उदयन पटकन ओळखत नाही, पण त्याचा आवाज मात्र ओळखीचा वाटतो. मग वासवदत्तेला बोलावलं जातं. हा ठेव परत करण्याचा व्यवहार साक्षीदारांच्या समक्ष करावा असा उदयनाचा आग्रह असतो. परंतू ठेव म्हणजे एक अवगुंठनातली स्त्री असल्याने व परस्त्रीकडे पाहू नये असा संकेत असल्याने तो वसुंधरेला साक्षीदाराचं काम करायला सांगतो. तेव्हा नीट पाहिल्यावर वसुंधरा वासवदत्तेला ओळखते.

लगेच यौगंधरायण आणि वासवदत्ता ‘महाराजांचा जयजयकार असो!’ असं म्हणत आपलं खरं रूप प्रकट करतात, यौगंधरायण राजाला नेमके काय व कसे झाले ते समजावून सांगतो. पद्मावती वा वासवदत्ता यांच्या मनात एकमेकींबद्दल प्रचंड आदर व प्रेम असल्याने त्या सवत म्हणून एकमेकींचा स्वीकार करतात.

आणि शेवटी भरतवाक्याने नाटकाचा शेवट होतो.

Recap-

उदयनाचं पद्मावतीशी लग्न झाल्यानंतर चौथा अंक सुरू होतो. पद्मावती वासवदत्ता व एका दासीसोबत फिरायला गेली असता उदयन वसंतकासोबत त्याच उद्यानात येतो. पण त्या तिघी त्या दोघांच्या नजरेस पडत नाहीत. त्या दोघांच्या गप्पांतून उदयनाला पद्मावतीविषयी आपुलकी जरी वाटत असली, तरीही त्याचं मन अजूनही वासवदत्तेतच अडकून राहिलं आहे, हे वासवदत्तेला कळतं व ती खूश होते. आता पुढे-

अंक पाचवा-

उदयनाने वासवदत्तेवरच्या आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने पद्मावतीला झालेलं दु:ख तिने चेहऱ्यावर किंवा बोलण्या-वागण्यातून दाखवलं नसलं तरी ते खचितच तीव्र असणार. त्याचाच परिणाम म्हणून की काय तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. तिला बरं वाटावं म्हणून सगळ्यांची धावपळ सुरू होते. डोकेदुखी थांबवण्यासाठी लेप आणणं, वासवदत्ता ही पद्मावतीची प्रिय सखी म्हणून तिला व उदयन हा पद्मावतीचा पती म्हणून त्याला पद्मावतीच्या या आजाराबद्दल कळवणं यासाठी दासी धावपळ करू लागतात. दासी उदयन व वासवदत्तेला पद्मावती समुद्रगृहात आराम करत असल्याचं सांगतात. समुद्रगृह हे एक असं दालन असतं जे एखाद्या सरोवराच्या मधोमध बांधलं जातं. जेणेकरून तिथलं वातावरण शीतल राहिल. उन्हाळ्यात किंवा आजारी असताना राजपुरुष व स्त्रीया या दालनात राहत असावेत.

उदयन वसंतकाला घेऊन तडक समुद्रगृहाकडे निघातो. उदयनाला पद्मावतीची काळजी वाटते आहे. आपली प्रिय वासवदत्ता तर दैवाने आपल्याकडून हिरावून नेलेली आहेच, आता पद्मावतीला का बरं दैव त्रास देत आहे? असा विचार तो करतो आहे. समुद्रगृहात शिरताच वसंतक बोंबा ठोकू लागतो- ‘साप, साप’. प्रत्यक्षात ती केवळ एक दोरी असते पण अंधूक प्रकाशामुळे ती वसंतकाला सापासारखी वाटते. गैरसमज दूर झाल्यावर दोघे आत जातात व पाहतात तो काय, पद्मावती तिथे नसतेच. म्हणून ते दोघे तिथेच बसून तिची वाट पाहू लागतात. वेळ घालवण्यासाठी वसंतक उदयनाला एक गोष्ट सांगू लागतो पण तेवढ्यात राजा पलंगावर आडवा होतो आणि बघता बघता झोपीही जातो. तिथल्या थंड वाऱ्यांचा त्याला त्रास होऊ नये म्हणून वसंतक त्याच्यासाठी शाल आणायला जातो. इथे भासाने प्रसंगाची बांधणी खूपच छान केली आहे. सगळ्या दासदास्या पद्मावतीची काळजी घेण्यात गुंतल्या आहेत. पद्मावती समुद्रगृहात नसून तिसरीकडेच आहे. वसंतक महालात गेला आहे. म्हणजे आता समुद्रगृहात उदयन काही काळापर्यंत एकटाच असणार आहे.

आणि इतक्यात वासवदत्ता धावत धावत तिथे येते. तिच्याही मनात उदयनासारखेच विचार चाललेले असतात. येऊन पाहते तो पलंगावर कुणीतरी झोपलेलं असतं. अंधुक प्रकाशात कोण आहे ते नीटसं कळत नाही. पण ती पद्मावतीच असणार अशी समजूत वासवदत्ता करून घेते. जवळ जाऊन श्वासोच्छवास नीट चालला आहे का ते पाहते. नीट चालल्याचे कळताच तिला हायसं वाटतं. मग ती विचार करते- ‘पलंगाची अर्धी बाजू मोकळी सोडलेली आहे. म्हणजे पद्मावतीला मी तिच्या शेजारी बसून रहायला हवी असेन.’ म्हणून ती बाजूला बसते. पण बसल्याक्षणीच तिला एक वेगळीच संवेदना जाणवते. ही संवेदना कसली याचा विचार ती करत असते तोच- ‘अगं वासवदत्ते!’ असा उदयनाचा आवाज येतो.

वासवदत्तेबरोबर आपल्यालाही भीती वाटते, वासवदत्तेचं बिंग फुटलं, उदयनाने तिला ओळखलं. पण नाही उदयन स्वप्नात असतो. त्या स्वप्नात त्याला वासवदत्ता भेटलेली असते. हे पाहून वासवदत्तेला हायसं वाटतं पण लगेच मनात चलबिचल सुरू होते. इथेच थांबून त्यांना डोळेभरून पाहून घ्यावं की कुणी यायच्या आत इथून निघून जावं? मोहाचा विजय होतो. वासवदत्ता तिथेच थांबते.

उदयन स्वप्नात पुन्हा बडबडू लागतो. ‘अगं प्रिये, प्रत्युत्तर तरी दे.’

वासवदत्ता- बोलते आहे, नाथ, मी बोलते आहे!

उदयन- हे काय, माझ्यावर रागावली आहेस?

इथे भासाने एक छोटीशी मजा केली आहे. प्रोषितभर्तृकांनी साजशृंगार करू नये, केशभूषा करू नये असा संकेत आहे. त्यामुळे वासवदत्ताही साध्या वेषात, केस मोकळे सोडून सगळीकडे वावरत होती. त्या काळी स्त्रिया प्रियकरावर रागावल्यावरही आपला राग सूचित करण्यसाठी असाच साधा वेष धारण करीत. उदयनाच्या स्वप्नातली वासवदत्ताही साध्या वेषातच होती. म्हणून त्याला प्रश्न पडतो, की ही आपल्यावर रागावली आहे की काय!

अशाच त्यांच्या गप्पा काही क्षणांसाठी चालू राहतात. उदयन स्वप्नातल्या वासवदत्तेशी बोलतो आणि वासवदत्ता त्याच्या प्रश्नांना उत्तरे देते. बोलता बोलता उदयन हात वर उचलतो पण झोपेत असल्याने ते खाली पडतात. वासवदत्ता भानावर येते. कुणीतरी येण्याच्या आत निघावं म्हणून उठते. पण विचार करते, ‘एवढा बिछान्यावरून लोंबणारा त्यांचा हात नीट बिछान्यावर ठेऊन निघू’ तसं ती करते. पण त्या स्पर्शाने उदयनाला जाग येते. तो वासवदत्तेचा स्पर्श ओळखतो. वासवदत्ता घाबरून समुद्रगृहातून पळून जाते. उदयन अर्धवट झोपेतच उठून तिचा पाठलाग करू लागतो पण बंद दारावर त्याचं डोकं आपटून तो मागे पडतो आणि वासवदत्ता त्याच्या दृष्टीस पडण्याचा प्रसंग टळतो.

उदयन विचारात पडतो, आपण पाहिलं ते सत्य की स्वप्न? वसंतकाला तो समजावू पाहतो की वासवदत्ता जिवंत आहे. वसंतकाचा त्याच्यावर अर्थातच विश्वास बसत नाही. तेव्हा उदयन म्हणतो, ‘अरे पहा, तिने मला स्पर्श केला तेव्हा माझ्या अंगावर उठलेला रोमांच अजून तसाच आहे.’ पण वसंतकाला काही हे पटत नाही. तो पुन्हा पुन्हा उदयनाला ‘वासवदत्ता मेली आता विसर तू तिला’ असं सांगून त्याची समजून काढू पाहतो. पण उदयनाच्या मनात वासवदत्ता जिवंत असल्याची आशा निर्माण होते, तो नंतर वसंतकाला म्हणतो-

‘यदि तावदयं स्वप्नो धन्यमप्रतिबोधनम।

अथायं विभ्रमो वा स्याद विभ्रमो ह्यस्तु मे चिरम ॥’

म्हणजेच- हे जर खरेच स्वप्न असेल, तर त्यांतून जाग न येण्यांतच धन्यता आहे. आणि जर हा मनाचा भ्रम असेल, तर हाच भ्रम चिरकाळ टिको”

इतक्यात कांचुकीय प्रवेश करतो व उदयनाला एक आनंदाची बातमी सांगतो. दर्शकाच्या सेनेसोबत उदयनाच्या सेनेने उदयनाच्या शत्रूवर जो हल्ला केला होता, त्याला यश आलं आहे. आणि गमावलेलं सगळं राज्य परत उदयनाच्या हाती आलं आहे.

म्हणजेच यौगंधरायणाच्या योजनेचा हेतू सफल झाला आहे.

हा अंक या नाटकातला सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे. या अंकावरूनच तर या नाटकाला नाव देण्यात आलं आहे. याच कारण म्हणजे भासाने स्वप्नदृष्याचा केलेला अभिनव प्रयोग. चौथ्या अंकात उदयनाच्या प्रेमाची साक्ष वासवदत्तेला मिळालेली आहे. या स्वप्नप्रसंगामुळे वासवदत्ता जिवंत असल्याची आशा उदयनाच्या मनात निर्माण होते. अशाप्रकारे त्यांचे मनोमीलन तर होतेच शिवाय अंकाच्या शेवटी आलेल्या बातमीमुळे त्यांच्या प्रत्यक्ष पुनर्मीलनाची सूचनाही आपल्याला मिळते. (तो भाग शेवटच्या अंकात)

खरं म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात स्वप्नप्रसंग रंगमंचावर दाखवू नयेत असा नियम दिला आहे. पण भासाने हा नियम त्याच्या स्वप्नवासवदत्तम व बालचरितम या दोन नाटकांत मोडला आहे. याखेरीज आणखीही काही नियम भास वेळोवेळी मोडतो. शिवाय त्याचे काही व्याकरणाचे प्रयोग आर्ष असल्याने भास हा भरत आणि पाणिनी यांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानले जाते.

अंक चौथा

Recap- उदयन काही कामानिमित्त मगधदेशी गेला असता राजा दर्शकाने आपली बहिण पद्मावती हिच्यासाठी उदयनाला मागणी घातली. उदयनाने होकार दिला व लगेच त्याच दिवशी त्यांचे लग्न झाले. त्यातच पद्मावतीची विवाहमाला गुंफण्याचं काम वासवदत्तेकडे आल्याने तिच्या दु:खात भरच पडली. इथवर सगळं तसं अपेक्षित मार्गावरूनच चाललं आहे, पण आता सुरू होतात अनपेक्षित वळणं-

अंक चौथा

हा माझा सर्वांत आवडता अंक आहे. यात एक द्विकेंद्री दृश्य आहे. म्हणजे रंगमंचावर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गटांत वेगवेगळी संभाषणे किंवा नाट्यं चालली आहेत. कसं ते आता आपण पाहुयाच.

पद्मावतीच्या लग्नानंतरचा प्रसंग. ती वासवदत्ता आणि एका दासीबरोबर बागेत फिरायला जाते. तिथे प्राजक्ताची झाडे फुलांनी डवरून आलेली असतात. एका शिळेवर बसून पद्मावती आणि वासवदत्ता त्या फुलांचे सौंदर्य पाहत असतात. तेव्हा पद्मावती दासीला सांगते, ‘थोडीशीच फुलं इकडे आण, बाकी सगळी झाडावरच राहू देत. म्हणजे महाराज (उदयन) इथे आले की त्यांनाही या फुलांची शोभा पहायला मिळेल.’ त्यावर वासवदत्ता तिला विचारते, ‘तुझं तुझ्यावर पतीवर खूप प्रेम दिसतं.’ पद्मावती मात्र ‘माझं प्रेम आहे’ असं स्पष्ट म्हणत नाही, राजकुळातल्या शिष्टाचाराप्रमाणे ‘ते काही माहित नाही बाई, पण ते जवळ नसले की हूरहूर वाटते.’ असे आडून सांगते.

नंतर बोलता बोलता ती एक शंका व्यक्त करते, ‘वासवदत्तेलाही महाराजांबद्दल माझ्याएवढंच प्रेम वाटत असेल का?’ पुन्हा एकदा वासवदत्तेचा मनावरचा ताबा जातो आणि ती भावनावेगात ‘तुझ्याहून जास्तच प्रेम होतं तिचं’ असं म्हणते. मग परत ‘त्याशिवाय का ती घरच्यांना सोडून पळून गेली त्यांच्याबरोबर’ असं काहीतरी बोलून वेळ मारून नेते.

दासीचं मात्र वेगळंच चाललेलं असतं. ती पद्मावतीला म्हणते, ‘तुम्ही महाराजांना वीणा शिकवण्यासाठी गळ घाला’. त्यावर पद्मावती म्हणते, ‘मी तसं विचारलंही होतं. पण ते एक उसासा सोडून गप्प झाले. वासवदत्तेची आठवण येऊन त्यांना वाईट वाटलं असावं.’ हे ऐकून वासवदत्तेला जरा बरं वाटतं. उदयनाने जरी पद्मावतीशी लग्न केलेलं असलं, तरी अजून तिला वासवदत्तेचा दर्जा दिलेला नाही, हेच कळून येतं ना यावरून. पण हे सगळे पद्मावतीच्या मनाचे खेळही असू शकतात. खुद्द उदयनाच्या तोंडून हेच वासवदत्तेला ऐकायला मिळालं तर? भास वासवदत्तेची ही इच्छा पूर्ण करतो.

अशी कल्पना करा की रंगमंचाचे दोन समसमान भाग केले आहेत. एका भागात रंगमंचाच्या मध्याच्या थोडं जवळ एक शिळा आहे व त्यावर बसून पद्मावती व वासवदत्ता बोलत आहेत आणि ती दासीही तिथेच उभी आहे. दुसऱ्या भागात एक लतामंडप उभारला आहे. ज्या भागात त्या तिघी बसल्या आहेत त्या भागाच्या विंगेतून उदयन आणि वसंतक (या नाटकातला विदूषक, उदयनाचा जवळचा मित्र) रंगमंचावर प्रवेश करतात आणि तिथेच थांबतात. मधे काही झुडुपे असल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे त्या दोघांना या तिघी दिसत नाहीत. ते दोघे आपापसात बोलतायत.

विदूषक राजाला प्रमदवनाची शोभा दाखवतो आहे, तर इथे उदयनाला वेगळीच काळजी लागून राहिली आहे. तो वसंतकाला म्हणतोय, मी वासवदत्तेला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मदनाने त्याचे ५ही बाण माझ्यावर सोडून मला पुरतं घायाळ केलं. अजूनही त्याचे घाव तसेच ताजे असताना, एक नवा घाव माझ्या हृदयावर बसला आहे. मदनाकडे केवळ ५ च बाण असताना हा सहावा बाण कुठून आला? थोडक्यात, उदयनाचं पद्मावतीवरचं प्रेम वाढतं आहे. वासवदत्तेवर इतकं जीवापाड प्रेम असताना दुसरी स्त्री आपल्याला कशी काय आवडू शकते, हे कोडं उदयनाला पडलं आहे.

पण विदूषकाचं लक्ष कुठे आहे त्याच्या बोलण्याकडे? तो स्वत:शीच बडबडतोय, ‘कुठे गेली असेल बरं पद्मावती?’ तो सगळ्या बाजूंना वळून ती कुठे दिसतेय का ते पाहू लागतो. त्या तिघींवर नजर जाण्यापूर्वी त्याची दृष्टी आकाशाकडे वळते आणि वरून उडणारी एक बगळ्याची माळ त्याला दिसते. तो लगेच उदयनाला ते सुंदर दृश्य दाखवतो. इतक्यात दासीला सुद्धा ते बगळे दिसतात व ती त्या दोघींना ते दृश्य दाखवते. सर्वजण एकाच ठिकाणी पाहू लागतात. बगळ्यांकडे पाहत असताना दासीची दृष्टी खाली जाते व तिला उदयन व वसंतक दिसतात.

इथे आपल्याला वाटायला लागतं, झालं, आता दासी त्या दोघांना हाक मारणार आणि वासवदत्ता उदयनाला दिसणार आणि त्यांचं बिंग फुटणार. पण तसं होत नाही. पद्मावतीला आठवतं की वासवदत्तेला परपुरुषदर्शन वर्ज्य आहे. त्यामुळे ती वासवदत्ता आणि दासीसोबत लतामंडपात शिरते. त्याच्यावरून वेली सोडल्या असल्यामुळे त्यांच्या आड लपलेल्या त्या तिघी त्या दोघांना दिसणार नाहीत, पण ते दोघं मात्र त्यांना दिसतील, त्यांचं बोलणं ऐकू येईल.

इतक्यात ते दोघं त्याच शिळातलापाशी येतात. तिथे प्राजक्ताची फुले ठेवलेली पाहिल्यावर पद्मावती इथे येऊन गेली असली पाहिजे असा तर्क ते करतात व तिथेच तिची वाट पाहत बसून राहतात. त्यामुळे त्या तिघी मंडपातच अडकून राहतात.

पण सलग ५ मिनिटांत एकही घोळ घातला नाही, तर तो वसंतक कसला? शिळेवर बसतो ना बसतो तोच परत उठून तो उदयनाला म्हणतो, ‘चल रे, इथे फार उन्ह आहे, आपण त्या लतामंडपात जाऊया.’ उदयनालाही मित्रावर फारच प्रेम! तो लगेच मंडपाकडे जायला उठतो. आता आली का पंचाईत! ते दोघे मंडपाजवळ येतात. वसंतक वेली बाजूला सारून आत येणार…… तोच आपली चतुर दासी डोकं लढवते आणि जवळच्या वेली गदागदा हलवते. त्यावर बसलेले भुंग्यांचे थवेच्या थवे त्या दोघांच्या दिशेने उडू लागतात. वसंतक घाबरून मागे हटतो. पण ते भुंगे आहेत हे कळयावर एक दोन शिव्या हासडतो. (संस्कृतात शिव्या आहेत बरं!)

त्यावर त्याला थांबवण्यासाठी उदयन जे काही म्हणतो, तो या नाटकातला माझा सर्वांत आवडता संवाद आहे. तो म्हणतो,’ अरे नको रे त्या भुंग्याना त्रास देऊस. पहा तरी,

मधुमदकला मधुकरा मदनार्ताभि: प्रियाभिरुपगूढा:।

पादन्यासविषण्णा वयमिव कान्तावियुक्ता: स्यु:॥’

म्हणजे, ‘मधाच्या धुंदीत गोड गुणगुणणाऱ्या मधुकरांना त्यांच्या प्रेमविव्हल प्रिया बिलगून बसल्या आहेत. आपल्या पावलांच्या आवाजाने ते बिचकतील आणि आमच्याप्रमाणे त्यांनाही कांतेचा वियोग होईल!’

प्रेमात पडलेल्या माणसाचं हृदय कोमल होतं, असं म्हणतात ते खरं असावं बहुधा!

उदयन आणि वसंतक परत माघारी वळतात पण बागेबाहेर जात नाहीत, त्याच शिळातलावर जाऊन बसतात. हा सगळा प्रसंग चाललेला असताना वासवदत्तेचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अडकला असणार. पण उदयनाच्या नजरेस पडण्याचा हा प्रसंग टळल्यावर तिला हायसं वाटतं, ती उदयनाचं निरीक्षण करते आणि त्याची तब्येत सुधारल्याबद्दल तिला बरं वाटतं. इतक्या दिवसांनी पतीचं दर्शन झालं, दोघा नवरा-बायकोत अंतर जेमतेम काही फुटांचं, तरीही ती त्याला भेटू शकत नाही, या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी येतं. इतर दोघींच्या ते लक्षात आल्यावर भुंग्यांमुळे फुलांतले परागकण उडून डोळ्यात गेले अशी सबब ती सांगते.

मी मगाशीच म्हटलं ना, ५ मिनिटे शांत बसेल तो वसंतक कसला? इकडे तिकडे पाहून आसपास कुणी नाही याची खात्री करून घेऊन तो उदयनाला एक प्रश्न विचारतो,’ तुला कोण आवडते, त्या वेळची राणी वासवदत्ता की सध्याची राणी पद्मावती?’ अर्थातच या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी उदयन खूप आढेवेढे घेतो. कोणत्याही राणीच्या बाजूने बोलला तरी पंचाईत. त्यावर वसंतक म्हणतो, ‘अरे बिन्धास्त सांग रे, त्यातली एक देवाघरी गेली आहे आणि दुसरी आता इथे नाही.’ (हे वाक्य हशात भर पाडतं, कारण त्या दोघी बाजूलाच उभं राहून हे ऐकतायत.) इथे त्या दोघींचा जीव टांगणीला- काय उत्तर देणार उदयन? आतून दोघींनाही उदयनाने आपलं नाव घ्यावंसं वाटतंय पण तो आपलं सोडून दुसरीचंच नाव घेईल अशी भीतीही वाटतेय. उदयन मात्र वसंतकाला सांगितलं आणि ते गुपित त्याच्या पोटात राहिलं नाही तर काय घ्या, म्हणून काहितरी डिप्लोमॅटिक उत्तर शोधतो आहे.

अखेर कुठलाच मार्ग सापडत नाही व वसंतकही माघार घेत नाही हे पाहून उदयन त्याला खरं ते सांगतो. तो म्हणतो, ‘रुप, चारित्र्य, माधुर्य यांमुळे मला पद्मावतीबद्दल अत्यंत आदर आहे. पण वासवदत्तेच्या ठिकाणी गुंतलेलं माझं मन काही ती ओढून नेऊ शकत नाही.’

यावर तिघी त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे प्रतिक्रिया देतात. वासवदत्ता आनंदून जाते. तिच्या सगळ्यां दु:खांचं, कष्टांचं चीज झाल्यासारखं तिला वाटतं. दासी मात्र चिडते, ‘ही काय रीतभात झाली?’ पण पद्मावती तिची समजूत काढते. ती म्हणते, ‘अगं वासवदत्तेला ते विसरलेले नाहीत म्हणजे त्यांचं खरं प्रेम असलं पाहिजे’ असा खरं प्रेम करणारा पती मला मिळाला असं पद्मावतीला अभिप्रेत असतं, पण ते प्रेम तिच्यावर केलेलं नसतं याचं तिला दु:ख वाटत असलं , तरी ती दाखवत नाही.

मग उदयन वसंतकाला तोच प्रश्न विचारतो. वसंतक एक नंबरचा खादाड! तो म्हणतो, ‘वासवदत्तेबद्दल मला आदर आहेच, पण पद्मावती नेहमीच माझ्यासाठी तुपातले पदार्थ बनवते मग सगळीकडे मला शोधत फिरते आणि मी भेटलो, की मोठ्या प्रेमाने मला ते खायला देते. म्हणून मला पद्मावती आवडते.

वासवदत्ता मनातल्या मनात ‘अस्सं काय बच्चमजी!’ म्हणते तर उदयन वासवदत्ता वारल्याचे क्षणभर विसरून ‘थांब आता वासवदत्तेलाच सांगतो’ असं म्हणतो. विदूषक बावळट पुन्हा घोळ घालतो, ‘ वासवदत्ता? कुठे आहे ती? ती तर कधीच मेली’ असं वेड्यासारखं बडबडतो. (तेव्हा तो शिळातल उचलून त्याच्या डोक्यात घालावासा मला वाटतो) ते ऐकून उदयनाला खूप वाईट वाटतं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. वासवदत्तेला मात्र पदोपदी असे उदयनाच्या आपल्यावरच्या प्रेमाचे दाखले मिळाल्यामुळे भयंकरच आनंद झालेला असतो, आपल्या प्रियकराने आपण जवळ नाही असं समजून तिसऱ्याकडे आपलं गुणगान करून आपल्यावरच्या प्रेमाची कबुली द्यावी, प्रेयसीसाठी यापरती दुसरी आनंदाची गोष्ट कोणती?

इथे उदयनाला मात्र पुन्हा एकदा दु:खाचा उमाळा आलेला असतो, अश्रुंनी त्याचा चेहरा भिजून जातो म्हणून वसंतक पाणी आणायला जातो तर आपल्याला या अवस्थेत कुणी पाहू नये म्हणून उदयन चेहरा उपरण्याने झाकून घेतो. ही संधी साधून वासवदत्ता आणि दासी तिथून सटकतात, तर पद्मावती आपला पती दु:खात असताना आपण त्याच्याबरोबर असावं असा विचार करून त्याला धीर द्यायला जाते.

इतक्यात वसंतक येतो. त्याने इतके घोळ घातल्यावर पद्मावती त्याला बरी सोडेल! त्याचा रस्ता अडवून काय रे कुठे गेलेलास, हे पाणी कशासाठी असं विचारते. वसंतकाचं ततपप होतं, त्यावर ती ‘न अडखळता बोल’ असं म्हणते. (हा भाग वाचताना पद्मावती हाताची घडी घालून एक पाय जमिनीवर हळूहळू आपटत दरडावून त्याला विचारते आहे असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं) मजा म्हणजे त्यावर वसंतक वासवदत्तेने सांगितलेली परागकणांचीच सबब सांगतो. नंतर ते उदयनालाही जाऊन सांगतो आणि उदयन तेच नाटक करतो. मग तिघे एकत्र दर्शकाला भेटण्यासाठी निघून जातात आणि पडदा पडतो.

प्रतिज्ञायौंगधरायणापासून ज्याची चर्चा चाललेली असते, तो उदयन अखेर या अंकात रंगमंचावर अवतरतो. त्याचा हा प्रवेश त्याची भावनाप्रधानता, संवेदनशीलताच अधोरेखित करतो. या अंकात वासवदत्तेला उदयनाच्या प्रेमाची साक्ष पटली आहे. पण उदयनाच्या हृदयला दिलासा कसा मिळणार? ते पुढच्या अंकात.

Recap :D

आधीच्या भागात लिहीताना फारच गुंतागुंत झाली बहुधा. म्हणुन पहिल्या अंकातलं कथानक अगदी थोडक्या शब्दांत-

राजा उदयन त्याची राणी वासवदत्ता हिच्यावरच्या आत्यंतिक प्रेमापुढे राज्यकारभाराला दुय्यम स्थान देतो व परिणामी बरंचसं राज्य हातातून जातं. उदयनाला प्रेमातून बाहेर काढून राज्यकारभारात पुन्हा लक्ष घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचा अमात्य यौगंधरायण स्वत:च्या व वासवदत्तेच्या मृत्युचं नाटक करतो. ते दोघे वेषांतर करून अज्ञातवासात जातात. एका तपोवनात आले असता त्यांना मगधराजकन्या ‘पद्मावती’ भेटते. वासवदत्ता ही स्वत:ची प्रोषितभर्तृका (जिचा नवरा परगावी गेला आहे अशी स्त्री) बहिण असून तिचा सांभाळ करण्याची विनंती यौगंधरायण पद्मावतीला करतो. ती मान्य झाल्यावर वासवदत्ता पद्मावतीच्या सखीपरिवारात सामिल होते.

आता पुढे-

अंक दुसरा

हे दृश्य मगधदेशातलं- राजकुमारी पद्मावतीच्या राजमहालातलं. पद्मावती तिच्या सख्यांसोबत बागेत खेळते आहे. ४ मैत्रिणी एकत्र आल्या की काय होणार? एकमेकींची थट्टा मस्करी! त्यात पद्मावती तर उपवर झालेली. मग काय विचारता, तिच्या खेळण्यावरून, तिच्या कोमल हातांवरून, तिच्या सौंदर्यावरून वासवदत्ता पद्मावतीची थट्टा करते आहे. मस्करीत वासवदत्ता तिला प्रद्योत महासेनाची भावी सून म्हणून हाक मारते. तेव्हा वासवदत्तेला कळतं की पद्मावतीच्या मनात त्या देशाशी सोयरीक जुळवणं नाही. ‘मग कोणता राजा मनात भरला पद्मावतीच्या’ या तिच्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर धक्कादायक असतं- राजा उदयन! त्याचा संवेदनशील आणि मायाळू स्वभाव पद्मावतीला आवडलेला असतो.

तेव्हा दुसरी एक दासी पद्मावतीला चिडवत म्हणते, ‘पण ताईसाहेब, महाराज उदयन दिसायला बरे नसले तर?’ त्यावर वासवदत्ता पटकन बोलून जाते- ‘ छे, छे, सुंदरच आहेत’. हे शब्द तोंडून बाहेर पडल्यावर वासवदत्तेच्या लक्षात येतं की आपण भावनेच्या भरात मोठी चूक केली, कारण विवाहित स्त्रीयांना परपुरुषदर्शन वर्ज्य. मग ‘उज्जयिनीतली सारीच माणसं तसं म्हणतात, म्हणून मला माहित’ असं सांगून सारवासारव करते.

इतक्यात पद्मावतीची दाई रंगमंचावर प्रवेश करते. ती आलेली असते एक आनंदाची बातमी घेऊन- पद्मावतीचा साखरपुडा झाल्याची- तोही उदयनाशी! हे ऐकून वासवदत्ता पहिला प्रश्न विचारते तो उदयनाच्या खुशालीबद्दल. त्याचं कुशल आहे हे कळल्यावर मात्र ती ‘अरे देवा हे काय झालं!’ असं म्हणून जाते. मग पुन्हा स्पष्टीकरणं देणं आलं. ‘नुकतीच एक पत्नी गेल्यावर लगेच दुसरं लग्न ते करतील असं वाटलं नव्हतं’ असं म्हणून आपल्या दु:खाला वाट करून देते. पण उदयनाने वासवदत्तेला मागणी घातली नव्हती, ऊलट दर्शकाने स्वत:च आपल्या बहिणीसाठी उदयनाला मागणी घातली हे कळल्यावर तिला थोडंसं बरं वाटतं. म्हणजे उदयनाचं वासवदत्तेवरचं प्रेम अगदीच काही आटलं नसावं!

मग त्याच दिवशी शुभ नक्षत्र असल्याने ‘शुभमंगल’ करायचं ठरतं आणि पडदा पडतो.

तिसरा अंक

तिथे महालात राजकन्येच्या विवाहाचा जंगी उत्सव चालू आहे, दास्यांपासून राजापर्यंत सगळे खूश आहेत, पण वासवदत्ता मात्र एकाकी कोपऱ्यात बसून दु:ख करते आहे. ज्याच्या भल्यासाठी तिने हे विरहाचं दु:ख स्वत:च्या हातांनी स्वत:वर ओढवून घेतलं तोच आता तिला परका झाला. आता हा जीव सांभाळून काय करायचं! पण प्राण काही जात नाही, उदयनाच्या दर्शनाच्या आशेत अडकला आहे.

इतक्यात एक दासी तिला शोधत शोधत येते. ती सांगते की वासवदत्तेने पद्मावतीच्या विवाहाची माला गुंफावी अशी खुद्द पद्मावतीची इच्छा आहे. वासवदत्तेला आपलं दैवच आपल्या विरुद्ध गेलं आहे असं वाटू लागतं.

माला गुंफताना एकीकडे ती उदयनाची चौकशी करू लागते, ते ठीक आहेत ना, दिसायला कसे आहेत असे प्रश्न विचारते. पण लगेच आवरतं घेते कारण असे प्रश्न विचारणं म्हणजे परपुरुषाबद्दल कुतुहल दाखवणं होतं ना! मग ती मालेत गुंफायची एकेक वनस्पती हातात घेऊन ‘ही कोणती’ असं दासीला विचारते. त्यातल्या एका वनस्पतीचं नाव असतं ‘अविधवाकरण’ – म्हणजे जिच्यामुळे स्त्रीला वैधव्य न येता तिचं सौभाग्य टिकून राहतं ती. वासवदत्ता लगेच भरपूर अविधवाकरण घेऊन मालेत गुंफते. पुढची वनस्पती असते ‘सपत्नीमर्दन’ म्हणजे सवतीचा काटा काढणारी. त्यावर वासवदत्ता म्हणते ‘ही वनस्पती गुंफून काय उपयोग? पद्मावतीची सवत तर या जगात नाही ना’

माला गुंफून झाल्यावर दासी लगबगीने मंडपाकडे निघते आणि वासवदत्ता सोहळ्यापासून दूर!

पडदा पडतो

असे एकामागून एक नाट्यपूर्ण प्रसंग भास आपल्या अंकमालेत गुंफतो. खरं म्हणजे हे २ अंक खूपच छोटे आहेत. शिवाय या अंकांतून ज्या घटनेबद्दल माहिती मिळते- म्हणजे उदयन- पद्मावती यांचं लग्न, ते प्रत्यक्षात रंगमंचावर घडतच नाही. अशावेळी इतर नाटककार अंकाऐवजी एखादा प्रसंग योजून त्यात बिनमहत्त्वाच्या पात्रांकरवी (उदा.- दासी, शिपाई इ.) रंगमंचावर ज्या घटना दाखवायच्या नाहीत पण त्यांची थोडक्यात माहिती करून द्यायची आहे त्या घटना त्या पात्रांच्या संवादांतून प्रेक्षकांना कळवतात. पण भासाने मात्र इथे तसं केलेलं नाही. कारण उघड आहे. त्याच्या नाटकाची नायिका आहे वासवदत्ता आणि तिच्या मनातली वेगवेगळी आंदोलनं त्याला टिपायची आहेत. त्यामुळे त्याने या महत्त्वाच्या घटना पडद्याआड ठेवल्या आणि वासवदत्तेच्या स्वगत/ प्रकट संवादांतून तिच्या मनोवस्थेचं खूप सुंदर चित्रण केलं आहे. उदयन आता परका झाला याचं तिला दु:ख वाटतंय खरं, पण तिने त्याचा स्वीकार केला आहे. ही प्रक्रिया इतकी सहज नाही. ती आधी स्वत:ला सगळ्यांपासून तोडते. दूर जाऊन एकटीच बसते. दैवगती तिला एकटं सोडत नाही. नेमकं पद्मावतीची विवाहमाला बनवण्याचं कामच तिच्यावर सोपवण्यात येतं. ती मनावर दगड ठेवून ते काम सुद्धा पार पाडते. तिच्या मनात एकदाही पद्मावतीविषयी रागाची भावना निर्माण होत नाही. त्या दोघीचं आयुष्य आता समांतर चालणार आहे, तेव्हा दोघींसाठी योग्य होईल अशा तऱ्हेने ती विवाहमाला गुंफते. पण यामुळे तिचं दु:ख काही थांबत नसलं तरी त्यात विखारीपणा नक्कीच येत नाही. वासवदत्तेच्या मनोव्यापारातले हे टप्पे भासाने अचूक पकडले आहेत.

ता.क.- आज योगायोगाने मी या ब्लॉगवरचे जुने पोस्ट्स वाचत होते आणि लक्षात आलं की आजच या ब्लॉगला सुरू करून एक वर्ष झालं. ब्लॉगवर लिहून आणि इतक्या लोकांना हा ब्लॉग वाचताना पाहून, त्याचे प्रतिसाद वाचून छान वाटलं. अशीच ब्लॉगला भेट देत रहा :)

तपोवनाचा शांत परिसर. त्याच्या मधोमध उभ्या २ व्यक्ती- संन्यासाचा वेश धारण केलेला एक पुरुष आणि त्याच्यासोबत अवंती नगरीतल्या स्त्रियांसारखी वेषभूषा केलेली एक स्त्री. या दोन व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द यौगंधरायण आणि वासवदत्ता आहेत. वेषांतर करून एका तपोवनात आले आहेत.

इतक्यात कुठूनतरी आरडाओरडा ऐकू येतो- ‘बाजूला व्हा, दूर हटा’. इथूनच तुम्हाला भासाचं एक वेगळं वैशिष्ट्य दिसून येईल. ते म्हणजे त्याने त्याच्या पात्रांच्या मनोव्यापारांवर व त्यातून उद्भवणाऱ्या प्रतिक्रियांवर भर देणे. इथेही गोष्ट तशी साधीशीच आहे. आश्रमातल्या तपस्वीजनांवर काही लोक दमदाटी करत आहेत. पण याला नाटकातली वेगवेगळी पात्रे कशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात पहा.

यौगंधरायण हा एक प्रजासेवक, एक क्षत्रिय, प्रजेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य मानणारा. त्याला ते दमदाटी करणारे लोक थोड्याशा सत्तेने मुजोर झालेले, धर्मा-अधर्मात फरक न करणारे वाटतात. कारण फळं, वल्कलं, गवताची झोपडी एवढ्याच किमान गरजा असणाऱ्या निरुपद्रवी तपस्वीजनांना त्रास देणे हा अधर्म आहे असं त्याचं म्हणणं.

वासवदत्ता मात्र लहानपणापासून लाडात वाढलेली राजकन्या. २-३ सेविका सतत तिच्या मागेपुढे करत असणार. ती रस्त्यावरून अंबारीतून जाताना सगळे प्रजाजन लवून तिला नमस्कार करत असणार. अशा राजकन्येला आपल्याला कुणी सर्वसाधारण स्त्री म्हणून बाजूला लोटलेलं कसं चालेल? तिला हा स्वत:चा अपमान वाटतो आणि इतर कोणत्याही वेदनेपेक्षा भयंकर वाटतो. तेव्हा यौंगधरायण ‘हाही काळ जाईल, सुखाचे दिवस येतील. आपण पुन्हा अशाच अंबारीत विराजमान होऊन स्वत:च्या राज्यात परत जाल’ अशा शब्दांनी तिचं सांत्वन करतो.

इतक्यात एक कांचुकीय (राजस्त्रीयांचा सेवक) येऊन दमदाटी करणाऱ्या त्या लोकांना थांबवतो. तपस्वीजनांना असा उपद्रव दिल्याने त्यांच्या राजाच्या नावाला कलंक लागेल असं तो म्हणतो. एखाद्या राजसेवकाला आपल्या राजाच्या कीर्तीची काळजी असणारच. यौगंधरायण त्याला ‘हा सगळा काय प्रकार चाललाय’ असं विचारतो. तेव्हा कांचुकीयाकडून आपल्याला कळतं, की तो मगधराजा- ‘दर्शक’ याचा सेवक. त्याच्या मातोश्री म्हणजे मगधदेशाच्या राजमाता ‘महादेवी’ या आश्रमात राहतात. त्यांना भेटायलाच दर्शकाची बहिण ‘पद्मावती’ तपोवनात आली आहे. तिच्या सेवकांनी दमदाटी करून खराब केलेली तिची ‘इमेज’ सुधारण्यासाठी तो लगेच, ‘आमच्या राजकुमारी फार धर्मप्रिय आहेत, त्यांच्यामुळे आपल्या धर्मकार्यात बाधा यावी अशी त्यांची मुळीच इच्छा नाही.’ अशा छापाची सारवासारव करतो.

इतक्यात पद्मावती रंगमंचावर प्रवेश करते. आधीच ती राजकन्या आहे हे कळल्यावरच वासवदत्तेला आपली नातलग भेटल्यासारखा आनंद झालेला असतो. मग पद्मावतीचं देखणं, उच्चकुलीन रूप, नम्र आणि गोड वाणी पाहून ती वासवदत्तेला अधिकच आवडू लागते. त्यातच वासवदत्तेच्या भावासाठी पद्मावतीला मागणी घातली गेली आहे हे तिच्या कानावर पडतं. आणि अशी कुलीन, देखणी, नम्र राजकन्या आपली वहिनी होणार या कल्पनेने आनंदून जाते. पद्मावतीविषयी तिला अधिकच प्रेम वाटू लागतं.

यौंगधरायण मात्र हाडाचा राजकारणी. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. उदयन राजाबद्दल राजज्योतिषांनी केलेलं भाकित त्याला आठवतं. त्या भाकिताप्रमाणे या मगध देशाची राजकन्या म्हणजे पद्मावती हिच्याशी उदयनाचं लग्न होणार असतं. हे आठवून आपल्या राजाची (दुसरी) पत्नी म्हणून तिच्याविषयी त्याला आपुलकी आणि आदर वाटू लागतो.

अशातच आपल्या सेवकांनी केलेल्या दमदाटीची नुकसानभरपाई म्हणून की काय माहित नाही, पण पद्मावती ‘प्रत्येकाने त्याला जे हवे ते मागून घ्यावे, त्याची इच्छा पूर्ण केली जाईल’ असं जाहिर करते. ते ऐकून यौगंधरायणाच्या डोक्यातली चक्रं वेगाने फिरू लागतात. काय करायचं ते ठरल्यावर तो पद्मावतीला एक विनंती करतो. तो म्हणतो,- ‘ही (म्हणजे अवंतिकेच्या वेषातली वासवदत्ता) माझी बहिण. हिचा पती बाहेरगावी गेला आहे आणि तिच्या चारित्र्यरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण मी हा असा भणंग संन्यासी. तिची काळजी कशी बरं घेऊ शकणार. आपण तर चतुर आणि धर्माचरणी आहात. आपण जर काही दिवस हिचा सांभाळ केलात, तर ती व तिचं चारित्र्य खचितच सुरक्षित राहिल’.

ही विनंती मान्य करणं फारच जोखमीचं असलं तरी दिलेला शब्द पाळायचा म्हणून पद्मावती ही जोखीम पत्करते आणि वासवदत्तेची रवानगी पद्मावतीच्या सखीपरिवरात होते. ही विनंती करताना यौगंधरायण वासवदत्तेला एक अक्षरानेही काही विचारत नाही किंवा त्याच्या कृतीचं स्पष्टीकरणही देत नाही. पण त्याच्यावरच्या गाढ विश्वासाने वासवदत्ता जे घडेल त्याचा निमूट स्वीकार करत असते.

पण या विनंतीमागे यौगंधरायणाचा नक्की हेतू काय? वासवदत्तेची जबाबदारी नाकारून तिला वाऱ्यावर सोडून देणं? नाही. त्याचा राजज्योतिषांवर पक्का विश्वास असतो. या पद्मावतीचंच पुढे उदयनाशी लग्न होणार हे तो गृहित धरून चाललेला असतो. या पद्मावतीच्या सखीपरिवरातच वासवदत्ता राहिली, तर पुढे उदयन- वासवदत्ता यांच्या पुनर्भेटीच्या वेळी वासवदत्तेच्या शुद्ध चारित्र्याची ग्वाही पद्मावती स्वत: देईल. शिवाय आता वासवदत्ता त्याच्यासोबत नसल्याने त्याला पुन्हा एकदा त्याच्या योजनेतल्या इतर सोबत्यांशी संपर्क साधून उदयनाला अप्रत्यक्षपणे राजकारणात मदत करता येईल.

नाटक सुरू झाल्यापासून ‘हे सगळं चाललंय काय? वासवदत्ता आणि यौगंधरायण वेषांतर करून तपोवनात का आलेत?’ असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रसंगात मिळतं. एक ब्रह्मचारी रंगमंचावर प्रवेश करतो. प्रवासामुळे थकून जाऊन थोडी विश्रांती घ्यायच्या उद्देशाने तो तपोवनात येतो. त्याची विचारपूस करताना सर्वांना समजतं की हा ब्रह्मचारी लावाणक नावाच्या गावी शिक्षण घेण्यसाठी गेला होता. तो आता शिक्षण अर्धवट टाकून मगधदेशात चालला आहे. त्याचं कारण विचारलं असता त्याच्या गावावर एक संकट कोसळलं असल्याचं तो सांगतो. त्या गावात त्यांचा राजा उदयन त्याची राणी वासवदत्ता हिच्यासोबत रहात होता. तो शिकारीसाठी गेला असताना गावात आग लागून त्यात वासवदत्ता होरपळून गेली व तिला वाचवण्यासाठी गेलेला अमात्य यौगंधरायणही जळून खाक झाला. राजाच्या प्रियजनांचा मृत्यु म्हणजे मोठं संकटच!

आता आपल्या डोक्यात प्रकाश पडतो, की उदयनाने पुन्हा राज्यकारभारात लक्ष घालावं म्हणून वासवदत्ताच्या मृत्युची आवई उठवली जाते. आणि अज्ञातवासादरम्यान तिच्या रक्षणार्थ कुणी विश्वासू व्यक्ती तिच्यासोबत असावी यासाठी यौगंधरायणानेही तिच्यासोबत जावं म्हणून तोही त्यात गेल्याचं सांगितलं जातं.

ब्रह्मचाऱ्याच्या तोंडून त्या प्रसंगाबद्दल ऐकताना वासवदत्तेला पुन्हा उदयनाच्या विरहाचं दु:ख जाणवू लागतं. इथे ब्रह्मचारी पुढची – वासवदत्ता आणि यौगंधरायणाला माहित नसलेली हकीगत सांगू लागतो- त्या दोघांच्या मृत्युचं वृत्त ऐकून उदयन दु:खाने वेडापिसा होतो. त्याच आगीत स्वत:चे प्राण देण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न करतो. पण इतर मंत्री नानाप्रकारे त्याला आगीपासून दूर ठेवतात. मधेच त्याला वासवदत्तेचे अर्धवट जळलेले दागिने दिसतात, ते हृदयाशी कवटाळून तो जमिनीवर गडबडा लोळू लागतो आणि अखेर त्याची शुद्ध हरपते. शुद्धीवर आल्यानंतरही तो वासवदत्तेला ‘अगं प्रिये, अगं प्रियशिष्ये’ अशा हाका मारत आक्रोश करत राहतो. ‘इथे मी तिच्यासोबत हसलो, इथे बसून तिच्याशी बोललो’ असा शोक तो करत असतो. त्याचा विलाप पाहून ब्रह्मचारी म्हणतो- ‘धन्या सा स्त्री यां तथा वेत्ति भर्ता, भर्तृस्नेहात्सा हि दग्धाप्यदग्धा।’ म्हणजेच ज्या स्त्रीसाठी तिच्या पतीने असा शोक केला ती धन्य होय. ती प्रत्यक्षात जरी जळून मेली असली तरीही तिच्या पतीच्या हृदयातली तिची प्रतिमा कधीच नष्ट होणार नाही. म्हणूनच ती ‘दग्धा’ असली तरीही ‘अदग्धा’च!

ही हकीगत ऐकल्यावर उदयनाला आपल्यामुळे किती दु:ख झालं हे पाहून वासवदत्तेला आणखीनच वाईट वाटतं. तो बेशुद्ध पडल्याचं ऐकून तर अधिकच. पण त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून या दु:खातही थोडासा दिलासा मिळतोच. वृत्तांतकथन चालू असताना वासवदत्तेच्या तोंडी असलेल्या छोट्याशा संवादांतून, तिच्या रडण्यातून, भास या संमिश्र भावनांचं छान चित्रण करतो. इथे पद्मावतीला उदयनाची ही संवेदनशीलता, वासवदत्तेवरचं प्रेम पाहून त्याच्याबद्दल आपुलकी, काळजी वाटायला लागते.

या कथनाचा प्रत्येक पात्रावर वेगवेगळा परिणाम होतो. नंतर प्रत्येकजण आपापल्या नगरात / घरात परत जातो आणि पहिला अंक संपतो.

या अंकातली सर्वात मोठी irony म्हणजे त्यात ज्या २ व्यक्तींच्या मृत्युचं वर्णन केलं गेलं आहे त्या दोन व्यक्ती रंगमंचावरच उपस्थित आहेत आणि आपल्याच कानांनी आपल्याच खोट्या मृत्युचं वर्णन ऐकतायत. या प्रसंगातच किती नाट्यपूर्णता आहे!

पुढच्या अंकात वासवदत्ता पद्मावतीच्या राजमहालात गेल्यावर कथेला एक वेगळंच पण काहीसं अपेक्षित वळण मिळतं. तो कथाभाग पुढल्या भागात!

« Newer Posts - Older Posts »