नमस्कार मंडळी,
मला ओळखणाऱ्या लोकांना माझं दिव्य (!) पाककौशल्य ठाऊक आहेच. त्यात माझं पाककलेवरचं प्रेम किती उतू जातं, तेसुद्धा माहित असेलच. साधं ब्रेड-आम्लेट बनवतानाही माझी गत ’काढायला गेले मोर आणि झाला कावळा’ अशी असते. पर अब ये बात पुरानी हुई! मी आज चक्क स्वत:चं डोकं लढवून मनात येईल तसा पिझ्झा बनवला आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चवीला चांगला झाला. मी स्वत:वरच खूश झाले. गेला अर्धा तास त्याचाच विचार केल्यावर आता ’ ’मोनिका’ला सुद्धा इतका चांगला पिझ्झा बनवता यायचा नाही’ या निष्कर्षाप्रत मी पोहोचले आहे.
माझ्यासारख्या एक्सपर्ट कुकच्या या नव्या रेसिपीचा फायदा माझ्या निष्ठावान वाचकांनाही व्हावा, म्हणून खास तुमच्यासाठी ही पाककृती येथे देत आहे. जल्दी किजीए ये ऒफर सीमित है!
साहित्य-
पिझ्झा बेस
मॅगीचा ओरिएंटल सॉस
छोट्या आकाराचे मश्रूम्स
बोनलेस चिकन
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
पुदिना
लसूण
आलं
मीठ
हळद
तिखट
कांदा
चीझ
कृती-
सर्वप्रथम चवीनुसार मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि आलं मिक्सरमधे टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी. मग चिकनचे चौकोनी आकाराचे थोडे पातळ तुकडे करून घ्यावेत. मग त्या तुकड्यांना पेस्ट लावून ते मुरत ठेवावेत. मग मश्रूम्स घेऊन त्याचे उभे पातळ काप करावेत. कांद्याच्याही आडव्या चकत्या कराव्यात.
आता एक सळई घेऊन त्यात चिकनचे तुकडे अडकवून ते चांगले भाजून घ्यावेत.
मग पिझ्झा बेस घेऊन त्यावर सॉस लावावा. मग त्यावर मश्रूमचे काप , कांद्याच्या चकत्या (किंवा नुस्त्याच त्याच्या रिंग्ज) आणि चिकनचे भाजलेले तुकडे हे सर्व लावावे / रचावे / मांडावे. मग त्यावर थोडे चीझ किसून घालावे. आता हा पिझ्झा मायक्रोवेव्ह मधे ठेऊन २ मिनिटांसाठी गरम करावा किंवा नॉन स्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर खालची बाजू ब्राऊन होईपर्यंत गरम करावा, की झाला पिझ्झा तयार. (दुसरी पद्धत अवलंबल्यास पिझ्झा कुरकुरीत होतो असा अनुभव आहे.)
काय मग कशी वाटली माझी पाककृती? केवळ ’छान वाटली’ असेच प्रतिसाद पाठवावेत. ’काही खास नाही बुवा’ अशा आशयाचे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ’ही पाककृती आधी कुठेतरी वाचली आहे’ अशा छापाचे प्रतिसाद मुळीच पाठवायचे नाहीत!
tuzi pizza chi recipe chaan aahe.. ani 1st time pizza try karun chaan zala mhanaje zakas ch ki..tu jar pizza cha photo lawla aastas tar ajun jara majja aali aasati
अर्चना,
मी नॉनव्हेज अपवादानेच खातो त्यामुळे हे article एकदम strike झाले नाही अभिप्राय देताना! कोणी आयते करून दिले तर मी आवडीने खाईन.